Login

परतीचा रस्ता नसतो ५

संघर्ष
भाग ५


अनिरुद्धला जाऊन आज पूर्ण एक वर्ष झाले होते. घर तेच होते, त्या भिंती, त्या खिडक्या, दारावरची तीच नावाची पाटी, फरक फक्त एवढाच होता, पूर्वी त्या घरात एक आधार होता.
आता त्या घरात एक लढाई होती.

अनिरुद्ध रोजच्यासारखाच वरून आपल्या घराकडे पाहत होता. पण आज आज काहीतरी वेगळे जाणवत होते. त्या घरात अजूनही दु:ख होते, आठवणी होत्या, रिकामेपण होते,
पण आज तिथे हार नव्हती.

सकाळचे सात वाजले होते.
किचनमध्ये गॅसवर चहा उकळत होता.
डब्यांची तयारी सुरू होती.

अन्वी आता सात वर्षांची झाली होती, गोड, निरागस, पण वयापेक्षा जास्त समजूतदार.

आरव आता आईचा उजवा हात झाला होता. स्वतःची बॅग, बहिणीची बाटली, आजोबांची औषधं, शाळेचे डबे, सगळे तो अगदी व्यवस्थित काम करत होता.

अनिरुद्ध हे सगळे पाहत होता. त्याच्या डोळ्यांत अभिमान होता आणि त्याहून जास्त वेदना. कारण ज्या मुलांना तो “मोठं होताना बघेन…” म्हणायचा, त्यांच्या प्रत्येक बदलाचा तो आता फक्त साक्षीदार होता, सहभागी नव्हता.

***

त्या दिवशी शाळेत “माय हिरो” या विषयावर भाषण स्पर्धा होती. अन्वी खूप उत्साहात तयार होत होती.

“आई…” ती आनंदाने म्हणाली, “मी आज छान बोलणार.”

स्वरा हसली.
“नक्की बोलशील.”
“कोणत्या विषयावर बोलणार आहेस?”

अन्वी अभिमानाने म्हणाली, “माझ्या हिरोवर.”

स्वरा सहज हसत म्हणाली, “बाबांवर?”

अन्वी काही क्षण शांत झाली. मग तिने हळूच मान हलवली.
“नाही…”

स्वराच्या हातातला चमचा थांबला.
“मग?”

अन्वी धावत आली. आईच्या कंबरेला मिठी मारली आणि निरागसपणे म्हणाली,
“माझी हिरो तू आहेस.”

क्षणभर स्वराला काय बोलावे काहीच समजले नाही. तिचे डोळे भरून आले.
“मी?”

अन्वीने मान डोलावली.
“हो…”
“कारण बाबा देवाघरी गेले…”

ती आईच्या डोळ्यांत बघत पुढे म्हणाली,
“पण तू… रोज लढतेस.”
“तू रडतेस… तरी हसतेस…”
“तू दमतेस… तरी काम करायचे थांबत नाहीस…”

मग ती उत्साहाने म्हणाली,
“माझ्या टीचर म्हणाल्या…”

क्षणभर थांबून ती म्हणाली,
“खरे हिरो ते असतात, जे पळत नाहीत, लढतात.”

अनिरुद्ध तिथेच थिजला. त्या एका वाक्याने त्याच्या आत्म्याला आरपार छेदले.
“खरे हिरो ते असतात, जे पळत नाहीत…”

तो खाली बसला. दोन्ही हातांनी डोके पकडले आणि पहिल्यांदाच पूर्णपणे स्वतःसमोर हरला होता.

“मी पळालो…”
त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.
“मी हरलो…”
“मी…”
त्याचा आवाज तुटला.
“मी माझ्या लोकांना शिक्षा दिली…”
“मला परत जायचे आहे….” तो ओरडला..

तेवढ्यात…
आकाशात पुन्हा तो गंभीर आवाज घुमला,
“पश्चात्ताप उशिरा झाला, पण आता परतीचा रस्ता नाही…”

डोळ्यांतून अश्रू वाहत होते.
“माफ कर…”
तो रडत म्हणाला.
“स्वरा…”
“आई…”
“बाबा…”
“आरव…”
“अन्वी…”
“माफ करा…”

****

समाप्त

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →