Login

रायबागन

ऐतिहासिक कथा
लघुकथा स्पर्धा मे-जून 2026

ऐतिहासिक कथा


रायबागन


रात्रीचा पहिला प्रहर सरत चालला होता.
सावित्रीबाई आपल्या महालात अस्वस्थपणे येरझाऱ्या घालीत होत्या.

तेवढ्यात त्यांचे सुपुत्र जगजीवनराम आल्याची वर्दी त्यांना मिळाली आणि पाठोपाठ ते महालात प्रवेश करते झाले.

"प्रणाम आईसाहेब," सावित्रीबाईंचे चरणस्पर्श करीत ते उद्गारले.

"यशवंत व्हा, किर्तीवंत व्हा," आशीर्वाद देताना सावित्रीबाई त्यांच्याजवळची वार्ता ऐकण्यास उत्सुक होत्या.

"आईसाहेब, आपले अनुमान खरे आहे, हरचंदराय आपल्यावर हल्ला करण्याची योजना बनवितो आहे अशी खबर नुकतीच हेरांनी आणली आहे, पण आपणही कमी नाही हे दाखवून देऊ त्याला," शौर्याने बाहू फुरफुरवत जगजीवनराम म्हणाला.

"आपण शौर्यात कमी नाहीच आहोत पण आपल्याकडे सैन्य कमी आहे हे ही विसरून चालणार नाही," सावित्रीबाई विचारपूर्वक बोलत होत्या.

क्षणभर थांबून विचार करून त्या म्हणाल्या, "जगजीवनराम तुम्ही ताबडतोब पातशहा औरंगजेबांना खलिता पाठवून परिस्थिती सांगा आणि जादा कुमक मागवून घ्या. सध्यातरी याशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही. सैन्य मिळाले तर हरचंदरायासी आपण रोखू शकू."

"जी आईसाहेब, हाच मार्ग योग्य राहील. सकाळच्या प्रहरी खलिता रवाना होईल याची व्यवस्था करतो, आज्ञा द्यावी," सावित्रीबाईस नमस्कार करीत जगजीवनराम निघून गेले.

रात्र चढत चालली होती पण सावित्रीबाईंच्या डोळ्यास डोळा लागत नव्हता. गवाक्षातून खाली बघताना अंधारात बुडालेलं माहूर गाव शांततेची चादर ओढून झोपी गेलेलं दिसत होतं.

सरदार उदाजीराम यांची आठवण येऊन बाईंच्या डोळ्यांत टचकन पाणी आले.
उदाजीराम हे आधी निजामशाहीत तर नंतर मुघल दरबारात सेवा देणारे सरदार होते.
अकबराने त्यांना माहुरच्या रामगढ किल्ल्याचे किल्लेदार म्हणून नेमले होते.
माहुरचे किल्लेदार उदाजीराम यांची पत्नी होती सावित्रीबाई देशमुख.
वतनदारी त्यांना मिळाली पण आधीचे राजपूत ज्यांच्याकडे किल्ला होता त्यांच्याकडून अकबराने वतनदारी काढून उदाजींना दिली होती त्यामुळे त्या राजपुतांचा वंशज हरचंदराय आता किल्ला मिळवण्यासाठी कारवाया करू लागला होता.

अंबर मलिक सोबत मुघलांचे जे युद्ध झाले त्यात उदाजीरामांना वीरमरण आले होते.
त्यावेळी जगजीवनराम अगदीच अल्पवयीन होता.

सावित्रीबाई अतिशय धीराच्या आणि बुद्धिमान होत्या.
त्यांनी अगदी मुत्सद्दीपणाचे धोरण ठेवत, आपले दुःख बाजूला सारत, आपल्या मुलासाठी बादशहा शहाजहान कडून माहूरच्या आसपासच्या 25 गावांची वतनदारी आणि सोबतच जगजीवनरामसाठी मनसब सुद्धा मिळविली होती.

सावित्रीबाई अतिशय विद्वान होत्या.
त्यांना 'पंडिता' ही उपाधी मिळाली होती.

आता जगजीवनराम सक्षम झाले होते, मोठे झाले होते आणि त्यांची मनसबदारी व वतनदारी कर्तव्यदक्षतेने सांभाळत होते.
आणि आज मात्र जगजीवनराम नको तीचं खबर घेऊन आले होते.

"या हरचंदरायाचा बिमोड करावाच लागेल. पण आमचे सैन्य अपुरे पडेल हे निश्चित.
पातशहांना खलिता वेळेवर पोहोचू देत आणि आम्हाला जादा कुमक मिळू देत, रेणुकामाता," मनोमन माहूरच्या मातेला प्रणाम करीत त्या विचार करीत होत्या.

औरंगजेबाने शहाजहानविरुद्ध बंड पुकारले होते.
दारा शुकोह आणि औरंगजेब हे एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते.
मुघल साम्राज्यात उघडपणे दोन गट पडले होते.
दख्खनचा सुभेदार म्हणून जगजीवनरामने औरंगजेबास पाठिंबा दिला होता. तो त्यांच्या फौजेत मनसबदारी करीत होता.

खरेतर दोन भावांचे भांडण प्रचंड विकोपाला पोचले होते आणि म्हणूनच सावित्रीबाई साशंक होत्या की खलिता वेळेत पोहोचून मदत वेळेवर मिळेल की नाही म्हणून.

शेवटी विचार करता करता कधीतरी त्यांचा डोळा लागला.

तिकडे दारा शुकोह आणि औरंगजेबामध्ये लढाया सुरूच होत्या. जगजीवनराम आपले कर्तव्य तत्परतेने बजावण्यास गेले, धैर्याने लढत होते.

पण सामूगढ येथे दोन मुघल भावांत निर्णायक लढाई झाली, तुंबळ युद्ध झाले आणि त्यात जगजीवनरामांना वीरमरण आले.

सवित्रीबाईंवर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला.
पण शोक करायला वेळ कुठे होता.

आता जगजीवनराम यांचा सुपुत्र बाबुराव याला त्यांनी पद दिले पण बाबूराव एक छोटा बालक होता त्यामुळे पुन्हा सावित्रीबाईचं खंबीरपणे वतनदारी करू लागल्या इतकेच नव्हे तर मनसब सांभाळण्याची सुद्धा त्यांची तयारी होतीच.

हळूहळू सगळे सावरत आहे, आटोक्यात येत आहे असे वाटत असतानाच वैऱ्याने डाव साधला.

हरचंदरायाने माहूर गडावर आक्रमण केले.

गडावर सैन्य अगदी थोडके होते, मदतीचा खलिता पातशहांपर्यंत पोहोचला की नाही माहीत नव्हते पण जादा कुमक मदतीस आली नव्हती हे ही सत्य होते.

सैन्य कमी असले तरी शौर्य आणि धैर्य अमाप होते.
तुटपुंज्या सैनिकांच्या बळावर लढाई सुरू होती.
पण सैनिकांचे मनोबल खचत चालले होते.
त्यांनी मनाने पराभव स्वीकारला होता.
सावित्रीबाईंचे सैन्य मागे हटू लागले.

इतक्यात एक घोडेस्वार भाला उंचावत आला.
भाल्याला चोळी बांधली होती.
सैन्याने मागे हटू नये म्हणून घोडेस्वार जीवाचे रान करू लागला.

" तुम्ही लढवय्ये आहात, पळपुटे नाही.
तुम्ही शूरवीर आहात, आपल्या वतनाचे रक्षण आपल्याला करावयाचे आहे, भिऊ नका.
संख्येने कमी असलो तरी पराक्रमात अव्वल आहोत हे शत्रूला दाखवण्याची ही वेळ आहे," घोडेस्वार अतिशय स्फूर्तिदायक बोलत होता.

तो घोडेस्वार म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून स्वतः सावित्रीबाई होत्या.

हातात भाला घेऊन त्या स्वतः रणांगणात उतरल्या होत्या.
सावित्रीबाई सैन्याची हिंमत वाढवत होत्या.

"तुमची बहीण युद्धात उतरली आहे, तिची लाज राखा!," चोळी बांधलेला भाला उंचावत त्या म्हणाल्या.

त्यांचा युध्दावेश बघून सैनिकांनाही स्फुरण चढले.
ते पुन्हा त्वेषाने लढू लागले.

चोळी बांधलेला भाला बघून हरचंदराय व त्याची सेनासुद्धा चकित झाले.
आपण गड सहज काबीज करू या त्यांच्या कल्पनेला सावित्रीबाईंच्या लढवय्या बाण्याने सुरुंग लागला होता.

हरचंदराय जिद्दीला पेटला. "एका स्त्री कडून पराभव? शक्यच नाही! मरणं स्वीकारेल हारणं नाही..." हा विचार करून हरचंदराय स्वतः सावित्रीबाईंना सामोरा गेला.

दोघेही निकराने लढू लागले.
सावित्रीबाई चपळाईने वार चुकवत होत्या.
हे बघून हरचंदराय चवताळला.
जीव तोडून सपकन त्याने तलवार चालविली.
सावित्रीबाईंच्या हातावर जोरदार घाव बसला पण आपला भाला त्यांनी खाली पडू दिला नाही.

रणांगणातच तो भाला त्यांनी जमिनीत उभा खोचला आणि कमरेच्या दुपट्ट्यात खोचलेली तलवार घेऊन त्या एखाद्या वाघिणीसारख्या चवताळून हरचंदरायावर वार करू लागल्या.

तलवारीची खणखण आणि त्यांचा आवेश बघून क्षणभर हरचंदरायास काही सुचले नाही.
पण स्वतःला सावरत तो प्रतिवार करू लागला.
एका क्षणी जोरदार प्रहार करीत सवित्रीबाईंची तलवार त्याने उडवून लावली.

"एक स्त्री असून माझा सामना करायला निघाली? कळली तुझी जागा तुला? आली मोठी शूरवीर...," हरचंदराय खदाखदा हसत खिल्ली उडवू लागला.

आणि रागाने मुठी आवळत त्याच बेसावध क्षणी सावित्रीबाईंनी चोळी बांधलेला आपला भाला हातात खेचून घेतला आणि जोरदार चित्कारत, संपूर्ण ताकदीने हरचंदरायाच्या छातीत खुपसला.

वेदनेने कण्हत तो घोड्यावरून खाली पडला.

त्यांच्या डोळ्यांत अंगार फुलला होता.

"ही आहे स्त्री शक्ती हरचंदराय. पण तुझ्यासारख्या खुज्या विचारांच्या लोकांना काय कळणार म्हणा. स्त्रीला कमी लेखणारा तू, तुला स्त्रीच्याच हातून मरण यावे हे विधिलिखित असावे....,"
सावित्रीबाईंचे रौद्ररूप त्याला दिसत होते.

'पंडिता' असलेल्या सावित्रीबाई रणरागिणी बनून पराक्रम गाजवित होत्या.

एखादी जखमी वाघीण जशी डरकाळी फोडत अंगावर चालून जाते अगदी तसेच छातीतला भाला उपसून पुन्हा त्याच्या छातीत खुपसून त्यांनी हरचंदरायाचा वध केला.

सावित्रीबाईंनी अतुलनीय शौर्य दाखवत शत्रूची दाणादाण उडविली.
हरचंदरायाचा बिमोड करून युद्धात विजय मिळविला.

आपला गड राखण्यात आणि घराण्याचं संरक्षण करण्यात त्या यशस्वी ठरल्या.

त्यांच्या शौर्याची कीर्ती सर्वत्र पसरली.
सगळीकडे वाहवाही होऊ लागली, इतकी की खुद्द औरंगजेबाने त्यांना सन्मानाने आग्र्याला दरबारात बोलावले.

"बहोत खूब. क्या तारीफ करे हम आपकी.
आपकी बहादुरी एक मिसाल है.
बाघिन की तऱ्हा लढी हो आप. हमे नाज है की आप हमारी सरदारनी है..." पातशहांकडून स्तुतीचे पूल बांधले गेले.

" आपकी इस बेमिसाल शुजाअत को मद्दे नजर रखते हुए हम आपकी तौकिर में आपको रायबाघिन ये किताब बहाल करते है," औरंगजेबाने असे म्हटल्याबरोबर दरबारातील सर्वांनी "तारीफ-ए-तौसिफ," म्हणत टाळ्या वाजवत अनुमोदना दिली.

औरंगजेबाने त्यांचा यथोचित आदरसत्कार करून सन्मानाने वापस पाठविले.

रायबाघीन म्हणजे राज्याची वाघीण.

बोलीभाषेत अपभ्रंश होत रायबाघन आणि पुढे त्याचे रायबागन झाले.

आणि सावित्रीबाई 'पंडिता' सोबतच 'रायबागन' म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

औरंगजेबाने त्यांना दख्खन प्रांताची जबाबदारी दिली होती, त्या ती अगदी निष्ठेने पार पाडत होत्या.

त्या खरेच एखाद्या वाघिणीसारख्या शूर होत्या.
न घाबरता शत्रूचा फडशा पाडणाऱ्या होत्या.

उंबरखिंडीच्या लढाईत त्या करतलबखानासोबत शिवरायांविरुध्द लढण्यास गेल्या पण समयसूचकतेच्या धनी, सदसद्विवेकबुद्धीने वागणाऱ्या रायबागन यांनी शेवटी खानाला राजांसोबत तह करण्यास भाग पाडले.

अश्या या विद्वान पंडिता, धोरणी, बुद्धिमान, निष्ठावान, शूरवीर आणि विचारवंत रायबागन आपल्या कर्तृत्वाने, जिद्द आणि अतुलनीय पराक्रमाने इतिहासात अजरामर ठरल्या.


समाप्त।


© डॉ समृध्दी अनंत रायबागकर, अमरावती
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →