"हात सोड माझा..." राजवीरने रागात विराजचा हात झटकण्याचा प्रयत्न केला.
"मी नाही सोडणार..." विराज हट्ट करत म्हणाला.
त्याने त्याच्या हाताची पकड जराही सैल केली नव्हती. राजवीरने त्याच्याकडे रागात बघितले आणि तो परत स्वतःचा हात सोडवू लागला.
"सॉरी ना..." विराज केविलवाण्या स्वरात म्हणाला.
"ऐनवेळी एंट्री घेतलीस... जरा लवकर यायला काय धाड भरली होती?" राजवीरने रागात विचारले.
"किंचित उशीर झाला; पण आलो ना..." विराजने ओठांचा चंबू केला.
"उपकारच केलास." राजवीरने ओठ तिरपे केले.
"उफ्फ! बायकोसारखा रुसू नको आता..." विराज राजवीरचे गाल खेचत म्हणाला. दुसऱ्याच क्षणी राजवीरने विराजच्या पोटात कोपर मारला.
"आह्ह!" विराज कळवळला.
"फक्त बायकोसारखा रुसत नाही, तर तुडवतोही मी!" राजवीरने विराजच्या गालावर थोपटून धमकीवजा सुरात सांगितले.
"मी आहे म्हणून तुझा हा जाच सहन करतोय. आणखी कोणी असतं ना तर तुझ्या या वाईल्ड प्रेमापुढे टिकलाच नसता." विराज मानेला झटका देत म्हणाला.
"आता तू कशाला बायकांचं अधिकृत वाक्य बोलतोय?" राजवीरने कमरेवर हात ठेवला.
"म्हणजे?" विराजने गोंधळून पाहिले.
"मी आहे म्हणून टिकली, या डायलॉगबद्दल बोलतोय." राजवीर म्हणाला.
"हा तर खरंच आहे ते..." विराजने नाकाचा शेंडा उडवला.
"निघ." राजवीर रुबाबात म्हणाला.
"तड़पाओगे? तड़पा लो...
हम तड़प-तड़प कर भी तुम्हारे गीत गाएंगे
ठुकराओगे? ठुकरा लो
हम ठोकर खा कर भी तुम्हारे दर पे आएंगे
तड़पाओगे? तड़पा लो..." विराजने अगदी सुरात गात राजवीरला बघून भुवया उंचावल्या.
हम तड़प-तड़प कर भी तुम्हारे गीत गाएंगे
ठुकराओगे? ठुकरा लो
हम ठोकर खा कर भी तुम्हारे दर पे आएंगे
तड़पाओगे? तड़पा लो..." विराजने अगदी सुरात गात राजवीरला बघून भुवया उंचावल्या.
"हाडऽऽ!" राजवीर बारीक डोळे करून म्हणाला, तसा विराज खळखळून हसला. त्याला हसताना बघून शेवटी रुसवा सोडून राजवीरही हसला.
त्यानंतर दोघेही अधिराच्या खोलीजवळ आले. त्यांनी एक बटण दाबली, तसे आतले दिवे लुकलुक करू लागले. लगेच अधिराने आतून दार उघडले. दोघेही आत गेले. तशी ती दोघांनाही बिलगून रडू लागली.
.......
.......
स्थळ: सर्जेराव इंदलकर रत्नागिरी विद्यापीठ, रत्नागिरी.
अगस्त्य त्याची बाईक पार्किंगमध्ये पार्क करत होता.
"या साहेब, आलात! काय सेवा करू तुमची?" दात ओठ खात एका मुलीने त्याला पाहताच खवळून विचारले.
"अं... एक बन मस्का!" तो तिच्याकडे बघत दात दाखवत म्हणाला.
"मलाई मारून की नुसताच कानाखाली जाळ काढलेला चालेल तुला?" तिने तिचे हात चोळत विचारले.
"सकाळी सकाळी डोकं उठवू नकोस यार गाथिका..." तो तिच्यावर आता भडकला.
"चोराच्या उलट्या बोंबा! मित्रा, डोकं तू उठवलंयस माझं... कुठे तडमडला होतास? माहिती आहे ना आज आपलं नाटक आहे... आपण फायनल रिहर्सल नाही केली अजून आणि तू ऐनवेळी गायब..." गाथिका रागाने धुसफूस करत होती.
"ह्म्म." त्याने फक्त हुंकार भरला.
"ह्म्म काय? आणि एक मिनिट, गाल लाल का आहे तुझा?" गाथिकाचे त्याच्या गालाकडे लक्ष गेले तशी ती निरखून बघू लागली.
"काही नाही असंच..." तो विषय बदलू लागला.
"घरी काही झालं का? तुझे डॅड..." गाथिका अंदाज घेत म्हणाली.
"डोन्ट कॉल हिम दॅट... आणि माझा गाल लाल करायला आधी त्या व्यक्तीला माझी भेट घ्यावी लागेल, जे तो या जन्मात तरी घेणार नाही." अगस्त्य निर्विकार चेहऱ्याने म्हणाला.
"ह्म्म. सोड! मूड वाया नको घालवू यात..." गाथिकानेही त्याच्या वडिलांचा विषय टाळला.
"ह्म्म." अगस्त्यने हुंकार भरला.
"मग तुझ्या गालावर रंगपंचमी कोणी खेळली?" गाथिकाला आता वेगळीच उत्सुकता वाटत होती.
"त्याच्या आधी तू सांग सुंदर मुलींना देव बुद्धी देत नाही का?" त्याने वैतागून विचारले. सकाळी समुद्रकिनारी भेटलेली अधिरा आणि तिने मारलेली चापट त्याला अजूनही आठवत होती.
"असं काही नाही! मी तर शार्प माईंडेड आहे. नेहमीच फर्स्ट येते. तुमच्या सगळ्यांमध्ये माझा आयक्यूसुद्धा हाय आहे." गाथिका स्वतःचं कौतुक करत म्हणाली.
"पण तू सुंदर आहे, हे कुणी म्हटलं? हा गैरसमज कधीपासून आहे गं तुला?" त्याने भुवया उडवून तिची खिल्ली उडवत तिला विचारले आणि ती त्याच्याकडे नाकपुड्या फुगवून बघू लागली.
"तुझ्या तर..." तिने हाताचा ठोसा केला आणि त्याला मारायला त्याच्या पाठीमागे पळू लागली.
"बरं, बरं... ठीक आहे सॉरी! मी जस्ट मस्करी केली यार..." अगस्त्यने लगेच हार पत्करली.
तिनेही विषय ताणून नाही धरला आणि दोघे परत शांतपणे चालू लागले.
"पण इतक्या वेळ होतास कुठे? आणि अचानक असा काय प्रश्न विचारलास? वेट, तुझा हा गाल एका मुलीने रंगवला? ॲंड टू बी प्रिसाईज, एका सुंदर मुलीने तुझा गाल रंगवला?" गाथिका आता मुद्दाम त्याला छेडत होती.
तिच्या प्रश्नाचे उत्तर न देता तो शांत राहिला आणि ती जे समजायचे ते समजून गेली.
"मित्रा... आज मेरा दिन बन गया! या आनंदापुढे बाकी सगळं शून्य आहे." ती खिदळत म्हणाली.
"गाथा..." त्याने तिच्याकडे वैतागून पाहिले आणि आता तिने आवरते घेतले.
"ओके! जोक्स अपार्ट; पण झालं काय नेमकं? तू कितीही आगाऊ असलास तरी मार खाण्याइतपत तर तू चुकीचा वागणार नाहीस. नेमका विषय काय आहे?" गाथिकाने गांभीर्याने विचारपूस केली.
"अरे यार... ते..." असं बोलून अगस्त्यने तिला थोडक्यात सर्वकाही सांगितले. गाथिका त्यावर विचार करू लागली.
"आता तूच सांग माझी काय चूक होती? तिला माणुसकी म्हणून मदत केली आणि तिने मलाच चापट मारली." अगस्त्य तोंड पाडून म्हणाला.
"ह्म्म." गाथिकाने विचार करत हुंकार भरला.
"तू मुलगी आहेस ना?" त्याने एकाएकी विचारले.
"विचारतो काय? आहेच मी!" ती लगेच कमरेवर हात ठेवत म्हणाली.
"तुझ्या वागण्यावरून वाटत नाही." त्याने परत तिची फिरकी घेतली. तसे तिने डोळे फिरवले.
"मिसोजिनिस्ट... मुद्द्याचं बोल." ती नजर रोखून म्हणाली.
"तू मुलगी आहेस तर तू विचार करून सांग ना की त्या मुलीने मला विनाकारण का चापट मारली असेल..." अगस्त्य गाथिकाकडे उत्तराच्या अपेक्षेने बघत होता.
"मेबी... मेबी शी थॉट यू आर पर्व्हट..." हनुवटीवर बोट ठेवत ती म्हणाली. ते ऐकताच तो तीन ताड उडाला.
"म्हणजे?" त्याच्या कपाळावर आठ्या पसरल्या.
"ठरकी रे..." तिने मराठीत भाषांतर करून सांगितलं.
"अर्थ नाही विचारला तुला... इंग्लिश येतं मला..." तो तिच्यावर खेकसला, तशी ती शांत झाली.
"ती मुलगी असा कसा विचार करू शकते माझ्याबद्दल?" अगस्त्यला आता अधिराचा रागच आला.
"कारण तू आहेस एक नंबरचा फ्लर्ट..." गाथिकाने खांदे उडवले, तसा तो तिच्याकडे बारीक डोळे करून बघू लागला.
"एक्सक्युझ मी? मुली माझ्यावर फिदा होतात, मी मुलींवर नाही. मी तर मुलींपासून चार हात लांब राहतो." अगस्त्य रुबाबात म्हणाला.
"पण तिच्याजवळ तू स्वतः गेला होतास ना..." गाथिका म्हणाली.
"ती भान हरपून तिच्या सॅंड आर्टमध्ये गुंतली होती आणि तिथलं वातावरण बघता मला मदत करावीशी वाटली तिची, म्हणून गेलो होतो... नाहीतर मला काही हौस नव्हती." तो नाकाचा शेंडा उडवत म्हणाला.
"तिला वाटलं असेल की तू मदतीचा हात देऊन तिचा गैरफायदा घेणार आहेस." ती त्याला डिवचत म्हणाली.
"गप्प बस यार गाथिका... मी खरंच तसा आहे का?" अगस्त्यने भुवया जुळवून काकुळतीने विचारले.
"चिल! इतकं काय चिडचिड करतोय? फॉरगेट इट." ती त्याला समजावत म्हणाली.
"अरे यार, इतक्या सहज नाही विसरता येत. मला कोणी माझ्याबद्दल गैरसमज करून घेतलेला नाही आवडत..." तो खोल श्वास घेत नाराजीने म्हणाला.
"ह्म्म. मला कळतंय; पण प्रत्येकाला पटवून नाही ना देऊ शकत आपण... रिलॅक्स! सोड तिला आणि आजच्या स्पर्धेवर फोकस कर." गाथिकाने त्याचे लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला.
"ठीक आहे! पण आधी मला काहीतरी खायचंय यार... भूक लागलीय." अगस्त्य केविलवाण्या स्वरात म्हणाला.
"भूक तर मलाही लागलीय. चल, कॅन्टीनमध्ये सगळे वाट बघत आहेत." ती पायांचा वेग वाढवत म्हणाली.
"सगळेच?" त्याने आश्चर्याने विचारले.
"हो." तिने त्याच्यावर एक कटाक्ष टाकून उत्तर दिले.
"जास्त चिडले नाहीत ना?" त्याने चाचरत विचारले.
"नाही." ती म्हणाली.
"नक्की?" त्याने साशंक नजरेने पाहिले.
"चिडले नाहीत रे! पण हो, तुला पाहिल्याबरोबर तुला फैलावर घेतील, इतकं नक्की!" ती म्हणाली आणि आता विचार करूनच त्याला घाम फुटला.
"गाथिका..." त्याने ओठांचा चंबू केला.
"आधी उशीर करताना विचार नाही केलास नि आता गयावया करतोय..." ती डोळे बारीक करून म्हणाली.
"मुद्दाम नाही केला यार उशीर... आधी पहाटे आरे-वारे बीचला गेलो. तिथे झोपून राहिलो आणि परत उठून येणार तर..." तो बोलता बोलता थांबला.
तेवढ्यात तिने त्याचे वाक्य पूर्ण केले, "तर तू त्या सुंदर मुलीला न्याहाळत बसला."
"तिला नाही, तिच्या आर्टला..." तिचा टोमणा ऐकून तो त्याची बाजू सावरत म्हणाला.
"ह्म्म... तेच आर्ट ज्याच्यावर तू पाय ठेवलास!" ती उपरोधिक हसली.
"मी मुद्दाम नाही केलं." त्याने ओठ बाहेर काढला.
"हो रे! तिच्या सौंदर्यात हरवून केलं." तिने परत त्याची फिरकी घेतली आणि त्याचा चेहरा आता बघण्यासारखा झाला.
क्रमशः
.........
© सेजल पुंजे
.........
© सेजल पुंजे
