Login

परतीचा रस्ता नसतो १

Katha Sangharsh
परतीचा रस्ता नसतो…
भाग १


“सर, तुम्ही आम्हाला नेहमी सांगता,
‘समस्या कितीही मोठी असली, उपाय शोधायचा… हार मानायची नाही. तुम्ही सुद्धा हे सगळे असेच फॉलो करतात काय? तुम्ही पण असेच आहात काय?”
वर्गाच्या शेवटच्या बाकावर बसलेल्या एका मुलीने अगदी निरागसपणे प्रश्न विचारला आणि क्षणात संपूर्ण वर्गात हशा पिकला. काही विद्यार्थ्यांनी बाकांवर टाळ्या वाजवल्या, काहींनी एकमेकांकडे बघत हसत मान डोलावली.

वर्गाच्या मध्यभागी उभा असलेला अनिरुद्ध क्षणभर त्या मुलीकडे बघत राहिला. मग चेहऱ्यावर नेहमीसारखं हसू आणत त्याने खांदे उडवले.
“मी?” तो हलकेसे हसत म्हणाला, “हो, मी सुद्धा हे सगळे फॉलो करतो.”
क्षणात पुन्हा वर्ग टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमला.

“सर, म्हणूनच तुम्ही आमच्या सर्वांचे फेवरेट आहात.” एक मुलगा मोठ्याने म्हणाला. त्यावर अनिरुद्ध फक्त हसला.

पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे, त्या आत्मविश्वासाने भरलेल्या आवाजामागे, एक माणूस दिवसेंदिवस आतून तुटत चालला होता.

अनिरुद्ध , वय वर्षे पस्तीस. शहरातील नामांकित महाविद्यालयात प्राध्यापक होता. उच्च शिक्षित, प्रभावी व्यक्तिमत्त्व, बोलण्यात अशी जादू, की त्याच्या व्याख्यानासाठी बाहेरच्या कॉलेजमधूनही विद्यार्थी यायचे. स्टेजवर उभा राहिला की शेकडो लोक शांतपणे ऐकत बसायचे.

तो विद्यार्थ्यांना नेहमी सांगायचा,
“मनाला कधी हरू देऊ नका…”
“भावना मनात दाबून ठेवू नका…”
“बोलून दाखवा…”
“जीवन एकदाच मिळतं…”
आणि लोक भारावून जायचे.
पण…
कधी कधी जे लोक दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश पेरत असतात, त्यांच्याच मनात हळूहळू काळोख साचत जातो.
आणि ते कोणालाच दिसत नाही.

त्या दिवशीही सगळे अगदी नेहमीसारखेच होते.

सकाळी कॉलेज, नेहमीचा गडबडीतला नाश्ता, लेक्चर, विद्यार्थ्यांचे प्रश्न, कॉरिडॉरमध्ये थांबून घेतलेले फोटो, स्टाफरूममध्ये चहा, सहकाऱ्यांसोबत गप्पा करणे, हसणे, सगळे इतके सामान्य, इतके नेहमीसारखे की कोणालाच कल्पना आली नसेल की आजचा दिवस वेगळा असेल.

स्टाफरूममधून बाहेर पडताना एक सहकारी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, “सर, उद्याच्या सेमिनारला वेळेवर या हं, सगळे तुमची वाट बघत असतील.”

अनिरुद्धने हलकेसे स्मित केले.
“नक्की.”

****

रात्रीचे साडेदहा वाजले होते, घरात हळूहळू शांतता पसरत होती. हॉलमधला टीव्ही बंद झाला होता. स्वयंपाकघर आवरून झाले होते.

स्वरा अनिरुद्धची पत्नी पलंग नीट करत होती. मोठा मुलगा पुस्तक उघडून गृहपाठ पूर्ण करत होता, तर लहान मुलगी बाबांच्या मांडीवर बसण्यासाठी हट्ट करत होती.

“बाबा…” ती गोड आवाजात म्हणाली, “उद्या मला शाळेत सोडायला यायचं हं…”

अनिरुद्धने तिला जवळ घेतले. तिच्या केसांवरून हळूवार हात फिरवला आणि म्हणाला, “नक्की.”
फक्त एक शब्द, पण त्या एका शब्दात कितीतरी न बोललेले दडले होते. त्याचा आवाज थोडासा थरथरला होता.
पण घरातल्या कुणाचेच त्याकडे लक्ष गेले नाही.

कारण…
आपले माणसं तुटत असताना आवाज बदलतो, आणि आपण तो रोजचा थकवा समजून दुर्लक्ष करतो.

रात्रीचे अकरा वाजले होते. सगळे झोपले होते. घर पूर्ण शांत झाले होते. अनिरुद्ध त्याच्या खोलीत एकटाच बसला होता.
खोलीत फक्त टेबललॅम्पचा पिवळसर प्रकाश पसरला होता.
त्याच्या समोर एक वही, एक पेन, काही उघडलेल्या फाईल्स, बँकेची कागदपत्रं, कर्जाचे हप्ते, खर्चाचे आकडे होते.
आणि मनात हजारो आवाज होते,
तू अपयशी आहेस…
तुझ्याकडून काही होत नाही…
कर्ज वाढत चाललंय…
जबाबदाऱ्या संपत नाहीत…
सगळ्यांच्या अपेक्षा…
तू थकलायस…

अनिरुद्धने दोन्ही हातांनी डोके पकडले. त्याच्या कपाळावर घाम जमा झाला होता. श्वास जड झाला होता. त्याने समोर ठेवलेला कुटुंबाचा फोटो हातात घेतला.

फोटोत, आई-बाबा, स्वरा, दोन्ही मुलं होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर निर्मळ, विश्वासाने भरलेले हसू होते.

त्याचे ओठ थरथरले, डोळे भरून आले. त्याने फोटो छातीशी घट्ट धरला आणि कुजबुजला, “माफ करा…”
ते फक्त दोन शब्द होते आणि एका क्षणाच्या निर्णयाने एका संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून गेले.




किती वेळ गेला, त्यालाच समजले नाही. त्याने पुन्हा डोळे उघडले पण तो त्याच्या खोलीत नव्हता. तो हवेत होता. वर… खूप वर, जणू काही शरीराचे ओझेच संपले होते. त्याने घाबरून खाली पाहिले आणि त्याचा श्वास थांबला.
त्याचे शरीर , निर्जीव, निश्चल. खोलीत गोंधळ उडाला होता. लोक धावत होते. दारे आपटली जात होती. कुणीतरी डॉक्टरला फोन करत होते आणि त्या सगळ्या गोंधळावर एक आवाज आकाश फाडत होता.

“अनिरुद्धऽऽऽ!”
स्वराचा तो आवाज ऐकताच त्याच्या स्वतःच्या अंगावर काटा आला.

“स्वरा! मी इथे आहे!”
“आई!”
“बाबा!”
“मी, मी हा इथे आहे..” तो ओरडत होता पण त्याचा आवाज कुणालाच ऐकू येत नव्हता.

खाली…
त्याची आई सुमित्रा त्याच्या छातीवर डोकं ठेवून हंबरडा फोडत होती. त्याचे वडील शरद, ज्यांनी आयुष्यभर डोळ्यातले पाणी कोणासमोर दाखवले नव्हते, ते आज त्यांच्या मुलाच्या मृतदेहाजवळ बसून अक्षरशः थरथरत होते.
त्यांनी अनिरुद्धचा चेहरा हातात घेतला आणि गहिवरलेल्या आवाजात म्हणाले,
“अरे… म्हातारपणी खांदा द्यायचा तू…”
त्यांचा आवाज तुटला होता, “ आम्ही कसे करायचे?”

ते शब्द ऐकून अनिरुद्धच्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले.

स्वरा…
ती एका कोपऱ्यात उभी होती, पूर्ण सुन्न, एका हातात मुलगी, दुसऱ्या हाताने मुलाला कवटाळलेले होते.

मोठा मुलगा रडत रडत सतत एकच विचारत होता,
“आई… बाबा उठत का नाहीत?”
“आई… बाबा झोपले का?”
“आई… बोल ना…”
पण स्वराकडे उत्तर नव्हते. फक्त भरलेले, रिकामे, तुटलेले डोळे होते.

“स्वरा, इकडे बघ, मी..मी इकडे आहे.” अनिरुद्ध वेड्यासारखा ओरडत होता, पण कुणीच त्याच्याकडे बघत नव्हते.

खाली त्याच्या घरात लोकांची गर्दी वाढत होती. कोणी रडत होते, कोणी कुजबुजत होते, कोणी डोके हलवत होते,
पण अनिरुद्धला अजून माहीत नव्हते त्याच्या जाण्याने खरंच प्रश्न सुटले होते काय?

क्रमशः…


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →