"वीर, हजार वेळा सांगितलं आहे, अशी मस्करी करत जाऊ नकोस. मला नाही आवडत..." विराज राजवीर चिडला.
"पण खरं तर हेच आहे ना..." राजवीर म्हणाला.
"मी अधिराशी लग्न करणार नाहीये." विराज ठामपणे म्हणाला.
"आणि हे तू तुझ्या बाबांना किंवा आमच्या बाबांना सांगू शकतोस ठामपणे?" राजवीरने विचारले.
अधिरा दोघांकडेही आळीपाळीने बघत होती.
"बोल ना सांगू शकतोस का? नाही ना?" विराजला शांत बघून राजवीर उपरोधिक हसला.
"एक दिवस नक्की सांगेन, वीर..." विराज त्याच्या डोळ्यात बघत म्हणाला.
"कधी?" राजवीरनेही नजर रोखली.
"सांगेन कधीतरी..." विराजने आता नजर वळवली. तेवढ्यात अधिराने विराजला हात लावला, तसे तो तिच्याकडे बघू लागला आणि ती हातवारे करू लागली.
"तू तुझं सिक्रेट सांगितलं तर सगळं लगेच सॉल्व्ह होईल." ती हातवारे करून म्हणाली. तिचे हातवारे राजवीरलाही कळले.
"कोणतं सिक्रेट राज? तू कधीपासून गोष्टी लपवून ठेवायला लागला माझ्यापासून? आपण तर बेस्ट फ्रेंड्स आहोत ना! सगळंच शेअर करत आलोय; पण तुझं सिक्रेट अधिराला माहितीये, मला नाही. दॅट्स नॉट फेअर." राजवीर रुसत म्हणाला.
"वीर..." विराजने राजवीरकडे पाहिले.
"राज..." राजवीरने ओठांचा चंबू केला. विराजने खोल श्वास घेत डोळे मिटले.
"माझं एका व्यक्तीवर प्रेम आहे आणि जेव्हा अधिराशी लग्न करायला घरून जास्तच दबाव होईल तेव्हा घरी सांगेन मी सगळं..." विराजने स्वतःचे गुपित उलगडले.
"तुझं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्या व्यक्तीला माहिती आहे हे सगळं?" राजवीरने विचारले.
"नाही, मी अजून माझं प्रेम कबूल केलेलं नाही." विराज शांतपणे म्हणाला.
"मग करू पण नको." राजवीर निर्विकारपणे म्हणाला. त्याचे उत्तर ऐकून अधिरा राजवीरकडे आश्चर्याने बघू लागली.
"वीर!" विराज आता थोडा चिडला.
"राज, तुलाही माहिती आहे सगळं किती कॉम्प्लिकेटेड आहे. उगाच तुझ्या कबुलीने बऱ्याच जणांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जाईल. माझ्या शब्दातलं गांभीर्य तू समजून घे." राजवीर कठोरपणे म्हणाला.
"पण माझं अधिरावर प्रेम नाही, अधिराचं माझ्यावर प्रेम नाही. आमच्यात बहीण-भावाचं नातं असताना आम्ही कसे काय लग्न करू शकतो?" विराज वैतागून म्हणाला.
"मग आतापासून एकमेकांसाठी दृष्टिकोन बदला." राजवीर भावनाशून्य स्वरात म्हणाला.
"गप्प बस यार वीर..." विराज पलंगावरून उठत म्हणाला आणि त्याने अधिराकडे पाहिले. तिने नजरेनेच त्याला शांत केले.
"अधिरा, तुझं झालं का आवरून? चल जाऊयात आणि तू मंजुषाचा रोल प्ले करणार आहेस. ओके?" विराजने खोल श्वास घेत सरळ विषयच बदलला.
"ओके." तिने त्याला अंगठा दाखवला.
"चल, उशीर होतोय." आता विराज राजवीरकडे बघून म्हणाला; पण राजवीर पलंगावरून उठला नाही.
'राज, तुझं प्रेम कन्फेस न करणंच योग्य आहे. नाहीतर... नाहीतर खरंच तू तीन लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करशील. मुळात अधिरा यात उगाच भरडली जाईल.' राजवीर मनातल्या मनात विचार करत म्हणाला.
"कसला विचार करतोय?" त्याच्या खांद्यावर हळूच थोपटत विराजने त्याला भानावर आणले.
"अं... काही नाही." राजवीर खोल श्वास घेत म्हणाला.
"चल मग, उशीर होतोय. आपल्याला तिथे गेल्यावर परत एकदा रिहर्सलसुद्धा करावी लागेल." विराज म्हणाला.
"ह्म्म." राजवीरने हुंकार भरला आणि त्यानंतर ते तिघेही त्या खोलीतून बाहेर पडले.
............
............
स्थळ: सर्जेराव इंदलकर रत्नागिरी विद्यापीठ, विद्यापीठ.
एका खोलीत अगस्त्य आणि गाथिका आमोरासमोर खुर्च्यांवर बसले होते. त्यांच्या मधोमध टेबल ठेवला होता आणि त्यावर काही कागद ठेवलेले होते. दोघेही एकमेकांकडे बघत होते.
तिथे त्यांच्या नाटकाची तालीम सुरू होती.
"मिस गीता तुम्ही कायदा का हाती घेतला?" अगस्त्यने गाथिकाला नजर रोखून विचारले.
"कारण तुमचा कायदा गरिबांची कधीच साथ देत नाही, इन्स्पेक्टर साहेब." गाथिकाने सडेतोड उत्तर दिले.
"कायद्यापुढे सगळे सारखेच..." अगस्त्यने तथाकथित विधान केले.
"हे फक्त म्हणायलाच..." गाथिका उपरोधिक हसली.
"म्हणजे?" अगस्त्यचे हावभाव बदलले. गाथिका तिचा पुढचा डायलॉग बोलणारच की तेवढ्यात एक आवाज त्या खोलीत घुमला.
"अगस्त्य, कॉश्च्युम्स आलेले आहेत. कुठे ठेवू?" रजनीशने विचारलं आणि आता सगळे त्याच्याकडे बघू लागले.
"ये! इकडे ये आणि ठेव डोक्यावर माझ्या..." गाथिका संतापली.
"सॉरी..." रजनीशला लगेच त्याची चूक कळली.
"रजनीश, इथे ठेव नीट." तनिशाने त्याला इशारा केला. तसा तो तिच्याजवळ गेला.
"स्टुपिड!" गाथिकाने रजनीशकडे बघून डोळे फिरवले.
"रिलॅक्स! पुढचा डायलॉग घे." अगस्त्य अगदी शांतपणे म्हणाला.
"सगळी लिंक तोडली मेल्याने..." गाथिकाचा राग अजूनही शांत झाला नव्हता.
"मोठा श्वास घे आणि बोल डायलॉग..." अगस्त्यने तिला समजावले, तसे तिने होकारार्थी मान डोलावली.
अगस्त्यने त्याच्या डायलॉगची पुनरावृत्ती केली, तशी गाथिका तिचा डायलॉग बोलायला सरसावली.
"कायदा हा फक्त श्रीमंतांचा असतो, इन्सपेक्टर! कायदा फक्त श्रीमंतांच्या इच्छेनुसार वळतो. व्यक्ती श्रीमंत असेल तर त्याने कितीही मोठा अपघात केला तरी चार ओळीचा निबंध लिहून श्रीमंत अपराधी निर्दोष सुटतो. बलात्कारासारख्या अक्षम्य गुन्ह्यातही श्रीमंत गुन्हेगारांची निबंध लिहून सुटका होत असेल तर अशा व्यवस्थेबद्दल काय बरं अपेक्षा ठेवावी गरीबाने?" गाथिका ओठांचा कोपरा उंचावत उपरोधिक हसून म्हणाली. तसा अगस्त्य खजिल झाला.
"आणि इन्स्पेक्टर तुम्हीसुद्धा हेच सिद्ध केलं की गरीबाचा कायदा नाही." ती खुर्चीला टेकून पायावर पाय ठेवून बसत म्हणाली.
"मी कधीच भेदभाव केला नाही, मिस गीता. नॉट एव्हरी पब्लिक सर्व्हन्ट इज करप्ट!" अगस्त्य गाथिकाच्या डोळ्यात बघत म्हणाला.
"हो?" गाथिकाने भुवया उंचावल्या.
"हो." अगस्त्यची नजर अजूनही स्थिर होती.
"मग इतक्या अनसॉल्व्ह केसेस पडीक आहेत; पण अवघ्या ७२ तासांत तुम्ही हीच केस सॉल्व्ह का केली?" गाथिकाने जळजळीत कटाक्ष टाकून थेट प्रश्न केला.
अगस्त्य पुढे बोलतच होता की तेवढ्यात पूर्ण खोलीत एकच आवाज निनादला.
"आछ्छी...."
सगळ्यांनी शिंकेच्या आवाजाच्या दिशेने बघितले तर प्रनिश नाक चोळत होता.
"तुझ्या तर... मेल्या शिंक येते तर कशाला धूळ उडवतोय? डेडबॉडी आहेस, डेडबॉडी बनून राहा. नाहीतर मी खरंच पोहचवेन हा तुला..." गाथिका प्रनिशवर भयंकर चिडली.
"सॉरी... सॉरी यार गाथा..." प्रनिशने लगेच माफी मागितली.
"यार मला रिहर्सलच नाही करायची. आज जणू प्रत्येकाने मला इरिटेट करायचा ध्यास घेतलाय." गाथिका वैतागून म्हणाली.
"गाथिका काय झालं? इतकी का चिडचिड करतेय?" अगस्त्यने काळजीने विचारले.
"मग या अशा परिस्थितीत काय आनंदाने नाचू?" ती तिरसटपणे म्हणाली.
"मी असंही नाही म्हटलं; पण तू आज माझ्यापेक्षाही जास्त चिडचिड करतेय. काय झालं?" अगस्त्य तिची विचारपूस करत होता.
"काही नाही. वेळ कमी आहे. एका तासाने कार्यक्रमाची सुरुवात होईल त्याआधी ही फायनल रिहर्सल आटपून घेऊ." गाथिका म्हणाली.
"ह्म्म." अगस्त्यने हुंकार भरला.
"आता जर परत कोणी डिस्टर्ब केलं ना तर एकेकाचं कंबरडं मोडेल मी..." खुर्चीवरून थोडी तिरपी वळत तिने सगळ्यांवर कटाक्ष टाकला आणि धमकी दिली.
"गाथिका मॅडम, कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीने गुन्हा करण्याची वार्ता करू नये." मयंकने तिला सल्ला दिला.
"इकडे ये! तुला गुन्हा करून दाखवते आणि मग कायद्याचं शिक्षणही सांगते." गाथिकाने त्याला दम दिला, तशी त्याची टरकली.
"सॉरी..." मयंकने हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवले.
"सॉरी म्हणे... स्टुपिड!" मानेला झटका देत गाथिकाने डोळे फिरवले.
"रिलॅक्स! पुढचा डायलॉग घे." अगस्त्य तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला, तसा तिने खोल श्वास घेतला.
"काय आहे नेक्स्ट डायलॉग?" ती स्क्रिप्ट बघू लागली.
"हा बघ..." त्याने तिला एक ओळ दाखवली.
"ह्म्म. अरे पण आधी तुझा डायलॉग आहे." गाथिका म्हणाली.
"ओके." तो म्हणाला आणि परत तिथे शांतता पसरली.
"कारण... कारण..." अगस्त्य अडखळत म्हणाला.
"बोबडी वळली इन्स्पेक्टर? की खरं सांगायची हिंमत नाही?" गाथिकाने उपरोधिक स्वरात विचारले.
"मिस गीता..." अगस्त्यने त्याच्या मुठी आवळल्या.
"तुम्ही ही केस सॉल्व्ह केली, कारण यात एका श्रीमंताचा खून झालाय. संपूर्ण व्यवस्थेत उलथापालथ झाली फक्त त्या श्रीमंत अपराध्याचा खूनी शोधायला... तुमच्यावर दबाव टाकला गेला लवकरात लवकर या केसचा सोक्षमोक्ष लावायला, बरोबर ना?" गाथिका तिची तीक्ष्ण नजर रोखून म्हणाली.
"ते..." अगस्त्य आता नजरानजर चोरत होता.
"जस्टिफिकेशन देऊ नका सर. ही केस कॉम्प्लिकेटेड आहे आणि खूनी शोधायला वेळ लागेल, असं तुम्हीच स्टेटमेंट दिलं होतं मिडीयाला... पण तरीही ही कॉम्प्लिकेटेड केस सॉल्व्ह झाली. अहं! टू बी प्रिसाईज सॉल्व्ह केली गेली." गाथिकाने ओठ तिरपे केले.
"हे बघा मिस गीता, तुमचा आक्रोश व्यर्थ आहे." अगस्त्य म्हणाला.
"माझा आक्रोश व्यर्थ नाही, ही सिस्टीम व्यर्थ आहे. इतर सगळ्या अनसॉल्व्ह केसेसमध्ये गुन्हेगार कोण आहे, हे ठाऊक असूनही, गुन्हेगाराविरुद्ध पुरावे उपलब्ध असूनही केसेस पडीक आहेत..." टेबलवर दोन्ही हात आपटून ती खुर्चीवरून उठत उभी राहिली. तसे सगळेच तिच्याकडे आश्चर्याने बघू लागले.
