Login

पोरका न्याय भाग १

पोरका न्याय भाग १
पोरका न्याय
भाग १

"दादा, माझ्या डोळ्यांत बघून एकदा तरी सांग की तुला माझ्यावर विश्वास नाहीये ! फक्त एकदा... त्यानंतर मी स्वतःहून या घराचा उंबरठा ओलांडून कायमचा निघून जाईन. पण असा बेवारशासारखा पोलिसांच्या हवाली मला करू नकोस."

समीरचा आवाज थरथरत होता. त्याचे डोळे रडून रडून लाल झाले होते. पण समोर उभ्या असलेल्या अविनाश सरदेसाई यांच्या चेहऱ्यावरची एकही रेघ हलली नाही. पुण्यातील त्या आलिशान सरदेसाई मेंशनमध्ये आज जणू स्मशानशांतता पसरली होती. हॉलच्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या इन्स्पेक्टर राणेंनी हातातील हातकडी कचाकच वाजवून समीरला त्याची जागा दाखवून दिली.

अविनाशने संथपणे चष्म्याचा काच पुसला. समीरकडे एक भेदक नजर टाकली.

" विश्वास ? समीर, हा शब्द तुझ्या तोंडी आता शोभत नाही. साडेतीन कोटींचा अपहार ! आणि ते ही माझ्याच कंपनीत ? ज्या कंपनीच्या पायऱ्या तू माझ्या बोटाला धरून चढायला शिकला होतास, त्याच कंपनीच्या मुळावर तू घाव घातला आहेस. ही साधी चूक नाही, हा रक्ताने केलेला विश्वासघात आहे."

" दादा, ऐकून तर घे... त्या मित्रांच्या दबावाखाली मी फक्त काही कागदपत्रांवर सह्या केल्या होत्या. मला कल्पनाही नव्हती की ते एवढं मोठं षड्यंत्र असेल. मला पैशांची हाव नाहीये दादा, तू मला जे दिलंय त्यात मी सुखी होतो." समीर कळवळून सांगत होता.

"समीर!" अविनाश जोरात ओरडले. त्यांच्या आवाजाने हॉलमधलं झुंबरही क्षणभर हादरलं.

" कागदपत्रांवर सह्या करताना तुझं डोकं कुठे होतं? ज्या कंपनीत हजारो कामगारांचा घाम आणि माझा आयुष्यभराचा संघर्ष गुंतलाय, तिथे तू असा निष्काळजीपणा कसा करू शकतोस ?
आणि समजा, तू म्हणतोयस तसं तुला काहीच माहित नव्हतं, तरीही ती तुझी अक्षम्य चूक आहे. आणि माझ्या तत्त्वांमध्ये एका गोष्टीला थारा नाही.चुकीला माफी नाही!"

बाजूला उभ्या असलेल्या अविनाशच्या पत्नीने, उर्मिलाने, रडत रडत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

" अहो, लहान आहे तो. चुकला असेल. पोलीस नकोत, घरात बसून मार्ग काढूया ना ? तो तुमचा एकुलता एक भाऊ आहे."

अविनाशने उर्मिलाकडे जळजळीत नजरेने पाहिले.

"भाऊ? ज्याने भावाच्या पाठीत खंजीर खुपसला तो भाऊ? उर्मिला, आज जर मी याला माफी दिली, तर उद्या माझ्या कंपनीचा प्रत्येक कामगार चोरी करायला मोकळा होईल. नियमाला अपवाद नसतो. इन्स्पेक्टर, याला घेऊन जा. जे काही पुरावे द्यायचे असतील ते कोर्टात द्या."

पोलीस समीरचा हात धरून ओढत बाहेर नेऊ लागले. समीर पायऱ्यांवरून घसरत होता, दादाकडे वळून बघत होता, ओरडत होता. पण अविनाशने पाठ फिरवली होती. त्यांच्यासाठी समीर नावाचा अध्याय तिथेच संपला होता.
दोन दिवस उलटले. समीरला जेल झाली.

अविनाशने कंपनीत सर्व व्यवहार पुन्हा तपासायला सुरुवात केली. पण त्यांच्या मनाच्या एका कोपऱ्यात एक अस्वस्थता होती. समीरने मी निर्दोष आहे असं का म्हटलं असावं ? जर त्याने पैसे चोरले असते, तर ते त्याच्या खात्यावर दिसायला हवे होते, पण तसं झालं नव्हतं.

एके दिवशी अविनाश ऑफिसमध्ये असताना त्यांचा विश्वासू मॅनेजर, सावंत, घामेघूम होऊन केबिनमध्ये आला.

" सर, खूप मोठी गडबड झाली आहे. आपण ज्या ऑडिट रिपोर्टच्या आधारावर समीर बाबांना पोलिसांत दिलं, त्या रिपोर्टमध्ये फेरफार करण्यात आले आहेत."

अविनाश ताडकन उठले.

"काय बोलतोयस सावंत? स्पष्ट बोल!"

"सर, समीर बाबांनी ज्या सह्या केल्या होत्या, त्या पगारवाढीच्या फाईल्सवर होत्या. पण वरची पानं बदलून तिथे साडेतीन कोटींच्या ट्रान्सफरचे कागद जोडले गेले. हे सगळं कोणीतरी जाणीवपूर्वक केलंय. समीर बाबा खरेच निर्दोष आहेत." सावंतांचा आवाज दबलेला होता.

अविनाशच्या हातातील पेन खाली पडलं. त्यांना समीरचा तो रडवेला चेहरा आठवला.
'दादा, माझ्या डोळ्यांत बघून सांग!'
अविनाशने तातडीने जेलमध्ये फोन केला. पण समोरून जे उत्तर मिळालं, त्याने अविनाशच्या काळजाचे तुकडे झाले.

"मिस्टर सरदेसाई, युवर ब्रदर समीर... त्याने आज सकाळी लॉकअपमध्ये आत्महत्या केली. तो म्हणाला होता की ज्या भावाचा विश्वास नाही, त्या भावाच्या जगात त्याला राहायचं नाहीये."

अविनाशच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या चुकीला माफी नाही या तत्त्वावर ते जगले, त्याच तत्त्वाने आज एका निरागस जिवाचा बळी घेतला होता.

पाच वर्षं सरली. अविनाशचा व्यवसाय आता कोट्यवधींच्या घरात होता, पण सरदेसाई मेंशनमध्ये फक्त एकांत नांदत होता. उर्मिलाने त्यांच्याशी बोलणं सोडलं होतं. अविनाश आता एक चालत फिरतं प्रेत बनले होते. एके दिवशी त्यांच्या ऑफिसमध्ये एक पंचवीस वर्षांचा तरुण इंटर्न म्हणून जॉईन झाला. त्याचं नाव होतं 'ईशान'.

ईशानचं काम इतकं अचूक होतं की अविनाशला त्यात स्वतःची तरुणपणीची प्रतिमा दिसायची. पण ईशान कधीच हसयचा नाही. त्याच्या डोळ्यांत एक अनामिक गूढ आणि दुःख होतं.

एके दिवशी ऑफिस सुटताना ईशान अविनाशच्या केबिनमध्ये आला. त्याच्या हातात एक जुनी, पिवळी पडलेली फाईल होती.

" सर, ही फाईल दहा वर्षांपूर्वीची आहे. ही तीच फाईल आहे ज्यावर समीर सरदेसाईंच्या सह्या होत्या. पण यात एक पान असं आहे, जे त्या वेळी पोलिसांनीही बघितलं नव्हतं," ईशानने ती फाईल टेबलवर ठेवली.

अविनाशने थरथरत्या हाताने फाईल उघडली. त्या पानावर खरं षड्यंत्र रचणाऱ्याचं नाव होतं. आणि ते नाव वाचताच अविनाशचे डोळे विस्फारले.

क्रमशः...

© ® वेदा

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →