एक काळ असा होता की आमच्या कडे रेडिओ नव्हता,कारण वीजच नव्हती.आमच्या समोरच्या चाळीतल्या एकाकडे मात्र तो होता. नाहीतर आमच्या घरी सगळे रॉकेलचे दिवे असायचे.त्यांना आम्ही चिमणी, भुत्या, कलेक्टर असं म्हणायचो. चिमणी म्हणजे अतिशय लहान काचेचा दिवा. भुत्या म्हणजे एखाद्या बाटलीत चिमणीसारखं नळी असलेलं बुंठण ज्यातून वात बाहेर यायची. वरती काचबीच कुछ नहीं. तो उजेड कमी आणि धूर जास्ती करायचा. कलेक्टर म्हणजे दोन पत्र्याचे पट्टे कमरेला असायचे,म्हणजे वरचा वातीचा भाग घट्ट धरला जायचा. आणि उचलायला एका कडेला हॅंडल. कंदीलही होते. माझ्या भावाचा इंजिनिअरींगचा डिग्री पर्यंतचा अभ्यास तिथेच झाला. असो अशा प्रकारच्या जागेत रेडिओ असणं कठीणच नाही का ?
ग़ंमत म्हणजे समोरच्या चाळीत रेडिओ होता,तेही ओळखीचे होते.रेडिओवर त्यावेळी सकाळी सहा वाजता मंगलप्रभात हा भक्तीगीतांचा कार्यक्रम व दुपारी अकरा वाजता कामगार सभा, आणि आजकालच्या मालिकांसारखा श्रुतिका म्हणून रात्री कार्यक्रम असायचा.श्रुतिका म्हणजे ऐकायला येते ती . त्यात मालिकेसारखेच लोकं काम करीत. उत्तम आवाजाने संवाद जिवंत करीत.त्यावेळी नीलम प्रभू या निवेदिका गोड आवाजासाठी फार प्रसिद्ध होत्या.शिवाय हिंदी विविध भारती कार्यक्रमात फिल्मी गाणीही ऐकायला मिळायची, शिवाय बातम्या होत्याच. पण आम्हाला रेडिओवरची गाणी ऐकायला येतायत,असं दिसल्यावर ते आवाज कमी करायचे. मनुष्य स्वभाव,दुसरं काय? मग काळ बदलला, भावा बहिणींना नोकऱ्या लागल्या. नवीन जागा घेतल्या गेल्या. जिथे वीज असल्याचं अप्रूप वाटायचं. लोकांनाही अभिमानाने तसं सांगायचो. तेव्हा रेडिओ जाऊन ट्रान्झिस्टरचा जमाना आला. मग अवाढव्य रेडिओ मागे पडले.तरीही रेडिओ आणि त्यावरील कार्यक्रम याबद्दल आकर्षण अजूनही कायम आहे.
पण आता टीव्ही मुळे बराच फरक पडला आहे. कारण आता फक्त ऐकू येत नाही तर समोर गाणारा आणि भूमिका करणारा नाही दिसतो. टीव्ही मुळे ट्रान्झिस्टर, रेकॉर्ड प्लेअर , डीव्हीडी प्लेअर सगळेच मागे पडले. तसंच चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात जाण्याची गरजच पडत नाही. तरीसुध्दा मोठा पडदा आणि छोटा पडदा यात बराच फरक आहे. आता टीव्हीच्या पुढची स्टेज म्हणजे मोबाईल. त्यामुळे टीव्ही जणू खिशातूनच घेऊन जाता येतो. रेडिओला पूर्वी लायसन्स फी भरावी लागायची, आता टीव्ही वर कार्यक्रम पाहण्यासाठी केबलवाला नाहीतर नेटफ्लिक्स सारख्या कंपन्यांना पैसे भरावे लागतात. एकूण एकच .घास सरळ घेतला काय नाहीतर गळ्याभोवतालून घेतला काय तोंडातच जाणार.
अरुण कोर्डे ठाणे पश्चिम
©®
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
