Login

साज़िश: गॅम्बल ऑफ लव्ह (भाग-२४)

अगस्त्य आणि अधिराने केला प्रेमविवाह, दोघेही एकत्र खूप खूश; पण एकाएकी अधिराचा झाला खून आणि हत्येच्या आरोपाखाली अगस्त्यला झाली अटक! अख्खा महाराष्ट्र त्याच्याविरोधात असताना त्याची मैत्रीण—गाथिकाने त्याची केस लढण्याचा घेतला निर्णय. कोणती रहस्ये उलगडेल हा खटला? या रक्तरंजित खेळाचा सूत्रधार अगस्त्य असेल की आणखी कोणी? जाणून घेण्यासाठी वाचा "साज़िश: Gamble Of Love"

स्थळ: राजवीरची खोली

"आता तरी मिटली ना तुझी काळजी?" दिगंबर जाताच विराजने राजवीरला विचारले.

"हो. थॅंक्स यार! काय शक्कल लढवलीस!" राजवीर म्हणाला.

"ह्म्म. आता तू रिलॅक्स झालाय तर आपल्याबद्दल बोलायचं?" विराज खूश होत म्हणाला.

"आपल्याबद्दल काय?" राजवीरने प्रतिप्रश्न केला.

"कसला बोरिंग आहेस तू..." विराजने नाक-तोंड गोळा केले.

"गर्लफ्रेंड असल्यासारखा काय तक्रारी करतोस रे..." राजवीरने डोळे बारीक करून पाहिले.

"मी तुझी गर्लफ्रेंड कसा असू शकतो? माझ्यासाठी बॉयफ्रेंड योग्य शब्द राहील." विराज दात काढत म्हणाला.

"झालं?" राजवीरने नजर रोखली.

"तू माझ्यासोबत असला की तुझ्यात काय तात्या विंचू येतो का? इतकी काय चिडचिड करतो..." विराज गाल फुगवून म्हणाला.

"प्रेम उतू जावं, असा काही वागतच नाही ना तू..." राजवीरनेही त्याला टोला लगावला.

"इतका प्रेमळ आहे मी आणि तरीही मला बघून तुझं प्रेम उतू जात नाही म्हणजे नक्की तूच निष्ठूर आहेस." विराज ओठ तिरपे करून म्हणाला.

"व्हॉटेव्हर..." राजवीरने सुस्कारा सोडला.

"माघार घ्यायची असली की फक्त इतकंच बोलता येतं तुला... सोड." विराजनेही डोळे फिरवत सुस्कारा सोडला.

"मग काय पकडू?" राजवीरने भुवया उंचावल्या.

"मला!" विराजने दात दाखवले. त्याचे उत्तर ऐकून राजवीर मात्र त्याच्याकडे खालून ते वरपर्यंत बघू लागला.

"असा नको बघू... गंमत केली जस्ट..." विराजने ओठ बाहेर काढला.

"तू आणि तुझ्या गंमती..." राजवीर पुटपुटला.

"बरं, आता सिरियस टॉपिकवर बोलू..." विराज म्हणाला, त्यावर राजवीरने हुंकार भरला.

"आज आपला फेअरवेल परफॉर्मन्स होता ना... सो कसं फील होतंय?" विराजने विचारले.

"मिक्स्ड फिलिंग्स आहेत; पण सगळ्यात भारी माहितीये काय वाटलं..." राजवीर आता उत्सुकतेने बोलू लागला.

"काय?" उशी मांडीवर घेत विराजने विचारले.

"कोर्स पूर्ण करून जवळपास वर्ष झालं; तरीही अगस्त्य आणि त्याच्या फ्रेंड सर्कलसोबत वावरताना अजिबात अवघडलेपणा किंवा परकेपणा जाणवत नाही. शिवाय अजूनही ते मला त्यांचा सिनियर म्हणून बघतात. सो इट्स लिटरली हार्टटचिंग." राजवीर अगस्त्य आणि त्याच्या मित्रमंडळाचे कौतुक करत बोलला.

"तू आहेसच की त्यांचा सिनियर!" विराज म्हणाला.

"हो रे... पण कसंय ना, फायनल एक्झाम झाली की सहसा बाकी ज्युनियर्स ओळख नसल्यासारखे वागतात; पण त्यांचा ग्रुप तसा नाही म्हणून म्हणालो." राजवीरने विश्लेषण केले.

"ओह, कम ऑन! तू इंटर्नशिपही तर सर्जेराव इंदलकर मेडिकल केअरमध्येच करतोय ना... तर टेक्निकली यू आर स्टिल देअर सिनियर..." विराज खांदे उडवत म्हणाला; पण त्याची ती प्रतिक्रिया बघून राजवीर त्याच्याकडे खाऊ की गिळू नजरेने बघू लागला.

"तू ना मूड स्पॉयलर आहेस. मला वाटतंय कौतुक करावंसं त्यांचं, तर करू दे ना... आहे ते सगळे माझे चांगले मित्र! म्हणून माझ्या मनात त्यांच्यासाठी सॉफ्ट कॉर्नर आहे; पण त्यांचं कौतुक केल्याने तुला का मिरची झोंबतेय? त्यांच्यासमोर नाही केलं त्यांचं कधी मी असं कौतुक, निदान त्यांच्या माघारी तरी करू दे." राजवीर गाल फुगवून म्हणाला.

"बरं, बरं." विराज गालात हसला.

त्यानंतर राजवीरने बराच वेळ मनातल्या भावना व्यक्त केल्या आणि विराज शांतपणे ऐकत राहिला.

"तुला कसं वाटतंय? आज मुलींनी तर जाम घोळका केला होता तुझ्याभोवती! स्पेशली तुझ्या फील्डच्या ज्युनियर्स त्यांच्या लाडक्या सिनियरला म्हणजे तुला फुल, ग्रीटिंग कार्ड्स देऊन निरोप देत होत्या, तर काय वाटलं त्यांचा विशेष निरोप समारंभ बघून?" राजवीरने थट्टा करत विचारले.

"फार बरं वाटलं. त्यांचं प्रेम, त्यांनी दिलेला आदर सगळं स्पेशल आहे माझ्यासाठी; कारण सगळ्यांनीच मला नेव्ही ट्रेनिंगसाठी शुभेच्छा दिल्या. कोणी माझ्या निर्णयाचा आदर केला, कोणी म्हणालं की त्यांच्या मनात माझ्याप्रती आदर वाढलाय. सो सगळं बघून स्पेशल फील झालं. हा सेंड ऑफ लक्षात राहील मला..." विराज म्हणाला.

"ह्म्म. बाय द वे, तुझं जिच्यावर प्रेम आहे, तिला दिलास का तू निरोप?" एकाएकी राजवीरने प्रश्न केला आणि विराज काहीसा विचारात पडला.

"सांग ना..." बराच वेळ विराज काही बोललाच नाही म्हणून राजवीरने परत त्याला उत्तरासाठी खुणावले.

"नाही दिला निरोप." विराज शांतपणे म्हणाला.

"का?" राजवीरने गोंधळून विचारले.

"सहज..." विराजने खोल श्वास घेतला.

"बरं, जिच्यासाठी इतका झुरतोय ती कोण आहे? मी ओळखतो का तिला? कधी भेट झाली तुमची? कधी प्रेमात पडलास तिच्या?" राजवीरने एकामागोमाग एक प्रश्नांची सरबत्ती केली.

"तुला काय इतक्या चौकशा?" विराजने साशंक नजरेने त्याच्याकडे पाहिले.

"जेन्यून क्युरिऑसिटी! बेस्ट फ्रेंड्स आहोत आपण म्हणून विचारतोय." राजवीर खांदे उडवत म्हणाला.

"मग तू सांग ना तुझं काय सिक्रेट आहे?" विराजने हाताची घडी घातली.

"काही नाही." राजवीर गप्प झाला.

"हं... चिटींगखोर..." विराजने ओठ तिरपे केले.

"चिटींग कसली? तू कोणावर प्रेम करतोस ते सांगितलं नाही, तसंच मीही माझं सिक्रेट सांगितलं नाही. वी बोथ आर इव्हन." राजवीर म्हणाला.

"वी आर नॉट! सकाळी तू इमोशनल ब्लॅकमेल करून माझं सिक्रेट वदवून घेतलंस; पण स्वतः मूग गिळून बसलाय." विराज तक्रार करू लागला.

"आता तू आहेस इमोशनल फूल त्यात माझा काय दोष?" राजवीर फसकन हसला.

"इमोशनल फूल नाहीये मी... मी फक्त..." विराज बोलता बोलता थांबला.

"काय?" राजवीरने भुवया उंचावल्या.

"काही नाही." विराजने खोल श्वास घेतला. राजवीरने त्याच्याकडे बघत खांदे उडवले.
..........

स्थळ: रुधिराची खोली

रुधिरा अजूनही न्हाणीघरातल्या आरशासमोर उभी होती.

"तू अशी हसत का आहेस? तुला गांभीर्य कळत नाहीये का? तो... तो सम्राट चव्हाण आहे." रुधिरा प्रतिबिंबाला हसताना बघून चिडून म्हणाली.

"तर काय झालं?" तिच्या प्रतिबिंबाने बेफिकीरी दर्शवली.

"बाबांना कळलं तर..." रुधिराने मान खाली घातली.

"कोण बाबा?" तिचे प्रतिबिंब उपरोधिक हसले.

"म्हणजे सर्जेराव इंदलकर... त्यांना कळलं तर? सर्जेराव आणि त्र्यंबकनाथ चव्हाण यांच्यात किती वर्षांपासून तेढ आहे. मी सम्राट चव्हाणशी मैत्री करून चूक केलीय, खूप मोठी चूक!" रुधिरा अपराधीपणाची भावना मनात साठवून बोलली.

"चूक-बरोबर कोण ठरवणार? प्रत्येक वेळी तू का सॅक्रिफाईज करायचं? तुला बोलता येतं, ऐकता येतं; पण तरीही कसं आयुष्य जगतेय तू? कळसूत्री बाहुली आहेस तू त्या सर्जेरावाच्या हातातली... तो म्हणेल तेच करायचं, तो म्हणेल तसं वागायचं. तुझं स्वतःचं अस्तित्त्वच नाही जणू..." तिच्या प्रतिबिंबाने तिच्या जुन्या जखमांची तिला आठवण करून दिली.

"पण सर्जेराव इंदलकरमुळे मला ओळख मिळालीय..." रुधिरा कशीबशी बोलली.

"अगं कसली ओळख? कोण ओळखतं तुला? सगळ्यांच्या ओठांवर अधिरा इंदलकरचं नाव आहे. कोणीतरी रुधिरा इंदलकरचा ध्यास घेतलाय? नाही. लोकं दुर्लक्ष करतात तुझ्याकडे आणि आपण आता त्याचाच फायदा घ्यायचा." तिचे प्रतिबिंब कपटी हसले.

"न... नाही. हे चूक आहे." रुधिरा घाबरत म्हणाली.

"हेच बरोबर आहे रुधिरा! तुला जर मोकळं आयुष्य जगायचं असेल, तर तुला तुझा आनंद निवडावा लागेल." तिच्य प्रतिबिंबाने तिला सल्ला दिला.

"पण..." रुधिराचा श्वास वाढला होता. विचारशक्ती कमकुवत ठरत होती.

"त्याने तुला निवडलं, तू त्याला निवड..." प्रतिबिंबाचा आवाज तिथे घुमला.

"त्यानेही मला कुठे निवडलं? मी त्याचा आवाज ऐकला होता. त्याला मी नाही, अधिरा अपेक्षित होती." रुधिरा खिन्न स्वरात म्हणाली.

"पण त्याला ते माहिती नाही ना?" प्रतिबिंब बोलले.

"एक ना एक दिवस त्याला कळेलच..." रुधिरा निराश होत म्हणाली.

"काय कळेल त्याला?" प्रतिबिंबाने उलट प्रश्न केला.

"हेच की तो जिला अधिरा समजतोय, ती प्रत्यक्षात मी आहे— रुधिरा. आज त्याची साईन चुकली. त्याने साईन रुधिराची केली तरी तो एक्सपेक्ट अधिरा करत होता. त्याला अधिराशी मैत्री करायची होती, माझ्याशी नाहीच." रुधिरा थरथरत्या आवाजात म्हणाली.

"हे तू सांगणार आहेस का त्याला?" प्रतिबिंबाचे हावभाव तसूभरही बदलले नाही.

"मी न सांगताही सम्राटला एक ना एक दिवस कळेलच की मी रुधिरा आहे, अधिराची जुळी बहीण असूनही तिच्या सावलीएवढीही मला किंमत नाही आणि सर्जेराव मला फक्त त्यांचं ओझं म्हणून बघतात... हे सगळं त्याला कळल्यावर काय करणार मी?" रुधिराच्या डोळ्यातून अश्रूचा एक थेंब गालावर ओघळला.

"ती वेळ येण्याआधी तू असं काही कर की तो सम्राट चव्हाण तुझी जबाबदारीच झटकू शकणार नाही." आरशातले प्रतिबिंब गूढ हसले.

"म्हणजे?" रुधिरा अविश्वासाने बघू लागली.

"तुला माहितीये मी काय म्हणतेय..." एवढेच बोलून तिचे प्रतिबिंब परत अस्थिर झाले.

रुधिराने खोल श्वास घेतला आणि परत एकदा आरशात बघितले.

'खूप झालं रडून... सम्राट स्वतः माझ्या जवळ आला, मी त्याच्या जवळ गेले नव्हते. त्याने मैत्रीचा हात पुढे केला आणि मी तो स्वीकारला. ही चोझ मी, आय विल चुझ हिम नो मॅटर व्हॉट. मला इंदलकरच्या दलदलीतून बाहेर पडायचं असेल तर कदाचित सम्राट चव्हाणच एकमेव दुवा आहे. आऊटकास्टचा टॅग मिरवून खूप दमले, आता मला माझ्या कथेची नायिका व्हावंच लागेल.' रुधिराने मनातल्या मनात निर्धार केला आणि डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा पुसून ती न्हाणीघरातून बाहेर पडली.


कोणता निर्धार केला असेल रुधिराने? रुधिराचा हा निर्णय भविष्यातील धोक्याची संभाव्यता तर नाही?

क्रमशः
...........
© सेजल पुंजे.

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →