Login

परवानगी-1

नणंदबाईंनी आपण घरी नसताना आपल्या वस्तू परस्पर मैत्रिणीला दिल्या हे पुजाला त्यांच्या कॉमन व्यक्तीच्या व्हाट्सअप्प स्टेटवरून कळलं आणि तिचा संताप झाला
मेघनाच्या व्हॉट्सॲप स्टेटसच्या फोटोत आपल्याच काही वस्तू दिसल्याने पूजा हैराण झाली होती.

एक छोटंसं गुलाबी ब्लँकेट, टॉम अँड जेरीचं कीचेन, लोकरीने विणलेला एक बाहुला आणि एक छोटासा खुळखुळा.

या गोष्टी पूजाला लगेच ओळखू आल्या होत्या.

पूजाने मेघनाला रिप्लाय करण्यासाठी टेक्स्ट बॉक्स उघडला. परंतु तिने विचार केला की हिला डायरेक्ट कसं विचारावं की ह्या वस्तू कोणाच्या आहेत, किंवा सांगावं तरी कसं की या माझ्याच वस्तू आहेत, तुझ्याकडे कशा आल्या?

मग पूजाने जरा विचार केला आणि मेघनाला सहज मेसेज केला. तिच्या स्टेटसवर रिप्लाय दिला.

"खूप छान फोटोज आहेत, मेघना."

या तिच्या रिप्लायवर मेघनाने हसून उत्तर दिलं.

"थँक्यू, पूजा."

आता पूजाने विषय काढायला सुरुवात केली.

"तुझ्याकडे त्या फोटोत पिंक ब्लँकेट आहे ना, माझ्याकडे सेम तसंच आहे."

मेघना म्हणाली,

"हो का? अरे वा!"

पूजाने पुन्हा विचारलं,

"आणि ते कीचेन, तो खुळखुळा... अगदी सेम. बहुतेक आपण एकाच मार्केटमधून घेतले असावेत."

तेव्हा मात्र मेघनाने पूजाला सांगितलं,

"अगं नाही नाही, ह्या वस्तू मी नाही आणलेल्या. या मला प्रज्ञा ताईंनी दिलेल्या आहेत."

हे ऐकून पूजाचं डोकंच सटकलं. तिचा संताप अनावर झाला. तिने मेघनाला रिप्लाय केला,

"अच्छा, ठीक आहे. चल, मला जरा काम आहे. आपण नंतर बोलू."

मेघनानेही तिला बाय केलं.

पूजाने फोन भिरकावून दिला आणि डोक्याला हात लावून बसली.

"काय करावं या प्रज्ञाताईंचं? माझ्या वस्तू म्हणजे त्यांच्याच मालकीच्या समजतात."

पूजा काही दिवसांसाठी तिच्या माहेरी आली होती. तिच्या चुलत बहिणीचं लग्न असल्याने आठ दिवस ती माहेरीच थांबणार होती.

तिच्या सासरी तिच्या नणंदबाई येऊन थांबल्या होत्या.

नणंदबाई चांगल्या शिकल्या-सवरलेल्या होत्या. पण तरीही दुसऱ्याच्या वस्तूंना हात लावायचा नसतो, दुसऱ्याची प्रायव्हसी जपायची असते, या गोष्टी त्यांना समजतच नव्हत्या.

कितीतरी वेळा त्या वहिनीच्या खोलीत न विचारता आत घुसायच्या.

बऱ्याचदा पूजा आणि तिचा नवरा एकमेकांना चिकटून बसलेले असतील किंवा त्यांच्यात काही रोमँटिक क्षण असतील आणि चुकून दरवाजा लॉक करायचा राहून गेला असेल, तर अशा विचित्र परिस्थितीतही प्रज्ञाताई कसलाही विचार न करता भसकन खोलीत घुसायच्या. पूजा आणि तिच्या नवऱ्याला ओशाळल्यासारखं वाटायचं.

पूजा तिच्या नवऱ्याला सांगायची,

"अहो, तुमच्या बहिणीला थोडंसं सांगा की येताना नॉक करून येत जा म्हणून."

परंतु शेवटी भाऊच तो. तो का आपल्या बहिणीशी वाईट होईन?

प्रज्ञाताईंच्या या स्वभावामुळे पूजाला सारखा त्यांचा राग येत असे.

यावेळेस मात्र कहरच झाला होता.

पूजाने तिच्या मुलाच्या लहानपणीच्या वस्तू खोलीत जपून ठेवल्या होत्या. त्याच्या लहानपणीच्या आठवणी म्हणून तिचा जीव त्यांच्यात होता.

परंतु प्रज्ञा ताईंनी खुशाल ती नसताना तिच्या खोलीत एन्ट्री केली, त्या वस्तू चाचपडल्या आणि उचलून त्यांच्या मैत्रिणीलाच, म्हणजे मेघनाला, तिच्या बाळासाठी नेऊन दिल्या.

मेघना ही प्रज्ञाताईंची मैत्रीण होती. हे एव्हाना पूजाच्या लक्षात आलं होतं. पूजा आणि मेघनाची ओळख झुंबा क्लासला झालेली असल्याने एका ट्रिपसाठी नंबर शेयर केले होते.

पूजा विचारातच मग्न होती,
"न विचारता अशा वस्तू परस्पर दुसऱ्याला देणं हे कितपत योग्य आहे?"

तो राग मनात ठेवूनच पूजा लग्न आटोपून सासरी गेली.

सासरी गेल्यावर तिने पाहिलं की प्रज्ञाताईंनी त्यांच्या सासरी नेण्यासाठी पापड, कुरडया, वेफर्स अशा काही पिशव्या भरून ठेवलेल्या होत्या आणि त्या आता निघण्याची तयारी करत होत्या.

प्रज्ञाताई काही वेळाने निघणारच होत्या. कॅब येण्यास अजून एक तास अवधी असल्याने त्या आईशी गप्पा मारत खोलीत बसल्या होत्या.

गप्पा मारून झाल्यानंतर प्रज्ञाताई बाहेर आल्या आणि त्यांनी पाहिलं तर.....
क्रमशः

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →