Login

पत्रास या कारण की !पार्ट 1

.
पत्र !


प्रिय आई,
काल तुला जत्रेत पाहिले. तू अजूनही तशीच सुंदर आहेस जशी लहानपणी होतीस. वाटले की तुला उराशी कवटाळून रडावं, तुला भांडावे. माझ्या हृदयावरच्या जखमा तुला दाखवून तुला उत्तर मागावे. का सोडून गेली मला लहानपणी ? तू गेल्यावर किती तरी लोकांनी मला टोमणे मारले. दहा वर्षाचा असताना कुणीतरी लुगडं अंगावर घालून मला देवीला सोडलं. बापही वारला. पूर्ण गाव मला चिडवायचं. तू तर पळून गेली पण समाजाने माझ्या तोंडात शेण घातले. बरोबरीची लहान मुले मला शेतात न्यायची. नवरा-बायको खेळू म्हणत मला बायको बनवायची आणि बळजबरी करायची. जिथे स्त्रिया, प्राण्यानांही वासनांध नराधम सोडत नाहीत तिथे जोगत्यावर झालेल्या बलात्काराची कोण दखल घेणार ? माझा आवाज त्या भयाण शिवारात विरून गेला. माझा कुणी वाली नव्हता. आधी लुगडं घालायला येत नव्हतं. पण हळूहळू जमायला लागलं. नटायला आवडायला लागलं. पुरूष छेडायची तेव्हा आनंद वाटायला लागला. बाईपण अंगात भिनायला लागलं. कदाचित मी माझ्यातच माझी आई शोधत होतो. एक जोगतीण होती. माझ्यावर जीव ओवाळून टाकायची. एकेदिवशी तिने मला घट्ट मिठी मारली. तिला शरीरसुखाची अपेक्षा होती. परंतु असंख्य पुरुषांच्या अंगाखाली गेल्यावर माझ्यात पुरुषपण उरलंच कुठं होतं? मला काही करता आले नाही. ती थुंकून निघून गेली. पलीकडच्या गावातला एक पहिलवान माझ्या प्रेमात पडला होता. तू स्त्री असती तर झुलवाच लावला असता असे म्हणला होता. तेव्हा फार खंत वाटली स्त्री नसल्याची. एकटेपणाला कंटाळून दारूचा आसरा घेतला. पुरूष त्यांची वासना भागवण्यासाठी माझा वापर करायचे. दारू आणि पुरुष यांच्याशिवाय जगणं मुश्कील झाले. लोकांसमोर देवीची भक्ती करायचो पण मनोमन मी स्वतःला अपवित्र समजत होतो. दारूच्या व्यसनात आणि वासनेच्या चिखलात बुडालेला माणूस कसकाय देवीचा भक्त बनू शकतो ? पण पोटाचा प्रश्न होता म्हणून भक्त म्हणून मिरवत गेलो. व्यवस्थेचा बळी ठरलेला मी कधी व्यवस्था हाताशी धरून इतरांना बळी पाडू लागलो कळलंच नाही. आई, तुला आनंदात पाहिलं तेव्हा डोळ्याचे पारणे फिटले. किमान तू तरी तुझा संसार थाटला तुझ्या आवडीच्या माणसासोबत. कदाचित त्या आवडीच्या माणसाने मला सोडून देण्याची अट घातली असावी. आंघोळ करताना जेव्हा गावाचे तरुण शिट्ट्या मारतात तेव्हा अंगावरून मोरपीस फिरवल्यासारख वाटत. पूर्ण स्त्री मी कधी होऊ शकत नाही. छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानायला शिकत आहे. देवीला उधळलेल्या भंडाऱ्यात आसवे विरून गेली आणि टाळीच्या आवाजात हुंदके दडपून गेली. काही जण म्हणतात की मी गादी चालवणार वगैरे. काय करू गादी चालवून ? जगात माझ्यावर प्रेम करणारा कुणी नाही. एकटा आहे मी. मानसिक खच्चीकरण झाले आहे माझे. आयुष्यात पराभव झालाय माझा. एक शिक्षक गावात प्रबोधन करत होता. त्याला कोण सांगणार या रूढी परंपरा सहजासहजी संपत नाहीत. आई आज मी हे पारंब्यासारखे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. तुझं एक लुगडं मी जपून ठेवलं होतं. तेच लुगडं घालून विष पिऊन मरतोय. मी मेल्यावर पंथाचे लोक चपला मारतील. पुन्हा असा जन्म नको म्हणून. आई जमल्यास स्मशानातील माती तुझ्या पदरात बांधून ठेव. म्हणजे मेल्यानंतर तरी तुझ्या मांडीवर निजायची इच्छा पूर्ण होईल.
तुझंच लेकरू!

( जोगवा चित्रपटापासून प्रेरित )

©® पार्थ धवन
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →