सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान रुधिराच्या खोलीवर थाप पडली, त्यामुळे ती झोपेतून उठून बसली. चेहऱ्यावरून हात फिरवत तिने आळस झटकला आणि दार उघडले.
दारात राजवीर, विराज आणि अधिरा उभे होते. तिने खालून ते वरपर्यंत त्या तिघांनाही बघितले. त्यांना बघताच क्षणी तिला कळले की ते तिघे बाहेर जात असावेत.
"काय झालं?" रुधिराने राजवीरला विचारले.
"आमच्यासोबत येतेस का?" राजवीरने तिलाच प्रतिप्रश्न केला.
"कुठे?" तिने हातवारे करून विचारले.
ते चौघे असतानाही तिने हातवारे केलेले बघून राजवीर थोडासा खिन्न झाला.
"अगस्त्यकडे... त्याचा आज वाढदिवस आहे." राजवीर उत्तरला.
"नाही, मला नाही यायचं." तिने जरा रूक्षपणेच सांगितले आणि दार लगेच बंद केले.
"चला, आपण तिघेच जाऊ." विराज म्हणाला. त्यावर हुंकार भरून ते सगळे त्या खोलीतून बाहेर पडले.
ते तिघे अंगणात आलेच होते की राजवीरचा मोबाईल वाजला. त्याने उसासा घेऊन मोबाईल कानाला लावला.
"बोला बाबा..." राजवीर कॉल उचलत म्हणाला. विराजने लगेच स्पीकर ऑन केले.
"अधिराला घेऊन कुठे निघालास? कोणाला विचारून तू तिला घेऊन जातोय?" सर्जेरावांनी दटावत विचारले.
"बाबा ते..." राजवीर बोलतच होता की विराज बोलू लागला.
"काका, माझ्या मित्राचा वाढदिवस आहे. आम्ही तिथेच जातोय." विराज म्हणाला.
"पण विराजराव, अधिराला सोबत घेऊन जायची काय गरज?" विराजचा आवाज ऐकताच सर्जेरावांच्या आवाजात बदल झाला आणि ते ओठांवर हसू ठेवून बोलले.
"काका, माझ्या काही मित्र-मैत्रिणींकडे अधिराची जबाबदारी सोपवलीय. मी आणि राजवीर नसताना तेच तिची काळजी घेतील. त्यामुळे बॉंडींग वाढवण्यासाठी घेऊन जात आहोत आम्ही अधिराला..." विराजही वरवर हसत बोलला.
"पण..." सर्जेराव अजूनही परवानगी द्यायला तयार नव्हते.
"बाबा, त्यांना माहितीये की अधिरा विराजची होणारी बायको आहे." राजवीर म्हणाला.
"हो का? आधी सांगायचं ना... आता कसा निश्चिंत आहे मी, कारण ते सगळे मर्यादेबाहेर वागणार नाहीत याची खात्री झालीय. जाऊन या मग..." सर्जेरावांनी क्षणात परवानगी दिली.
"माणूस आहे की सरडा?" फोन ठेवताच विराज पुटपुटला.
"श्शु!" राजवीरने बॉडीगार्ड्सकडे खुणावत विराजला गप्प केले.
त्यानंतर ते तिघेही कारमध्ये बसले आणि तिथून बाहेर पडले. पंधरा-वीस मिनिटांत ते अगस्त्यच्या घरी पोहोचले. गाथिका आणि इतर मित्रही त्याच वेळी तिथे पोहोचले होते.
एकमेकांना बघून ते गालात हसले आणि लगेच सगळे आत गेले. त्यांना बघून आजी-आजोबा खूश होऊन काही बोलणारच की गाथिकाने त्यांना इशाऱ्यातच शांत राहायला सांगितले. त्यांनी होकारार्थी मान हलवली.
"आजी, कावळा काय करतोय?" गाथिकाने हळूच विचारले.
"चहा करतोय." आजींनी सांगितले.
"ओके." गाथिकाने इशारा करत म्हणाली आणि लगेच हलकासा गळा खाकरला.
"ए छोटू, आमच्यासाठी पण स्पेशल चहा टाक." गाथिकाने मुद्दाम स्वयंपाकखोलीकडे बघून अगस्त्यला डिवचण्यासाठी फर्माईश सांगितली.
"ए कारटे, मी काय टपरी उघडलीय का?" गाथिकाचा आवाज ऐकला आणि अगस्त्य पाय आपटतच सांडशी घेऊन बाहेर आला; पण समोर सगळ्यांना आणि विशेषतः अधिराला बघून तो थक्कच झाला.
त्याने पटकन सांडशी पाठीमागे लपवली.
"तुम्ही सगळे इथे?" अगस्त्यने गोंधळून विचारले.
"सरप्राईज!" सगळे एकत्रच म्हणाले; पण त्याचा गोंधळ कमी झाला नाही.
"हॅप्पी बर्थडे, बर्थडे बॉय!" सगळ्यांनी एकत्रच त्याला शुभेच्छा दिल्या, तसा त्याचा चेहरा उजळला.
"तुम्हाला लक्षात होतं? मला वाटलं तुम्ही विसरलात." अगस्त्य केसांत हात फिरवून म्हणाला.
"असं कसं विसरणार? आजच तर महाराष्ट्रातल्या हिटलरचा जन्म झाला होता ना!" प्रनिशने हळूच टोमणा मारला. त्यावर सगळेच फिदीफिदी हसले.
"अधिरा, तुझी ओळख करून देतो." राजवीरने अधिराकडे बघून हातवारे केले, तशी तिने मान हलवली.
"हे अगस्त्यचे आजी-आजोबा आहेत." आजी-आजोबांकडे खुणावून त्याने सांगितले.
"ओह!" तिने आश्चर्याने भुवया उंचावल्या आणि लगेच त्या दोघांना वाकून नमस्कार केला. सवयीप्रमाणे त्यांनीही तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला.
"ही कोण? कधी पाहिलं नाही हिला..." आजी अधिराकडे बघून विचारपूस करू लागल्या.
"आजी, माझी बहीण आहे अधिरा..." राजवीरने परिचय दिला.
"अरे व्वा! खूप गोड नाव आहे; पण ही बोलत का नाहीये?" आजोबांनी गोंधळून विचारले.
"आजोबा, तिला बोलता आणि ऐकता नाही येत." राजवीर म्हणाला.
"अरे देवा!" आजी-आजोबांना तिच्यासाठी वाईट वाटले.
"ए छोटू, चहा झाला का बघ... नाहीतर आटून जाईल." अधिराला अवघडलेपणा जाणवू नये म्हणून गाथिकाने मुद्दाम विषय बदलला आणि सगळेच हलके हसले.
थोडा वेळ त्यांच्या गप्पा रंगल्या. त्यानंतर केक कापून अगस्त्यचा वाढदिवस साजरा झाला.
"हे दोन्ही गिफ्ट्स मला अधिराने सुचवले." राजवीर पुढे होत म्हणाला.
"दोन गिफ्ट्स कशाला?" अगस्त्यच्या कपाळावर आठ्या पडल्या.
"तू बावीस वर्षाचा झालास ना! म्हणून प्रत्येकाकडून दोन गिफ्ट्स, असे एकूण बावीस..." गाथिका बत्तिशी दाखवत म्हणाली.
"आणि ही अति हुशार कल्पना तुझ्याच अति हुशार मेंदूने जन्माला घातली असेल." अगस्त्य बारीक डोळे करून तिला बघू लागला.
"अगदी बरोबर!" गाथिका अभिमानाने म्हणाली.
"बावळट..." अगस्त्यने तिच्या डोक्यात टपली मारली.
"तुला ना कदरच नाही." गाथिका नाक मुरडत म्हणाली, अगस्त्य आही बोलणारच की आजी त्या दोघांनाही दटावल्या.
"तुम्ही झालात का परत सुरू? गप्प बसा की जरा..." आजी म्हणाल्या, तसे एकमेकांना खुन्नस देत दोघेही शांत झाले. म्हणून राजवीर पुढे बोलू लागला.
"तुला नाटकाची आवड आहे, तर पुढच्या आठवड्यात 'देशोदेशी मातीच्या चुली...' नाटकाचा प्रयोग आपल्या रत्नागिरीला होतोय; त्या नाटकाची तिकिट ॲज अ गिफ्ट म्हणून बेस्ट राहील, असं अधिरा म्हणाली. त्यामुळे ही तीन तिकीटे, तू आजी-आजोबासोबत नक्की बघून ये हे नाटक." राजवीर हसत म्हणाला.
"थॅंक यू दादा." अगस्त्यने नाटकाची तिकिटे घेतली.
"एक मिनिट आणखी एक गिफ्ट बाकी आहे!" राजवीर गालात हसला आणि त्याने लगेच आणखी एक भेटवस्तू दिली. अगस्त्यने सगळ्यांच्या आग्रहाखातर भेटवस्तू उघडली.
"कॉमेडी ॲंड ट्रॅजेडी ब्रास थिएटर मास्क! वॉव दादा! किती सुंदर आहेत. थॅंक यू सो मच!" पितळी मास्कवरून हळूवारपणे हात फिरवत अगस्त्यने आभार मानले.
"तुला गिफ्ट आवडलं याचा आनंद आहे. हॅप्पी बर्थडे!" राजवीरने शुभेच्छा दिल्या. त्यानंतर विराज पुढे आला.
"माझ्याकडून कलोन सेट आणि मिनी थिएटर स्टेज वुडन शोपीस. हे मिनी थिएटर तुला तुझ्या ध्येयाचा कधीच विसर पडू देणार नाही. वाढदिवसाच्या परत एकदा शुभेच्छा मित्रा..." विराजने शुभेच्छा देत भेटवस्तू दिल्या.
"मिनि थिएटर स्टेज! इतकी युनिक गिफ्ट आयडिया कशी सुचली?" अगस्त्यने औत्सुक्याने विचारले.
"अधिरा..." विराज म्हणाला, तसा अगस्त्य अधिराकडे बघू लागला. ती मंद हसली.
"थॅंक यू सो मच, राज दा." अगस्त्य म्हणाला.
आता गाथिका पुढे आली. तिने घसा खाकरला आणि म्हणाली, "तसं बघायला गेलं तर माझी उपस्थितीच अमूल्य आहे तरीही गेल्या आठवड्यात नवीन काहीतरी वाचायचं आहे म्हणून कोकलत होतास ना तर हा घे पुस्तकांचा सेट! यात राम गणेश गडकरी, वि. वा. शिरवाडकर, व. पु., पुलं, नारायण धारप या तुझ्या काही आवडत्या लेखकांच्या कादंबऱ्यांचा समावेश आहे."
"थॅंक..." अगस्त्य बोलतच होता की गाथिकाने त्याला थांबवले.
"रुको जरा! दोन गिफ्ट आहे सांगितलं ना..." गाथिका म्हणाली, तशी त्याने मान डोलावली.
"यात वुडन पेन होल्डर... त्यावर मी काहीतरी स्पेशली कोरून घेतलंय, ते वाच..." गाथिका म्हणाली.
त्याने पटकन बॉक्स उघडून पेन होल्डर बाहेर काढले.
"अगस्त्य... नाम तो सुना ही होगा!" त्याने वाचले, तसे त्याच्या ओठांवर हसू पसरले.
"भारी आहे हे! थॅंक यू वन्स अगेन." अगस्त्य खूश झाला.
"थॅंक यू असू दे, पैसे तेवढे जीपे कर." गाथिका बोलली, तशी तिथे हशा पिकली.
आता सौंदर्या पुढे आली.
"मला गिफ्ट काय द्यावं सुचलं नाही; पण तू कुठेही झोपा काढतोस ना म्हणून या घे काही यू शेप पिलोज... यामुळे तुझ्या मानेला त्रास होणार नाही."
"ॲंटीक आहे गिफ्ट; पण थॅंक्स." सौंदर्याचे उत्तर ऐकून अगस्त्य गालात हसत म्हणाला.
"आणि सेकंड गिफ्ट आहे, क्लॅपरबोर्ड-स्टाईल नोटपॅड... बाकी युनिक काही सुचलं नाही, जीपीटीला विचारलं तर तिने हे सुचवलं." सौंदर्याने स्पष्टीकरण दिले.
"इट्स रियली युनिक ॲंड ब्युटिफुल! थॅंक यू सॅंडी." अगस्त्य गालात हसून म्हणाला.
"मिस्टर अगस्त्य मोहिते, गेल्या वेळी कॅम्पला जाताना तुम्ही एकाच रंगाच्या दोन लगेज बॅग्स बघून भलत्याच स्टुडंटची बॅग सोबत घेऊन जो घोळ घातला होता आणि त्यावेळी तुमचं लगेज शोधायला आमची जी दाणादाण झाली होती, ते आठवून तुमच्यासाठी खास लगेज टॅग्सचे तीन सेट! आता कधीही, कुठेही जायचे असल्यास कृपया या लगेज टॅग्सचा वापर करावा." तनिशाने शाल जोडीने अगस्त्यला नारळ दिला, म्हणजे भेटवस्तू दिली.
"तीन वर्षांपूर्वीची चूक लक्षात ठेवून तुम्ही जे नावीन्यपूर्ण गिफ्ट दिलं, त्यासाठी शतशः नमन." अगस्त्यनेही दात-ओठ खात हात जोडले. तशी ती फिदीफिदी हसली.
"सेकंड गिफ्ट आहे, विंटेज कॅमेरा! तुझा फोटोग्राफीचा बिनपगारी छंद जोपासण्यासाठी..." तनिशाने दात काढत दुसरी भेटही दिली.
"थॅंक्स अलॉट!" अगस्त्य गालात हसला.
"आता माझी पाळी..." प्रनिश खुनशी हसत म्हणाला.
"इतका आसुरी आनंद? नेमकं काय गिफ्ट आहे? एक काम कर, तू तुझं गिफ्ट तुझ्याकडेच ठेव. मला तुझ्यावर संशय येतोय." अगस्त्य प्रनिशचे हावभाव बघत म्हणाला.
"हिटलर डर गया, हिटलर डर गया!" प्रनिश अगस्त्यला चिडवू लागले, तसे सगळे पोट धरून हसू लागले.
अधिराही हलकीशी हसली, अगस्त्यचे तिच्याकडे लक्ष जाताच त्याने प्रनिशकडे तावातावाने पाहिले.
"तुझ्यासारख्या फुसकी फटाक्याला घाबरत नाही मी! दे तुझं गिफ्ट... बघतोच काय आहे असं..." अगस्त्य निर्भीडपणे म्हणाला, त्यावर प्रनिश गूढ हसला आणि आता सगळ्यांनाच प्रनिशने कोणती भेटवस्तू घेतली, हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली.
काय गिफ्ट असेल प्रनिशचे? त्याच्या आसुरी आनंदामागील रहस्य काय? प्रनिशने दिलेल्या गिफ्टमुळे अगस्त्यचा अधिरापुढे पचका तर होणार नाही ना?
