पासवर्ड.. -1
"अहो, परत कार्ड ब्लॉक ? मागच्या महिन्यात एटीएमचा पिन विसरलात, परवा गॅस नोंदणीचा नंबर, आणि आज चक्क स्वतःची बँकेची शाखा ? चौतीस वर्षं ज्या बँकेत नोकरी केलीत, तिचीच शाखा ?"
शालिनीने चहाचा कप जरा जोरातच टेबलावर ठेवला.
दिलीपरावांनी वर बघितलं नाही. ते हातातल्या कागदावर काहीतरी लिहीत होते.
"शाखा बदलली त्यांनी. नवीन इमारतीत गेली," ते शांतपणे म्हणाले. "आणि शालिनी, इकडे ये जरा. हा बघ, नेट बँकिंगचा पासवर्ड. पाठ कर."
"मला कशाला हवाय ? तुमचं तुम्ही बघता ना सगळं ?"
"पाठ कर म्हटलं ना." त्यांचा आवाज जरासा चढला, आणि लगेच उतरला. "म्हणजे.. असावा तुलाही. काळ कठीण आहे."
शालिनीने कागदाकडे बघितलं आणि नवऱ्याकडे. अडतीस वर्षांच्या संसारात या माणसाने तिला कधी लाईट बिलही भरू दिलं नव्हतं. "तू कशाला डोकं शिणवतेस, आकडे माझं खातं" हे त्यांचं ठरलेलं वाक्य.
बँकेत हेडकॅशियर म्हणून निवृत्त झालेला माणूस. पै न् पै चा हिशोब जिभेवर असलेला माणूस. आणि गेल्या तीन महिन्यांत हाच माणूस विचित्र वागत होता.
आधी छोट्या गोष्टी. भाजी आणायला गेले आणि पिशवी दुकानातच विसरून आले. मग जरा मोठ्या. एकदा फिरायला गेले आणि नेहमीच्या रस्त्याने परत यायला अर्धा तास जास्त लागला, "ऊन लागलं म्हणून लांबून आलो" म्हणाले. एकदा जुन्या मित्राचा फोन आला आणि हे पाच मिनिटं "कोण बोलतंय" च्या गोंधळात. आणि आता तर शालिनीला रोज काहीतरी नवीन शिकवायचा त्यांनी सपाटाच लावला होता. पासवर्ड पाठ कर.
एफडी जॉइंट केल्यात, पावत्या या कप्प्यात. लाईट बिल ऑनलाइन कसं भरायचं ते बघ. औषधांच्या दुकानाचा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह केलाय, "पहिल्या नंबरवर."
"अहो, मला हे सगळं आत्ताच का शिकवताय ?" तिने एकदा विचारलं होतं.
"निवृत्त माणसाला वेळ असतो, म्हणून," ते हसले होते. पण ते हसणं तिला ओळखीचं वाटलं नव्हतं.
दर मंगळवारी दुपारी ते बाहेर जायचे. "जोशाकडे जातो, बुद्धिबळ खेळतो." आधी शालिनीने लक्ष दिलं नाही. मग एकदा जोशींची बायको भाजी मंडईत भेटली आणि सहज म्हणाली, "तुमचे हे हल्ली येत नाहीत हो आमच्याकडे. बरेत ना ?" त्या रात्री शालिनी जेवली नाही. मंगळवारी दुपारी हा माणूस जातो कुठे ? बँकेतून पैसेही बरेच निघत होते. पाच हजार, तीन हजार, अधूनमधून. विचारलं तर "देणग्या दिल्या, जुनी येणी फेडली" अशी मोघम उत्तरं.
एकदा तर कहर झाला. शालिनीला फ्रीजमध्ये, दुधाच्या पातेल्याशेजारी, दिलीपरावांचा चष्मा सापडला. तिने हसत हसत तो त्यांच्या हातात दिला, "अहो, चष्म्याला गरम होतंय का ?" ते हसले, पण जेवताना गप्प होते, आणि त्या रात्री बराच वेळ गॅलरीत एकटे उभे होते. शालिनीला वाटलं, अपमान वाटला असेल विसराळूपणाचा. तिला काय माहीत, की तो माणूस गॅलरीत उभं राहून स्वतःच्याच मनाशी हिशोब मांडत होता.. अजून किती दिवस लपवता येईल याचा.
संशय घरभर पसरत चालला होता. दुसरं कुणी ? या वयात ? छे. मग कर्ज ? कुणाला जामीन राहिले ? की कुणी फसवतंय यांना ? तिने एकदा धीर करून जोशींना फोन लावला होता. "भावजी, हे येतात का हो तुमच्याकडे मंगळवारी ?" जोशी क्षणभर गप्प बसले आणि मग "अं.. हो हो, येतो की" असं इतकं कोरडं बोलले, की खोटं बोलायची सवय नसलेल्या माणसाचं खोटं लगेच ओळखू आलं. म्हणजे जोशींना काहीतरी माहीत होतं, आणि तेही तोंड शिवून होते.
लेकाला अमेरिकेला फोन करावा का, असाही विचार तिने केला. पण सांगणार काय ? बाबा चष्मा फ्रीजमध्ये ठेवतात ? पोरगा हसण्यावारी नेईल. आधी स्वतः शोधावं, मग बोलावं, असं ठरवून ती गप्प राहिली.
गुरुवारी संध्याकाळी दिलीपराव अंघोळीला गेले आणि स्कूटरची किल्ली टेबलावर राहिली. शालिनी किल्लीकडे बघत राहिली. अडतीस वर्षांत तिने नवऱ्याचं पाकीट उघडून बघितलं नव्हतं. आज तिचे पाय आपोआप खाली गेले. स्कूटरची डिकी उघडली.
आत एक फाईल होती. निळ्या पुठ्ठ्याची.
तिने ती उघडली आणि पायऱ्यांवरच बसली.
गुरुवारी संध्याकाळी दिलीपराव अंघोळीला गेले आणि स्कूटरची किल्ली टेबलावर राहिली. शालिनी किल्लीकडे बघत राहिली. अडतीस वर्षांत तिने नवऱ्याचं पाकीट उघडून बघितलं नव्हतं. आज तिचे पाय आपोआप खाली गेले. स्कूटरची डिकी उघडली.
आत एक फाईल होती. निळ्या पुठ्ठ्याची.
तिने ती उघडली आणि पायऱ्यांवरच बसली.
वर एक मोठं पाकीट. "न्यूरॉलॉजी क्लिनिक" चं नाव. आत एमआरआयचे काळे फोटो. रिपोर्ट. "दिलीप वामन साठे, वय ६३." खाली डॉक्टरांच्या अक्षरातल्या ओळी, ज्यातले अर्धे इंग्रजी शब्द तिला कळले नाहीत. पण दोन शब्द कळले.
"मेमरी लॉस.. प्रोग्रेसिव्ह.."
आणि फाईलच्या शेवटच्या पानावर, दिलीपरावांच्या स्वच्छ, बँकवाल्या अक्षरात एक यादी होती. "शालिनीला शिकवायचं.. १. नेट बँकिंग २. एफडी नूतनीकरण ३. घरपट्टी ४. गॅलरीतल्या झाडांना खत कुठून आणायचं ५. माझ्या बीपीच्या गोळ्या.. हिला माहीत असतंच, पण तरी.."
आणि फाईलच्या शेवटच्या पानावर, दिलीपरावांच्या स्वच्छ, बँकवाल्या अक्षरात एक यादी होती. "शालिनीला शिकवायचं.. १. नेट बँकिंग २. एफडी नूतनीकरण ३. घरपट्टी ४. गॅलरीतल्या झाडांना खत कुठून आणायचं ५. माझ्या बीपीच्या गोळ्या.. हिला माहीत असतंच, पण तरी.."
यादी अर्धवट होती. सहावा आकडा लिहून तिथेच थांबलेला.
वरून बाथरूमचं दार उघडल्याचा आवाज आला.
वरून बाथरूमचं दार उघडल्याचा आवाज आला.
