राखीचा बॉक्स - भाग -1
आज रक्षाबंधन होतं, दरवर्षी रक्षाबंधनला सकाळपासूनचं साठे कुटुंबात वेगळीच लगबग असायची, पण यंदा घर शांत शांत होतं.
रोहन हॉलमधल्या सोफ्यावर बसला होता,स्वयंपाकघरात आईने शिरा केला होता,श्रुतीला शिरा खूप आवडायचा, पण यंदा शिरा तसाच कढईत होता.
श्रुतीचं लग्न होऊन तीन वर्षं झाली होती, ती पुण्याला सासरी गेली होती, लग्नानंतर पहिल्या वर्षी ती मुद्दाम रक्षाबंधनाला आली होती, दुसऱ्या वर्षी तिची तब्येत बरी नव्हती म्हणून येऊ शकली नाही, पण रोहन पुण्याला गेला होता.
यंदा मात्र दोघांनांही जमलं नाही, श्रुतीच्या सासऱ्यांचं ऑपरेशन होतं, त्यामुळे श्रुतीला सासरहून निघणं शक्य नव्हतं, आणी रोहनच्या ऑफिसमध्ये प्रोजेक्टची डेडलाईन होती,त्यामुळे त्याला सुट्टी मिळाली नाही.
सकाळी दोघांचं बहीण, भावाचं व्हिडिओ कॉलवर बोलणं झालं होतं, श्रुतीने स्क्रीनवरूनच हात दाखवला, "बघ, मी राखी आणून ठेवलीय, तू आल्यावर बांधेन."
रोहननेही हसून "हो" म्हटलं, पण फोन ठेवल्यावर दोघांच्याही मनात एक पोकळी राहिली,रक्षाबंधन म्हणजे स्क्रीनवर नाही, ते समोरासमोर असतं.
रोहन फोन ठेवल्यावर उठला आणि आपल्या खोलीत गेला, त्यानें कपाट उघडलं, सगळ्यात खालच्या कप्प्यात, पुस्तकांच्या मागे एक छोटा प्लास्टिकचा डबा होता, त्यावर "श्रुतीच्या राख्या" असं मार्करने लिहिलेलं होतं.
अक्षर आईचं होतं, त्यानें तो डबा बाहेर काढला आणि डबा घेऊन हॉलमध्ये आला, टेबलवर डब्बा ठेवला.
आई ते बघून एकदम भावुक झाली, तिच्या डोळ्यात एकदम पाणी आलं.
रोहनने हळूच डब्याचं झाकण उघडलं, आतमध्ये आठ-दहा राख्या होत्या, काहींचे धागे फिकट झाले होते, काहींचे मणी तुटलेे होते, काहींवरचं स्पायडरमॅन, छोटा भीमचं स्टिकर अर्धवट निघालं होतं....पण प्रत्येक राखी जिवंत होती, प्रत्येक राखीमागे एक वर्ष होतं, एक वय होतं, एक भांडण होतं.
रोहननें पहिली राखी उचलली, अगदी छोटी, लाल धाग्याची, मध्ये एक प्लास्टिकचं फुल.
पहिली राखी... वय असेल पाच-सहा वर्षांचं.
श्रुती तेव्हा तीन वर्षांची असेल, तिला राखी म्हणजे काय कळतही नव्हतं, आईने तिच्या हातात राखी दिली आणि सांगितलं, "दादाला बांध." तिने उलट्या हाताने रोहनच्या मनगटावर ती गुंडाळली, आणि वरून फेविकॉल लावल्यासारखी दाबून धरली. रोहन रडायला लागला, "आई, ती टोचतेय!"
श्रुतीला वाटलं दादा रडतोय म्हणजे आपलं काहितरी चुकलं म्हणून तीही रडायला लागली, शेवटी बाबांनी दोघांनाही एका हातात उचलून घेतलं आणि फोटो काढला, त्या फोटोत दोघांच्याही डोळ्यात पाणी आणि हातात ती वेडीवाकडी राखी.
रोहनला हसू आलं, त्याने ती राखी बाजूला ठेवली.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - श्रुती रक्षाबंधनाला नं आल्यामुळे रोहन दुखावला गेला होता.)
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
