Login

साज़िश: गॅम्बल ऑफ लव्ह (भाग-२३)

अगस्त्य आणि अधिराने केला प्रेमविवाह, दोघेही एकत्र खूप खूश; पण एकाएकी अधिराचा झाला खून आणि हत्येच्या आरोपाखाली अगस्त्यला झाली अटक! अख्खा महाराष्ट्र त्याच्याविरोधात असताना त्याची मैत्रीण—गाथिकाने त्याची केस लढण्याचा घेतला निर्णय. कोणती रहस्ये उलगडेल हा खटला? या रक्तरंजित खेळाचा सूत्रधार अगस्त्य असेल की आणखी कोणी? जाणून घेण्यासाठी वाचा "साज़िश: Gamble Of Love"
काही वेळाने जेवण उरकून अधिराही तिच्या खोलीत गेली, तर राजवीर आणि विराज राजवीरच्या खोलीत बसले होते.

"राज..." एकाएकी राजवीरने आवाज दिला.

"ह्म्म." विराजने त्याच्याकडे बघितले.

"मला एक टेन्शन आहे यार..." राजवीर गंभीरपणे म्हणाला.

"कशाचं?" विराजने लगेच विचारले.

"अधिरा..." राजवीरने सांगितले. विराज मात्र बुचकळ्यात पडला.

"म्हणजे?" त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या.

"आपण इथे नसल्यावर दिगंबर तिच्यावर २४ तास लक्ष ठेवणार आहे. त्याने आज सकाळी जो गोंधळ घातला होता, तसाच पराक्रम परत केला तर?" राजवीरने त्याच्या मनातली काळजी व्यक्त केली.

"नाही करणार." विराज गूढ हसला.

"कशावरून?" राजवीरने गोंधळून पाहिले.

"कारण आपण त्याच्याशी डील करणार आहोत." विराजच्या ओठांचा कोपरा उंचावला होता.

"कोणती डील?" राजवीरने आश्चर्याने विचारले.

"कळेल तुलाही! आधी त्या दिगंबरला इथे बोलव." विराज म्हणाला. राजवीरने मान डोलावली आणि कॉल करून दिंगबरला बोलावले.

दारावर थाप पडताच विराजने स्वतःच दार उघडले. दिगंबर आत आल्यावर त्याने पटकन दार लावून घेतले.

"बोला साहेब..." दिगंबर अदबीने म्हणाला.

"राजला बोलायचंय तुमच्याशी..." राजवीरने विराजकडे इशारा केला, तसा दिगंबर त्याच्याकडे बघू लागला.

"दिगंबर दादा, मी सकाळी तुमच्यावर एक फेव्हय केलाय, आहे ना लक्षात?" विराज नजर रोखून बोलला.

"कोणता फेव्हर?" विराजची नजर बघून दिगंबर आधीच गार झाला होता, तरीही कसेबसे शब्द जुळवून त्याने विचारले.

"इतक्या लवकर विसरलात दादा? सकाळी तुम्ही गैरसमज करून अधिराचा आणि माझा फोटो सर्जेराव काकांना पाठवला होता. त्यामुळे भलताच गोंधळ उडाला होता. नशीब, मी वेळेत आलो नि सगळं निस्तरलं; पण काका तुमच्यावर रागावले होते, बरोबर?" विराजने सकाळच्या प्रसंगाची आठवण करून दिली.

"अं... हो." त्याने अडखळत होकार दिला.

"काका किती रागावले होते तुमच्यावर हे मी नव्याने सांगायला नको. मला तर खात्री आहे, रागाच्या भरात त्यांनी तुम्हाला फक्त नोकरीवरून काढलं नसतं, तर अक्षरशः तुमचा जीवही घेतला असता. आफ्टरऑल अधिराच्या बाबतीत ते किती प्रोटेक्टिव्ह आहेत, याची तुम्हालाही कल्पना असेलच ना?" विराजच्या ओठांवर हसू असले तरी त्याचा प्रत्येक शब्द निखाऱ्यासारखा दिगंबरला चटके देत होता.

"हो साहेब, मघाशी ते चुकून..." दिगंबरच्या कपाळावरून घामाचा ओघळ खाली पडला.

"दादा, मी काकांना थांबवलं नसतं तर काय झालं असतं ओ?" दिगंबरचे हावभाव टिपून विराजने हाताची घडी घातली.

"ना तुमची नोकरी शाबूत असती, ना तुम्ही. बरोबर?" विराजने एक भुवई उंचावत त्याच्याकडे रोखून पाहिले.

"हो साहेब. तुमचे खूप उपकार झाले माझ्यावर..." दिगंबर आवंढा गिळत म्हणाला.

"ह्म्म. आता त्याच उपकाराची परतफेड तुम्ही आम्हाला करायची आहे." विराजने त्याची खेळी खेळली.

"म्हणजे?" दिगंबरने न कळून राजवीरकडे पाहिले. त्यालाही कल्पना नसल्याने तो फक्त शांतपणे सर्वकाही ऐकत होता.

"मी आणि राजवीर आमच्या ट्रेनिंगसाठी केरळला जातोय. या दरम्यान आमच्या गैरहजेरीत आम्ही अधिराची काळजी घ्यायला आमच्या मित्रांना सांगितलंय." विराज बोलू लागला, तर दिगंबर शांतपणे ऐकून घेऊ लागला.

"आम्हाला खात्री आहे की आमचे मित्र अधिराची काळजी खूप चांगल्या रितीने घेतील; पण तुम्ही उगाच सर्जेराव काकांची चापलुसी करण्याच्या निमित्ताने त्यांना काही मिसइन्फॉर्मेशन दिली किंवा शहानिशा न करता काकांना फोन लावून कोणतीही खबर दिली... तर दिगंबर दादा, काकांच्या आधी मीच तुम्हाला निकामी करेल! आणि ही पोकळ धमकी नाही. कळलं?" विराजने त्याची धारदार नजर रोखून दिगंबरला धमकी दिली. भीतीने दिगंबरचे गाळण उडाले होते.

"पण... पण साहेब, मी माझं काम केलं नाही तर भाऊंना राग येईल." तो थरथरत म्हणाला.

"कर ना! तू तुझं काम कर; पण अधिरासंबंधित कोणतीही बातमी असो, त्याविषयी तू सगळ्यात आधी आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा." राजवीर म्हणाला. दिगंबर त्यावर विचार करू लागला.

"हे सात जण आमचे खूप चांगले मित्र आहेत. जर अधिरा यांच्यापैकी कोणासोबतही तुला दिसली तर विनाकारण संशय घेण्याची गरज नाही. त्यांना आम्हीच तिची जबाबदारी सोपवली आहे. फक्त यांच्या व्यतिरिक्त इतर कोणी तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला, तरच तू हस्तक्षेप करायचा. कळलं?" राजवीरने अगस्त्य, गाथिका, रजनीश, प्रनिश, तनिशा, सौंदर्या, मयंक या सगळ्यांचे फोटो दिगंबरला दाखवले आणि सुचना दिली.

"पण भाऊंना कळलं की मी माझं काम नीट नाही करतोय वगैरे तर?" दिगंबर मधोमध फसला होता. सर्जेरावांची क्रुरताही त्याला ठाऊक होती आणि त्याला विराजशीही वैर घ्यायचे नव्हते.

"काकांना संशय येणार नाही, ही काळजी तुम्हीच घ्यायची आहे दादा..." विराज तिरकसपणे हसून म्हणाला.

दिगंबरने कपाळावर जमा झालेला घाम पुसला.

"सोप्या भाषेत सांगायचं तर अधिरा मुळातच सुसंस्कृत आहे म्हणून ती स्वतःहून कधीच वाकडं पाऊल टाकणार नाही." राजवीर शांतपणे म्हणाला. दिगंबरलाही ते पटले म्हणून त्याने समर्थनार्थ मान डोलावली.

"तू तिचा बॉडीगार्ड आहेस. तिच्यावर लक्ष ठेवणं, तिचं रक्षण करणं तुझं काम आहे; पण तुझ्या अति देखरेखीमुळे तिला मोकळा श्वासही घेता येत नाही. तिला आधीच कोणी मित्र-मैत्रिणी नाहीत. आम्ही दोघं असल्यावर ती निश्चिंत असते; पण आम्ही नसल्यावर ती एकटी पडू नये म्हणून आमच्या मित्र-मैत्रिणींना आम्ही तिची सोबत करायला सांगितलंय." राजवीरने बोलता बोलता दिगंबरचे हावभाव टिपले.

"दिगंबर दादा, आमचा हेतू वाईट नाही. तुम्हाला काकांनी अधिराच्या सुरक्षिततेची जबाबदारी सोपवलीय म्हणून तुम्ही काटेकोरपणे तिची काळजी घेता; पण अधिरा आमचीही लाडकी आहे. तिच्याबद्दल चुकीचे निर्णय आम्हीही घेत नाही, हे लक्षात असू द्या." विराज म्हणाला, त्यावर दिगंबरने परत मान डोलावली.

"आमचे सगळेच मित्र विश्वासू आहेत, म्हणूनच त्यांची आणि अधिराची मी ओळख करून दिली. त्यांच्या सानिध्यात अधिरा सुरक्षितच असेल म्हणून तू निश्चिंत राहा." राजवीर बोलला. दिगंबर आता गांभीर्याने विचार करू लागला.

"दादा, तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा; पण आजपासून अधिराविषयी कोणताही मुद्दा असेल तर आधी तुम्ही आम्हाला संपर्क करायचा. चालेल?" विराज म्हणाला.

"ठीक आहे साहेब!" थोडा वेळ विचार करून शेवटी दिगंबरने होकार दिला, कारण विराजचा शब्द खुद्द सर्जेराव नाकारत नसायचे म्हणून त्यानेही फार आढेवेढे घेतले नाही.

त्याने होकार देताच राजवीर आणि विराजच्या ओठांवर विजयी हसू पसरले.
...................

इकडे रुधिरा न्हाणीघरातल्या आरशात एकटक बघत होती. मनात विचारांचे द्वंद्व सुरू होते.

'मी... मी योग्य केलं ना? मी खोटं बोलायला नको होतं का? पण... पण मी खोटं बोललेच नाही. मी... मी फक्त खरं सांगितलं नाही...' रुधिरा अस्वस्थ स्वरात बडबडली.

दुसऱ्याच क्षणी तिने तिचे केस गच्च पकडले.

'मी काय केलं हे... याचा परिणाम काय असेल?' विचार करतच रुधिराने नळ सुरू केला.

सगळे प्रसंग एकामागून एक डोळ्यासमोर तरळत होते. एक चेहरा वारंवार थैमान घालत होता म्हणून घाईतच तिने ३-४ वेळा स्वतःच्याच चेहऱ्यावर पाणी मारले.

"परिणाम काहीही असला तरी आता तुला झुरत बसायची गरज नाही." एकाएकी तो आवाज रुधिराच्या कानात शिरला आणि ती दचकली.

तिने नळ बंद केला आणि सरळ उभी राहिली. पुढे पाहिले तर आरशात तिचेच प्रतिबिंब होते. तिने आरशावर उडलेले पाण्याचे शिंतोडे हातानेच पुसले, तसे ते प्रतिबिंब आणखी स्पष्ट दिसू लागले.

"तू... तू परत आलीस?" रुधिरा स्वतःच्याच बोलक्या प्रतिबिंबाला घाबरली नाही, जणू तिला तिचा परिचय आधीपासूनच होता.

"ह्म्म. तुझ्या भल्यासाठी यावं लागलं." तिचे प्रतिबिंब उत्तरले.

"माझं भलं? आणि आता तू काय सल्ला दिलास? झुरत बसायची गरज नाही म्हणजे?" रुधिराने थेट बघत प्रश्नांची सरबत्ती केली.

"हे बघ, अधिराकडे विराज दादा आहे, त्याच्याशी तिचं लग्न ठरलंय. भाऊ म्हणून राजवीर दादा तिच्या पाठीशी आहे. दिखावा म्हणून का असेना; पण लोकांसमोर सर्जेराव इंदलकरही तिला जपतो... मात्र तुझं काय?" आरशातील प्रतिबिंबाने विचारलेला प्रतिप्रश्न रुधिराच्या आत्मसन्मानावर खोलवर रुतला; पण तिने चेहरा निर्विकार ठेवला.

"मला कोणाची गरज नाही." रुधिरा कठोरपणे म्हणाली.

"रुधिरा, हे खोटं तू जगाला सांग, मला नाही. माझ्यापासून तू काही लपवून ठेवू शकत नाहीस." तिचे प्रतिबिंब उपरोधिक हसत म्हणाले.

"मी... मी कुठे काय लपवलं?" आता रुधिराने नजर चोरली.

"लपवत आहेस तू सध्या..." तिचे प्रतिबिंब गरजले.

"क... काय?" रुधिरा अडखळली.

"तुला आवडला ना तो पहिल्याच नजरेत?" तिच्या प्रतिबिंबाने थेट विचारले.

"पण तो... तो..." रुधिराची बोबडी वळली होती. कपाळावर घाम जमा झाला होता.

"तो काय?" तिच्या प्रतिबिंबाने नजर रोखली.

"तो सम्राट चव्हाण आहे, त्र्यंबकनाथ चव्हाणचा मुलगा..." रुधिरा धीर एकवटून थरथरत्या आवाजात म्हणाली.

तिच्या मनातली अपराधीपणाची भावना वाढली होती; पण तिच्या प्रतिबिंबाच्या ओठांवर मात्र कपटी हसू होते.


कोण आहे सम्राट चव्हाण? रुधिरा का त्याचा उल्लेख करताना घाबरली आहे? राजवीर आणि विराजने दिगंबरसोबत केलेल्या डीलबद्दल सर्जेराव इंदलकरांना कळले तर?

क्रमशः
..........
© सेजल पुंजे.


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →