रकाना.. -1
अवनीने शाळेचा फॉर्म टेबलावर ठेवला, पेन उचललं, आणि "वडिलांचे नाव" या रकान्यापाशी तिचा हात थांबला. बराच वेळ. मग तिने तो रकाना तसाच रिकामा ठेवून खालचं सगळं भरलं आणि फॉर्म दप्तरात कोंबला.
जयश्रीने हे किचनच्या दारातून बघितलं. ती काही बोलली नाही. रात्री दप्तर आवरताना तिने तो फॉर्म काढून बघितला, आणि तो रिकामा रकाना तिला दिवसभर छळत राहिला. लेकीला विचारावं का ? विचारलं तर ती "काही नाही आई" म्हणेल, हे तिला माहीत होतं. पाच वर्षं दोघींनी एकमेकींना "काही नाही" म्हणण्याची सवय लावून घेतली होती. गेल्या सात महिन्यांत तिने बोलणं कमीच केलं होतं. बोलून प्रश्न सुटत नव्हते.
सात महिन्यांपूर्वी तिचं दुसरं लग्न झालं होतं. विक्रमशी. अवनीचे बाबा अपघातात गेले तेव्हा अवनी सात वर्षांची होती. पाच वर्षं जयश्रीने एकटीने काढली. मग घरच्यांचा आग्रह, विक्रमचं स्थळ. शांत माणूस, स्वतःचं छोटं प्रिंटिंग युनिट, पहिली बायको आजारपणात गेलेली, मूल नाही.
त्याने पहिल्या भेटीतच म्हटलं होतं, "अवनीला मी बाबा म्हणायला लावणार नाही. ती म्हणेल तेव्हा म्हणेल." जयश्रीला ते वाक्य आवडलं होतं. लग्न झालं.
सुहास गेला तेव्हा अवनी सात वर्षांची होती. बाबांची स्कूटर, बाबांची सायकल शिकवायची पद्धत,
.. सगळं तिच्या डोक्यात करकरीत होतं. पाच वर्षं ती आणि आई. दोघींचं घर. आणि मग त्या घरात तिसरा माणूस आला.
.. सगळं तिच्या डोक्यात करकरीत होतं. पाच वर्षं ती आणि आई. दोघींचं घर. आणि मग त्या घरात तिसरा माणूस आला.
अवनीला विचारलं गेलं होतं, "आईने लग्न केलं तर चालेल ?" तिने "हो" म्हटलं होतं. आईला एकटं बघणं तिलाही नको होतं. पण "हो" म्हणणं आणि रोज सकाळी नाश्त्याच्या टेबलावर एक नवीन माणूस बघणं, यात फरक होता.
अवनी बारा वर्षांची. सातवीत. ती विक्रमला "काका" म्हणायची. रागाने नाही. फक्त तेवढंच अंतर ठेवून. विक्रम तिला शाळेत सोडायचा, ती "थँक्यू काका" म्हणून उतरायची. तो तिच्यासाठी पुस्तकं आणायचा, ती "थँक्यू काका" म्हणून घ्यायची. सगळं व्यवस्थित, आणि सगळं परकं.
सकाळचा नाश्ता म्हणजे रोजची परीक्षा. विक्रम विचारायचा, "आज काय आहे शाळेत ?" अवनी म्हणायची, "काही नाही." "गणिताचा पेपर कसा गेला ?" "ठीक." जयश्री मधे बोलायला जायची, "अवनी, नीट सांग ना.." आणि विक्रम तिला थांबवायचा, "जाऊ दे. ती बोलते ना, तेवढं पुरे. न बोलणारी मुलं जास्त कठीण असतात."
एकदा शाळेत मैत्रिणीने विचारलं, "तुला घ्यायला येतात ते तुझे बाबा ना ?" अवनीने क्षणभर विचार केला आणि म्हणाली, "आईचे मिस्टर." मैत्रीण गोंधळली, आणि अवनीला स्वतःच्याच उत्तराचं वाईट वाटलं, पण ती ते मागे घेऊ शकली नाही. विक्रम गेटबाहेर उभा होता, त्याने ऐकलं होतं की नाही, तिला कळलं नाही. त्याने काही दाखवलं नाही.
एका रात्री जयश्रीने विषय काढला. "अवनी, विक्रम काकांना.. म्हणजे.. एकदा तरी बाबा म्हणून बघ ना. त्यांना बरं वाटेल."
अवनी जेवत होती. तिने घास संपवला आणि शांतपणे म्हणाली, "आई, बाबा एकच असतात. ते गेले. मी काकांना काका म्हणते, वाईट वागत नाही. एवढं पुरे ना ?"
जयश्रीने पुढे काही म्हटलं नाही. पण त्या रात्री विक्रमला ती म्हणाली, "मला वाटतं तुम्ही एकदा बोला तिच्याशी. स्पष्ट."
"बोलणार नाही." विक्रम म्हणाला. "जयश्री, बाबा ही पदवी मागून मिळत नाही. मिळाली तर मिळेल. नाही मिळाली तर मी काका म्हणून पूर्ण करीन जे करायचं ते."
आणि मग ते फॉर्मचं प्रकरण झालं.
चार दिवसांनी दुपारी घरचा फोन वाजला. जयश्री बाहेर गेली होती. विक्रमने उचलला.
"हॅलो, अवनी कदमच्या घरून ना ? मी तिच्या वर्गशिक्षिका, माने बाई बोलतेय. जरा बोलायचं होतं. पालक आहात का तुम्ही ?"
"हो.. म्हणजे.. मी तिचा.." विक्रम अडखळला. "मी तिच्या आईचा नवरा आहे. बोला."
"हॅलो, अवनी कदमच्या घरून ना ? मी तिच्या वर्गशिक्षिका, माने बाई बोलतेय. जरा बोलायचं होतं. पालक आहात का तुम्ही ?"
"हो.. म्हणजे.. मी तिचा.." विक्रम अडखळला. "मी तिच्या आईचा नवरा आहे. बोला."
"बरं." पलीकडे क्षणभर शांतता. "अवनीने वार्षिक माहितीचा फॉर्म भरून दिलाय. त्यात वडिलांच्या नावाचा रकाना रिकामा आहे. आम्हाला माहितीये तिचे वडील गेलेत. पण फॉर्मवर 'पालक' म्हणून कुणाचं तरी नाव लागतं. आणि.." बाईंचा आवाज हळू झाला. "त्या रिकाम्या रकान्याखाली तिने स्वतःच्या अक्षरात एक ओळ लिहिलीये. मी ती तुम्हाला फोनवर वाचून दाखवावी की तुम्ही येऊन बघाल ?"
विक्रमचा हात फोनवर घट्ट झाला. जयश्री घरी नव्हती, हे बरं की वाईट, ते त्याला कळेना. काय लिहिलं असेल तिने ? "माझे बाबा गेले. आता कुणी नाही ?" की काही वाईट ? त्याने डोळे मिटले.
"वाचा," तो म्हणाला.
बाईंनी वाचलं. आणि विक्रम बराच वेळ फोन कानाला लावून उभा राहिला, बाई "हॅलो, ऐकताय ना ?" म्हणेपर्यंत.
