Login

परतीचा रस्ता नसतो ४

संघर्ष
भाग ४

सकाळचे साडेआठ वाजले होते. बसस्टॉपवर लोकांची नेहमीची गर्दी होती, शाळकरी मुले, ऑफिसला धावणारे लोक, हातात डबे, पिशव्या, मोबाईल आणि त्या गर्दीत साध्या फिकट निळ्या साडीत उभी होती स्वरा, एका हातात फाईल, दुसऱ्या हातात मुलीचा हात आणि पाठीवर मुलाचा दप्तर होते. स्वतःच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे पण चेहऱ्यावर तिने एक शांत मुखवटा चढवला होता.

अनिरुद्ध वरून तिला बघत होता. त्याला आठवले, हीच स्वरा, जीला तो पावसात भिजू देत नव्हता. जीच्या हातातल्या पिशव्या स्वतः उचलायचा. नेहमी जीला म्हणायचा, “तू फक्त हसत राहा… बाकी मी आहे.”
आणि आज तीच सगळं एकटी उचलत होती. कारण “मी आहे…” म्हणणारा माणूसच निघून गेला होता.


स्वराला एका खाजगी कॉलेजमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून मुलाखत साठी गेली होती. ती आत गेली. समोर तीन लोक बसले होते. त्यांनी तिची सर्टिफिकेटस पाहिली. एकमेकांकडे बघून मान हलवली.

“एक्सेलेन्ट ऍकॅडमीक रेकॉर्ड..”
“गोल्ड मेडल…”
“गुड कम्युनिकेशन..”

ते ऐकून स्वराच्या डोळ्यांत आशेची एक लखलख चमकली.
तेवढ्यात एकाने सहज विचारले, “युअर हसबंड?”

स्वरा दोन सेकंद शांत राहिली.
“नाहीत…”

“ओह…” त्याच्या चेहऱ्यावरची औपचारिक सहानुभूती दोन सेकंद टिकली.

मग दुसऱ्याने विचारले, “काय झाले होते?”

स्वराच्या हातातली फाईल घट्ट झाली. “त्यांनी… आत्महत्या केली.”

क्षणात खोलीत शांतता पसरली. तीनही चेहरे बदलले. कोणी नजरा चुकवल्या. कोणी खुर्चीत मागे रेलले. कोणी पेन फिरवू लागले. मुलाखत संपली.

“ओके वी विल लेट यू नो.” त्यातील एक म्हणाला.

ते चार शब्द, ज्यांचा अर्थ स्वराला चांगलाच माहीत होता. बाहेर पडल्यावर ती काही क्षण जिन्यात उभी राहिली. डोळ्यांत पाणी दाटले होते पण तिने ते बाहेर पडू दिले नाही.
कारण बाहेर तिची मुले वाट पाहत होती.

अनिरुद्धचे डोके खाली झुकले.
“माझ्या एका निर्णयामुळे लोक तिला क्वालिफिकेशन ने नाही, माझ्या मृत्यूने जज करतात आहेत..”

असेच दिवस सरत गेले. एका ठिकाणी नोकरी मिळाली पण पगार कमी आणि काम मात्र जास्त होते. त्यात एकटी बाई म्हणून सामाजिक दृष्टिकोन सुद्धा बदलला होता. लोकांच्या, पुरुषांच्या नजरांचा सामना करावा लागत होता.

सकाळी घर, मुलं, सासू-सासरे, बस, कॉलेज, समाजाचे टोमणे, चारित्र्यावर संशय, परत बाजार, घर, स्वयंपाक, मुलांचा अभ्यास, रात्री बिलं आणि मग शांतपणे रडणे, असा दिनक्रम सुरू होता.

****
एका संध्याकाळी..

आरव अभ्यास करत होता. तो अचानक पुस्तक बंद करून बसला.
“आई…”

स्वरा भाजी चिरत होती.
“हं बेटा?”

त्याचा आवाज थरथरत होता.
“आज शाळेत सगळे म्हणत होते…”

स्वराचे हात थांबले.
“काय म्हणत होते?”

आरवने मान खाली घातली.
“तुझ्या बाबांनी… गळफास घेतला…”
“ते भ्याड होते…”
“ते पळून गेले…”

स्वराच्या हातातून सुरी खाली पडली. क्षणभर तिला श्वास घ्यायलाही कठीण झाले.

वरून अनिरुद्धचा आत्मा अक्षरशः तडफडला.
“नाही…!”
“मी भ्याड नव्हतो…”
पण त्याच्याच मनाने त्याला उत्तर दिले, “मग काय होतास?”
तो शांत झाला, पूर्ण शांत.


स्वरा हळूच आरवजवळ बसली. त्याचा चेहरा हातात घेतला.

“ऐक…”
“लोक काय म्हणतात ते सगळं खरं नसतं.”
“तुझे बाबा वाईट नव्हते. ते खूप चांगले होते…”

तिचा आवाज भरून आला.
“फक्त…”
ती थांबली. स्वतःला सावरले, “फक्त ते एका क्षणी खूप थकले होते.”

आरवने विचारले,
“मग त्यांनी आपल्याला सोडलं का?”

हा प्रश्न स्वराच्या छातीत खोलवर उतरला. तिने मुलाला मिठीत घेतले आणि पहिल्यांदा ती त्याच्यासमोर रडली.


त्या रात्री…

सगळे झोपल्यावर ती अनिरुद्धच्या फोटोसमोर बसली होती.
फोटो हातात घेतला, डोळे लाल झालेले, आवाजात प्रेमही होते आणि रागही.

“तुमच्यावर आजही प्रेम आहे…”
“पण…”
“तुमच्यावर रागही आहे.”
“कारण तुम्ही तर गेलात आणि मला रोज थोडं थोडं मरायला सोडून गेलात.”
“मी जगते आहे…”
“पण कशासाठी?”
“तुमच्या मुलांसाठी.”
“तुमच्या आईवडिलांसाठी.”
“आणि…”
तिने फोटो छातीशी धरला.
“कारण, तुमच्यासारखी हार मानणं मला परवडणार नाही.”

वरून अनिरुद्ध कोसळला. आज पहिल्यांदा त्याला स्वतःचा तिटकारा आला. कारण तो ज्या वेदनेपासून पळाला होता तीच वेदना, त्याच्या पत्नीने रोज जगायला शिकली होती.


क्रमशः

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →