"अधिरा, मी आणि राज एझिमाला गेल्यावर तुला काहीही गरज लागली तर या सगळ्यांना बिनधास्त सांगायचं." राजवीर अधिराला म्हणाला, तशी तिने होकारार्थी मान हलवली.
"आता तुमची मैत्री झालीय ना तर लेक्चर्सनंतर यांच्यासोबतच वेळ घालवायचा. लायब्ररी असो की कॅन्टीन... ओके?" राजवीरने अधिराला आणखी एक सुचना दिली.
"ओके." तिने परत एकदा गुणी बाळासारखी मान होकारार्थी हलवली.
आता राजवीर अगस्त्यसह बाकी सगळ्यांकडे बघू लागला.
"तुम्हाला अधिराची जबाबदारी सोपवतोय. आमच्या गैरहजेरीत प्लीज तिची काळजी घ्याल." राजवीरने अधिराच्या काळजीपोटी परत एकदा विनंती केली.
"ओके बॉस!" सगळे एकत्रच म्हणाले, तसा राजवीर किंचित हसला.
"अं... साईन लॅंग्वेज खूप अवघड असते का दादा?" गाथिकाने उत्सुकतेने विचारले.
"ना अगदी सोपी, ना अगदी अवघड... आपण जशा इतर भाषा शिकतो, तशीच साईन लॅंग्वेज शिकता येते. जगातली कोणतीही भाषा शिकायला जितका वेळ लागतो, तितकाच वेळ साईन लॅंग्वेज शिकायला लागतो." राजवीरने उत्तर दिले.
"ओह! तरी अंदाजे किती दिवस लागू शकतात साईन लॅंग्वेज शिकायला?" गाथिकाने आणखी एक प्रश्न केला.
"तीन महिन्यात बऱ्यापैकी साईन लॅंग्वेज येऊ शकते. सहा महिन्यात खूप चांगली आणि एक वर्षांत फ्लुएंटली... डेली प्रॅक्टिसमुळे डाऊट्स क्लियर होत जातात." राजवीरने माहिती दिली.
"अच्छा!" गाथिका हलकीशी हसली.
"पण गाथा, तू का साईन लॅंग्वेजबद्दल इतके प्रश्न विचारतेयस?" विराजने भुवया उडवत विचारले.
"सहज राज दा! ॲक्च्युली अधिरासाठी साईन लॅंग्वेज शिकून बघावी का, असा विचार करत होते." गाथिकाने एक कटाक्ष अगस्त्यवर टाकून विराजच्या प्रश्नाचे उत्तर दिले.
"असं काही नाही. तुम्ही सगळे अधिराशी मेसेज थ्रू बोलू शकता किंवा वही-पेन तर आहेतच." राजवीर म्हणाला.
ते सगळे त्याच्या बहिणीची काळजी घ्यायला तयार होते, यातच तो संतुष्ट होता. विनाकारण त्याला त्यांचा त्रास वाढवायचा नव्हता.
"हो... पण इन केस एखाद्याला स्वेच्छेने साईन लॅंग्वेज शिकायची असेल तर?" गाथिका सूचक हसत म्हणाली.
दुसऱ्याच क्षणी अगस्त्यने त्याची धारदार नजर तिच्यावर रोखली.
"एखाद्याला म्हणजे?" राजवीरने अनभिज्ञ स्वरात विचारले.
"काही नाही, सहज बोलले..." गाथिका म्हणाली.
"सहज?" अगस्त्य वगळता सगळेच तिच्याकडे साशंक नजरेने बघू लागले.
"हा म्हणजे अगस्त्य साईन लॅंग्वेज सहज शिकू शकतो ना म्हणून बोलले." गाथिका म्हणाली, तसा अगस्त्यने मोठा सुस्कारा घेतला.
"तो का सहज शिकू शकतो?" विराजने गोंधळून विचारले.
"त्याने दहावी बोर्डच्या परीक्षेनंतर एक साईन लॅंग्वेज क्लब जॉईन केला होता म्हणून..." गाथिकाने माहिती दिली.
"खरंच?" अगस्त्यकडे बघत राजवीरने विचारले. बाकी सगळेही त्याच्याकडेच बघत होते.
"हो... पण आता बऱ्यापैकी विसरायला झालं आहे. म्हणजे साईन्स लक्षात आहेत; पण कन्फ्यूजन होतं जरा..." अगस्त्य अवघडून हसला.
"अच्छा!" राजवीर म्हणाला.
"पण प्रयत्न केला तर खूप लवकर शिकू शकतोस तू परत... क्विक लर्नर आहेस ना!" गाथिका गालात हसत म्हणाली.
"ह्म्म." अगस्त्यने हुंकार भरला.
"साईन लॅंग्वेज तू शिकायलाच हवी, असं काही नाहीये अगस्त्य... एकदा सुटल्यावर परत शिकणं अवघड जातं म्हणून तू..." राजवीरला त्याला बळजबरी करायची नव्हती म्हणून तो नकार देऊ लागला.
"इट्स ओके दादा! असंही मी परत एकदा साईन लॅंग्वेज शिकणार होतोच." अगस्त्य म्हणाला, तशी गाथिका गूढ हसली.
"का?" राजवीर आणि विराजने गोंधळून विचारले.
"दोन महिन्यांनी मी एका डिफ शाळेत जाणार आहे. त्या शाळेच्या संचालिका जाधव मॅम माझ्या आजोबांना ओळखतात. त्यांनी रिक्वेस्ट केली आहे की मी मुलांना ॲक्टिंग शिकवावी, कारण शाळेच्या ॲन्यूअल डे फंक्शनमध्ये त्या सगळ्या मुलांना नाटक परफॉर्म करायचं आहे... तर त्या लहान मुलांशी कम्युनिकेट करायला मी साईन लॅंग्वेज शिकणार आहे." अगस्त्यने माहिती दिली.
"ओह! ग्रेट यार!" राजवीरला अगस्त्यचे कौतुक वाटले.
"ह्म्म... सो असाही मी ऑनलाईन साईन लॅंग्वेज क्लास जॉईन करणारच होतो, त्यामुळे त्रास वगैरेचा प्रश्न नाही दादा. शिवाय साईन लॅंग्वेज शिकल्यावर मला अधिराला अभ्यासात आणखी चांगल्याप्रकारे मदत करता येईल ना!" अगस्त्य अधिराकडे बघून किंचित हसत म्हणाला.
"बरं. जशी तुझी इच्छा. तू इतके एफर्ट्स घेतोय, त्यातच मी समाधानी आहे." राजवीर म्हणाला.
"एफर्ट्स काय दादा! हे बेअर मिनिमम आहे. आफ्टरऑल तुझा उत्तराधिकारी म्हणून अगस्त्य इतकं तर करूच शकतो." गाथिकाने परत एकदा मिश्किल हसत चिडवले, तशी तिथे हशा पिकली.
"गाथा, तू ना खूप आगाऊ आहेस." विराज हसतच म्हणाला.
"याच्याकडूनच शिकले." गाथिकाने सगळा दोष अगस्त्यवर टाकला.
"खोटारडी..." अगस्त्यने ओठ तिरपे केले.
"सेम टू यू." गाथिकाने जीभ दाखवली. तसे परत एकदा सगळे हसले.
"हे दोघे बेस्ट फ्रेंड्स आहेत का?" अधिराने राजवीरला इशाऱ्यात विचारले.
"काय म्हणाली अधिरा?" गाथिकाने जिज्ञासा दर्शवली.
"तुम्ही दोघे बेस्ट फ्रेंड्स आहात का असं विचारतेय." राजवीरने हसतच सांगितले.
"अरे नाही, हा माझ्या कुंडलीतला शनी आहे. भगवंताने फ्री ऑफ कॉस्ट दिलाय, हे सांग दादा अधिराला..." गाथिका एक कटाक्ष अगस्त्यवर टाकत म्हणाली.
"आणि ही माझ्यासाठी राहू-केतू आहे. टू इन वन डोकेदुखी! हेही सांग दादा तू अधिराला..." अगस्त्यनेही तोंड वाकडे केले.
विराजने हसतच मान नकारार्थी हलवली आणि हातवारे करत म्हणाला, "हो, ते बेस्ट फ्रेंड्स आहेत."
"काहीही म्हणा, तुम्ही दोघं क्युट वाटता भांडताना..." राजवीर हसतच म्हणाला. त्यावर सगळ्यांनीच दुजोरा दिला, अपवाद अगस्त्य आणि गाथिका होते.
"हा नि क्युट?" गाथिकाने डोळे फिरवले.
"ही आणि क्युट?" अगस्त्यही उपरोधिक हसला.
"नो वे!" त्या दोघांनीही एकत्रच प्रतिक्रिया दिली, तसे सगळे पोट धरून हसले.
थोड्या वेळाने कॅन्टीनमध्ये गर्दी वाढू लागली, तसे ते तिथून बाहेर पडले आणि त्यांच्या नेहमीच्या बाकाकडे गेले.
"अं... दादा, तुमची ट्रेनिंग एझिमालाला आहे ना, तर कधीपासून जाणार आहात?" सौंदर्याने कुतुहलाने विचारले.
"पुढच्या आठवड्यात, सोमवारी..." राजवीर म्हणाला.
"ओह!" सौंदर्या म्हणाली.
"पण काय भारी योगायोग आहे ना! तुम्ही दोघेही ट्रेनिंगला एझिमालालाच जाणार आहात." मयंकने आश्चर्य वर्तवले. तसे राजवीर आणि विराज एकमेकांकडे बघून किंचित हसले.
"ह्म्म... आता फक्त आपणच नाही, तर नेव्ही कॅडेट्सही या दोघांच्या मैत्रीचे साक्षीदार असतील." तनिशा डोळे मिचकावत म्हणाली.
"खरंय!" सर्वजण हसत म्हणाले.
"पण तुम्हाला वेळ मिळेल ना अधुनमधून भेटायला?" प्रनिशने शंका व्यक्त केली.
"म्हणजे?" राजवीर आणि विराजने एकाच वेळी गोंधळून विचारले.
"म्हणजे... वीर दादा, तू नेव्ही मेडिकल ऑफिसर म्हणून ट्रेनिंग घेणार आहेस, तर राज दा इंजिनिअरिंग ब्रॅंचमध्ये सब लेफ्टनंट म्हणून ट्रेनिंग घेणार आहे! बरोबर?" प्रनिश म्हणाला, त्यावर दोघांनीही होकारार्थी मान हलवली.
"मग तुमच्या दोघांच्या ट्रेनिंगचा फॉरमॅट वेगळा असेल ना! त्यामुळे कधी वीर दादा तू बिझी असू शकतो, तर कधी राज दा... म्हणून म्हटलं की अधुनमधून भेटायला तुम्हा दोघांना वेळ मिळेल की नाही..." प्रनिशने त्याच्या मुद्द्याची उकल केली.
"हो, असं होऊ शकतं; पण मॅनेज करता येईल ना..." विराज आत्मविश्वासाने म्हणाला.
"पण कसं होईल मॅनेज? तिकडे काटेकोरपणा, शिस्त याला खूप महत्त्व असतं, असं ऐकलंय मी... सिनियर्स स्ट्रिक्टसुद्धा असतात." रजनीशने त्याच्याकडे असलेली माहिती पुरवली.
"वेळ काढता येईलच की! फक्त रोज भेटीगाठी शक्य होणार नाहीतच; पण वेळ मिळेल तसं भेटू शकतोच. शिवाय नियम पाळले तर सिनियर्सही विनाकारण का त्रास देतील?डिसिप्लिनने वागल्यावर मला नाही वाटत काही प्रॉब्लेम येईल." विराज ठामपणे म्हणाला.
एकमताने सगळ्यांनी दुजोरा दिला.
"अं... दादा, एक सांगायचं होतं." अगस्त्य म्हणाला.
"बोल ना!" राजवीर आणि विराज त्याच्याकडे बघू लागले.
"तिथल्या ज्युनियर्सच्या सानिध्यात आमचा विसर पडू देऊ नका हं!" अगस्त्य आर्जवी स्वरात म्हणाला.
"हो! तुमचे लाडके ज्युनियर्स आम्हीच असणार आहोत हं!" गाथिकानेही अगस्त्यला दुजोरा दिला. हळूहळू सगळ्यांनी गाथिका आणि अगस्त्यची री ओढली.
"हो रे बाबांनो!" राजवीर हसत म्हणाला.
"आमचे ऑल टाईम फेव्हरेट्स तुम्हीच असणार आहात!" विराज म्हणाला, त्याला राजवीरनेही मान हलवत दुजोरा दिला. तसे सगळ्यांचेच चेहरे उजळले.
अधिरा शांतपणे सगळ्यांचेच भाव टिपत होती. ते काय बोलत आहेत, हे तिला ऐकू येत नसले तरी त्यांचे हावभाव बघून तिच्याही नकळत तिच्या ओठांवर हसू उमलत होते.
तेवढ्यात गाथिकाचे अधिराकडे लक्ष गेले आणि तिला एक युक्ती सुचली.
"ऐका ना, माझ्याकडे एक मस्त प्लॅन आहे." गाथिका खूश होत म्हणाली.
"कोणता?" सगळ्यांनी उत्सुकतेने विचारले.
"राज दा आणि वीर दादा एझिमालाला जाण्याआधी आपण सगळ्यांनी फिरायला जायचं?" गाथिकाने भुवया उडवत विचारले. तिच्या चेहऱ्यावर कमालीचा उत्साह झळकत होता.
"फिरायला?" राजवीरच्या कपाळावर मात्र आठ्या पडल्या.
"हो, आठवण म्हणून! प्लीज..." गाथिका बोट दुमडून (फिंगर क्रॉस करून) आशेने बघत म्हणाली.
"अं..." राजवीरने काळजीने विराजकडे पाहिले.
"प्लीज ना दादा... मजा येईल." गाथिका ओठांचा चंबू करत म्हणाली. इतरांनाही गळ घातली. तसे विराज आणि राजवीर एकमेकांकडे बघू लागले.
राजवीर आणि विराज हिरवा कंदील देतील का गाथिकाच्या बेताला?
