Login

साज़िश: गॅम्बल ऑफ लव्ह (भाग-१४)

अगस्त्य आणि अधिराने केला प्रेमविवाह, दोघेही एकत्र खूप खूश; पण एकाएकी अधिराचा झाला खून आणि हत्येच्या आरोपाखाली अगस्त्यला झाली अटक! अख्खा महाराष्ट्र त्याच्याविरोधात असताना त्याची मैत्रीण—गाथिकाने त्याची केस लढण्याचा घेतला निर्णय. कोणती रहस्ये उलगडेल हा खटला? या रक्तरंजित खेळाचा सूत्रधार अगस्त्य असेल की आणखी कोणी? जाणून घेण्यासाठी वाचा "साज़िश: Gamble Of Love"
"हाय गाईज, काय बघताय?"

अधिरा, राजवीर आणि विराजला कोणाची तरी चाहूल जाणवली, तसे त्यांनी मागे वळून बघितले.

"हाय कल्याणी! आताच आलीस का?" विराजने त्या मुलीला बघत विचारले.

"ह्म्म." कल्याणीने हुंकार भरला.

"बरं, मंजुषाबद्दल कळलं ना तुला?" राजवीरने विचारले.

"हो, वाचला मी ग्रुपवर मेसेज... पण आता? आपला ॲक्ट फसणार का?" कल्याणीच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या.

"नाही, रिप्लेसमेंट आहे ना!" विराज डोळे मिचकावत म्हणाला.

"एवढ्या कमी वेळात तुम्ही रिप्लेसमेंट शोधलीही? कोण आहे ती?" कल्याणीने भुवया उंचावल्या.

"अधिरा..." राजवीर आणि विराज एकत्रच बोलले, तशी कल्याणी आता अधिराकडे बघू लागली.

"अरे पण जमेल का हिला?" कल्याणीने चिंता व्यक्त केली.

"का नाही? आपण जेव्हा जेव्हा रिहर्सल केली तेव्हा तेव्हा ती होतीच की सोबत..." विराजने खांदे उडवले.

"अरे रिहर्सल्सला हजर असणं आणि स्वतः अभिनय करणं यात फरक असतो ना..." कल्याणीने तिचा मुद्दा मांडला.

"हो! पण मी खात्रीने सांगतो की करेल ती..." विराज ठामपणे म्हणाला.

"तुम्हाला खरंच खात्री आहे?" राजवीर आणि विराजला बघून कल्याणीने शांतपणे विचारले.

"हो." ते दोघेही म्हणाले.

"ओके! मग माझीही हरकत नाही, कारण तसंही आपल्याकडे रिप्लेसमेंट नाही. ॲक्ट फसण्यापेक्षा आणि परफॉर्म करण्याआधीच डिसक्वालिफाय होण्यापेक्षा निदान परफॉर्म करू. पुढचं पुढे बघता येईल." कल्याणी विचार करत म्हणाली.

तिचा सकारात्मक प्रतिसाद बघून राजवीर आणि विराज निश्चिंत झाले.

"ह्म्म. आपला ॲक्ट जबरदस्त होणारच; पण आपण एकदा अधिरासोबत फायनल रिहर्सल करून घेऊ." राजवीर म्हणाला.

"आता?" कल्याणीने हातातल्या घड्याळात वेळ बघितली.

"हो. आपल्या ॲक्टसाठी खूप वेळ आहे आणि असंही सुरुवातीला तर अतिथींचं स्वागत, अध्यक्षीय भाषण राहील... तोपर्यंत होईल आपली रिहर्सल." विराज म्हणाला.

"चला मग पळा..." कल्याणी म्हणाली आणि ते सगळेच प्रांगणातून आतमध्ये पळतच गेले.

एका वर्गखोलीच्या दिशेने ते चौघे पळतच जात होते की अधिराचा नाट्य सभागृहाकडे जाणाऱ्या अगस्त्यला ओझरता धक्का लागला. ती माफी मागणारही होती; पण त्या प्रसंगापासून अनभिज्ञ विराजने तिचा हात पकडला आणि तिला घाईतच खोलीत घेऊन गेला.

दरम्यान अगस्त्यने मागे वळून पाहिले; पण तोपर्यंत तिथे कोणीच नव्हते.

"आज काय सगळे अपघात माझ्यासोबतच होणार आहेत का? कोणी चापट मारतं काय, कोणी धक्का मारून जातं काय... शी! आजचा दिवसच खराब आहे. फक्त आजच्या परफॉर्मन्समध्ये काही गडबड होऊ नये." अगस्त्य वैतागून पुटपुटला.

"शुभ शुभ बोल डुचक्या..." गाथिकाने त्याचे शेवटचे शब्द ऐकले, तशी ती म्हणाली.

"सॉरी." अगस्त्यने लगेच कान पकडले.

"ह्म्म. इथे काय करत होतास? आत चल ना..." गाथिका नाट्य सभागृहाकडे इशारा करत म्हणाली.

"काही नाही, चल." अगस्त्यने परत एकदा मागे वळून पाहिले आणि मग नकारार्थी मान हलवत तो गाथिकासोबत नाट्य सभागृहाच्या आत गेला.

हळूहळू विद्यापीठातील नाट्य सभागृहात गर्दी वाढू लागली आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.

आधी अतिथींचे स्वागत झाले. त्यानंतर अध्यक्षीय भाषण आटोपले आणि मग नाट्य स्पर्धेला सुरुवात झाली.

एकामागोमाग एक सर्वजण नाटक सादर करू लागले. अगस्त्य आणि त्याच्या मित्रांनीही नाटक सादर केले. त्यांच्या नाटकाचे विशेष कौतुक केले गेले. नाटक सादर करून झाल्यानंतरही बराच वेळ प्रेक्षक टाळ्या वाजवतच होते.

नाटक सादर करून झाल्यावर अगस्त्य आणि त्याचे मित्र परत आसनखुर्च्यांवर बसून कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ लागले.

"अरे वीर दादा कुठे आहे? त्याच्या ग्रुपने अजून परफॉर्म नाही केलं ना?" अगस्त्यने हळूच विचारले.

"सकाळपासून मीही पाहिलं नाही त्यांना..." गाथिका इकडे तिकडे बघून हळूच म्हणाली.

"कसं पाहणार होतीस? आपण तर रिहर्सलमध्ये बिझी होतो ना..." प्रनिश म्हणाला.

"ह्म्म." सगळ्यांनीच त्यावर हुंकार भरला.

"पण यंदा वीर दादा परफॉर्म करतोय ना?" अगस्त्यने शंका वर्तवली.

"करतोय रे परफॉर्म!" मयंक ठामपणे म्हणाला.

"तेच ना... नाट्य स्पर्धा आहे आणि वीर दादा परफॉर्म नाही करतोय, असं कधी होईल का?" तनिशा मानेला झटका देत म्हणाली.

"ते आहेच..." अगस्त्य म्हणाला.

"तसं मी ऐकलंय की यावेळी वीर दादा आणि त्याचा ग्रुप माईम परफॉर्म करणार आहे." सौंदर्याने हळूच सांगितले.

"माईम?" अगस्त्य आणि गाथिकाने भुवया उंचावल्या.

"ह्म्म." सौंदर्याने हुंकार भरला.

"ग्रेट यार! आता तर मी आणखीच एक्सायटेड आहे त्यांच्या ॲक्टसाठी..." अगस्त्य खूश होत म्हणाला.

"तूच नाही, आम्ही सगळेच." रजनीश म्हणाला, त्यावर सगळ्यांनीच हसत हुंकार भरला.

"अं... वीर दादा कोण आहे?" इतका वेळ शांतपणे त्यांची चर्चा ऐकणाऱ्या दीप्तांशुने आश्चर्याने विचारले.

"तुला वीर दादा नाही माहिती?" गाथिकाने त्यालाच प्रतिप्रश्न केला.

"नाही ताई." दीप्तांशु उत्तरला, तसे सगळेच त्याच्याकडे डोळे विस्फारून बघू लागले.

"अरे हा रेग्युलर येत नाही ना त्यामुळे माहिती नसेल." मयंकला आठवताच तो म्हणाला.

"अच्छा!" गाथिका म्हणाली.

"ह्म्म." दीप्तांशुने हुंकार भरला; पण अजूनही त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नव्हते.

त्याची जिज्ञासू नजर गाथिकाने लगेच पारखली.

"दीप्तांशु, वीर दादा सिनियर आहे." गाथिकाने उत्तर दिले.

"कोणती फॅकल्टी?" दीप्तांशुने पुढचा प्रश्न केला.

"एम.बी.बी.एस." गाथिकाने सांगितले.

"ओह! ते पण नाट्यस्पर्धेत भाग घेतात का?" दीप्तांशुने आणखी एक प्रश्न कुतुहलाने विचारला.

"नुसताच भाग घेत नाहीत, तर प्रत्येक स्पर्धा गाजवतात." अगस्त्य म्हणाला.

"खरंच!" दीप्तांशुने उत्सुकतेने विचारले.

"हो. आज तूच लाईव्ह बघ. तुलाही कळेल की का क्रेझ आहे वीर दादाच्या ग्रुपची!" गाथिका किंचित हसून म्हणाली.

"ओके." दीप्तांशु मंद हसला आणि आता तोही रंगमंचाकडे आतुरतेने बघू लागला.

"मित्रांनो, ज्या क्षणाची तुम्ही सगळेच वाट बघत होतात, तो क्षण आलाय! आता आपल्यासमोर माईम ॲक्ट सादर करत आहेत, राजवीर इंदलकर आणि टीम." सूत्रधार करणाऱ्या विद्यार्थ्याने उद्घोषणा केली, तसा टाळ्यांचा कडकडाट झाला आणि सगळ्यांची नजर रंगमंचावर स्थिरावली.

दरम्यान रंगमंचावर काळोख करण्यात आला. हळूहळू पडदा उघडला आणि आता मंचावर दोन स्पॉटलाईट्स पडले.

एकीकडे चेहऱ्यावर मुखवटे लावलेले दोन मुले होते आणि दुसरीकडे चेहऱ्यावर मुखवटे लावलेल्या दोन मुली होत्या. एका स्पॉटलाईटमध्ये विराज आणि राजवीर एकमेकांच्या खांद्यावर डोके ठेवून बसले होते, तर दुसऱ्या स्पॉटलाईटमध्ये कल्याणी आणि अधिरा होत्या. कल्याणीच्या मांडीवर डोके ठेवून अधिरा पुस्तक वाचत होती.

एकाच रंगमंचावर दोन बाजूने दोन समलिंगी जोडप्यांची प्रेमकथा मुक अभिनयाद्वारे विराज-राजवीर आणि कल्याणी-अधिरा दाखवत होते.

दोन्ही जोडपे आपापल्या जोडीदारासोबत खूश होते; पण अचानक पडद्याला चिकटलेला आरसा तुटून खाली पडला आणि काचा सर्वत्र पसरल्या. जसा तो काचेचा आरसा फुटला तसाच पात्रांच्या प्रेमाचा आरसाही फुटला आणि विखुरला त्यांचा स्वप्नांचा महाल!

चौघांची कुटुंबे त्यांना दोरीने मागे ओढू लागली आणि क्षणात चौघांच्या घरी लग्नाचा थाट मांडला गेला. त्या दोन समलिंगी जोडप्यांना नको नको ती बंधने लादून एकमेकांपासून वेगळे केले गेले.

पुढच्या क्षणाला राजसोबत अधिरा एका मांडवात उभी राहिली, तर दुसऱ्या मांडवात वीरसोबत कल्याणी आणि असे दोन समाजमान्य लग्न करण्याचा घाट त्या पात्रांच्या कुटुंबियांनी रचला.

रंगमंचावर परत एकदा काळोख पसरला, तोच काळोख सध्या पात्रांच्या आयुष्यातही पसरला होता. चौघेही परिस्थितीपुढे हतबल झाले होते. कुटुंब की जोडीदार? या धर्मसंकटात ते अडकले होते.

आता विराज, राजवीर, अधिरा आणि कल्याणी चार स्वतंत्र स्पॉटलाईट्समध्ये एकपात्री मूक अभिनय करून आपापल्या पात्राची हतबलता दर्शवत होते.

परत एकदा उजेड पसरला. चौघांच्याही हातात आता वरमाला होत्या; पण त्या चौघांपैकी कोणीही त्यांच्या कुटुंबाने त्यांच्यासाठी निवडलेल्या व्यक्तीच्या गळ्यात वरमाला घालायला पुढाकार घेत नव्हते.

त्यांच्या मनातली घालमेल व्यक्त करण्यासाठी रंगमंचावर परत एकदा काळोख पसरला आणि फक्त दोन स्पॉटलाईट्स दिसू लागले. एका स्पॉटलाईटमध्ये विराज-राजवीर त्यांच्या पात्रांच्या प्रेमकहाणीचा सुखद भूतकाळ मूक अभिनयाने दर्शवत होते, तर दुसऱ्या स्पॉटलाईटमध्ये कल्याणी-अधिरा त्यांच्या पात्रांच्या प्रेमकहाणीचा सुखद भूतकाळ दाखवत होते.

परत एकदा रंगमंचावर प्रकाश पडला आणि पार्श्वभूमीवर मंगलाष्टके ऐकू येऊ लागली. चौघांनीही एकदा हातातल्या वरमालेकडे पाहिले आणि एकदा आपल्या जोडीदाराकडे... क्षणात त्यांच्या हातातून वरमाला गळून पडल्या.

आता विराजची पावले राजवीरकडे वळली आणि कल्याणीची अधिराकडे... शेवटी चौघेही आपापल्या जोडीदारासह बोहल्यावरून पळाले. सगळ्या मर्यादा तोडून त्यांनी त्यांचा आनंद निवडला.

रंगमंचावर परत एकदा काळोख झाला आणि सुरुवातीसारख्या परत दोन स्पॉटलाईट्स दिसू लागल्या. एका स्पॉटलाईटच्या खाली विराज-राजवीर आणि दुसऱ्या स्पॉटलाईटच्या खाली अधिरा-कल्याणी!

हळूहळू पडदा पडला आणि त्या माईममध्ये गुंतलेले प्रेक्षक भानावर येऊन टाळ्यांचा कडकडाट करू लागले.

त्यानंतर चौघेही पडदा बाजूला सारून रंगमंचावर आले. चौघांनीही एकमेकांचे हात घट्ट पकडले आणि वाकून सगळ्यांचे आभार व्यक्त करून ते परत पडद्यामागे गेले; पण टाळ्यांचा गजर सुरूच राहिला.

क्रमशः
..........
© सेजल पुंजे.

अगस्त्य आणि त्याच्या मित्रांना राजवीर, राज, अधिरा आणि कल्याणीचा माईम ॲक्ट आवडला असेल का?


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →