लघुकथा लेखन स्पर्धा एप्रिल २०२६
विषय: उंबरठा ओलांडतांना.
शीर्षक: बंड.
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
" आई मला उशीर होत आहे. मी निघत आहे." असे म्हणून नीता कामावर निघून गेली.
" बाई, ह्या नीताला किती काम असतं ना. सारखी तिची धडपड चालूच असते." सासुबाई म्हणाल्या.
नीता ही घरातली मोठी सून होती, तसेच कमावती असल्यामुळे नेहमीच तिच्याकडे सासुबाईंचे झुकते माप असायचे.
सकाळी लवकर उठून सर्वकामे सुजाता म्हणजेच धाकट्या सुनेला करावी लागायची.
" एवढं सकाळपासूनच उठून काम करते, तरीसुद्धा तुला काम कसं लवकर आवरत नाही? " नेहमीप्रमाणे सासुबाईंनी आपल्या छोट्या सुनेकडे बघून टोमणा मारला.
त्याकडे दुर्लक्ष करत मोठ्या जावेच्या मुलांचे जेवणाचे डब्बे तिने त्यांच्याकडे सोपवले.
संध्याकाळ अजून झाली नव्हती आणि आज कधी नव्हे ते सुजाताचा नवरा अंकुश लवकर घरी आला होता.
" अहो, आज तुमची तब्येत तर ठीक आहे ना ? तुमचा चेहरा पण खूप उतरलेला दिसत आहे." सुजाताने विचारले.
" मला जरा चहा दे. मी थोडावेळ आराम करत आहे. मला कोणी सुद्धा आवाज देऊ नका." तो म्हणाला.
नक्कीच काहीतरी ऑफिसमध्ये बिनसले असेल,असा विचार करून सुजाताने चहा देऊन झाल्यावर ती आपल्या कामाला लागली.
संध्याकाळी दाराची बेल वाजली आणि बिल्डिंगमधल्याच एक काकू घरी आल्या होत्या.
" हो, ठीक आहे. मी माझ्या मोठ्या सुनेला नक्की पाठवते. काय आहे ना छोट्या सुनेला घराच्या बाहेर जायला जास्त आवडत नाही, त्यामुळे तिला सांगून काही फायदा नाही." असं सासुबाईंनी सांगितलेले सुजाताच्या कानावर आले.
हे नेहमीच झाले होते. कुठे काही कार्यक्रम असेल जसे की हळदीकुंकू किंवा घरातील सवाष्णीला जेव्हा आमंत्रण दिले जायचे, तेव्हा सगळीकडेच मोठ्या सुनेलाच मान दिला जायचा. तसेच आपली लहान सून फक्त घरातील काम करते, हे कदाचित सांगण्यामध्ये त्यांना कमीपणा वाटायचा.
कधी सुजाताने सुद्धा पुढे होऊन त्याबद्दल बोलणे योग्य समजले नव्हते, परंतु नेहमीच तिला वाईट वाटायचे की आपण एवढं सगळं घरासाठी करून सुद्धा आपली काही किंमतच त्या घरामध्ये नाही, असे तिला हळूहळू प्रकर्षाने जाणवत होते.
" आई, मला भूक लागली आहे." सुजाताचा चार वर्षाचा मुलगा तिच्याजवळ येऊन म्हणाला.
" हो, बाळा. मी तुला जेवण देते." तिने आपल्या बाळाला ताटामध्ये जेवण दिले होते.
तिचा मुलगा आपल्या हातानेच जेवण जेवत होता. कारण बाकीच्या सवयी लहानपणापासूनच लावणे गरजेचे आहे, असे सुजाताला वाटत होते. नाहीतर त्यावरून सुद्धा टोमणे मारायला सासुबाई मागे पुढे पाहणार नाहीत, हेही ती चांगलेच जाणून होती.
" हा, बोला तुम्हाला काही म्हणायचे होते का ?"
मघाशी जेवण झाल्यावर आपल्या बायकोशी काही बोलायचं आहे, त्यामुळे लवकर काम आटपून आपल्या खोलीमध्ये यायला अंकुशने सुजाताला सांगितले होते.
मघाशी जेवण झाल्यावर आपल्या बायकोशी काही बोलायचं आहे, त्यामुळे लवकर काम आटपून आपल्या खोलीमध्ये यायला अंकुशने सुजाताला सांगितले होते.
" हे बघ, आज माझी नोकरी गेली आहे." अंकुशने जे खरे होते ते सांगितले.
" हे सर्व कसं काय झाले ? आणि आता पुढे काय करायचं?" तिने विचारले.
" मला काहीच समजत नाहीये. जोपर्यंत दुसरी नोकरी मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला आपला खर्च थोडा कमी करावा लागेल." त्याने सांगितलं.
" ते सर्व ठीक आहे, पण याच वर्षी आपल्या मुलाला शाळेमध्ये प्रवेश घ्यावा लागणार आहे आणि त्यासाठी पैसे सुद्धा भरावे लागणार आहेत. मग ते सर्व कसे होईल?" ती पटकन म्हणाली.
" हे बघ, मी काही चुकीचं केलं म्हणून मला नोकरीवरून काढलेले नाहीये. आमची कंपनी आता लवकरच बंद होणार आहे आणि त्यामुळे हळूहळू करून सर्व लोकांना नोकरीवरून काढत आहेत. मी तरी काय करू ?" वैतागत तो म्हणाला.
पूर्ण घर झोपले होते, परंतु सुजाता आणि तिचा नवरा मात्र रात्री झोपलेच नव्हते.
' जर मला आधी नोकरी करायला परवानगी दिली असती तर आज असा विचार करायची गरज पडली नसती ', असे सुजाता मनोमन विचार करत होती.
दुसऱ्या दिवशी अंकुशने घरामध्ये त्याची नोकरी गेल्याचे सांगितले. सर्वांना वाईट सुद्धा वाटले आणि आता त्याच्या कुटुंबाचा खर्च कोण उचलणार, हा सुद्धा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता.
सुजाताने आपल्या मैत्रिणीला फोन केला होता.तिच्याशी सविस्तर बोलल्यावर, तिने एक निर्णय घेण्याचा विचार केला.
अंकुशची नोकरी जाऊन आता जवळजवळ एक महिना झाला होता आणि नोकरी गेल्यामुळे त्याला घरामध्ये वागणूक सुद्धा वेगळी मिळत होती. हे दोघा नवरा बायकोला सुद्धा समजून येत होते, पण गप्प राहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता.
" सुजाता, थोडं लवकर काम करायचे ना; तुला कळत कसं नाहीये." नीता मुद्दामूनच वेळ असूनही आपल्या धाकट्या जावेला टोमणा मारायची एक संधी सोडत नव्हती.
" नाहीतर काय, एक तर आता अंकुशची नोकरी गेली आणि हिने जरा अजून घरामध्ये नीट लक्ष द्यायचं ना. का दुसऱ्यांची सुद्धा नोकरी जायला हवी, असे तिला वाटत आहे ? " सासुबाईंनी लगेच तोंडसुख घेतले.
आजचे झालेले बोलणे सुजाताच्या मनाला खूपच लागले , मग तिने विचार करत मनाशी काहीतरी पक्के ठरवून टाकले.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तिने घरातले सर्व काम आवरले आणि नीता कामाला जाण्याआधीच ती घराच्या बाहेर पडली.
सर्व हातात मिळणाऱ्या गोष्टी वेळेत न मिळाल्यामुळे नीता आणि तिच्या नवऱ्याची तसेच सासु-सासऱ्यांची सुद्धा तारांबळ उडालेली होती.
" अरे अंकुश, तुझी बायको कुठे गेली आहे ? सकाळपासून दिसत नाही आणि तुलाही माहीत नाही, असं कसं होईल ?" अंकुशच्या आईने अंकुशला विचारले.
" तसे तर ती काम कुठे व्यवस्थित करते, असेच तुम्ही सर्वजण म्हणता ना, मग तिचा इथे असण्याचा किंवा नसण्याचा तुम्हाला काय फरक पडतो?" असे म्हणून अंकुश घरातून निघून गेला.
" आई, ह्याची नोकरी गेली तर आम्ही समजून घेतोय, तर हा आपल्याच जास्त बोलतोय. जरा त्याला समजवा." नीताचा नवरा म्हणजेच सासुबाईंचा मोठा मुलगा म्हणाला.
" नाहीतर काय, आजकाल खर्च किती झाला आहे आणि भाऊजींना आंही सांभाळून घेतो तर हे आम्हालाच बोलून दाखवत आहेत. " असे म्हणून नीता आपला डबा उचलून तिथून निघून गेली.
संध्याकाळी सहा नंतर सुजाता घरी आली.
" शेवटी एवढ्या सकाळी बाहेर पडून आणि फिरून घर सापडले वाटतं!" तिने घरात पाऊल टाकताच सासुबाईंनी बोलायला सुरुवात केली.
बाहेरून कोणी आल्यावर प्रत्येकाला आपण पाणी देतो, परंतु जेव्हा आपण बाहेरून आल्यावर आपल्याला पाणी देणार कोणीच नाही; हे बघून थोडसं तिला वाईट वाटले, पण एकदा आता आपण ही गोष्ट ठरवलेली आहे तर मागे हटणे नाही; असा विचार करून हातपाय धुऊन झाल्यावर सुजाताने लगेच रात्रीचा स्वयंपाक करायला सुरुवात केली.
" काय रे, तुला एवढे सुद्धा येत नाही का ? आणि किती वेळा तुला त्याच त्याच गोष्टी सांगायच्या?" रागाने नीताने आपल्या मुलावर हात उगारला.
नीताचा मुलगा रडतच," काकी sss" बोलत सुजाताकडे धावत गेला.
सुजाताने त्याला जवळ घेऊन त्याचा पूर्ण अभ्यास नीट करून घेतला.
" सुजाता, थांब मला तुझ्याशी बोलायचं आहे. तू सकाळी कुठे निघून गेली होतीस? आणि संध्याकाळी एवढ्या उशिरा आली होतीस. तुझं नेमकं काय चालू आहे?" सासुबाईंची संशयी नजर सुजाताने ओळखली होती.
" मी आजपासून कामाला जात आहे. जवळच असणाऱ्या एका पतपेढीमध्ये मला नोकरी मिळाली आहे, तसेच त्यानंतर मी काही मुलांचे शिकवणीचे तास सुद्धा घेत आहे." ती म्हणाली.
" अगं, पण तू हे सर्व कोणाला विचारून केलेस ?" नीताने त्यांचे बोलणे ऐकले होते, म्हणून ती पुढे येऊन रागात विचारत होती.
" माझ्या नवऱ्याला मी काय करते, त्याबद्दल माहीत आहे आणि तसेच मी आज सर्व काम करून गेले होते; पण हा उद्यापासून सकाळचा नाहीतर रात्रीचा कोणता तरी एक वेळचा स्वयंपाक हा तुम्ही करायचा थोरल्या जाऊबाई. तसेच आई तुम्ही सुद्धा घरामध्ये मदत केली तर बरच होईल." ती म्हणाली.
तिचे बदललेले रूप बघून सर्वजण आश्चर्यचकित झाले.
" अगं, पण मग घरातले बाकीचे काम कोण करणार?" पुन्हा प्रश्न तिच्यापुढे सासुबाईंनी उभा केला.
" हे बघा, यांची नोकरी गेली आहे. यांची नोकरी लागत नाही तोपर्यंत तरी मला नोकरी करणे गरजेचे आहे. कारण यावर्षी आमचा मुलगा सुद्धा शाळेमध्ये जाईल आणि त्यासाठी फी जास्त असल्याने मला आता नोकरी करण्याशिवाय पर्याय नाहीये. तसेच जरी यांना पुढे नोकरी लागली, तरी सुद्धा मी नोकरी सोडणार नाही. मला उशीर होतो आणि झोप आली आहे. मी झोपायला जाते." असे म्हणून त्यांचे पुढचं न ऐकता ती तिथून निघून गेली.
सुजाताने खूप विचार केला होता की नोकरी असणे किती गरजेचे असते, त्याशिवाय आपली किंमत कोणाला कळत नाही. तसेच ज्यावेळेस आपल्या नवऱ्याला भावनिक आधाराची गरज होती, आपण त्यांना ती केली. आता आर्थिक आधाराची सुद्धा गरज असल्यामुळे आपण काही करू शकतो का, याचा तिने विचार केला.
आधी तर कोणताच अनुभव नसल्यामुळे तिला थोडीशी भीती वाटली, परंतु तिची जिद्द आणि चिकाटी यामुळे नोकरीचा शोध घेताना तिला दोन ठिकाणी काम करण्यास मिळाले. तसेच आपला मुलगा सुद्धा त्याच्या वयानुसार इतर मुलांप्रमाणे ह्याच वर्षी शाळेमध्ये जाणार, याचे तिला समाधान वाटले. बंड पुकारताना थोडी हिंमत तिने दाखवली होती, त्यामुळे आधी जरी सर्वजण बोलत असले तरी नंतर तिने त्यांना बोलायला जागा ठेवली नव्हती.
सुजाताने घरचा उंबरठा ओलांडतांना खूप विचार केला, परंतु तो उंबरठा ओलांडणे गरजेचे आहे, हे सुद्धा तिने जाणले; म्हणून थोडेसे बंड पुकारून तिने आपल्या संसारासाठी बाहेर पडण्याचा विचार केला तसेच यात तिच्या नवऱ्याने सुद्धा तिला साथ दिली.
समाप्त.
© विद्या कुंभार
कथा आवडल्यास लाईक करून तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा.
(सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.)
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
