Login

साज़िश: गॅम्बल ऑफ लव्ह (भाग-२६)

अगस्त्य आणि अधिराने केला प्रेमविवाह, दोघेही एकत्र खूप खूश; पण एकाएकी अधिराचा झाला खून आणि हत्येच्या आरोपाखाली अगस्त्यला झाली अटक! अख्खा महाराष्ट्र त्याच्याविरोधात असताना त्याची मैत्रीण—गाथिकाने त्याची केस लढण्याचा घेतला निर्णय. कोणती रहस्ये उलगडेल हा खटला? या रक्तरंजित खेळाचा सूत्रधार अगस्त्य असेल की आणखी कोणी? जाणून घेण्यासाठी वाचा "साज़िश: Gamble Of Love"
"ओय सस्पेन्स क्रिएटर, नुसता हसणारच आहेस की सांगशीलही गिफ्ट काय आहे ते..." गाथिका म्हणाली.

"सांगतो, सांगतो." प्रनिश म्हणाला. अगस्त्यही हाताची घडी घालून त्यालाच बघत होता.

"अगस्त्य, खरं सांगायचं तर तू हिटलर आहेस म्हणून मी तुला तुझा क्रूरपणा दाखवण्यासाठी आरसा देणार होतो..." प्रनिश बोलला, तसे अगस्त्यने डोळे बारीक केले.

"नशीब समज मी तुझ्यासारखा जहाल नाही म्हणून डिजिटल घड्याळ देतोय. सकाळी लेट आला होतास ना म्हणून हे घे डिजिटल घड्याळ. हे घड्याळ तुला सारखं रिमाइंडर देत राहील." प्रनिश टोमणा मारत म्हणाला. त्यावर सगळे ओठ दाबून हसले.

"माझ्याकडून सेकंड गिफ्ट आहे, वुडन म्युझिक बॉक्स." प्रनिशने सांगितले, सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.

"यातलं सॉफ्ट म्युझिक ऐक... कदाचित हिटलरवाद विसरून तू मवाळ होशील." प्रनिशने परत एकदा टोमणा मारला आणि सगळे परत एकदा हसले.

"स्वतःच्या ॲक्टिंगवर लक्ष द्यायला नको; पण मला टोमणे मारायला विसरू नको." अगस्त्यनेही तोडीसतोड टोमणा मारला.

"बस काय भावा! तो तर आपला मैत्रीसिद्ध अधिकार आहे ना!" प्रनिश दात काढत म्हणाला.

"ह्म्म. थॅंक यू. दोन्ही गिफ्ट्स छान आहेत." अगस्त्य प्रनिशला मिठी मारत म्हणाला.

आता रजनीशने दोन भेटवस्तू बाहेर काढल्या.

"माझ्याकडून पहिलं गिफ्ट आहे बूक नूक मिनिएचर! तुला एस्थेटिक वस्तू आवडतात ना... आणि काल-परवाच असं बूक नूक मिनिएचर मी तुला ऑनलाईन शोधताना बघितलं होतं. तू अजून घेतलं नव्हतंस म्हणून मीच दिलं." रजनीशने पहिली भेटवस्तू दिली.

"थॅंक यू! खूप छान आहे!" अगस्त्य सगळ्यांच्या भेटवस्तू बघून भारावला होता.

"दुसरं गिफ्ट काय आहे?" मयंकने कुतुहलाने विचारले.

"याला काहीही सुचतं ना..." रजनीश बोलतच होता की अगस्त्यने भुवया उंचावल्या.

"काहीही म्हणजे?" अगस्त्यने नजर रोखली.

"अरे काहीही म्हणजे नवीन, युनिक... मला बोलू तरी दे..." रजनीशने स्पष्टीकरण दिले.

"हा बोल..." अगस्त्य शांत झाला.

"तुला नवनवीन कॉन्सेप्ट सुचत असतात आणि बरेचदा तुला विसरायलाही होतं तर आजपासून ही डायरी आणि हा फाऊंटेन पेन वापर. तुझ्या स्क्रिप्ट्स यात लिहून ठेवत जा." रजनीश म्हणाला.

"रजनीश, लव्ह यू यार... काय गिफ्ट दिलंस! आवडलं आपल्याला..." अगस्त्य डायरी आणि पेन बघून खूप खूश झाला. त्याच्यातल्या लेखकाला ते गिफ्ट खूप भावले.

"आणि आमचं?" बाकी सगळ्यांनी लगेच त्याच्यावर मोर्चा वळवला.

"तुमचंही आवडलं बाबा..." अगस्त्य म्हणाला, तसे सगळे शांत झाले.

"पण माझं गिफ्ट तुला सगळ्यात जास्त आवडेल." मयंक आत्मविश्वासाने म्हणाला.

"इतका कॉन्फिडन्स?" गाथिकाने आश्चर्य व्यक्त केले.

"हो तर!" मयंक तोऱ्यात म्हणाला.

"काय आहे?" सगळ्यांनी उत्सुकतेने विचारले.

"अगस्त्य, कधीपासून राम गणेश गडकरींचं 'प्रेमसंन्यास' नाटक शोधत होतास ना तू? फायनली मला मिळालं. हॅप्पी बर्थडे मेरे यार..." मयंकने प्रेमसंन्यासची प्रत अगस्त्यच्या हातावर ठेवली.

"अति आत्मविश्वासू बालका, अगस्त्यने प्रेमसंन्यास कालच एका पब्लिक लायब्ररीमधून इश्यू केलंय." गाथिकाने सांगितले, क्षणात मयंकचा चेहरा पडला आणि तो अगस्त्यकडे पाहू लागला.

"हो; पण ते परत करावं लागेलच ना... मयंक, तू दिलेली ही प्रत आता परमनंटली माझ्याकडे असेल. सो थॅंक यू मयंक." अगस्त्यने असे बोलताच मयंकचा चेहरा उजळला.

"टू माय एस्थेटिक मॅनिॲक वन मोअर गिफ्ट..." मयंकने अगस्त्यला आणखी एक भेटवस्तू दिली.

"भारीये हे बुकेंड्स! थॅंक यू मयंक!" अगस्त्यचा चेहरा आणखी एकदा उजळला.

"वेलकम." मयंकने त्याला मिठी मारली.

"अधिरा, आता तू तुझं गिफ्ट दे." राजवीर अधिराला म्हणाला, तशी तिने होकारार्थी मान हलवली.

"दादा, तू आणि राज दाने आणलं होतं ना... अधिराने गिफ्ट आणायची गरज नव्हती." अगस्त्य म्हणाला.

"आम्ही सांगितलं तिला; पण बर्थडे आहे तर गिफ्टविना इथे यायला ती तयारच नव्हती." राजवीर खांदे उडवत म्हणाला.

"घे रे आता, नाटकं नको करू..." गाथिका मुद्दाम त्याला चिडवत हसली, म्हणून त्याने तिच्यावर रागीट कटाक्ष टाकलाच.

अधिरा पुढे आली. तिने तिच्या पिशवीतून एक ओरेगॅमी झुंबर, मंडला आर्ट केलेले दहा बुकमार्क्स आणि एक गुंडाळलेला खलिता हे सर्व अगस्त्यला दिले.

"अधिराला मंडला आर्ट आणि ओरेगॅमीचा छंद आहे. फावल्या वेळात ती असं काहीतरी करत असते म्हणून इतक्या कमी वेळात तिला हेच द्यायचं सुचलं. गोड मानून घे." राजवीर म्हणाला. तसा अगस्त्य मंद हसला.

"मला खूप आवडलं. थॅंक यू अधिरा." अगस्त्यने बोलतच एक खूण केली; पण ती खूण बघून अधिराच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि ती राजवीरकडे बघू लागली.

तेवढ्यात राजवीर हसला, "तुझी साईन चुकली."

"म्हणजे?" अगस्त्यने गोंधळून विचारले.

"तू जी साईन केली, त्याचा अर्थ सॉरी होतो. थॅंक यू म्हणताना हाताचा पंजा असा छातीवर ठेवावा लागतो, मूठ नाही करायची." राजवीरने कृती करून दाखवली.

"ओह... थॅंक यू अधिरा!" अगस्त्यने राजवीरने सांगितल्याप्रमाणे हातवारे केले. त्याची ती खूण बघून आता अधिरा मंद हसली.

"अगस्त्य, तू साईन लॅंग्वेज शिकायला लगेच मनावर घेतलं?" गाथिकाने मुद्दाम सगळ्यांसमोर त्याला प्रश्न केला.

"शुभस्य शीघ्रम." अगस्त्य ओठांवर हसू ठेवून नजरेने तिला दम देत होता.

"ओह!" गाथिका सुचकपणे म्हणाली, तसे त्याने परत डोळे दाखवले.

"अं... खलित्यामध्ये काय लिहिलंय?" प्रनिशला कुतुहल वाटले.

"बर्थडे विशच असेल ना... बावळट!" अगस्त्य कपाळावर हात मारत म्हणाला.

"अरे यार वाच ना..." सगळेच हट्ट करू लागले, म्हणून खोल श्वास घेऊन अगस्त्यने वाचायला सुरुवात केली.

"अगस्त्य, मघाशी मी तुमचं नाटक लाईव्ह बघू शकले नाही; पण दादाने मला तुमच्या नाटकाचा व्हिडिओ दाखवला. तुमचे डायलॉग मला ऐकू येत नसले तरी अभिनय मला आवडला. तुम्ही फार छान ॲक्टिंग करता. मी ऐकलंय की तुम्हाला नाटककार व्हायचंय आणि रंगभूमीवर अभिनयही करायचाय. मला खात्री आहे, तुम्ही एक दिवस नक्की व्हाल!" अगस्त्यने वाचता वाचता अधिराकडे पाहिले. तिचे शब्द वाचून त्याच्या मनाला आत्मिक समाधान मिळत होते.

तो पुढे वाचू लागला.

"सकाळी मी गैरसमज करून घेत तुम्हाला चापट मारली, त्यासाठी मनापासून सॉरी! पण आता माझा गैरसमज दूर झालाय, तर तुम्हीही माझा राग करू नका." अगस्त्यने ते वाचून अधिराकडे बघून किंचित हसला.

"कोणता गैरसमज? आणि चापट मारली? का?" तेवढ्यात आजी-आजोबांनी प्रश्न केला.

"ते आजी..." गाथिका बोलतच होती की अगस्त्य म्हणाला,

"मी सांगतो आजी-आजोबा तुम्हाला नंतर..."

"बरं." त्या दोघांनी होकारार्थी मान हलवली.

"पुढे वाच रे..." सौंदर्या उत्सुकतेने म्हणाली.

"मला गिफ्ट काय द्यावं ते सुचलं नाही म्हणून हे बुकमार्क्स आणि ओरेगॅमीचं झुंबर देतेय. आशा आहे की तुम्हाला हे आवडेल. परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा." अगस्त्यने पूर्ण पत्र वाचले आणि अधिराकडे कृतार्थ नजरेने बघितले.

त्या पत्रातल्या भावना त्याच्या हृदयाला स्पर्श करून गेल्या होत्या.

"थॅंक यू अधिरा, इट मीन्स अलॉट." त्याने खलिता परत गुंडाळला आणि अधिराकडे बघून त्याने परत हातवारे करत आभार मानले.

अधिरानेही काही हातवारे केले.

"काय म्हणतेय अधिरा?" राजवीरकडे बघत अगस्त्यने विचारले.

"तुला गिफ्ट्स आवडले, याचा आनंद आहे म्हणतेय ती..." राजवीरने सांगितले, ते ऐकून अगस्त्यसकट सगळ्यांच्याच ओठांवर स्मित विसावले.

आता आजी-आजोबा पुढे आले.

"माझ्याकडून पहिलं गिफ्ट आहे, स्टार मॅप फ्रेम. तुझा जन्म झाला तेव्हा तारेही इतके सुंदर दिसत होते. आजपासून रोज हे बघायचं... म्हणजे तुला आजचा दिवस नकोसा वाटणार नाही." आजी म्हणाल्या, तसा अगस्त्य भावूक झाला.

"थॅंक यू आजी..." अगस्त्यने आजींना मिठी मारली.

"पुष्पा, आय हेट टियर्स रे..." आजोबा म्हणाले, तसे आजी आणि अगस्त्य खुदकन हसले.

"माझ्याकडून पहिलं गिफ्ट आहे, हे बोन्साय झाड..." आजोबांनी अगस्त्यच्या हातात बोन्साय झाड दिले.

"अगस्त्य, या बोन्साय झाडासारखं व्हायचंय तुला. मेहनत तर तू घेतोयस; पण संयम आणि सातत्य ठेवलंस तर उद्या तुझंही नावलौकिक होईल. उंची लहान पण किर्ती महान, हे सगळ्यांच्या तोंडून मला तुझ्याबद्दल ऐकायचंय. या बोन्साय झाडाला आणि तुझ्या स्वप्नांना कायम जप." आजोबांनी अगस्त्यला शुभेच्छांसह मोलाचा सल्ला दिला.

"नक्की आजोबा. थॅंक यू." त्याने आजोबांना मिठी मारली.

"आता माझ्याकडून दुसरं गिफ्ट आहे, हा किपसेक बॉक्स. सध्या यात तुझ्या बालपणीचे फोटो आठवणीस्वरूप साठवून आहेत; पण मला तुझ्या यशस्वी स्वप्नपूर्तीचे, पुरस्कार सोहळ्यांचे फोटो यात साठवण्याची ओढ आहे." आजी म्हणाल्या.

अगस्त्यने त्या छोट्याशा लाकडी पेटीवरून हात फिरवला आणि परत एकदा आजींचे आभार मानले.

"माझ्याकडून दुसरं गिफ्ट आहे, लेदर स्क्रिप्ट फोल्डर आणि वॅक्स सील स्टॅम्प सेट. या फोल्डरमध्ये तुझ्या स्क्रिप्ट्स जपून ठेवशील आणि जेव्हा जेव्हा तू तुझ्या स्क्रिप्ट्स मोठमोठ्या दिग्दर्शकांना पाठवशील तेव्हा या वॅक्स सील स्टॅम्पचा वापर करशील." आजोबांनी भेटवस्तू दिली.

"खरंतर तुमचा आशीर्वादच मला पुरेसा आहे; पण हे गिफ्ट्सही तितकेच माझ्या हृदयाजवळचे आहेत. थॅंक यू सो मच माझ्या स्वप्नांना समजून घेत मला सपोर्ट करण्यासाठी आणि इतके सुंदर गिफ्ट्स देण्यासाठी..." अगस्त्य म्हणाला आणि त्याने भावूक होत आजी-आजोबांना मिठी मारली.

त्यानंतर सगळे परत खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा मारू लागले.

साधारण एक तासानंतर अगस्त्यचे सगळे मित्र अगस्त्यचा आणि आजी-आजोबांचा निरोप घेऊन आपापल्या घरी निघून गेले. आजींनी त्यांना जेवणासाठी आग्रह केला; पण आजींना विनाकारण त्रास नको म्हणून सगळ्यांनीच नकार दिला व ते घरी गेले.

निरोप दिल्यावर अगस्त्य सोफ्यावर बसला, तर आजी-आजोबा हाताची घडी घालून त्याच्याकडे रोखून बघू लागले. अगस्त्यने त्यांच्याकडे बघितले आणि त्यांची रोखलेली नजर बघून तो पेचात पडला.


आजी-आजोबा अगस्त्यकडे असे का बघत आहेत?


क्रमशः
..........
© सेजल पुंजे.

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →