Login

साज़िश: गॅम्बल ऑफ लव्ह (भाग-१६)

अगस्त्य आणि अधिराने केला प्रेमविवाह, दोघेही एकत्र खूप खूश; पण एकाएकी अधिराचा झाला खून आणि हत्येच्या आरोपाखाली अगस्त्यला झाली अटक! अख्खा महाराष्ट्र त्याच्याविरोधात असताना त्याची मैत्रीण—गाथिकाने त्याची केस लढण्याचा घेतला निर्णय. कोणती रहस्ये उलगडेल हा खटला? या रक्तरंजित खेळाचा सूत्रधार अगस्त्य असेल की आणखी कोणी? जाणून घेण्यासाठी वाचा "साज़िश: Gamble Of Love"
"मी गाथिकाला बोललो होतो की कल्याणी ताईसोबत ज्या मुलीने आज परफॉर्म केलं ती मुलगी मंजुषा दी नाहीये; पण ही म्हणाली की मीच थापा मारतोय. सो मग यावरून आमच्यात पैज लागली होती. जो पैज हरेल, तो ट्रीट देईल असं ठरलं होतं." अगस्त्यने राजवीरला पैजेबद्दल सांगितले.

"ओह! भारीच फसली गाथिका..." राजवीर किंचित हसला.

"ह्म्म. आता पैज हरल्यामुळे आपल्या सगळ्यांना सगळ्यांच्या लाडक्या भावी वकिलीनबाई गाथिका घाटगे ट्रीट देणार आहेत. टाळ्या!" अगस्त्य गाथिकाला चिडवायची एक संधी सोडत नव्हता.

सगळेच गाथिकावर हसत होते म्हणून तिचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.

थोड्या वेळाने ते सगळेच गाथिकाची फिरकी घेत कॅन्टीनमध्ये पोहोचले.

"बाय द वे, अगस्त्य तुला कसं कळलं?" कोपऱ्यातला टेबल पकडून खुर्चीवर बसत राजवीरने अगस्त्यला प्रश्न केला.

"काय दादा?" अगस्त्यने न कळून विचारले.

"हेच की कल्याणीसोबत परफॉर्म करणारी मुलगी मंजुषा नाही. तिचा अभिनय डल होता का? की तिच्याकडून मिस्टेक झाली एखादी?" राजवीरने काळजीने विचारले.

"नाही दादा, असं काही नाही. इनफॅक्ट मला तिचा अभिनय खूप आवडला. मी तर तिच्या उंचीवरून ओळखलं. मंजुषा दी कल्याणी ताईपेक्षा उंच आहे; पण ती मुलगी कल्याणी ताईपेक्षा किंचित ठेंगणी वाटली म्हणून..." अगस्त्यने स्पष्टीकरण दिले.

"अच्छा! तशी आहेच ती ठेंगणी..." राजवीर मंद हसला.

"बाय द वे कुठे आहे ती मुलगी?" अगस्त्यने कुतुहलाने विचारले.

"तुला का इतक्या चौकशा?" राजवीरने डोळे बारीक करून पाहिले.

"सहज..." अगस्त्य म्हणाला.

तेवढ्यात तिथे विराज आला.

"वीर, तुला कुठे कुठे शोधलं मी आणि तू इथे गप्पा मारत बसला आहेस!" विराज डोळे बारीक करून तक्रारीच्या सुरात म्हणाला.

"राज अरे हे सगळे त्या क्लासरूमबाहेर भेटले. यांच्याशी गप्पा करत करत मीही इकडे येऊन गेलो." राजवीर दिलगीर स्वरात म्हणाला.

"ह्म्म." विराजने हुंकार भरला आणि आता सगळ्यांकडे बघितले.

"हाय राज दादा..." सगळे विराजला बघून एकत्रच म्हणाले.

"हाय गाईज!" विराज मंद हसला.

"बाय द वे आमचा परफॉर्मन्स तुम्हाला आवडला ना? काही डिसपॉईंटमेंट तर नाही ना?" विराजने विचारले.

"दादा, असं विचारून लाजवतोय तू आम्हाला..." तनिशा म्हणाली.

"असं काही नाही. मी जेन्यून फीडबॅक विचारतोय. आम्हीही खूप काही अचिव्ह केलेलं नाही अजून... तुम्ही सुधारणा सांगितल्या तर नक्कीच आम्ही इम्प्रूव्हमेंट करू." विराज म्हणाला.

"पण आमच्याकडे सुचवायला काहीच सुधारणा नाहीत, कारण आमच्यासाठी तुमचा ग्रुप बेस्ट परफॉर्मर आहे." मयंक म्हणाला.

"फेअर ॲंड स्क्वेअर विनरही म्हणता येईल." सौंदर्या दुजोरा देत म्हणाली.

"पण आमच्यासाठी तुमचा ग्रुप बेस्ट परफॉर्मर आहे." विराज म्हणाला.

"इन फॅक्ट आम्ही बेस्ट कॉम्पिटिटर म्हणून बघतो तुमच्या ग्रुपकडे!" राजवीर म्हणाला, विराजने समर्थनार्थ मान हलवली.

"खरंच?" अगस्त्यने भुवया उंचावल्या. सगळ्यांचीच प्रतिक्रिया बहुतेक त्याच्यासारखीच होती.

"हो मग! जबरदस्त ॲक्टिंग करता तुम्ही सगळेच... आजच्या तुमच्या नाटकाचा विषयही छान होता आणि परफॉर्मन्स तर त्याहून भारी होता." विराजने सगळ्यांकडे बघत प्रशंसा केली.

"शिवाय पडद्यामागील सगळी बारीकसारीक कामे ज्या एकीने तुम्ही पार पाडता, त्याचंही विशेष कौतुक करावंसं वाटतं. म्हणूनच यापुढे तुमच्यासारखे ज्युनियर्स ड्रामा क्लबची धुरा सांभाळणार आहेत, याचा अभिमान वाटतो आम्हाला..." राजवीरने अगस्त्यचा हात हातात घेतला. बाकी सगळेच नजरेने कृतज्ञता व्यक्त करत होते.

"तू ड्रामा क्लबची जबाबदारी माझ्यावर सोपवलीस त्यासाठी थॅंक यू दादा. मी तुला डिसपॉईंट करणार नाही." अगस्त्यने वचन दिले.

"आय नो म्हणून तर तुला निवडलं ना मी!" राजवीरने अगस्त्यची पाठ थोपटली, तेवढ्यात गाथिका ओठांवर हात ठेवून हसली.

"गाथिका हसायला काय झालं?" राजवीरने तिला बारीक डोळे करून विचारले. आता सगळेच तिच्याकडे बघत होते.

"ते तुमच्या दोघांचं कन्व्हर्सेशन ऐकून शिवगामीने बाहुबलीला उत्तराधिकारी घोषित करून महिष्मती साम्राज्य सोपवल्यासारखा फील येतोय मला..." गाथिकाने सांगितले, तशी तिथे हशा पिकली.

"गप गं! काहीही तुझं..." राजवीर हसतच म्हणाला.

"प्रनिश ग्रेट हं! तुझा विलन आर्क तू छान पोट्रे केला होतास. डायलॉगही छान डिलिव्हर केलेस." राजवीरचे प्रनिशकडे लक्ष गेले, तसा तो त्याला बघून म्हणाला.

"थॅंक्स दादा पण एक खरं सांगू, एके ठिकाणी माझा फंबल पडला होता." प्रनिशने डोळे मिचकावत सांगितले. आता सगळ्यांनी त्याच्याकडे बघून नकारार्थी मान हलवली.

"सांग ना, आणखी गर्वाने सांग." अगस्त्य भडकला आणि आता प्रनिशने जीभ चावली.

"या हिटलरबद्दल मी विसरलोच होतो." प्रनिश हळूच पुटपुटला, तसे सौंदर्या आणि मयंक सगळ्यांच्या नकळत हसले.

"लाज वाटू दे जरा... ती मंजुषाला रिप्लेस करणारी मुलगी सिंगल अटेम्प्टमध्ये फ्लॉलेस परफॉर्मन्स देतेय आणि एक तुम्ही आहात महाशय..." अगस्त्यने स्तुतीसुमने उधळली.

"मित्रा, तिने माईम केलं आणि माझा डायलॉगमध्ये फंबल पडला. फरक आहे ना!" प्रनिशने ओठांचा चंबू केला.

"माईम हे डायलॉग डिलिव्हरीपेक्षाही अवघड असतं, कारण त्यात न बोलता शब्दांना वाचा फोडावी लागते. मूक अभिनय सोपा नसतो. साध्या ड्रामामध्ये ॲक्टिंगची कसर डायलॉग बोलून कव्हर अप करता येते; पण माईममध्ये क्षुल्लक चूक महागात पडत असते. म्हणून माईम आणि डायलॉग फंबलची तू तुलना करूच नको. युझलेस!" प्रनिशचे कारण अगस्त्यने खपवून घेतले नाही.

"अरे भाई, इतका काय चिडतो? मला काही तुझ्यासारखा नाटकाचा छंद नाही. मला नाही यात करियर घडवायचंय. तू बळजबरी मला ड्रामा क्लबमध्ये घेतलंस, तुझ्यामुळे मला अशा ड्रामा कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट करावं लागतं आणि तू मलाच बोल." प्रनिशही आता तक्रार करू लागला.

"अरे पण इतक्या रिहर्सल्स करून काय फायदा? आणि गेल्या तीन वर्षांपासून घेतोयस ना तू नाटकात सहभाग? तरीही अशी दयनीय अवस्था?" अगस्त्य खोचकपणे म्हणाला. प्रनिशने नाक मुरडले.

"ते काही नाही... माझं ठरलंय, आता मला जेन्यून आर्टिस्ट्स शोधावे लागतील." अगस्त्य ठामपणे म्हणाला.

"हा शोध. आला मोठा धमकी देणारा..." प्रनिशने आव्हानात्मक स्वरात म्हणाला.

"हा शोधेनच..." अगस्त्यने ओठांचा कोपरा उंचावला आणि प्रनिशने डोळे फिरवले.

त्या दोघांची खडाजंगी बघून बाकी सगळ्यांनी सुस्कारा सोडला.

"वीर दादा..." अगस्त्यने प्रनिशकडे एक कटाक्ष टाकून राजवीरला आवाज दिला.

"बोल..." राजवीर म्हणाला.

"ते दादा विशेष काही नाही, मला फक्त त्या मुलीची भेट घडवून दे ना..." अगस्त्य विनंती करत म्हणाला.

"कोणती मुलगी?" राजवीरने गोंधळून विचारले.

"तीच, मंजुषाची रिप्लेसमेंट भरून काढणारी मुलगी!" अगस्त्य म्हणाला आणि आता विराज त्याच्याकडे डोळे बारीक करून बघू लागला.

"तिची भेट घ्यायचीय तुला?" राजवीरने भुवया उंचावल्या.

"हो." अगस्त्यने होकार दिला.

"कशासाठी?" आता विराजने प्रश्न केला.

"तुम्ही दोघे संशय का घेत आहात? मला अशा तशा कारणासाठी ओळख करून घ्यायची नाही तिच्याशी..." अगस्त्यने आधीच स्पष्ट केले.

"मग? नेमकी भानगड काय आहे?" राजवीरने थेट विचारले.

"ते..." अगस्त्य बोलणारच होता की मध्येच प्रनिश बोलला.

"दादा, ह्याच्यावर विश्वास ठेवू नको. हा एक नंबरचा फ्लर्ट आहे." अचूक वेळी प्रनिशने सूड घेतला होता म्हणून अगस्त्य त्याच्याकडे रागीट कटाक्षाने बघू लागला.

"हो दादा." मुद्दाम बाकी मित्रांनीही प्रनिशची री ओढली.

"गप्प बसा रे, उगाच इज्जतीचे धिंडवडे काढत आहात." अगस्त्यने सगळ्यांनाच दटावले.

"पण ते बोलत तर खरं आहे ना..." विराजने खांदे उडवले.

"नाही रे राज दा, मी तसा नाही." अगस्त्यने केविलवाणा चेहरा केला.

तेवढ्यात एक मुलगी तिथे आली.

"अगस्त्य, हा बुके तुझ्यासाठी..." ती मुलगी लाजतच म्हणाली.

"थॅंक्स निधी." अगस्त्य पुष्पगुच्छ स्वीकारून मंद हसला. तिच्या पाठोपाठ आणखी काही मुली आल्या आणि पुष्पगुच्छ, गुलाबाची फूले देऊन निघून गेल्या.

क्षणात त्या टेबलवर पुष्पगुच्छांचा ढीग साचला होता.

"बघितलं ना दादा!" सगळ्या मुली निघून गेल्यावर प्रनिश मुद्दाम अगस्त्यला डिवचण्यासाठी राजवीरशी कोड्यात बोलला.

"ह्म्म." सगळ्यांनीच अगस्त्यची फिरकी घेत दीर्घ हुंकार भरला.

"मी नाही त्यांना बुके घेऊन बोलावलेलं..." प्रनिशकडे खाऊ की गिळू नजरेने बघत अगस्त्य म्हणाला, त्यानंतर त्याने राजवीरकडे मोर्चा वळवला.

"दादा, प्लीज तू यांचं ऐकून घेऊ नको आणि मला त्या मुलीची भेट घडवून दे." अगस्त्य हट्ट करत म्हणाला.

"अरे पण कशासाठी?" आता विराज आणि राजवीर दोघांनीही एकत्रच विचारले.

"आता तुमचं लास्ट इयर ना..." अगस्त्य सूचक बोलला.

"हा मग?" त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या.

"म्हणून मला तिला ड्रामा क्लब जॉईन करण्यासाठी रिक्वेस्ट करायची आहे." अगस्त्यने खरे कारण सांगितले.

"बाप रे! खरंच?" राजवीरला आश्चर्य वाटले.

"हो. शी इज रियली टॅलेंटेड. काय भारी ॲक्टींग केली तिने! मी लिटरली इंप्रेस झालोय. सो प्लीज तू आमची ओळख करून दे." अगस्त्य काकुळतीने म्हणाला.

"तुला तिचं काम आवडलं याचा आनंद आहे मला; पण तिला ड्रामा क्लब जॉईन करण्यासाठी रिक्वेस्ट करू नको. त्याची गरज नाही, कारण ती नाही करणार जॉईन." राजवीरने शांतपणे उत्तर दिले.

"का?" अगस्त्यने गोंधळून विचारले.

"मी म्हणतोय ना नाही करणार, तर ती नाहीच करणार." राजवीर नम्रपणे म्हणाला.

"दादा..." अगस्त्यने ओठांचा चंबू केला.

"काय?" राजवीरने नजर रोखली.

"ती नकारच देणार हे तू इतकं ठाम कसा सांगू शकतोस?" अगस्त्यने गाल फुगवून विचारले.

"कारण मला माहीत आहे." राजवीर म्हणाला आणि आता सगळेच त्याच्याकडे गोंधळून बघू लागले. विराज मात्र अपवाद होता.

क्रमशः
........
© सेजल पुंजे.

अगस्त्य आणि अधिराची परत एकदा प्रत्यक्ष भेट होईल का? ती ड्रामा क्लब जॉईन करेल की राजवीरने सांगितल्याप्रमाणे नकार देईल?



0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →