Login

साज़िश: गॅम्बल ऑफ लव्ह (भाग-२२)

अगस्त्य आणि अधिराने केला प्रेमविवाह, दोघेही एकत्र खूप खूश; पण एकाएकी अधिराचा झाला खून आणि हत्येच्या आरोपाखाली अगस्त्यला झाली अटक! अख्खा महाराष्ट्र त्याच्याविरोधात असताना त्याची मैत्रीण—गाथिकाने त्याची केस लढण्याचा घेतला निर्णय. कोणती रहस्ये उलगडेल हा खटला? या रक्तरंजित खेळाचा सूत्रधार अगस्त्य असेल की आणखी कोणी? जाणून घेण्यासाठी वाचा "साज़िश: Gamble Of Love"

गाथिकाने मयंकला लगेच धारेवर धरत विचारले, "काय सुरू आहे तुझ्या डोक्यात?"

"काय?" मयंकने गोंधळून पाहिले.

"तुला त्या दोघींपैकी कोणी आवडलं का?" सौंदर्याने डोळे बारीक करून पाहिले.

"ए... काहीही काय? मी फक्त त्यांच्या सौंदर्याचं कौतुक केलं." मयंक खेकसला. तसा त्यांचा संशय दूर झाला.

"असं असेल तर मग ठीक आहे." प्रनिश म्हणाला.

"ह्म्म, असंच आहे! बाय द वे, कार्बन कॉपी आहेत ना दोघीही..." मयंकने परत नवल व्यक्त केले.

"पण अधिरा फ्रेंडली आहे, रुधिरा नाही." अगस्त्य ओघात बोलून गेला.

"दादा बोलला ना तिला सवय नाहीये म्हणून असेल..." तनिशा म्हणाली.

"कदाचित..." अगस्त्य बोलला.

"बरं, तू अधिराचा नंबर फॉरवर्ड कर ना." रजनीश म्हणाला.

"अं..." अगस्त्य भाव खाऊ लागला.

"नखरे काय करतोय?" रजनीशने कमरेवर हात ठेवला.

"तुमची लक्षणं पाहता एखाद्या मुलीचा नंबर तुम्हाला देणं म्हणजे धोक्याची घंटा वाटतेय." अगस्त्य मस्करीत म्हणाला.

"कम ऑन यार अगस्त्य... वीर दादाची बहीण आहे अधिरा..." रजनीश मानेला झटका देत म्हणाला.

"मग काय! वीर दादाची बहीण ती आपली बहीण..." मयंकनेही दुजोरा दिला.

"हो ना... गर्लफ्रेंडची टंचाई असली तरी अधिराबद्दल आपल्या मनात चुकीचे विचार येऊच शकत नाही." प्रनिश म्हणाला, त्यांची निष्ठा बघून तनिशा आणि सौंदर्याने भुवया उंचावल्या.

"केलाय नंबर फॉरवर्ड..." अगस्त्य म्हणाला; पण आता त्याचा चेहरा थोडा पडला होता, कारण त्याच्या मनातली अपराधीपणाची भावना त्याच्या मनाला पोखरत होती. गाथिकाने त्याचे हावभाव टिपले आणि तिने खोल सुस्कारा सोडला.

थोड्या वेळाने सगळे एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या घराच्या दिशेने रवाना झाले.
.........

"अधिरा, अगस्त्य, गाथिका आणि बाकी सगळेच खूप चांगले आहेत. तुला त्यांच्यासोबत कधीच अनकम्फर्टेबल वाटणार नाही म्हणून त्यांच्याशी मोकळेपणाने वागू शकतेस." कारमध्ये बसून असताना राजवीरने अधिराला हातवारे करत सांगितले.

"हो दादा, मला त्यांच्याकडून पॉझिटिव्ह वाईब्स आल्या. ते सगळेच प्युअर सोल्स आहेत. मला पहिल्याच भेटीत त्यांच्यासोबत सेफ फील झालं अगदी..." अधिराने हातवारे करत प्रत्युत्तर दिले.

"ओके! अगस्त्यबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस. तो खरंच खूप चांगला मुलगा आहे." राजवीरने समजावले.

"दादा, मला आधी गैरसमज झाला होता. कदाचित घाबरले होते म्हणून असेल; पण आता माझा गैरसमज क्लियर झालाय. आय नो, ही इज जेंटलमन टू!" अधिराने तिचे मत सांगितले, तसा राजवीर निश्चिंत झाला.

"ह्म्म. यू कॅन ट्रस्ट देम ॲज आय डू." राजवीर म्हणाला. तशी तिने होकारार्थी मान हलवली. रुधिराने ओठ तिरपे केले.

"रुधिरा, तूसुद्धा कोणतीही अडी-अडचण आली तर त्यांची मदत घेऊ शकतेस." राजवीरचे रुधिराकडे लक्ष जाताच तो तिला म्हणाला.

"त्याची काही गरज नाही, माझी मी समर्थ आहे." रुधिराने रूक्षपणे हातवारे करून उत्तर दिले आणि खिडकीबाहेर बघू लागली.

राजवीरने सवयीप्रमाणे खोल सुस्कारा सोडला.

थोड्या वेळात सगळे इंदलकर निवासमध्ये पोहोचले.

...........

दरम्यान अगस्त्यही त्याच्या बाईकने १५ मिनिटात घरी पोहोचला होता.

त्याचे आजी-आजोबा गप्पा मारत बसले होते.

"कसं झालं नाटक?" अगस्त्यला बघताच आजींनी विचारले.

"मस्त!" अगस्त्य गालात हसत म्हणाला.

"होणारच होतं! आमचा आशीर्वाद होता ना सोबत..." आजोबा गालात हसत म्हणाले. तसा तोही हसला.

"पण तुम्हीही यायला पाहिजे होतं." अगस्त्यने ओठांचा चंबू केला.

"आता शरीर साथ देत नाही राजा..." आजोबा म्हणाले.

"जास्त प्रवास केला की दमायला होतं." आजी म्हणाल्या.

"ह्म्म." अगस्त्य त्यांच्या गुडघ्याजवळ बसला.

"आजी-आजोबा, मी लवकरात लवकर माझं पी.जी. पूर्ण करून रंगभूमीवर ऑफिशियल पदार्पण करणार आहे. माझ्या पहिल्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला तुम्हाला फ्रंट सीटवर बसावंच लागेल, तेव्हा तुमचा एकही बहाणा ऐकून घेणार नाही मी!" अगस्त्य हट्ट करत म्हणाला.

"त्या दिवसाची आम्हीही आतुरतेने वाट बघतोय." आजींनी त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला.

"तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यावर तो दिवसही लवकरच येईल आपल्या आयुष्यात!" आजींचे हात हातात घेत अगस्त्यने त्यावर ओठ टेकवले.

"नक्कीच..." आजोबा गालात हसत म्हणाले.

"बरं, आज काय स्पेशल खाणार आहेस?" आजींनी कौतुकाने त्याच्याकडे बघत विचारले.

"स्पेशल? नाटक यशस्वी झालं म्हणून..." त्याने गोंधळून विचारले.

"ते तर आहेच रे... पण आज तुझा वाढदिवस आहे ना म्हणून विचारतेय." आजी म्हणाल्या.

"ओह! माझा वाढदिवस आहे, हे विसरलोच होतो." अगस्त्य ओशाळून हसला.

"असा कसा विसरलास तू? तुझ्या मित्रांनी नेहमीप्रमाणे विश केलं असेलच की..." आजोबा म्हणाले.

"कुठे आजोबा... एकानेही विश केलं नाही." अगस्त्य तक्रारीच्या सुरात म्हणाला.

"मग तू इतका नाराज का होतोय? दरवर्षी त्यांनी तुझा वाढदिवस साजरा केली की तूच म्हणायचास ना तुला वाढदिवस साजरा करायला आवडत नाही. मग आज का गाल फुगवतोयस?" आजींनी भुवया उंचावल्या.

"हो आजी... पण त्यांच्यामुळे आता सवय झालीय ना..." अगस्त्यने ओठांचा चंबू केला.

"ह्म्म. असू दे... विसरले असतील." आजोबांनी समजावले.

"हो, फायनल रिहर्सल आणि स्पर्धा या सगळ्यात विसर पडला असेल." अगस्त्यने समजून घेतले.

"होऊ शकतं. जा तू फ्रेश होऊन ये, मी जेवायला वाढते." आजी म्हणाल्या.

"आजी, तू का केलास स्वयंपाक? मी आहे ना हे सगळं करायला..." अगस्त्यने कमरेवर हात ठेवला.

"माझ्या लाडक्या नातवाचा वाढदिवस आहे आणि मी आज त्यालाच राबवेन का?" आजींनी त्यालाच प्रतिप्रश्न केला.

"यात काय इतकं..." अगस्त्यने खांदे उडवले.

"मला नाही पटत ते म्हणून... एरवी तर तू करतोसच ना! आज मी केला स्वयंपाक तर काय झालं? असंही तुला माझ्या हातचं जेवण आवडतंच ना!" आजी म्हणाल्या.

"आजी, तू ना खूप हट्टी आहेस." अगस्त्य गाल फुगवून म्हणाला.

"म्हणून तर तुझी आजी आहे." आजोबा म्हणाले आणि एकाच वेळी तिघेही खळखळून हसले.

त्यानंतर अगस्त्य खोलीत गेला, त्याने कपडे बदलले आणि आवरून खाली आला. आजी-आजोबासोबत त्याने जेवण आटपले. काही वेळ थोड्याफार गप्पा मारून अगस्त्य त्याच्या खोलीत गेला आणि त्याचे जुने नोट्स शोधू लागला.

त्याने कपाटातून काही वह्या काढल्या. काही पाने पालटून बघितली आणि दुसऱ्याच क्षणी त्याचा चेहरा उजाडला. त्याने त्याच्या बॅकपॅकमध्ये त्या सर्व वह्या ठेवल्या आणि आता पलंगावर लोळून विचारात हरवला.

'वाटलं नव्हतं अधिरा अशी असेल... मी बीचवर तिला मूकबधिर आहेस का असं सारकास्टिकली बोललो होतो म्हणून तर ती त्यावेळी रडली नसेल ना?' अगस्त्यच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

'नाही, हे शक्य नाही. तिला अनोळखी लोकांची लिप रिडींग येत नाही; पण तो शब्द कळला असेल तर?' त्याच्या मनात विचारांचे द्वंद्व सुरू होते.

अगस्त्य उठून बसला. 'जास्त विचार नको करू अगस्त्य! पहिल्या भेटीत नकळत हर्ट केलंय तिला; पण आता हर्ट करायचं नाही.' त्याने स्वतःला बजावले.

त्यानंतर त्याने राजवीरला मेसेज करून नोट्स मिळाल्याचे कळवले आणि थोडा वेळ इन्स्टाग्राम चाळू लागला.

'अधिरा हसताना किती गोड दिसते! तिचं निरागस हसू तिच्या सौंदर्यात भर घालतं.' गाथिकाच्या इन्स्टाग्राम स्टोरीतला फोटो बघून अगस्त्य हसतच पुटपुटला.

अचानक त्याचे डोळे विस्फारले आणि दुसऱ्याच क्षणी त्याने मोबाईल बंद केला.

'एक मिनिट, काय सुरू आहे माझं? मी काय विचार करतोय?' त्याने मानेवरून हात फिरवला.

'अगस्त्य विसरू नकोस, अधिरा राजवीर दादाची बहीण आहे. मुळात तिचं आणि विराज दादाचं लग्न होणार आहे. डोन्ट क्रॉस एनि लिमिट्स. डोन्ट!' अगस्त्यने स्वतःलाच बंधन लादले, कारण त्याला विश्वासघात करायचा नव्हता.

थोड्या वेळाने विचार करता करता त्याचा डोळा लागला.
............

स्थळ: इंदलकर निवास

घरी पोहोचल्यावर अधिरा आणि रुधिरा त्यांच्या खोलीत निघून गेल्या, तर विराज राजवीरसोबत त्याच्या खोलीत गेला.

त्या दोघांनी कपडे बदलले आणि ते बाहेर गेले. अधिरा-रुधिराही कपडे बदलून डायनिंग टेबलजवळ आल्या. त्या चौघांनीही जेवण वाढून घेतले आणि शांततेत जेवू लागले.

आता तिथे फक्त ते चौघेच होते.

"रुधिरा, कसा होता पहिला दिवस?" राजवीरने काळजीने विचारले.

"जसा सगळ्यांचा असतो." रुधिरा त्याच्याकडे न बघता उत्तरली.

"तू सरळ उत्तर देऊ शकत नाही का?" विराजने तिरसटपणे विचारले.

"सरळच उत्तर दिलंय मी! पहिला दिवस काय नि दुसरा दिवस काय... कोणताही दिवस सारखाच असतो." रुधिरा ओठ तिरपे करत म्हणाली.

विराज परत तिच्याशी काही वाद घालणारच की राजवीरने त्याचा हात पकडला आणि इशाऱ्यातच शांत राहायला सांगितले. त्याने वैतागून डोळे फिरवले आणि तो मुकाट्याने जेवण करू लागला.

"कोणाशी ओळख झाली का? कोणाशी मैत्री केलीस?" राजवीरने हा प्रश्न विचारताच तिच्या डोळ्यासमोर एक चेहरा तरळला; पण दुसऱ्याच क्षणी तिने तो चेहरा मनातून खोडला.

"नाही." ती उत्तरली.

"का?" राजवीरने विचारले. अधिराही शांतपणे त्यांच्यातील संवाद नजरेने समजून घेत होती.

"कारण सगळ्यांना अधिराशी मैत्री करायची आहे, माझ्याशी नाही. माझे क्लासमेट्स अधिरात इंटरेस्टेड आहेत. थोडक्यात त्यांना माझ्याशी मैत्री करायची नाही आणि मला त्यांच्याशी..." रुधिरा म्हणाली.

तिच्या शब्दांत अव्यक्त सल होती, जी राजवीरने अचूक हेरली. अधिरालाही अपराधी वाटले आणि तिने मान खाली घातली.

"हळूहळू होईल तुझी सगळ्यांशी मैत्री..." राजवीर समंजसपणे म्हणाला.

"मला नाही गरज कोणाच्या मैत्रीची..." रुधिरा लगेच चिडली.

"अगं पण..." राजवीर काही बोलणारच की ती ताट घेऊन उठली.

"तुझे प्रश्न विचारून झाले असतील तर जाते मी..." रुधिरा करड्या नजरेने बघत म्हणाली.

"जेवून तर घे." राजवीर काळजीने म्हणाला.

"प्रश्नांनी पोट भरलं माझं..." असे बोलून रुधिरा खिन्नपणे हसली.

तिने ताट स्वयंपाकघरात नेवून ठेवले आणि तावातच तिच्या खोलीत निघून गेली. राजवीर, विराज आणि अधिरा मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिले.


अगस्त्य सध्यातरी प्रेमापासून दूर पळतोय; पण त्याला कधी जाणवेल त्याच्या खऱ्या भावना? राजवीर आणि रुधिरामधील शीतयुद्ध कधीच संपुष्टात येणार नाही का? त्याचा जिव्हाळा तिला कधीच कळणार नाही का? रुधिराच्या डोळ्यासमोर कोणाचा चेहरा तरळला होता?

क्रमशः
.........
© सेजल पुंजे.

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →