Login

साज़िश: गॅम्बल ऑफ लव्ह (भाग-११)

अगस्त्य आणि अधिराने केला प्रेमविवाह, दोघेही एकत्र खूप खूश; पण एकाएकी अधिराचा झाला खून आणि हत्येच्या आरोपाखाली अगस्त्यला झाली अटक! अख्खा महाराष्ट्र त्याच्याविरोधात असताना त्याची मैत्रीण—गाथिकाने त्याची केस लढण्याचा घेतला निर्णय. कोणती रहस्ये उलगडेल हा खटला? या रक्तरंजित खेळाचा सूत्रधार अगस्त्य असेल की आणखी कोणी? जाणून घेण्यासाठी वाचा "साज़िश: Gamble Of Love"
गाथिकाने वातावरणात गांभीर्य निर्माण केले होते. सगळेच तिच्या अभिनयाने थक्क झाले होते. तिच्या डायलॉगमुळे प्रत्येकाच्या अंगावर काटा आला होता.

ते सगळेच त्या क्षणात गुंतलेले असताना अचानक त्या खोलीचे दार उघडून कोणीतरी आत आले. दाराचा आवाज आला आणि गाथिकाने मानेवरून हात फिरवत त्या दिशेने पाहिले तर एक मुलगी उभी होती.

त्या मुलीला बघून गाथिकाने सुस्कारा सोडला आणि अगस्त्यकडे पाहिले, तर त्याच्या कपाळावर आधीच आठ्या पडल्या होत्या.

गाथिकाने कपाळावर बोटे चोळली आणि वैतागून परत खुर्चीवर बसली.

"वॉव! खूप भारी आहे सगळं! मी काही डायलॉग्स ऐकले बाहेरून... जबरदस्त आहेत. गाथिका, यू आर ग्रेट ॲक्टर!" ती मुलगी अगस्त्यकडे बघत गाथिकाला म्हणाली.

"थॅंक्स." गाथिका अवघडून हसली.

"हाय..." ती मुलगी आता अगस्त्यच्या पुढे येऊन उभी राहिली.

"याश्वी, तू इथे काय करतेय?" अगस्त्यने शांतपणे विचारले.

"मी... मी हे तुम्हाला द्यायला आली आहे." याश्वी थोडीशी लाजत हात पुढे करत म्हणाली.

"बुके? कशासाठी?" त्याने तिच्या हातातल्या पुष्पगुच्छाकडे बघत विचारले.

"ते तुमच्या नाटकासाठी..." याश्वी केसांची बट कानामागे सारत म्हणाली.

"सहसा नाटक परफॉर्म केल्यानंतर बुके देतात याश्वी, तू आधीच देतेय. युनिक आहेस!" सौंदर्या किंचित हसत म्हणाली.

"मला माहीत आहे मी युनिक आहे." याश्वी डोळे गोल फिरवत सौंदर्याला म्हणाली. सौंदर्याने मात्र नकारार्थी मान हलवत खांदे उडवले.

"अगस्त्य, नाटक परफॉर्म केल्यानंतर बऱ्याच मुली तुम्हाला बुके देतील; पण मी तुम्हाला परफॉर्म करण्याआधी शुभेच्छास्वरूप हा बुके देतेय. प्लीज घ्या." याश्वीने परत हातातला पुष्पगुच्छ पुढे केला.

त्याने सगळ्यांवर कटाक्ष टाकला, गाथिकाचे हावभाव त्याने बघितले आणि त्याने आवंढा गिळला.

"थॅंक्स याश्वी. आता प्लीज तू जाऊ शकतेस का? आम्हाला आमची रिहर्सल करायची आहे आणि नाटकात सहभागी नसलेल्या कोणालाच इथे थांबायची परवानगी नाही." अगस्त्यने स्पष्ट शब्दात सांगितले.

"मग ते सगळे काय करत आहेत? ते तिघेसुद्धा नाहीयेत ना प्लेमध्ये? स्टिल इथे आहेत." तनिशा, मयंक आणि सौंदर्याकडे बोट दाखवत याश्वी म्हणाली.

"इथे उपस्थित प्रत्येकजण आमच्या प्लेमध्ये सहभागी आहे. नाटकात नटांची कामगिरी जितकी महत्त्वाची असते तितकीच महत्त्वाची कामगिरी पडद्यामागच्या लोकांचीही असते, याश्वी. तनिशाने प्रॉपर्टीची जबाबदारी घेतलीय, रजनीशने कॉश्च्युम्सची, मयंकने लाईट सेटअपची आणि सौंदर्याने मेकअपची... सो याश्वी, डोन्ट थिंक की इथे उपस्थित बाकी सगळे काहीच करत नाहीयेत." गाथिका उठून उभी राहत तिच्या मित्र-मैत्रिणीची बाजू घेत याश्वीला म्हणाली.

"सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं..." याश्वीने आता केविलवाणा चेहरा केला.

"गाथिका..." अगस्त्यने गाथिकाकडे पाहिले, तसे तिने डोळे फिरवले आणि दात ओठ खात हाताची घडी घातली.

"याश्वी, आमच्याकडे आधीच वेळ कमी आहे. आम्हाला फायनल रिहर्सल करायची आहे. तू प्लीज आता जाऊ शकतेस का?" अगस्त्य याश्वीकडे बघत होता. त्याच्या कपाळावरील आठ्या बघून याश्वीने खोल श्वास घेतला.

"ठीक आहे, जाते मी. ऑल द बेस्ट!" याश्वी म्हणाली, तसा सगळ्यांनी हुंकार भरला आणि ती दार उघडून बाहेर गेली.

"गेली ती... घ्या पोझिशन सगळे..." गाथिका अगस्त्यवर कटाक्ष टाकून सगळ्यांना म्हणाली.

"अशी का बघतेस? मी नाही बोलावलेलं तिला..." अगस्त्य ओठांचा चंबू करून म्हणाला.

"पण ती आली तर तुझ्यामुळेच ना..." गाथिकाने ओठ तिरपे केले.

"यात माझा काय दोष?" त्याने खांदे उडवले.

"तुझा काहीच दोष नाही, तू तर मोठा कृष्ण आहेस ना... म्हणून गोपिका तुझ्याभोवती घिरट्या घालतात." गाथिकाने त्याला टोमणा मारला.

"मी कुठे म्हटलं मी कृष्ण आहे; पण येतात त्या मुली माझ्यासाठी... आता इथे मीच एकटा हॅंडसम असल्यावर त्यांचा तरी काय दोष ना!" अगस्त्य स्वतःचेच कौतुक करू लागला आणि सगळ्यांनी एकत्रच सुस्कारा सोडला.

"चोमडा..." तनिशा, सौंदर्या आणि गाथिका एकत्रच म्हणाल्या, तशी तिथे हशा पिकली.

"भाई... पण त्या याश्वीला आमच्यापासून काय प्रॉब्लेम आहे? कशी लुक देते ती नेहमीच..." मयंक याश्वीची नक्कल करत म्हणाला.

"आणि ह्याला अहो-जाहो, तुम्ही म्हणते..." सौंदर्याने मानेला झटका दिला.

"कदाचित तुमच्या सगळ्यात मीच एक विद्वान आणि आदरास पात्र व्यक्ती तिला वाटत असेल." अगस्त्य दात दाखवत म्हणाला.

"बस कर भाई! किती स्वतःचंच कोडकौतुक करणार आहेस. जनाची नाही, तर निदान मनाची तरी वाटू दे." प्रनिश म्हणाला, तसे सगळे परत अगस्त्यवर हसले.

"जळतात तुम्ही माझ्यावर..." अगस्त्य वाकडे तोंड करून म्हणाला.

"आम्ही तर नाही जळत; पण ती याश्वी नक्कीच गाथिकावर जळते." रजनीशने जे निरीक्षण केले होते, त्यावरून तो बोलत होता.

"हो! मीही नोटिस केलंय. नक्कीच तिला वाटत असेल की हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत." सौंदर्या म्हणाली.

"आधी वाटत होतं, आता नाही वाटत." गाथिका म्हणाली, तसे सगळेच तिच्याकडे बघू लागले.

"म्हणजे?" सगळ्यांनीच आश्चर्याने विचारले. अगस्त्यही डोळे विस्फारून तिच्याकडे बघत होता.

"दोन आठवड्यापूर्वी तिने मला कन्फ्रंट केलं होतं. म्हणत होती की माझ्या मनातही अगस्त्यसाठी फिलिंग्स असतील तर ती माझ्याशी फेअर कॉम्पिटिशन करायला रेडी आहे." गाथिकाने सांगितले आणि अगस्त्यने कपाळावर हात मारला.

"मग?" सौंदर्याने विचारले. बाकी सगळ्यांनाही जाणून घेण्याची उत्सुकता होती.

"मग काही नाही. मी तिला सांगितलं की माझे डोळे फुटले नाहीत या माकडावर प्रेम करायला... जगातले सगळे पुरुष नाहीसे झाले आणि अगस्त्य एकमेव पुरुष उरला या पृथ्वीवर तरी मी याला निवडणार नाही, असं तिला सांगितलं तेव्हा कुठे ती बया शांत झाली." गाथिकाने सांगितले, तसे सगळे फसकन हसले.

"माझ्याविषयी इतकं कडू मत बनवायची गरज नाही. एक दिवस रिग्रेट करशील तू... माझ्यासारखा कोहिनूर तुला शोधूनही सापडणार नाही." अगस्त्य नाक मुरडत म्हणाला.

"हाडऽऽ" ती म्हणाली, तसे परत सगळे हसले.

"ऑन सिरियस नोट, मला एक प्रश्न विचारायचा आहे अगस्त्य तुला..." सौंदर्या म्हणाली.

"काय?" अगस्त्यने गोंधळून पाहिले.

"तू त्या याश्वीला काही सांगत का नाही? आय मीन जर तुला काही हरकत नसेल तर तिला ग्रीन सिग्नल दे; पण जर तू काहीच फील करत नसशील तर तिला स्पष्ट सांग ना..." सौंदर्या म्हणाली.

सगळ्यांनीच तिच्या वाक्याला दुजोरा दिला. गाथिकाने मात्र सुस्कारा घेतला.

"अरे यार, खूप वेळा सांगून झालं; पण ती ऐकतच नाही. ती म्हणते की जोपर्यंत माझ्या आयुष्यात मुलगी नाही तोपर्यंत ती ट्राय करत राहणार." अगस्त्यने खोल श्वास घेत सांगितले.

"पण ती किती गुंतेल तुझ्यात आणि तिला मुव्ह ऑन करायला किती अवघड जाईल नंतर..." मयंकने काळजी व्यक्त केली.

"मलाही माहितीये आणि मी तिला समजवलंय सगळं; पण ती काही ऐकूनच घेत नाही." अगस्त्य वैतागून म्हणाला.

"म्हणजे आता तिचा पत्ता कट करण्यासाठी का होईना तू प्रेमात पडणार आहेस तर..." सौंदर्या त्याला चिडवत म्हणाली.

"सॅंडी काहीही बोलू नको. प्रेमाशी माझा दूर-दूरपर्यंत संबंध नाही आणि कधीच नसेल." अगस्त्य ठामपणे म्हणाला.

"मग काय फेक डेटिंग?" तनिशाने कुतुहलाने विचारले.

"शट अप यार! ऑनलाईन वेबसाईट्सवर कथा वाचून वाचून तुला काहीही सुचतं." अगस्त्यने डोळे फिरवले.

"ए त्याविषयी तू काही बोलायचं नाही हं..." तनिशा गाल फुगवून म्हणाली.

"मग कशाला काहीही बरळते. फेक डेटिंग म्हणे..." अगस्त्यने तिच्या डोक्यात टपली मारली.

"पण मग याश्वीचं कसं?" रजनीशने विचारले.

"तेच तर कळत नाहीये ना..." अगस्त्यच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या.

"जाऊ दे! ती समजायचं तेव्हा समजेल. सध्या या विषयावर चर्चा करणं गरजेचं नाही. लेट्स गो बॅक टू रिहर्सल." गाथिका सगळ्यांना वेळेची जाणीव करून देत म्हणाली.

"हो." सगळ्यांनी होकार दिला आणि आपापल्या कामी लागले.

अगस्त्य परत खुर्चीवर बसला. गाथिका टेबलवर हात ठेवून उभी राहिली. सगळे शांत झाले, तशी परत त्यांची तालीम सुरू झाली.

"असो. कायदा माझा नसला तरी मी स्वतःला न्याय मिळवून दिला. मला यातच समाधान आहे." गाथिका परत खुर्चीवर बसली, आता तिच्या चेहऱ्यावर समाधानाची रेष होती.

"न्याय? अशाप्रकारे?" अगस्त्यने भुवया उंचावल्या.

"हो." गाथिका ठामपणे म्हणाली.

"एकदाही कायदा तुमची मदत करेल, असं वाटलं नाही तुम्हाला?" अगस्त्यने विचारले.

"नाही." गाथिकाने क्षणात उत्तर दिले.

"याला आत्मविश्वास म्हणू की व्यवस्थेवरील अविश्वास?" अगस्त्यने एक भुवई उंचावली.

"दोन्ही!" ती म्हणाली.

"तुम्हाला कायद्याविषयी एवढी चीड का? इतका अविश्वास का?" अगस्त्यने गोंधळून विचारले.

"इन्स्पेक्टर, हे तुम्ही मला विचारताय? एवढी वर्षे या व्यवस्थेत काम करून तुम्हाला तर एव्हाना अंदाज यायला हवा की माझा का संताप झालाय... का मी कायद्याचा तिरस्कार करते आणि का माझ्या मनात अविश्वास आहे कायद्यावर, या सिस्टमवर..." गाथिकाने नजर रोखली, तसे अगस्त्यचे हावभाव बदलले.

"हे बघा मिस गीता, माझ्या अंदाजाला कवडीमोल महत्त्व आहे. त्यामुळे वस्तुस्थिती काय आहे? गुन्हेगाराने गुन्हा का केला हेच न्यायालयात विचारले जाते. म्हणून कायद्यावर भाष्य करण्याऐवजी स्पष्ट उत्तर द्या, का केला तुम्ही सुर्या खोत यांचा खून?" अगस्त्यने विचारले आणि परत एकदा वातावरण गूढ झाले.

गाथिका बोलायला सरसावली होतीच की तेवढ्यात मोबाईल वाजला आणि तिथली शांतता भंग झाली.

क्रमशः
.........
© सेजल पुंजे.

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →