Login

साज़िश: गॅम्बल ऑफ लव्ह (भाग-१८)

अगस्त्य आणि अधिराने केला प्रेमविवाह, दोघेही एकत्र खूप खूश; पण एकाएकी अधिराचा झाला खून आणि हत्येच्या आरोपाखाली अगस्त्यला झाली अटक! अख्खा महाराष्ट्र त्याच्याविरोधात असताना त्याची मैत्रीण—गाथिकाने त्याची केस लढण्याचा घेतला निर्णय. कोणती रहस्ये उलगडेल हा खटला? या रक्तरंजित खेळाचा सूत्रधार अगस्त्य असेल की आणखी कोणी? जाणून घेण्यासाठी वाचा "साज़िश: Gamble Of Love"
गाथिकाला अधिराच्या डोळ्यात पाणी दिसले.

"कदाचित घाबरली होती असेल अधिरा म्हणून काही बोलायला सुचलं नसेल त्यावेळी..." गाथिकाने अधिराची बाजू घेतली आणि तिने हळूच अगस्त्यला कोपर मारून अधिराकडे बघायला सांगितले.

त्याने तिच्याकडे बघताच त्यालाही तिचे अश्रू दिसले, तसा त्याचा आविर्भाव बदलला.

"सॉरी अधिरा, मला नव्हतं माहिती की माझ्यामुळे तुला ओरडा पडेल." अगस्त्य तिच्याकडे बघत दिलगीर स्वरात म्हणाला.

तिने डोळे पुसले; पण काही बोलली नाही म्हणून अगस्त्यच्या मनात अपराधीपणाची भावना दाटून आली.

"सॉरी ना... मला खरंच नव्हतं माहिती गं..." अगस्त्य कान पकडून म्हणाला. तशी ती विराज आणि राजवीरकडे बघू लागली.

"दादा तूच सांग ना तुझ्या बहिणीला..." अगस्त्य राजवीरला म्हणाला.

राजवीरने अधिराकडे पाहिले, तिने डोळ्यांनीच इशारा केला.

"माफ केलंय तिने तुला..." राजवीरने अगस्त्यला सांगितले.

"हे ती स्वतः सांगेल तेव्हाच मी मान्य करेल." अगस्त्य हट्ट करत म्हणाला.

"ते तर शक्य नाही." राजवीर म्हणाला.

"का?" अगस्त्यने गोंधळून पाहिले.

"कारण ती बोलू किंवा ऐकू शकत नाही." विराजने उत्तर दिले. तसा सगळ्यांना धक्का बसला.

"व्हॉट? तुम्ही तिघे प्रॅंक तर करत नाही आहात ना?" अगस्त्यने साशंक नजरेने पाहिले.

"नाही, हे खरं आहे." राजवीर म्हणाला.

"आय ॲम सो सॉरी. मला खरंच... म्हणजे मी..." अगस्त्य पुरता भांबावला होता.

"पॅनिक नको होऊस अगस्त्य आणि गिल्टीही फील करू नको. इट्स ओके म्हणतेय अधिरा!" राजवीर म्हणाला, तसा अगस्त्यने हुंकार भरला.

वातावरण थोडे अवघडल्यासारखे झाले होते म्हणून अगस्त्य उठला आणि काउंटरकडे नाश्त्याचे ट्रे घ्यायला गेला. त्याच्या पाठोपाठ गाथिकाही गेली.

"रिलॅक्स अगस्त्य! तू मुद्दाम काही केलं नव्हतंस." गाथिकाला माहिती होते सध्या तो काय विचार करत असेल म्हणून ती त्याला समजावत होती.

"हो पण..." अगस्त्यने सुस्कारा घेतला.

"तुझ्याबद्दल तिचा जो गैरसमज झाला होता, तोही दूर झाला असेल एव्हाना... सो नको जास्त विचार करू." गाथिका त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाली.

"ह्म्म." त्याने हुंकार भरला. त्यानंतर अधिरासाठी ऑर्डर दिली व थोडा वेळ तिथेच थांबून राहिला.

"बाय द वे तिच्याकडे बघून वाटत नाही ना तिला बोलता किंवा ऐकता येत नसेल." आता गाथिका मुद्दाम अगस्त्यला बोलते करण्यासाठी बोलत होती.

"ह्म्म." अगस्त्यने फक्त हुंकार भरला.

"तरीही काय भारी परफॉर्म केलं ना!" गाथिका उत्सुकतेने म्हणाली.

"हो." अगस्त्यने होकार दिला.

"सुंदर दिसते हं ती! म्हणूनच तू तिला बघून क्लीन बोल्ड झालास होतास बीचवर..." गाथिका ओठातले हसू दाबून म्हणाली आणि योगायोगाने अगस्त्यने हुंकार भरला.

"म्हणजे तू मान्य करतोयस की तू तिला बीचवर बघून फिदा झाला होतास!" गाथिका डोळे मिचकावत म्हणाली आणि आता अगस्त्य भानावर आला.

त्याने पटकन गाथिकाच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला, "ए बावळट, हळू बोल ना!"

"का?" ती त्याचा हात बाजूला करत म्हणाली.

"ऐकलं नाहीस का वीर दादा काय बोलला?" त्याने रागीट कटाक्ष टाकला.

"काय बोलला?" गाथिकाने न कळून विचारले.

"राज दादा आणि अधिराचं लग्न ठरलंय. वुड बी हसबंड ॲंड वाईफ आहेत ते दोघे... हे ऐकून उगाच गैरसमज होईल." अगस्त्य म्हणाला आणि काउंटरला पाठ टेकवून जिथे त्यांचे मित्र होते त्या दिशेने बघू लागला.

"गैरसमज काय? तू पडलास ना तिला पाहताक्षणीच तिच्या प्रेमात..." गाथिकाने खांदे उडवले.

"कम ऑन यार गाथा! पहिल्या नजरेतलं प्रेम वगैरे... नॉट माय कप ऑफ टी." अगस्त्यने सपशेल नकार दिला.

"पण मला असं का वाटतंय की तुला ती आवडलीय, फक्त तू मान्य करत नाहीयेस." गाथिकाने नजर रोखली.

"तुला ना काहीही वाटतं." तो मानेला झटका देत म्हणाला.

"मग तू अजूनही पापण्यांची उघडझाप न करता अधिराकडे एकटक का बघतोय?" गाथिकाने हाताची घडी घालून विचारले.

"असं... असं काही नाही." अगस्त्यने लगेच दुसरीकडे पाहिले.

"बघ, लगेच तू नजर दुसरीकडे वळवलीस." तिने ओठांचा कोपरा उंचावला.

"शट अप मिस आय नो एव्हरीथिंग." त्याने वैतागून डोळे फिरवले.

"मी तुझा चेहरा वाचतेय, अगस्त्य." ती त्याच्या चेहऱ्याचे भाव टिपत म्हणाली.

"माझा चेहरा वाचण्याऐवजी लॉची पुस्तकं वाच." त्याने तिला टोमणा मारून तोंड वाकडे केले आणि ट्रे उचलून त्यांच्या टेबलकडे जाऊ लागला.

"तू प्रश्न डॉज करतोय, अगस्त्य..." गाथिकाही दुसरा ट्रे घेऊन पळतच त्याच्यासोबत चालू लागली.

"श्शु! सध्यातरी तू विचार करतेय तसं काही नाही म्हणून हा विषय इथेच थांबव." अगस्त्य तिच्याकडे बघत म्हणाला.

"ओके." त्यांचा टेबल दोन पावलांच्या अंतरावर होता म्हणून गाथिकानेही होकार दिला.

त्यानंतर दोघेही नाश्ता घेऊन टेबलजवळ आले.

"अरे व्वा! वडापाव, सॅंडविच, मिसळपाव... आज मोठी ट्रीट देत आहेत आपल्या भावी वकिलीनबाई!" राजवीर हलके हसून म्हणाला.

"आता तू चिडवू नको ना दादा..." गाथिका बारीक तोंड करून म्हणाली. तसा राजवीर हसला.

सगळ्यांनी नाश्त्याची एकेक प्लेट उचलून घेतली. अगस्त्य आणि गाथिका त्यांच्या जागेवर बसले.

"दादा, अधिराला वडापाव आवडतो का?" राजवीरने तिला वडापावची प्लेट दिली म्हणून गाथिकाने कुतूहल व्यक्त केले.

"खूप..." विराज अधिराकडे बघून किंचित हसत म्हणाला.

"अच्छा! अगस्त्यलाही खूप आवडतो." गाथिका म्हणाली, तसा अगस्त्यने खोल श्वास घेतला.

"गप्प बस, नाहीतर मार खाशील." त्याने तिला मेसेज पाठवला.

"तुझ्या मनात काही नसताना तू का इतका अस्वस्थ होतोय?" गाथिकानेही त्याला डिवचणारा मेसेज पाठवला.

"गाथा, प्लीज!" त्याने इमोजीसकट मेसेएद्वारे विनवणी केली.

"ओके." गाथिकाने काही वेळ विचार करून मेसेज पाठवला.

"अरे, तुम्ही दोघं नाश्ता सोडून काय मोबाईल घेऊन बसलात?" मयंकने डोळे बारीक केले. दुसऱ्याच क्षणी अगस्त्यने मोबाईल खाली ठेवला.

"ते मी मेसेज चेक करत होतो." अगस्त्य म्हणाला.

"मी फोटो कॅप्चर करत होती." गाथिकाने दात दाखवले.

"आणि मग इन्स्टाला स्टोरी टाकेल #मायट्रीट!" प्रनिशने तिला चिडवले.

"तू खातोयस ना वडापाव की घेऊ हिसकावून..." गाथिका धमकी देत म्हणाली. तसे सगळे खळखळून हसले आणि सॅंडविच, वडापाव, मिसळ पाववर ताव मारू लागले.

"बाय द वे दादा, तुमचे बाबा किती सॉफ्ट आहेत! त्यांनी इतक्याशा कारणामुळे का हात उचलला अधिरावर?" गाथिकाला अधिराकडे बघून प्रश्न पडला, तसे तिने वडापाव खात प्रश्न केला.

"जसं दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं गाथिका..." राजवीर उपरोधिक हसला.

"म्हणजे?" सगळ्यांनीच त्यावर प्रतिक्रिया दिली.

"फार काही सांगणार नाही; पण राजकारणी सगळे एकाच माळेचे मणी असतात, इतकं लक्षात घ्या." राजवीरचे बॉडीगार्डकडे लक्ष गेले म्हणून तो आणखी स्पष्ट बोलला नाही.

"आम्ही त्यांना किती ग्रेट समजत होतो." गाथिका निराश होत म्हणाली, सगळ्यांनीच दुजोरा दिला.

त्या सगळ्यांचा भ्रमनिरास झाला होता, कारण राजवीरमुळे त्यांना सर्जेरावांची खरी प्रतिमा लक्षात येत होती.

"ह्म्म. सगळेच समजतात, कारण आपले आमदारसाहेब दिखावा करण्यात तरबेज आहेत. शिवाय स्वतःला ते राजा समजतात म्हणून इतरांना कळसुत्री बाहुलीसारखं नाचवतात." विराज तिरसटपणे म्हणाला.

"असो. हा विषय सोडा." राजवीरने विराजच्या हातावर हात ठेवला, तसा विराजने खोल श्वास घेतला.

"आपलं इंट्रोडक्शन बाकी आहे ना..." राजवीर म्हणाला. सगळ्यांनीच त्यावर मान डोलावली.

"तुम्ही करा सुरू मी हे ट्रे काउंटरवर ठेवून येते." तनिशा म्हणाली आणि ट्रे उचलून घेऊन गेली.

"अधिरा, हा अगस्त्य मोहिते आहे. हा एम.ए. फर्स्ट ईयरला आहे. थिएटर आर्ट्स करतोय. असा दिसत असला तरी चांगला मुलगा आहे तर गैरसमज करून घेऊ नकोस." शेवटचे वाक्य राजवीर मुद्दाम बोलला.

"दादा..." अगस्त्यने नाराजी व्यक्त केली तसे सगळेच हसले. तनिशाही परतली होती.

"दादा तुला साईन लॅंग्वेज येत नाही का?" गाथिकाने गोंधळून विचारले, कारण राजवीर हातवारे न करता अधिराशी बोलत होता.

"काय? मग तुम्ही कम्युनिकेट कसं करता?" अगस्त्यने भुवया उंचावल्या.

"येते बाबा आम्हाला साईन लॅंग्वेज..." राजवीरने सांगितले.

"अच्छा! मग तू असं का बोलतोय? म्हणजे तू तिला साईन लॅंग्वेजमध्ये आमचं इंट्रोडक्शन दे ना म्हणजे तिला नीट कळेल." गाथिका म्हणाली.

"तिला लिप रिडींग येते. त्यामुळे तिला कळतंय की मी काय बोलतोय." राजवीरने खुलासा केला.

"वॉव! ग्रेट!" सगळ्यांनीच कौतुकाने भुवया उंचावल्या.

"ह्म्म... पण सगळ्यांची नाही येत तिला लिप रिडींग..." राजवीरने सांगितले.

"म्हणजे?" गाथिकाने गोंधळून विचारले.

"ती ज्या लोकांना ओळखते त्यांची लिप रिडींग तिला करता येते. जसं मी, विराज... तुमचीही करता येईल; पण वेळ लागेल, कदाचित ३-४ महिने..." राजवीरने माहिती दिली.

"अच्छा!" सगळेच कौतुकाने अधिराकडे बघत म्हणाले.

"खूप टॅलेंटेड आहे दादा तुझी बहीण..." अगस्त्य नकळत बोलला.

"तुझी बहीण, तुझी बहीण काय करतोय? अधिरा म्हण ना तिला..." राजवीर कपाळावर हात मारत म्हणाला.

"हो, सॉरी." अगस्त्यने ओशाळून केसांत हात फिरवला.

"आज हा दिवसभर सॉरीच म्हणणार आहे बहुतेक..." गाथिका हळूच पुटपुटली; पण अगस्त्यने ते ऐकलेच, तसा तो तिच्याकडे रागीट कटाक्षाने पाहू लागला. गाथिकाला मात्र काही फरक पडला नाही.

अगस्त्यने नकारार्थी मान हलवली आणि बॅगमधून वही-पेन बाहेर काढला.

"हाय अधिरा!" अगस्त्यने वहीत लिहिले आणि ती वही अधिराकडे सरकवली.

"अं... एक मिनिट..." अचानक दीप्तांशु खुर्चीवरून उठून उभा राहिला. तसे सगळेच गोंधळून त्याच्याकडे बघू लागले.


काय झाले दीप्तांशुला? तो अचानक का उठून उभा राहिला?

क्रमशः
..........
© सेजल पुंजे.

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →