तिथे उपस्थित कोणालाच गाथिकाची अवस्था बघवत नव्हती.
"बोला ना, तुम्हालाही माझं स्वप्न वायफळ वाटतं का? माझे एथिक्स अनरिझनेबल वाटतात का?" गाथिका उलट्या हाताने डोळे पुसत विचारले.
अगस्त्यने सगळ्यांना इशारा केला आणि तो बोलायला सरसावला.
"गाथा, काहीही बरळू नको! प्रत्येकात नसते हिंमत तुझ्यासारखं स्वप्न बघायची... मुळात श्रीमंत घरात जन्म घेऊनही तुला तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्याचा ध्यास आहे यातच सगळं आलं. ही लॉस्ट जेम. तुझी उणीव त्याला जाणवेल ना तेव्हा त्याला कळेल की त्याने तुला गमावून खूप मोठी चूक केली." अगस्त्यने गाथिकाचे डोळे पुसून तिला समजावले.
"पण... पण माझं खूप प्रेम आहे रे त्याच्यावर... मला कधीच वाटलं नव्हतं तो... तो माझ्या स्वप्नांना, एथिक्सला कवडीमोल म्हणेल..." गाथिकाचा कंठ दाटून आला.
"आय नो, तुझं आयुषवर खूप प्रेम आहे; पण जास्त विचार नको करू सध्या... कदाचित आयुष आणि तुझी साथ इथपर्यंतच होती." अगस्त्य म्हणाला, तसे तिने नाक वर ओढले.
"गाथा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रेमापेक्षाही स्वाभिमान महत्त्वाचा असतो. तू स्वाभिमानी आहेस आणि आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे. सध्या तुला त्रास होतोय; पण बाप्पाने नक्कीच काहीतरी बेस्ट प्लॅन केलेलं असेल. तुझ्या एथिक्सची, तुझ्या व्हॅल्यूजची आणि तुझ्या स्वप्नांची कदर करणारा जोडीदार तुला नक्की मिळेल." अगस्त्य म्हणाला.
आता गाथिका बऱ्यापैकी शांत झाली होती.
"नक्की?" तिने मुसमुसत विचारले.
"हो." अगस्त्य किंचित हसला.
"नाही मिळाला तर?" तिने डोळे पुसत विचारले.
"तर... तर मी शोधून देईन." अगस्त्य म्हणाला, तसे गाथिकाने तोंड वाकडे केले.
"वाकडं तोंड करायला काय झालं?" अगस्त्यने डोळे बारीक केले.
"मला वाटलं एकतर तू माझा होशील किंवा माझ्यासोबत तूही आयुष्यभर सिंगल राहशील." गाथिका ओठ तिरपे करून म्हणाली.
"प्रश्न सिंगल राहायचा असेल तर तो मी असाही राहीन; पण मी तुझा होणं या जन्मात काय कोणत्याच जन्मात शक्य नाही, शेंबडे..." अगस्त्यने गाथिकाच्या डोक्यात टपली मारली.
"हं! जा रे... मलाही नकोय तू... मी तर परीक्षा घेत होते की या परिस्थितीत तू काय उत्तर देतो... जर संधी साधून तू मला अप्रोच केलं असतं तर आधी मीच तुडवला असता तुला..." नाकाचा शेंडा उडवत गाथिका म्हणाली.
तिने स्वतःला सावरलेले बघून सगळ्यांनाच समाधान वाटले.
"अशी संधी स्वप्नातही नको मला..." अगस्त्य तिला चिडवत होता.
"हो का डुचक्या..." गाथिका त्याला मारायला पळाली, तसे सगळे हसले.
त्यानंतर रजनीश, प्रनिश, मयंक, सौंदर्या आणि तनिशानेही गाथिकाला मिठी मारली. थोडा वेळ चेष्टामस्करी करून वातावरण हलके-फुलके केले.
"ओके चला, मस्करी पुरे झाली! आता रिहर्सल करू." अगस्त्य वेळेचे भान राखून म्हणाला.
"ह्म्म." सगळ्यांनीच हुंकार भरला.
"गाथा, नक्की ठीक आहेस ना?" अगस्त्यने परत एकदा खात्री केली.
"हो." गाथिकाने होकारार्थी मान हलवली.
"ओके." अगस्त्यने तिच्या डोक्यावर मायेने थोपटले. ते सगळे परत तालीमसाठी सज्ज झाले.
तेवढ्यात खोलीचे दार उघडून एक तरुण आला.
"अगदी वेळेत आलास दीप्तांशु... आता तुझीच एंट्री आहे." त्या तरुणाकडे बघून अगस्त्य म्हणाला.
"हो दादा." दीप्तांशु (ज्युनियर) हलका हसला.
"काय रे, इतका उशीर?" गाथिकाने भुवया उंचावल्या.
"ऐनवेळी सायकल पंक्चर झाली होती ताई... सॉरी." दीप्तांशु तोंड पाडून म्हणाला.
"बरं, ठीक आहे. एरवी तू असा उशीर करत नाहीस म्हणून विचारलं." गाथिका शांतपणे म्हणाली. तशी त्याने मान हलवली.
"दीप्तांशु, डायलॉग्स आहेत ना पाठ?" अगस्त्यने विचारले.
"हो." दीप्तांशु उत्तरला.
"मला माहीत आहे, तुझी ही पहिलीच वेळ नाहीये नाटकात काम करण्याची; पण तरीही जरा सांभाळून... फंबल पडता कामा नये." अगस्त्यने शांतपणे सूचना दिली.
"हो दादा, मी काळजी घेईन." तो म्हणाला.
"गुड!" अगस्त्य मंद हसला.
त्यानंतर ते सगळे परत त्यांच्या तालीममध्ये गुंतले.
साधारण अर्ध्या तासानंतर...
"येस, वी डिड इट!" विना व्यत्यय सर्वकाही नीट होताच गाथिका उत्साहात म्हणाली.
"आता इतकाच स्ट्रॉंग परफॉर्मन्स आपल्याला स्टेजवर द्यायचा आहे." अगस्त्य सगळ्यांना बघून म्हणाला.
"हो." सगळ्यांनी उत्साहातच होकार दिला. तालीम यशस्वी झाल्याने त्यांच्यात वेगळाच जोश संचारला होता.
........
........
स्थळ: विद्यापीठ प्रांगण
"रुधिरा, आमच्यासोबत ये. तुझाही आज पहिलाच दिवस आहे ना? मी तुम्हा दोघींनाही तुमच्या क्लासरूमपर्यंत सोडतो." राजवीर रुधिराशी हातवारे करून बोलला.
"माझी इतकी काळजी करायची गरज नाही. आय नो, सगळ्यांची लाडकी अधिरा आहे. माझ्याशी कोणाला काही घेणं देणं नाही. सो उगाच वर वर पुळका दाखवायची गरज नाही." रुधिराने चिडून हातवारे करत प्रतिक्रिया दिली.
"रुधिरा, असं काही नाही. माझ्यासाठी तू आणि अधिरा सारख्याच आहात." राजवीर रुधिराची समजूत काढू लागला.
"हं!" रुधिराने ओठ तिरपे केले.
त्याच वेळी तिचा मोबाईल वाजला. स्क्रीनवरचं नाव पाहून तिचा चेहरा पांढरा पडला. तिने थरथरत कॉल उचलला आणि कानाला लावला.
"तू ऐकू शकतेस, हे जर कोणाला कळलं तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही." सर्जेराव इंदलकरांनी अगदी सौम्य आवाजात क्रूर धमकी दिली.
त्यांचे शब्द ऐकून रुधिरा अक्षरशः थिजून गेली होती. त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हा विचार करेपर्यंत सर्जेरावांनी कॉल ठेवला होता.
सर्जेरावांचे शब्द तिच्या कानात घुमत असल्याने तिच्याही नकळत तिच्या डोळ्यातून एक अश्रू गालावर ओघळलाच.
"रुधिरा, काय झालं? काय म्हणाले ते?" राजवीरने काळजीने विचारले.
त्याच्या आवाजाने ती भानावर आली आणि तिने तिचे डोळे पुसले.
"काही नाही." त्याचा हात झटकत ती तावातावाने म्हणाली.
"रुधिरा प्लीज!" राजवीरने परत एकदा काकुळतीने तिचा हात पकडला.
अधिरा आणि विराज काळजीने त्या दोघांकडे बघत होते.
"काय प्लीज? हे बघ, तू उगाच दिखावा नको करू. तू फक्त अधिराला बहीण मानतोस, असं सांगितलं ना तरी मी काही मनाला लावून घेणार नाहीये. सगळेच मला नाकारतात, मला सवय आहे नकार सहन करण्याची..." रुधिरा कठोरपणे हातवारे करत म्हणाली.
"रुधिरा मी कधीच तुझ्यात आणि अधिरामध्ये भेदभाव केलेला नाही." राजवीर पोटतिडकीने त्याची बाजू मांडून तिला समजावत होता.
"हो का? मग माझ्याशी साईन लॅंग्वेजमध्ये हातवारे करून का बोलतोय तू?" तिने जळजळीत कटाक्ष टाकत विचारले.
"कारण..." राजवीर आता निःशब्द झाला होता, त्याच्या डोळ्यात पाणी तरळत होते.
"मी सांगते, तुम्हाला सगळ्यांना माझं अस्तित्वच पुसायचं आहे. मला बोलता येतं, मी ऐकू शकते याचं कोणाला काही घेणं देणं नाही म्हणून मला सगळेच असं ट्रीट करतात." रुधिरा भावूक होत म्हणाली; पण तीही हातवारे करूनच बोलत होती, कारण आजुबाजूला बॉडीगार्ड्स होते आणि ते प्रत्येक घटनेची खबर सर्जेरावांना देत होते.
"रुधिरा असं नाही, मी बाबांमुळे..." राजवीर बोलतच होता की रुधिरा कुत्सित हसली.
"बाबा! त्यांना तर माझा काहीच फायदा नाही म्हणून तर दत्तक घेतल्यापासून मला बळजबरी बहिरी असल्याचं सोंग घ्यायला सांगितलंय. असो. हे रडगाणं तुझ्यापुढे गाऊनही फायदा नाही. शेवटी सगळे एकाच माळेचे मणी..." रुधिराने स्वतःच स्वतःला सावरले.
"रुधिरा, मी खरंच त्यांच्यासारखा नाही. मलाही तुझ्यासाठी वाईट वाटतं, मलाही तुझी काळजी आहे. मी कधीच तुला इग्नोर केलं नाही." राजवीर म्हणाला.
"कारण कोणासाठी मी एक्झिस्टच करत नाही ना! सगळ्यांना सर्जेराव इंदलकरची एकच मुलगी माहितीये आणि ती आहे अधिरा इंदलकर... रुधिरा इंदलकर आहे की नाही, कोणाला काय फरक पडतो..." रुधिरा खिन्नपणे म्हणाली.
"मला फरक पडतो रुधिरा... बाबांमुळे तू माझ्याबद्दलही गैरसमज करून घेतेय. आय नो, तुझं स्वतःचं अस्तित्व आहे. मला तुझी काळजी..." राजवीर बोलतच होता की रुधिराने हात जोडले आणि पाय आपटतच तिथून जाऊ लागली.
"रुधिरा, थांब..." राजवीरने रुधिराचा हात पकडला.
"काय आहे?" तिने जळजळीत कटाक्ष टाकला.
"काळजी घे." तो तिच्या डोक्यावर किंचित थोपटून हळूच तिच्या कानात म्हणाला.
रुधिराचे मन मात्र विरघळले नाही. तिने तोंड वाकडे केले आणि निघून गेली.
तिची पाठमोरी प्रतिकृती बघून राजवीरने सुस्कारा सोडला. थोड्या अंतरावर असलेले विराज आणि अधिरा त्याच्याजवळ आले.
"ही खरंच अशी का आहे?" विराजने कपाळावर आठ्या पाडून विचारले.
"तिला फक्त प्रेमाची आस आहे रे... प्रेमासाठी आसुसली आहे ती! मी कितीही तिची काळजी घेण्याचा प्रयत्न केला तरी तिला माझी काळजी खोटी वाटते, कारण एरवी तिच्याकडे सगळेच दुर्लक्ष करतात." राजवीर उदास होत म्हणाला.
अधिराच्या मनात अपराधीपणाची भावना डोकावली, तशी तिने मान खाली घातली.
"ह्म्म. नको एवढा विचार करू, एक दिवस येईल अक्कल तिला... समजेल तुझं प्रेम तिला नक्कीच!" विराजने राजवीरला दिलासा दिला.
"अपेक्षा तर हीच आहे." राजवीर विचार करत म्हणाला.
अधिरा आणि विराजही रुधिरा ज्या दिशेने गेली तिकडेच बघत होते.
तेवढ्यात त्यांच्याजवळ एक मुलगी आली.
क्रमशः
..........
© सेजल पुंजे.
..........
© सेजल पुंजे.
सर्जेराव इंदलकरांनी का जगासमोर रुधिराची खोटी प्रतिमा उभी केली आहे? तिला बोलू शकते, ऐकू शकते यामुळे सर्जेराव इंदलकरांना काय त्रास आहे? ते का तिचे खरे अस्तित्व पुसत आहेत? राजवीरची काळजी रुधिराला कळेल का? त्याच्याविषयी रुधिराने जो गैरसमज करून घेतलाय तो दूर होईल का?
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
