Login

पूर्णत्व भाग 1

गोष्ट दुसऱ्या लग्नाची
"आई, मी विवाह संस्थेत नाव नोंदवून आले." नुकतीच आलेली मानसी सोफ्यावर बसत म्हणाली.

"काय? इतक्या लवकर? अगं, अजून तुझं शिक्षण पूर्ण झालंय का? नोकरी करणार म्हणतेस ना? इतकी घाई ,गडबड का मनू?" निवेदिता स्वयंपाक घरातून बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य अन् रागाचं मिश्रण झालं होतं. "तिथं कोणी तुला प्रश्न विचारले नाहीत? फोटो, माहिती मागितली नाही?"

"मागितली ना. देऊन आले मी." मानसी आईला बिलगली.
"काय हा आगाऊपणा? मनू, नोंदवलेलं नाव आधी काढून ये बघू. उद्या स्थळासाठी फोन यायला लागले तर मी काय उत्तर देणार?"

"आई, मी मामाचा नंबर दिलाय. तू उत्तराची काळजी करू नको." मनूने आईच्या गळ्याभोवती आपले हात गुंफले.
"यात दादाचा काय संबंध? म्हणजे तुला त्याची फूस आहे तर .? थांब, वहिनीलाच सांगते. तिच तुम्हा दोघांना बघून घेईल." निवेदिताने फोन हातात घेतला.

"आई, मामीला माहितीय सगळं. मी माझं नव्हे तर तुझं नाव नोंदवून आलेय." मानसी शांतपणे आईचा चेहरा निरखत म्हणाली.
"काय? तू काय बोलतेस हे कळतंय तुला?" नाराज झालेली निवेदिता काही वेळांतच मानसीला आपल्या माहेरी घेऊन आली.
"वहिनी, हे काय चाललंय तुमचं? इथं माझी लेक लग्नाला आलीय आणि तुम्ही माझं नाव काय नोंदवताय? आता या वयात मी लग्न करून सासरी जायचं की काय!
एक गोष्ट स्पष्टच सांगते वहिनी, मी जवळ राहत असले तरी तुमच्यावर अवलंबून नाहीय. मला चांगली नोकरी आहे. माझं आणि माझ्या लेकीचं भागतं त्यात. कित्येक महिने मी माहेरची वाट धरत सुद्धा नाही. फोनवर आपलं बोलणं झालं की इथं यायची मला काय गरज पडते?" निवेदिता रागात बोलत होती.

हे ऐकताच वर्षाने आपल्या नणंदेसमोर पाण्याचा पेला धरला. "निवेदिता, आधी शांत हो. मग बोलू." पाण्याचा पेला गटागट संपवल्यावर निवेदिता जरा शांत झाली. मानसी हॉलच्या एका कोपऱ्यात अंग चोरुन बसली होती. बाजूला तिचा मामा, अंकुर बोलण्याच्या तयारीत बसला होता.

वर्षाने खूण करताच अंकुर म्हणाला, "निवेदिता, आम्हाला वाटतं तू दुसरं लग्न करावंस. मान्य आहे, तुझा पहिल्या लग्नाचा अनुभव अतिशय वाईट होता. पण सगळेच पुरुष तसे नसतात ग.
उद्या मानसीचं लग्न झाल्यावर तू एकटी पडशील. तुला सोबत म्हणून कोण असेल? काही लागलं, दुखलं -खुपलं तर कोण बघेल? आमचा अनुज परदेशी जाण्याच्या तयारीत आहे. उद्या आम्हीही तिकडे जाऊ. मग तुझ्याजवळ आपलं कोणीतरी हवंच ना?"

"इतकी वर्षे मी एकटीने काढली ना? आता कोणाची सोबत नकोय मला." निवेदिता फणकाऱ्याने म्हणाली.

अवघ्या विसाव्या वर्षी आईच्या आग्रहाखातर केलेल्या पहिल्या लग्नाचा अनुभव निवेदितासाठी अतिशय अस्वस्थ करणारा आणि भयानक होता. नवऱ्याच्या आणि तिच्या वयात आठ वर्षांचं अंतर, सुशिक्षित सासर असूनही रोज होणारी मारहाण, मानसिक त्रास, त्यातच झालेला मानसीचा जन्म, निवेदिताच्या सौंदर्यावर घेतली जाणारी शंका आणि बरंच काही..

या अनुभवातून तावून सुलाखून निघालेल्या निवेदिताचा स्वभाव काळानुसार बदलला होता. एकटी स्त्री आपल्या लेकीला सांभाळून, कमवून आपला उदरनिर्वाह चालवत उभी राहू शकते हे तिने दाखवून दिलं होतं. पण एका हक्काच्या व्यक्तीसाठी अजूनही मनाचा एक कोपरा रिकामा होता. आयुष्यात जोडीदार नसताना वाट्याला आलेलं एकटेपण, घालमेल, तगमग कोणाला सांगता येत नव्हती.

"निवेदिता, निदान आता तरी स्वतःसाठी जग. आजवर खूप धावपळ केलीस. समाजाशी लढलीस. लेकीसाठी तिची ताकद बनून उभी राहिलीस. तुला समजून घेणाऱ्या, साथ देणाऱ्या, आयुष्याचा सोबती म्हणून हातात हात घालून सोबत नेणाऱ्या जोडीदाराची गरज आहे, हे कसं समजत नाहीय तुला?" वर्षाने तिच्या पाठीवर हात ठेवला. तसा निवेदिताचा बांध फुटला.

"रोज रात्री तुझी उशी अश्रूंनी चिंब भिजलेली असते. सणवार आला की कोणासाठी नटायचं, सजायचं हा प्रश्न तू आरशासमोर उभी राहून स्वतःला विचारतेस की नाही?
मनातलं बोलायला हक्काची, काळजी घेणारी व्यक्ती जवळ हवी की नको? भावनिक, मानसिक आधार देणारी आपली व्यक्ती हवीच. लेकीच्या लग्नात कन्यादान करताना तुझा हात रीते राहू दे की काय? स्त्री उभं आयुष्य एकटीने काढू शकते. पण त्यासाठी ती खूप खंबीर असावी लागते." वर्षाने आपल्या नणंदेला जवळ घेतलं अन् मानसीकडे एक कटाक्ष टाकला.

मानसी डोळे पुसत गॅलरीत जाऊन उभी राहिली.
"माझ्या मित्र -मैत्रिणींना त्यांचे बाबा न्यायला रोज शाळेत येतात. खूप सारी खेळणी, खाऊ घेऊन देतात. फिरायला नेतात. मलाही तसा बाबा हवाय." चौथीत असताना तिने निवेदिताकडे हट्ट केला होता.

हा हट्ट त्याचं दिवशी संपला. कारण निवेदिताने लेकीच्या अंगावर पहिल्यांदाच हात उचलला होता.

क्रमशः

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →