Login

साज़िश: गॅम्बल ऑफ लव्ह (भाग-१७)

अगस्त्य आणि अधिराने केला प्रेमविवाह, दोघेही एकत्र खूप खूश; पण एकाएकी अधिराचा झाला खून आणि हत्येच्या आरोपाखाली अगस्त्यला झाली अटक! अख्खा महाराष्ट्र त्याच्याविरोधात असताना त्याची मैत्रीण—गाथिकाने त्याची केस लढण्याचा घेतला निर्णय. कोणती रहस्ये उलगडेल हा खटला? या रक्तरंजित खेळाचा सूत्रधार अगस्त्य असेल की आणखी कोणी? जाणून घेण्यासाठी वाचा "साज़िश: Gamble Of Love"
"वीर दादा... यार, तिला नकार द्यायचा असेल तर तिचा तिला देऊ दे ना... तू का तिच्या वतीने निर्णय घेतोयस?" अगस्त्यने तक्रारीच्या सुरात विचारले.

"कारण माझा निर्णय तो तिचा निर्णय!" वीर म्हणाला.

"तुझं प्रेम आहे का तिच्यावर? की तुझी क्रश आहे ती?" अगस्त्यने वैतागून डोळे फिरवले.

"बहीण आहे ती त्याची!" विराजने खुलासा केला आणि आता अगस्त्यची बोबडी वळली.

"उप्स सॉरी! दादा मला खरंच तसं म्हणायचं नव्हतं. आय ॲम सॉरी." अगस्त्यने लगेच कान पकडून माफी मागितली.

"ह्म्म. इट्स ओके." राजवीरने विषय ताणला नाही.

"स्टिल सॉरी दादा... मी फक्त गंमतीत तुझी फिरकी घेत होतो." अगस्त्यने त्याचा हेतू सांगितला. त्यावर राजवीर काही बोलणारच की विराज बोलला.

"आधी कमेंट पास करायची, मग सॉरी म्हणायचं... टिपिकल द अगस्त्य मोहिते बिहेवियर!" विराजने नकारार्थी मान हलवत टोमणा मारला, तसे सगळे फिदीफिदी हसले.

"राज दादा, तू का मला टोमणा मारतोय? मी इंटेन्शनली नाही बोललो काहीच... शिवाय वीर दादाला सॉरी बोललो ना आणि त्याने समजूनही घेतलं; पण तू उगाच ऑफेंड होतोय तुझा काही संबंध नसताना... त्यात लागलेली आग विझवण्याऐवजी भडका पेटवण्याचे उपाय शोधतोयस? का?" अगस्त्यने डोळे बारीक करून प्रश्नांची सरबत्ती केली.

"कारण ती माझीही..." विराज बोलतच होता की अगस्त्य म्हणाला.

"कारण ती राजची होणारी बायको आहे." राजवीरचे उत्तर ऐकून सगळे काही क्षण डोळे विस्फारून बघत राहिले.

अगस्त्य तर तोंडावर आपटला होता म्हणून त्याने चेहराच झाकून घेतला.

"व्हॉट द हेल वीर... तुला सकाळीच सांगितलं ना मी..." विराज मात्र राजवीरवर हळूच चिडला; पण राजवीरने बॉडीगार्डकडे इशारा केला, तसा विराज रागाने धुसफूस करत शांत झाला.

"बोलताना विचार करून बोलत जा मित्रा..." गाथिका हळूच अगस्त्यच्या कानात कुजबुजली.

बाकीचे मित्र अगस्त्यच्या फजितीवर ओठ दाबून हसत होते.

"सॉरी राज दादा... मी... मला खरंच आयडिया नव्हती. आय डोन्ट मीन टू..." अगस्त्यला सुचेनासे झाले होते, तरीही शब्दांची जुळवाजुळव करत त्याने माफी मागितली.

"ठीक आहे." विराजने विषय ताणला नाही.

तेवढ्यात विराजच्या मोबाईलवर मेसेज नोटिफिकेशन आले.

"कोणाचा आहे मेसेज?" राजवीरने विचारले.

"अधिराचा... तिचं चेंज करून झालंय. कल्याणीला अर्जन्सीमध्ये जावं लागलं घरी, तर आता ती त्या रूममध्ये एकटी आहे." विराज मेसेज दाखवत म्हणाला.

"ठीक आहे, मग घेऊन ये तू तिला इकडेच... असंही या सगळ्यांशी तिची ओळख करून द्यायचीच आहे." राजवीर म्हणाला.

"कशाला?" विराजने गोंधळून विचारले.

"आपण ट्रेनिंगसाठी एझिमाला गेल्यावर इथे तिची काळजी घेणारं, तिला सोबत करणारं कोणी नसेल. हे सगळे अधिराचे सिनियर्स आणि आपले मित्र आहेत तर तिच्याशीही या सगळ्यांशी ओळख असणं गरजेचं आहे. हे सगळे तिच्या सोबत असतील तर माझी काळजी तेवढीच कमी होईल. आय कॅन ट्रस्ट देम ऑल." राजवीर म्हणाला.

"बरं, मग मी लगेच घेऊन येतो अधिराला इथे..." विराज जागेवरून उठत म्हणाला.

राजवीरने हुंकार भरताच विराज पळतच तिथून बाहेर गेला.

"दादा, तू खरंच तुझ्या बहिणीला आमचा ड्रामा क्लब जॉईन करू नाही देणार?" अगस्त्यने काकुळतीने विचारले.

"नाही." राजवीरचा नकार अजूनही ठाम होता.

"अरे पण का? किती भारी करते ती ॲक्टींग?" आता गाथिकाने मध्यस्थी केली.

"हो पण तिला नाहीये या सगळ्यात इंटरेस्ट..." राजवीर म्हणाला.

"म्हणजे आज तिचा पहिला अटेम्प्ट होता?" प्रनिशने चकित होऊन विचारले.

"हो." राजवीरने होकारार्थी मान हलवली, तसा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

"आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये इतका फ्लॉलेस अभिनय केला?" दिप्तांशुने विचारले.

"ह्म्म. रिहर्सल्सदरम्यान होती ती आमच्यासोबत, तर तिने ऑब्झर्व्ह केलं होतं आम्हाला..." राजवीरने माहिती दिली.

"आर यू सिरियस?" सौंदर्या आणि तनिशा थक्क झाल्या होत्या. त्यांची प्रतिक्रिया बघून राजवीरने हसतच हुंकार भरला.

"नुसत्या ऑब्झर्व्हेशनच्या आधारे इतकी भारी ॲक्टींग! शी इज रियली जेम दादा... तू रंगभूमीपासून एक हिरा अलिप्त ठेवतोयस." अगस्त्य म्हणाला, त्याच्या शब्दांत कळकळ दडली होती.

"ह्म्म. तू इमोशनल ब्लॅकमेल केलं तरी माझा निर्णय बदलणार नाही, अगस्त्य." राजवीर म्हणाला आणि आता सगळ्यांनाच प्रश्न पडला की रंगभूमीवर, नाटकावर अतोनात प्रेम करणारा राजवीर स्वतःच्याच बहिणीला रंगभूमी आणि नाटकांपासून का अलिप्त ठेवतोय?

"दादा..." अगस्त्य राजवीरशी पुढे काही बोलणारच होता; पण अचानक तिथे याश्वी आली.

"हाय अगस्त्य!" याश्वी अगस्त्यच्या जवळ आली.

"याश्वी, तू घरी गेली नाहीस अजून?" तिला बघून त्याच्या कपाळावर नेहमीप्रमाणे आठ्या पडल्या.

"नाही, तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट करायला थांबले होते." याश्वी उत्तरली.

तिच्या उत्तराने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आणि ते विरंगुळा म्हणून त्या दोघांचा संवाद कान टवकारून ऐकू लागले.

"आता कशासाठी कॉंग्रॅच्युलेट करणार आहेस तू मला?" अगस्त्यने गोंधळून विचारले.

"तुमचं नाटक सगळ्याच स्टुडंट्सला आवडलं. मी सगळ्यांचे रिव्ह्यूज घेतले. अल्मोस्ट सगळ्याच प्रेक्षकांना तुमचं नाटक, लिखाण, अभिनय, विषयाची मांडणी सगळंच खूप आवडलं." याश्वी म्हणाली.

"ओह!" सगळ्यांनीच ते ऐकून भुवया उंचावल्या.

"म्हणून मी खात्रीनिशी सांगू शकते की यंदा तुम्हीच जिंकाल ही स्पर्धा... त्याकरिता आधीच कॉन्ग्रॅच्युलेट करायला आले मी!" याश्वीने स्मित करत अभिमानाने सांगितले.

"माझ्यावर इतका विश्वास ठेवण्यासाठी थॅंक्स याश्वी..." अगस्त्य ओढूनताणून हसत बोलला, कारण आता परत सगळे त्याची फिरकी घेणार याची खात्री त्याला होती.

"अगस्त्य, तुम्हाला बघायचे आहेत का रिव्ह्यूज? मी रेकॉर्ड केलेत." याश्वी मोबाईल काढत म्हणाली.

"तू मला व्हॉट्सॲपला सेंड कर, मी बघून घेईन. सध्या बिझी आहे. बाय." अगस्त्यने तिला निरोपच दिला.

"बाय." याश्वी नाईलाजाने निघून गेली.

अगस्त्य त्याच्या खुर्चीवर बसला, तसे सगळेच त्याला चिडवू लागले. तो पुरता ओशाळला होता. त्यांची चेष्टा मस्करी सुरू असताना विराज अधिरासोबत तिथे आला. अगस्त्यला याश्वीचा मेसेज आला म्हणून त्याचे लक्ष मोबाईलमध्ये होते.

"सो एव्हरीवन, ही आहे माझी बहीण अधिरा इंदलकर." राजवीर अधिराजवळ उभा राहत म्हणाला.

राजवीरच्या आवाजाने अगस्त्यने मोबाईल बाजूला ठेवून त्याने पुढे बघितले तर त्याला अधिरा दिसली. अधिराचेही त्याच्याकडे लक्ष गेले, तसे तिचे डोळेच विस्फारले.

"तू?" अगस्त्य उठून उभा राहिला.

"तुम्ही ओळखता एकमेकांना?" राजवीरने प्रश्नार्थक नजरेने पाहिले.

अधिराने मान हलवून नकार दिला, तर अगस्त्यने होकारार्थी मान हलवली.

"हो की नाही?" विराजने अधिराला विचारले.

"हो." अगस्त्य म्हणाला, तिने मात्र परत मान हलवून नकार दिला.

"परत तेच?" राजवीर आणि विराजच्या कपाळावर आठ्या पडल्या.

गाथिका आणि इतर मित्रमंडळही गोंधळून त्या दोघांकडे बघत होते.

"ए खोटं का बोलतेस गं?" अगस्त्यने डोळे बारीक केले.

"अगस्त्य?" राजवीरने भुवया उंचावल्या. अगस्त्यला त्याची चूक लक्षात आली.

"दादा सॉरी... तुझी बहीण आहे ही; पण हिला ना मुळीच मॅनर्स नाहीत." अगस्त्य गाल फुगवून म्हणाला.

"म्हणजे?" राजवीरने अधिराकडे बघत अगस्त्यला विचारले.

"सकाळी माझी नि हिची आरे-वारे बीचवर भेट झाली. वातावरण बघून मी भोळ्या मनाने हिला मदत केली; पण हिने सरळ माझ्या कानाखाली मारली." अगस्त्य तक्रार करत म्हणाला.

"काय?" अगस्त्यच्या मित्रांना धक्का बसला. राजवीर आणि विराज आता अधिराकडे बघत होते, तिने मान खाली घातली होती.

"कदाचित तिच्या सॅंड आर्टवर माझा नकळत पाय पडला म्हणून चापट मारली असू शकते; पण हिंसा हा उपाय नाही ना! हिला राग आलाच होता तर आधी हिने माझा दयाळू स्वभाव आणि प्रामाणिक हेतू समजून घ्यायला नको का? त्यात कोणी आपली मदत केली की थॅंक यू म्हणायची पद्धत असते ना... पण हिने आभार तर मानले नाहीच सकाळी सकाळी चापट मारली ती वेगळीच आणि स्वतःच रडतही गेली." अगस्त्यने अधिराकडे बघतच इत्थंभूत प्रकरण सांगितले.

"म्हणजे तू ज्या मुलीबद्दल मघाशी मला सांगितलंस ती मुलगी वीर दादाची बहीण आहे?" गाथिकाने भुवया उंचावल्या.

"ओह! तर तो क्रीप तू होतास." विराज रागाने मुठी आवळत म्हणाला.

"क्रीप? हिने माझ्याबद्दल हे सांगितलं तुम्हाला?" अगस्त्यचे डोळेच विस्फारले, कारण आजपर्यंत त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल कोणी इतका मोठा गैरसमज केला नव्हता.

"हो आणि तुला माहितीये, तुझ्यामुळे अधिराला बाबा चापट मारणार होते." राजवीर आता अगस्त्यकडे रागीट कटाक्षाने बघत होता.

"काय? माझ्यामुळे?" अगस्त्य गोंधळून अधिराकडे बघू लागला, त्याला तिच्या डोळ्यात अश्रू दिसले.

"हो." विराजनेही जळजळीत कटाक्ष टाकला.

"पण मी काय केलं? मी फक्त तिला हेल्प केली होती." अगस्त्य म्हणाला.

"हो पण तू तिला स्पर्श केलास आणि तिच्या बॉडीगार्डने काकांना फोटो पाठवला आणि मग महाभारतच घडलं." विराजने दात ओठ खात सांगितले.

"अरे देवा!" अगस्त्यला अपराधी वाटत होते.

"नशीब, आपण दोघांनी एकसारखे कपडे घातले होते आणि फोटोही दुरून काढला असल्याने त्यात तुझा चेहरा क्लियर दिसत नव्हता म्हणून मला थाप तरी देता आली की फोटोतला मुलगा मीच आहे." विराजने खाऊ की गिळू नजरेने बघत माहिती दिली.

"सॉरी... असं काही होईल मला कल्पनाच नव्हती. मी वातावरण बघितलं, त्यात समुद्राच्या लाटांचा वेगही वाढला होता. मी हिला आवाज दिला; पण ही सॅंड आर्टमध्ये गुंतून होती म्हणून जवळ गेलो." अगस्त्य त्याची बाजू मांडत होता.

"ह्म्म." राजवीर आणि विराजने सूचक हुंकार भरला.

"पण हिने सांगायचं ना मला... मी बोलत होतो आणि ही फक्त बघत होती. मला कसं कळणार होतं खरंच? ही बोलली असती तर मीच स्वतः दूर झालो असतो लगेच..." अगस्त्य बारीक तोंड करून म्हणाला.

गाथिकालाही त्याचा मुद्दा पटला. बाकी मित्रांनीही अगस्त्यच्या विधानाला दुजोरा दिला; पण जिला बोलता येत नाही, ऐकताही येत नाही ती काय प्रतिक्रिया देणार होती? ती कशी अनोळखी व्यक्तीला हातवारे करून समजावून सांगणार होती? असा विचार मनोमन करून विराज आणि राजवीरने सुस्कारा सोडला.

क्रमशः
..........
© सेजल पुंजे.

अधिरा मूकबधिर आहे कळल्यावर अगस्त्यची प्रतिक्रिया कशी असेल?


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →