विषय:- ऐतिहासिक कथा
शीर्षक:- राणी चेन्नम्मा
बेदनूरच्या राजवाड्यात त्या दिवशी शांतता होती. अचानक दूताने आणलेले पत्र राणी चेन्नम्माच्या हातात पडले. पत्रावरील औरंगजेबाची मोहर पाहताच दरबारातील वातावरण गंभीर झाले.
"राजाराम आपके रियासत में होना ये हमारी मर्जी के खिलाफ हैं। इस ख़त के मिलते ही आप को राजाराम को अब्दुल्ला ख़ान के हाथों में सौंपना होगा, ये हमारा हुक्म हैं।" बादशाह औरंगजेबाने बेदनूरची राणी चेन्नम्माला धमकीवजा पत्र पाठविले.
पण राणी या धमकीवजा पत्राला अजिबात घाबरली नाही. त्या उलट ती त्या पत्राला न जुमानता तिने अत्यंत चातुर्याने आणि स्पष्टपणे उत्तर दिले,"राजाराम महाराज आमच्या राज्यातून जात असताना आमच्या सैन्याने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला; पण ते काही आमच्या हाती लागले नाहीत. पण त्यांचा काही मुद्देमाल, कपडे आणि दागिने मात्र आमच्या हाती लागले आहेत, ते आम्ही आपणास पाठवून देत आहोत."
तिच्या या उत्तराने औरंगजेबाचे समाधान झाले नाही. त्याला जेव्हा सत्य कळले तेव्हा त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिचे राज्य उद्ध्वस्त करण्याची आज्ञा देऊन त्याने त्याच्या खास तीन सरदारांना तिच्या राज्यावर हल्ला चढायला पाठवून दिले.
राणी चेन्नम्मा ही केळदीच्या बेदनूरची राणी होती. पतीच्या निधनानंतर तिचं राज्य चालवत होती.
स्वराज्याच्या व शिवाजी महाराजांच्या घडामोडी सतत राणीच्या कानी ऐकू येत होत्या. इसवी सन १६७५ मध्ये राणी चेन्नम्मा आणि शिवाजी महाराज यांच्यात एक मैत्रीचा करार झाला होता. त्या अंतर्गत पोर्तुगीज आणि आदिलशहापासून केळदी संस्थानाला त्यांनी संरक्षण दिलं होतं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी मुघलांनी इसवी सन १६८६ मध्ये विजापूर तसेच इसवी सन १६८९ गोवळकोंडा घेतलं.
औरंगजेबाच्या अनन्वित छळालाही न झुकणाऱ्या छावा छत्रपती संभाजी महाराजांना इसवी सन ११ मार्च १६८९ रोजी वीर मरण आले.
यावेळी आता राजाराम महाराज हे त्याचे पुढचे भक्ष्य होते. त्यांना ठार मारले की मराठा राज्य धाराशयी पडेल आणि ते राज्य काबीज करणे हे औरंगजेबाचे मनसुबे होते. त्या दृष्टीने त्याने त्याच्या सैन्याला रायगडाला कडक वेढा द्यायला सांगितले.
पण तेवढ्या कडक वेढ्यातूनही राजाराम आपल्या विश्वासू सरदारांच्या मदतीने तेथून औरंगजेबाच्या सैन्याच्या हाती तुरी देऊन निसटून गेले. त्यांनी दक्षिणेकडे कूच केली. त्यांनी तामिळनाडूमधील जिंजीचा अभेद्य किल्ल्याकडे प्रयाण केले. पण तिथे पोहोचण्या आधीच मुघलांच्या प्रदेशातून हजारो मैल जाणे अत्यंत धोकादायक होतं. म्हणून त्यांनी विचार करून वेश बदलून जाण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी लिंगायत साधूचा वेश धारण करून आपली वाटचाल जिंजीकडे सुरू केली. एक दिवस ते राणी चेन्नम्माची राजधानी बेदनूरमध्ये येऊन पोहोचले.
राणी चेन्नम्मा नित्यनेमाने सकाळी साधूंना अन्नदान करत असे. एके दिवशी अन्नदान करताना तिच्या लक्षात आले की समोरचे साधू हे साधू वाटत नाहीत, कोणी राजेशाही वाटतात. तिच्या नयनांनी ते अचूक टिपले. तिने त्यांची चौकशी केली.
"माफ करावे, महाराज. आपण कोणी साधू वाटत नाहीत." राणीने शांतपणे महाराजांच्या डोळ्यांत पाहत विचारले.
"बरोबर ओळखलेत आपण. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे कनिष्ठ पुत्र राजाराम आहोत," असे म्हणत राजाराम महाराजांनी सगळ्या परिस्थितीची कल्पना राणीला दिली.
राणीने सगळं काही ऐकून घेतले आणि क्षणभर तिने मनात विचार केला,"औरंगजेबाचा कोप ओढवून घेणे म्हणजे संकटाला आमंत्रण देणे होईल; पण शिवाजी महाराजांनी आपल्यावर केलेले उपकार ही आपल्याला विसरता येणार नाहीत. स्वराज्याच्या रक्षणासाठी घेतलेला धोका आपल्याला मान्य आहे."
तिने त्यांना आश्वस्त केले. त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आश्रय दिला. त्यांना अतिशय आदराची वागणूक दिली. तिला माहिती होतं की जर औरंगजेबला ही बातमी कळली तर तो तिच्या राज्यावर हल्ला करायलाही मागेपुढे पाहणार नाही. तरी तिने जोखीम घेऊन त्यांना आश्रय दिला. एकप्रकारे तिने शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर केलेली उपकराची परतफेड केली असे म्हणावे लागेल. असे करायलाही किती मोठे धाडस लागते ते तिने केले.
तिचे राज्य नेस्तनाबूत करण्यासाठी औरंगजेबाने आपल्या तीन विश्वासू सरदारांना आणि प्रचंड सैन्यांची फौज बेदनूरला रवाना केले.
"उस राणी को अच्छी तरह से सबक सीखा के आओ!" औरंगजेब रागाने थंड नजरेने त्यांना जाताना म्हणाला होता.
पण आपल्या महाराजांना आश्रय दिलेल्या राणीवर महाराजांमुळे मोठे संकट आले. हे महाराजांच्या अमत्यांना कळले.
"संताजी, आपल्या राजेंमुळे राणीचे राज्य धोक्यात आहे. त्यांना मदतीचा हात द्या." असे म्हणत अमात्यांनी शूरवीर संताजी घोरपडे यांना तिच्या मदतीसाठी पाठविले. संताजींनी मुघलांच्या सैन्याला कर्नाटकच्या सरहद्दीवरच गाठलं.
तिथे निकरीची लढाई सुरू झाली. त्यांच्या येण्याने राणी चेन्नम्माला धीर पोहोचला.
"राजेंची सैन्याची तुकडी आणि शूर सरदार संताची आपल्या सोबत आहेत. तर मुघलांच्या सैन्याला धूळ चारून पळवून लावू. चला, हर हर महादेव!" अशी गर्जना करत तीही तिच्या सैन्याच्या तुकडीसह लढाईत सामील झाली. त्यामुळे मुघलांची पिछेहाट झाली. त्यांचा सरदार जाननिसारसिंग हा जखमी झाला. तथापि औरंगजेबाच्या आज्ञेनुसार उरलेलं सैन्य बेदनूरकडे वळले.
तो प्रदेश घनदाट जंगलांनी भरलेला होता. त्यात मुघल सैन्य बिथरून गेलं आणि अनेक ठिकाणी ते दलदलीत फसलं. जंगलात मुघल सेना पिचून निघाली. त्यात राणीच्या सैन्याने गनिमी काव्याने मुघल सैन्याला सळो की पळो करून सोडले.
अशा प्रकारच्या छुप्या हल्ल्याने मुघल सैन्य त्रस्त झाली. राणीच्या सैन्यानं मुघलांना डोंगर दऱ्यात गाठून अक्षरशः चिरडून टाकलं. अखेरीस औरंगजेबाने माघार घेतली.
राणी आणि औरंगजेब यांच्यामध्ये शांततेचा तह झाला. राणीकडून थोडी खंडणी आणि सीमेकडील काही छोटे किल्ले घेऊन औरंगजेबाने आपले सैन्य जिंजीकडे वळवले.
राणी चेन्नम्मामुळे राजाराम महाराज हाती लागले नाहीत. शिवाय मुघल सैन्याला माघार घ्यावी लागली, हे औरंगजेबाचे मोठे अपयश होते.
राणी चेन्नम्मामुळे राजाराम महाराज सुखरूप जिंजीच्या दिशेने पोहोचू शकले. तिथे पोहोचल्यावर त्यांनी तिला आभार पत्र पाठविले. तिच्या या धाडसी निर्णयाने केवळ एका राजाचे प्राण वाचले नाहीत, तर स्वराज्याची ज्योतही तेवत ठेवली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या विचारांची व्याप्ती महाराष्ट्रापुरती मर्यादित नव्हती, तर ती दूरवर पसरली होती, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे राणी चेन्नम्माची ही मदत. तिच्या शौर्य, दूरदृष्टी आणि कर्तव्यनिष्ठेला इतिहास सदैव स्मरणात ठेवेल.
समाप्त:-
