अट.. -1
"लग्नानंतर नोकरी सोडावी लागेल. हे आत्ताच स्पष्ट सांगतेय, म्हणजे नंतर वाद नकोत. आमच्या घराण्यात सुना उंबऱ्याबाहेर काम करत नाहीत. घरात काय कमी आहे ?"
निनादच्या आईंनी, माईंनी, पानाचा विडा तोंडात टाकत जाहीर केलं. साखरपुडा होऊन दोन महिने झाले होते आणि लग्नाची तारीख काढायला दोन्ही घरं बसली होती. मानसी चहा देण्यासाठी पुढे येत होती, हे एकूण तिचे पाय जागेवरच थबकले.
"अहो पण माई, आधी बोलणी झाली तेव्हा हा विषय.." मानसीचे बाबा चाचरत म्हणाले.
"तेव्हा राहिला असेल. आता निघाला." माई ठाम होत्या.
"फिजिओथेरपी का काय ते.. लोकांचे हातपाय चेपायचे ना ? आमच्या घरची सून हे करते हे बाहेर कळलं तर काय म्हणतील लोक ?"
खोलीत शांतता पसरली. मानसीने निनादकडे बघितलं. साखरपुड्याच्या दिवशी "तुझं करिअर म्हणजे तुझा अभिमान आहे माझ्यासाठी" म्हणणारा निनाद. रोज रात्री तासभर फोनवर बोलणारा, तिच्या क्लिनिकच्या पेशंटच्या गोष्टी आवडीने ऐकणारा निनाद. तो खाली बघत होता. मोबाईलच्या कोपऱ्याशी बोटं खेळवत.
"निनाद ?" तिने हाक मारली. "तुझं मत ?"
त्या क्षणी जे झालं, त्याने पुढचं सगळं ठरवलं. निनादने आईकडे बघितलं. मग मानसीकडे. मग परत खाली.
"म्हणजे.. आई म्हणतेय त्यातही तथ्य आहे.. आणि तसंही तुला कुठे गरज आहे कमवायची.. मी आहे ना.. आपण नंतर बघू ना यावर.."
"नंतर काही बघायचं नाही." माईंनी विषय तोडला. "अट मान्य असेल तर मुहूर्त काढू."
घरी परतताना रिक्षात कुणीच बोललं नाही. घरी आल्यावर आई म्हणाली, "जाऊ दे ग. लग्न झाल्यावर हळूहळू वळतील सासूबाई. एवढं चांगलं स्थळ.." आणि बाबा पहिल्यांदा आईवर ओरडले, "चांगलं स्थळ म्हणजे काय असतं ग ? चार खोल्या आणि गाडी ? पोरीने सात वर्षं जे कमावलंय ते सोडायची अट घालणारं स्थळ चांगलं कसं ?" पण ओरडून झाल्यावर तेही गप्प बसले. गावात साखरपुडा मोडणं म्हणजे काय, हे त्यांनाही माहीत होतं.
मानसी त्या रात्री झोपली नाही. फिजिओथेरपिस्ट व्हायला तिने सात वर्षं दिली होती. शिक्षण, इंटर्नशिप, आणि मग गावातलं छोटं क्लिनिक. पहिल्या पेशंटला, पॅरालिसिसनंतर पहिलं पाऊल टाकणाऱ्या त्या आजोबांना बघून ती घरी येऊन रडली होती, आनंदाने. हे सगळं "लोक काय म्हणतील" च्या तराजूत टाकायचं?
आणि तरी, खरं सांगायचं तर, प्रश्न नोकरीचा नव्हताच. प्रश्न त्या खाली गेलेल्या नजरेचा होता.
दुसऱ्या दिवशी तिने निनादला एकट्याला भेटायला बोलावलं. कॉलेजजवळच्या टपरीवर, जिथे साखरपुड्याआधी दोघं भेटायचे.
दुसऱ्या दिवशी तिने निनादला एकट्याला भेटायला बोलावलं. कॉलेजजवळच्या टपरीवर, जिथे साखरपुड्याआधी दोघं भेटायचे.
"निनाद, एकच प्रश्न विचारते. आईंसमोर नाही, इथे, माझ्यासमोर. तुला काय वाटतं ? मी क्लिनिक बंद करावं ?"
"मानसी, तू समजून घे ना.. आई जुन्या वळणाची आहे. लग्न होऊ दे, मग हळूहळू मी तिला वळवीन.. वर्ष दोन वर्षं जाऊ दे.."
"म्हणजे तोवर मी क्लिनिक बंद ठेवायचं. आणि तुझ्या 'हळूहळू' ला मुहूर्त कधीचा ?" मानसीने त्याच्या डोळ्यांत बघितलं.
"निनाद, मला अट जड नाही रे. अटीच्या वेळी तुझं गप्प बसणं जड आहे. आज तू माझ्यासाठी आईसमोर एक वाक्य बोलू शकत नाहीस. उद्या संसारात हजार प्रसंग येतील. प्रत्येक वेळी मी एकटी असणार, हे आजच दिसतंय मला."
"म्हणजे तुला म्हणायचंय मी नेभळट आहे ?"
"मला म्हणायचंय, तू अजून फक्त मुलगा आहेस. नवरा व्हायला वेळ आहे." ती उठली. तिने बोटातली साखरपुड्याची अंगठी काढली आणि टेबलावर ठेवली. तिचा हात थरथरत होता, पण आवाज नाही. "माझ्याकडून लग्न मोडलं असं सांग सगळ्यांना. तुझ्यावर बोल नको यायला."
"मानसी, थांब.. अगं ऐकून तर घे.." निनाद उठला, पण त्याच्या आवाजात तिला थांबवण्याची ताकद नव्हती, विनवणीही अर्धवट होती. जणू आतून त्यालाही माहीत होतं, ती म्हणतेय ते खरं आहे.
ती वळली आणि चालायला लागली. मागून त्याने एकदाही हाक मारली नाही. या माणसावर आपण प्रेम केलं, या विचाराने पावलागणिक छातीत कळ येत होती, आणि तरी पावलं थांबली नाहीत.
पुढचे महिने वणव्यासारखे गेले. गावात चर्चा. "एवढं चांगलं स्थळ लाथाडलं." "नोकरीच्या माजाने मोडलं म्हणे." आईचे डोळे सतत ओले. बाबा गप्प गप्प. मानसीने उत्तर एकच ठेवलं. काम. सकाळी आठ ते रात्री आठ क्लिनिक. पेशंट वाढत गेले. दोन वर्षांनी तिने शेजारची जागा घेऊन क्लिनिक मोठं केलं. तिसऱ्या वर्षी हाताखाली दोन मुली ठेवल्या.
आणि साखरपुडा मोडून बरोबर तीन वर्षांनी, मैत्रिणीच्या लग्नात, अक्षता टाकून ती जेवणाच्या रांगेकडे वळली आणि जागीच थांबली.
समोर निनाद उभा होता.
तीन वर्षांत उतरलेला चेहरा, विरळ झालेले केस. आणि त्याच्या नजरेत तिला बघताच आलेली ती ओळखीची, खाली जाणारी सवय.
तीन वर्षांत उतरलेला चेहरा, विरळ झालेले केस. आणि त्याच्या नजरेत तिला बघताच आलेली ती ओळखीची, खाली जाणारी सवय.
"मानसी.." तो पुढे आला. "पाच मिनिटं.. फक्त पाच मिनिटं बोलायचंय."
क्रमशः
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
