Login

साज़िश: गॅम्बल ऑफ लव्ह (भाग-१२)

अगस्त्य आणि अधिराने केला प्रेमविवाह, दोघेही एकत्र खूप खूश; पण एकाएकी अधिराचा झाला खून आणि हत्येच्या आरोपाखाली अगस्त्यला झाली अटक! अख्खा महाराष्ट्र त्याच्याविरोधात असताना त्याची मैत्रीण—गाथिकाने त्याची केस लढण्याचा घेतला निर्णय. कोणती रहस्ये उलगडेल हा खटला? या रक्तरंजित खेळाचा सूत्रधार अगस्त्य असेल की आणखी कोणी? जाणून घेण्यासाठी वाचा "साज़िश: Gamble Of Love"
"कोणाचा फोन वाजतोय?" हाताची मूठ करत गाथिकाने टेबलवर हात आपटत विचारले, तसे सगळेच त्या आवाजाने आणि एकंदरीत गाथिकाच्या रागीट अवतारामुळे दचकले.

"ते..." मयंक उत्तर देणारच की त्याला गाथिकाचा रागाने लालबुंद झालेला चेहरा दिसला आणि त्याची दातखिळी बसली.

"लवकर सांगा, नाहीतर तुम्हाला कोणालाही मी जिवंत सोडणार नाही." गाथिकाने सगळ्यांवर कटाक्ष टाकत धमकी दिली आणि आता ते सगळे एकमेकांकडे बघू लागले.

तनिशाने खोल श्वास घेतला आणि म्हणाली, "गाथा, तुझाच मोबाईल वाजतोय."

तनिशाचे उत्तर ऐकून गाथिकाने डोळे मिटले आणि स्वतःचा राग शांत केला.

"कोणाचा कॉल आहे?" तिने आता शांतपणे विचारले.

"ए इनिशियलपुढे कुत्र्याचं आणि हार्ट इमोजी आहे." तनिशाने सांगितले.

"कट कर आणि मोबाईल स्विच ऑफ कर." गाथिका निर्विकारपणे म्हणाली; पण अगस्त्यचे हावभाव क्षणात बदलले.

"तुझा बॉयफ्रेंड कॉल करतोय आणि तू कॉल उचलत नाहीयेस?" अगस्त्यने भुवया उंचावून गाथिकाला विचारले, तसे सगळेच तिच्याकडे आश्चर्याने बघू लागले.

गाथिकाचा चेहरा मात्र शांत होता.

"तू तुझ्या बॉयफ्रेंडला कुत्रा समजतेस?" मयंकने ओठांतले हसू दाबून कुतुहलाने विचारले.

"तुला डुक्कर समजते, आणखी काही? झालं समाधान?" गाथिका डोळे फिरवत म्हणाली.

"ब्रो, आज गाथिकाला काय झालं? इतकी का कुरकुर करतेय?" मयंकने हळूच विचारले.

"तुझ्या फालतू विनोदाला कंटाळली असेल." सौंदर्या त्याची टर उडवत म्हणाली.

"ओह कम ऑन सॅंडी! नेहमी असेच जोक करतो मी, तेव्हा तर ही अशी वागत नाही. आज हिचं काही बिनसलंय का?" मयंक साशंक नजरेने गाथिकाकडेच बघत होता.

"तसं मीही नोटिस केलं, गाथिका आज एरवीपेक्षा जास्त चिडचिड करतेय." प्रनिश म्हणाला, रजनीशनेही त्याच्या वाक्याला दुजोरा दिला.

"भांडली असेल तिच्या बॉयफ्रेंडसोबत आज परत... म्हणून आपल्यामागे दिवाळी नसताना फटाके फोडतेय." अगस्त्य मस्करी करत म्हणाला; पण गाथिकाने त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

"सो भावी वकिलीनबाई, आज कोणत्या कारणाने भांडलीस तुझ्या बॉयफ्रेंडशी?" अगस्त्यने बेफिकीर स्वरात विचारले.

"कायमचं भांडण संपवून आले." गाथिका भावनाशून्य स्वरात म्हणाली.

"म्हणजे?" अगस्त्यच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

"मी ब्रेकअप केला त्याच्याशी..." गाथिकाने खोल श्वास घेत बिंग फोडले.

"ब्रेकअप?" रजनीश, सौंदर्या, मयंक, तनिशा आणि प्रनिशला आश्चर्याचा धक्काच बसला. अगस्त्य मात्र शांत होता.

"कुल यार! इतका सीन करायची गरज नाही. नॉर्मल आहे हे... हे दोघे क्षणात भांडतात आणि क्षणात एकत्र होतात. आज ब्रेकअप केलंय, उद्या पॅचअप करतील. फुल हसबंड-वाईफ कोडेड रिलेशनशिप आहे यांचं..." अगस्त्य मानेला झटका देत म्हणाला. तसे सगळे थोडे निश्चिंत झाले.

"यावेळी मी खराखुरा ब्रेकअप केलाय अगस्त्य आणि परत पॅचअप करणार नाहीये." तिने खुलासा केला आणि आता सगळ्यांचेच चेहरे गंभीर झाले. अगस्त्य अजूनही शांत होता.

"नक्की?" त्याने एक भुवई उंचावली.

"हो." ती ठामपणे म्हणाली.

"पण मला विश्वास नाही. नेहमी असंच काहीतरी म्हणतेस आणि दुसऱ्या दिवशी कळतं की तुम्ही आधीच पॅचअप केलाय. सो यावेळी मी फसणार नाही." अगस्त्य ओठ तिरपे करत म्हणाला.

"तू विश्वास ठेव किंवा नको ठेवू; पण यावेळी मी खरं बोलतेय. काहीही झालं तरी मी पॅचअप करणार नाहीये." गाथिकाचा कंठ दाटून आला होता. तिच्या आवाजातला बदल अगस्त्यला लगेच कळला.

"बरं. यावेळी काय आहे ब्रेकअपचं कारण?" त्याने शांतपणे विचारले. बाकी सगळेही गंभीरपणे ऐकत होते.

"तो... तो लंडनला जातोय." गाथिकाने खोल श्वास घेत सांगितले.

"शिकायला ना? येईल की मग शिक्षण घेऊन परत... इतका काय बाऊ करतेस?" अगस्त्यने खांदे उडवले.

"फक्त शिकायला नाही, कायमस्वरूपी जातोय." ते सांगताना तिचा आवाज थरथरला आणि आता तोही गंभीर झाला.

रजनीश, प्रनिश, तनिशा, मयंक आणि सौंदर्याला तर आश्चर्याचा धक्काच बसला.

"व्हॉट? तू खरं बोलतेय?" अगस्त्यने आवाज वाढवत विचारले.

"ह्म्म." तिने हुंकार भरला.

"का जायचं आहे तुझ्या बॉयफ्रेंडला तिकडे?" रजनीशने काळजीने विचारले.

"त्याचं म्हणणं आहे की भारतात फारसा स्कोप नाही." गाथिकाने स्वतःच्या भावनांवर संयम ठेवत उत्तर दिले.

"ब्रेकअप त्याने केला की तू?" सौंदर्याने प्रश्न केला.

"मीच!" गाथिका म्हणाली.

"का? लॉंग डिस्टन्स वर्कआउट होणार नाही म्हणून?" मयंकने भुवया जुळवत विचारले.

"लॉंग डिस्टन्सचा प्रश्नच नाही." गाथिका तुटकपणे बोलली.

"म्हणजे?" प्रनिशने साशंक नजरेने पाहिले.

"तो मलाही लंडनला त्याच्यासोबत चल म्हणत होता." गाथिका मान वर करून डोळ्यातले पाणी डोळ्यात अडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली.

"मग?" तनिशाने विचारले.

"मला नाही जायचं भारत सोडून... मी कधीच जाणार नाहीये. इथल्या मातीमुळे मला ओळख मिळालीय. आई अस्तित्वात असून मावशीला आईचा दर्जा देणं माझ्या तत्त्वात नाही." गाथिका भावूक होत म्हणाली.

"या क्षणी कोण काय विचार करेल, मला माहीत नाही; पण गाथा मला खरंच तुझा अभिमान वाटतो." सौंदर्या गाथिकाचे हात हातात घेत म्हणाली.

"बट हे सगळं एकाएकी कसं काय? मला तर वाटलं होतं तो खूप सॉर्टेड आहे." अगस्त्यच्या हाताच्या मुठी रागाने वळल्या.

"एकाएकी नाहीये, बरेचदा आमची यावर चर्चा झाली आहे." गाथिकाने हळूच सांगितले.

"आणि हे तू मला कधी सांगणार होतीस? आधी तुझा होकार होता का तिकडे जायला?" अगस्त्यने संतापून विचारले.

"नाही यार, माझं आधीही हेच उत्तर असायचं. उलट परदेशात स्थायिक होण्याचा विषय निघाला की मी कायम चिडायचे त्याच्यावर... मी चिडले की तो म्हणायचा मस्करी केली; पण आज कळलं की तो सिक्रेटली परीक्षा देत होता. यंदा त्याचं सिलेक्शन झालं आणि त्याने हा बॉम्ब फोडला." गाथिकाने थोडक्यात कल्पना दिली, तसा अगस्त्य शांत झाला.

"मला आयुषकडून ही अपेक्षा नव्हती गाथा... त्याने निराश केलं मला..." अगस्त्य दातावर दात घासून म्हणाला.

"खरंतर आयुष आधीपासून प्रॅक्टिकल विचार करतो, मी तशी नाही. मला माहितीये, इथे कितीतरी लोकांना न्यायाची गरज आहे. माझं लहानपणापासून स्वप्न होतं इथल्या माणसांची मदत करणं, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून योग्य तो न्याय मिळवून देणं; पण जर आयुषसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याने मला माझं स्वप्न विसरावं लागणार असेल तर इट्स बेटर टू पार्ट वेज..." गाथिका कठोरपणे म्हणाली; पण बोलता बोलता डोळे पाणावले होते.

"तू ठीक आहेस?" अगस्त्यने तिचा चेहरा ओंजळीत घेत विचारले.

"ह्म्म." तिने फक्त हुंकार भरला.

"जादू की झप्पी हवी?" त्याने तिच्या डोळ्यात बघत विचारले.

"नाही." तिने नकार दिला.

"ये गं..." त्यानेच तिला ओढून मिठीत घेतले, तशी ती त्याच्या मिठीत रडू लागली.

"इट्स ओके. आय ॲम विथ यू. रडू नको. तू योग्य निर्णय घेतलास." गाथिकाच्या डोक्यावर थोपटत अगस्त्य तिची समजूत काढत होता.

"आयुष असा का आहे अगस्त्य? त्याने का मला समजून घेतलं नाही कधीच? तो तर मला लहानपणापासून ओळखतो ना... तरी मला ओळखायला तो इतका कसा चुकू शकतो? की त्याने मला मी आहे तशीच कधी स्वीकारलंच नाही? मग नेमकं त्याने कसं प्रेम केलं माझ्यावर? आज तो माझ्या एथिक्सला युझलेस म्हणाला, तो माझ्याबद्दलही हाच विचार करत असेल का?" गाथिका हुंदके देत मनातली घुसमट व्यक्त करत होती.

"गाथिका, ना तुझे एथिक्स युझलेस आहेत, ना तू... उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको. तो तुला इतक्या वर्षांत समजून घ्यायला चुकला, ही त्याची चूक आहे. तू नको उलट-सुलट विचार करूस." अगस्त्यने गाथिकाचे डोळे पुसून तिचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला.

गाथिकाची छबी कायम कणखर, खंबीर, कठोर अशी होती; पण आज तिला असे रडताना बघून रजनीश, प्रनिश, तनिशा, मयंक आणि सौंदर्या भावूक झाले होते.

तिच्या आक्रोशामुळे त्यांना कळत होते की ती किती दुखावली आहे. त्यांनाही तिच्यासाठी वाईट वाटत होते त्यामुळे ते शांतपणे उभे राहून तिला आधार देत होते.

"तो... तो मला बोलला की मी माझ्याच कोशात जगते. मला रिॲलिटी माहिती नाही. मला सगळं आयतं मिळतं म्हणून मला उगाच कॉन्फिडन्स आहे की मी जग बदलू शकते, परिवर्तन घडवू शकते. मी कधीही पूर्ण न होणारं स्वप्न बघतेय आणि मला लवकरात लवकर खडबडून उठायला हवं असाही बोलला तो... अगस्त्य तुलाही असंच वाटतं का? तुम्हाला सगळ्यांनाही असंच वाटतं का?" गाथिकाने रडतच सगळ्यांना विचारले, तसे आता सगळे तिच्याकडे भावूक होऊन बघू लागले.

क्रमशः
..........
© सेजल पुंजे.

गाथिकाची समजूत कशी काढेल अगस्त्य? गाथिका ब्रेकअपमधून स्वतःला सावरू शकेल का?


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →