Login

साज़िश: गॅम्बल ऑफ लव्ह (भाग-२१)

अगस्त्य आणि अधिराने केला प्रेमविवाह, दोघेही एकत्र खूप खूश; पण एकाएकी अधिराचा झाला खून आणि हत्येच्या आरोपाखाली अगस्त्यला झाली अटक! अख्खा महाराष्ट्र त्याच्याविरोधात असताना त्याची मैत्रीण—गाथिकाने त्याची केस लढण्याचा घेतला निर्णय. कोणती रहस्ये उलगडेल हा खटला? या रक्तरंजित खेळाचा सूत्रधार अगस्त्य असेल की आणखी कोणी? जाणून घेण्यासाठी वाचा "साज़िश: Gamble Of Love"

राजवीर आणि विराज विचार करतच होते की गाथिका केविलवाणा चेहरा करत म्हणाली, "गेल्या वर्षभरात आपण सगळ्यांनी खूप कमी वेळ एकत्र घालवला आहे आणि आता तुम्ही दोघे एझिमालाला गेल्यावर आम्ही तुम्हाला आणखी जास्त मिस करू."

"तुम्ही एक दिवस नाही देऊ शकत का आम्हाला? तुम्ही दोघेच म्हणता ना की आम्ही तुमचे ज्युनियर्स नाही तर फ्रेंड्स आहोत. मग मित्रांना कोण नकार देतं? आम्ही वारंवार असा कोणता हट्ट करतो का? नाही ना? प्लीज, जाऊयात ना फिरायला!" गाथिकाने ओठ बाहेर काढले.

"ओके, जाऊयात!" विराजने हसून होकार दिला, तशी गाथिकाची कळी खुलली.

"ड्रामा क्वीन आहेस! किती इमोशनल ब्लॅकमेल करतेस!" राजवीरने डोळे बारीक करून तिला पाहिले, तशी तिने जीभ चावली.

"तुला कळलं?" गाथिकाने निर्लज्जपणे विचारले.

"मग काय!" राजवीरने तिच्या डोक्यात टपली मारली, तसे सगळेच तिच्यावर हसले.

"अधिरा, तूसुद्धा आमच्यासोबत येणार आहेस बरं का!" अधिराकडे बघत गाथिका म्हणाली. तिने गोंधळून राजवीर आणि विराजकडे पाहिले.

"गाथा, अधिराला बाबा पाठवणार नाहीत." राजवीर म्हणाला आणि ते ऐकताच अगस्त्यचा चेहरा पडला.

"पण दादा, याच निमित्ताने आम्हाला तिच्याशी बॉंडींग स्ट्रॉंग करता येईल ना! प्लीज कन्व्हिन्स कर ना दादा तुझ्या बाबांना..." गाथिकाने आग्रह केला.

"अगं पण..." राजवीरला काय बोलावे ते कळत नव्हते.

"ठीक आहे गाथा, मी बोलतो काकांशी..." विराज आश्वस्त स्वरात म्हणाला. त्याने जबाबदारी घेतली म्हणून राजवीरही काहीसा निश्चिंत झाला.

"पण तुझं ऐकतील का काका?" गाथिकाने शंका मांडली.

"त्याचंच तर ऐकतात." राजवीर हळूच पुटपुटला.

"म्हणजे?" गाथिकाने गोंधळून पाहिले.

"लाडका जावई आहे ना तो त्यांचा..." राजवीर ओठांचा कोपरा उंचावत हसला.

"वीर..." विराजने राजवीरवर रागीट कटाक्ष टाकला. राजवीरने मात्र खांदे उडवले.

राजवीरचे शब्द अगस्त्यच्या कानात मात्र अजूनही घुमत होते. त्याचे लक्ष विराजकडे बघणाऱ्या अधिराकडे गेले आणि त्याच्याही नकळत त्याने करकचून मूठ आवळली.

"ओके, मग ठरलं तर! आपण सगळे फिरायला जाणार आहोत." गाथिका उत्साहात म्हणाली.

"येस!" सगळ्यांनीच जोश दाखवला.

"पण जायचं कुठे?" तनिशाने उत्सुकतेने विचारले.

"जवळपासच जाऊ..." सौंदर्या म्हणाली.

"हो... पण कुठे?" रजनीशने भुवया उंचावल्या. आता सगळे विचार करू लागले.

"भाट्ये बीच?" मयंकने स्थळ सुचवले.

"बीचवर आपण नेहमीच जात असतो." प्रनिश म्हणाला.

"मग दुसरं वेगळं काय?" राजवीरला प्रश्न पडला.

"गणपतीपुळे!" अगस्त्यनेही एक स्थळ सुचवले.

"आपण सगळे आधीही गेलो आहोत तिथे..." विराज म्हणाला.

"हो यार..." सगळ्यांची परत एकदा निराशा झाली.

"अं... पावस कसं राहील?" गाथिकाने चाचरत विचारले.

"बेस्ट पर्याय आहे! फार दूर नसल्याने प्रवास सहजसोपा असेल." राजवीर खूश होत म्हणाला.

"ह्म्म." विराजने हुंकार भरला.

"मग पावस डन करूयात!" गाथिका म्हणाली.

"हो." सगळ्यांनी दुजोरा दिला.

"बाईक्सची सर्व्हिसिंग करून घ्या सगळे... आपण बाईक राईड करत जाऊ पावसला..." गाथिका उत्साहात म्हणाली.

"बाईकने?" राजवीरच्या कपाळावर परत एकदा आठ्या पडल्या.

"हो मग! बाईक राईडमध्ये मस्त प्रवास इंजॉय करता येतो दादा... मजा येईल सगळ्यांनाच..." गाथिकाने खूश होत डोळे मिचकावले.

"बाबा नकार देतील." राजवीर हळूच म्हणाला.

"अरे यार... काय वीर दादा त्या थ्री इडियट्समधल्या फरहानसारखा क्षणाक्षणाला अब्बा नही मानेंगे म्हणतोय..." गाथिकाने नाक-तोंड गोळा केले.

तिचे उदाहरण ऐकून सगळ्यांनाच हसू फुटले.

"अगं खरं ते सांगतोय." राजवीर म्हणाला.

"प्लीज ना दादा... पावस इथून फक्त १५-१६ किलोमीटरच्या अंतरावर आहे. बाईक राईड करत सहज अर्ध्या तासात पोहोचू आपण... लांबचा प्रवास नाहीच करणार आहोत आपण!" गाथिका त्याची समजूत काढू लागली.

"हो ना दादा... ४०-५० किलोमीटरचा प्रवास असता तर आम्हीच फोर्स केला नसता; पण आपला प्रवास खूप कमी अंतराचा आहे, तर काय हरकत आहे?" तनिशानेही गाथिकाच्या शब्दांना दुजोरा देत राजवीरला समजावण्याचा प्रयत्न केला.

राजवीर काही प्रतिक्रिया देणारच की विराज म्हणाला, "ओके, जाऊयात बाईकनेच!"

"अरे! काय ओके? राज, तुला माहितीये ना सगळं?" राजवीर विराजवर भडकला.

"हो... पण तुलाही बाईक राईड करायची हौस आहे ना? आजपर्यंत रिस्ट्रिक्शन्समुळे तू कधी केली नाहीस. या छोट्याशा पिकनिकमुळे संधी मिळतेय तर का नकार द्यायचा?" विराज म्हणाला.

"राज, जे आतापर्यंत मी करू शकलो नाही ते आता करू शकणार आहे का?" राजवीरने वैतागून डोळे फिरवले.

"हो." विराज ठामपणे म्हणाला.

"अरे..." राजवीर भुवया आकसून घेत त्यालाच बघू लागला.

"मी बोलतो ना काकांशी, तू नको काळजी करू." विराज निश्चिंत स्वरात म्हणाला.

"काशी कर... तोंडावर आपटशील तेव्हा कळेल." राजवीर नाक मुरडत म्हणाला.

तेवढ्यात अधिराने त्या दोघांचेही कान पकडले आणि हातवारे करत म्हणाली, "परत भांडलात तर बघा!"

"सॉरी..." दोघांनी लगेच माफी मागितली, तसे तिने त्यांचे कान सोडले.

"अधिरा तुमची बॉस आहे वाटतं." मयंक हसत म्हणाला.

"ह्म्म." राजवीर आणि विराजने गालात हसून हुंकार भरला. तशी अधिरा हसली.

तिला हसताना बघून अगस्त्यच्या हृदयाची धडधड वाढली; पण त्याने स्वतःच्या मनात उठलेल्या वादळाला वेळीच शांत केले आणि तो सगळ्यांच्या नकळत तिचे निरीक्षण करू लागला.

थोडा वेळ गप्पा मारून सगळे आता पार्किंग लॉटकडे आले. राजवीर कारमध्ये बसतच होता की अचानक त्याचे डोळे विस्फारले.

"ओह शीट! एक विसरलोच..." राजवीरने कपाळावर हात मारला.

"काय?" सगळेच त्याच्याकडे बघू लागले.

"अगस्त्य..." त्याने अगस्त्यचे नाव घेतले, तसा अगस्त्य त्याच्याकडे बघू लागला.

"मी अधिराचा नंबर तुला टेक्स्ट केला आहे, तुम्ही सगळे आपापसांत सर्क्युलेट करून घ्या." राजवीर म्हणाला.

अगस्त्यने मेसेज चेक केला आणि तो गोंधळून राजवीरकडे बघू लागला.

"अरे असं काय बघतोय? आम्ही इथे नसल्यावर तुम्हाला सगळ्यांनाच तिची काळजी घ्यायची आहे ना! तर तिचा नंबर नको का तुमच्याकडे..." राजवीर म्हणाला आणि आता कुठे अगस्त्यच्या कपाळावरील आठ्या सैल झाल्या.

"ह्म्म." अगस्त्यने हुंकार भरला.

"अधिराचा नंबर आठवणीने सेव्ह करून घ्या. मेसेज थ्रू तुम्ही तिच्याशी इजिली कम्युनिकेट करू शकाल." राजवीरने सुचना दिली.

"दादा, बहिणीचा नंबर स्वतःहून सर्क्युलेट करणारा पहिलाच भाऊ असशील तू..." मयंक हसत म्हणाला.

"तुमच्यावर माझा डोळे झाकून विश्वास आहे म्हणून दिला अधिराचा नंबरही आणि तिची जबाबदारीही!" राजवीरने सगळ्यांकडे बघून कृतार्थता व्यक्त केली. त्याच्या नजरेतून विश्वास झळकत होता.

"आम्हाला इतकं गुणी समजल्याबद्दल मंडळ आभारी आहे." प्रनिश म्हणाला.

"आगाऊ आहात; पण गुणी आहात, इतकं तर मीही मान्य करतो." विराजही हसत म्हणाला.

"याला कौतुक समजावं की उपेक्षा?" सौंदर्याने भुवया उंचावल्या.

"चॉईस इज युअर्स!" विराज हसला. तसे सगळेच खळखळून हसले.

"चला, बाय..." राजवीर निरोप घेत म्हणाला.

"बाय!" सगळेच त्या तिघांना निरोप देऊ लागले.

"बाय अधिरा..." गाथिका म्हणाली.

"बाय." अधिरानेही हात हलवून गालात हसत निरोप दिला.

त्यानंतर ते तिघे कारमध्ये बसतच होते की त्याचवेळी तिथे रुधिरा आली.

तिथे अगस्त्य, गाथिका, रजनीश, मयंक, प्रनिश, तनिशा आणि सौंदर्याला बघून तिच्या कपाळावर हलक्याशा आठ्या पसरल्या; पण दुर्लक्ष करून ती कारमध्ये बसणारच की राजवीरने तिचा हात पकडला.

"रुधिरा, हे माझे फ्रेंड्स आहेत. मी इथे नसताना तुला काही अडचण आली तर यांना सांगू शकतेस." बॉडीगार्ड्सच्या धाकामुळे राजवीर हातवारे करत तिच्याशी बोलला.

"हिलाही बोलता किंवा ऐकता येत नाही का?" गाथिकाने नकळत प्रश्न केला.

"तिला बोलता येतं, ऐकता येत नाही." राजवीर नाईलाजाने खोटे बोलला. परत एकदा रुधिराची खोटी ओळख करून दिल्यामुळे रुधिरा संतापली होती.

"मी तुझी सगळ्यांशी ओळख करून देतो." राजवीर रुधिराकडे बघत हातवारे करून म्हणाला.

"नको. अधिराला सांगितलंय ना, दॅट्स इनफ." रुधिरा बोलली आणि कारचे दार उघडून आत बसली.

तिची ती प्रतिक्रिया बघून सगळ्यांचेच डोळे विस्फारले; कारण अधिरा जितकी शांत वाटत होती, तितकीच रुधिरा पहिल्याच भेटीत त्यांना अशांत आणि रागीट भासली.

राजवीर अवघडून हसला.

"बोललो होतो ना ती जरा इंट्रोव्हर्ट आहे, त्यामुळे..." राजवीरने खोटा बहाणा केला.

"आम्ही समजू शकतो." गाथिका हलके हसली. इतरांनीही विषय ताणला नाही.

"चला, बाय! भेटू उद्या." राजवीर म्हणाला.

"हो बाय." सगळ्यांनी निरोप दिला. तसे ते तिघेही कारमध्ये बसले.

"अगस्त्य, तू प्लीज जमलं तर उद्या तुझे नोट्स घेऊन ये." कारची खिडकी थोडी खाली करत राजवीर म्हणाला.

"हो दादा, मी घरी गेल्यावर शोधतो नोट्स आणि उद्या आठवणीने घेऊन येईल. काळजी करू नकोस. बाय." अगस्त्यने आश्वासन दिले.

अंततः निरोप घेऊन ते तिघे तिथून रवाना झाले.

"अधिरा-रुधिरा, दोघीही किती सुंदर दिसतात ना! जणू विश्वकर्माने कोरलेल्या दोन जिवंत कलाकृतीच!" मयंक कारच्या दिशेने एकटक बघत म्हणाला. तसे सगळेच डोळे बारीक करून मयंककडे साशंक नजरेने बघू लागले.


मयंकच्या मनात काय सुरू आहे? त्याला अधिरा-रुधिरापैकी कोणी एक आवडले असेल का?

क्रमशः
.........
© सेजल पुंजे.



0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →