लघुकथा लेखन स्पर्धा- एप्रिल:-२०२४
विषय:- विठ्ठलाचे दर्शन
शीर्षक:- पंढरपूरची वारी
"उज्ज्वल, आयुष्यात मला एकदा तरी पंढरपूरची वारी करायची आहे रे." अंथरूणाला खिळून असलेली आई मंगल मुलगा उज्ज्वलला मोठ्या आशेने पाहत म्हणाली.
"आई, अगोदर तू बरी हो, मग बघता येईल पंढरपूरच्या वारीचं. वारी काय पळून जाणार नाही." उज्ज्वल उपहासाने म्हणाला.
"असे नको बोलूस रे? अख्ख्या महाराष्ट्राचा देव आहे तो विठ्ठल! त्याचे दर्शन घेतले की मला बरं वाटेल बघ. म्हणून म्हणतेय घेऊन चल मला." मंगल डोळ्यांत पाणी आणत म्हणाली.
"आई, आधी तुमची तब्येत बघा. इतका मोठा प्रवास झेपणार नाही तुम्हाला. इथूनच दर्शन घ्या." त्यांचे संभाषण ऐकून सून दिक्षा कोरड्या स्वरात म्हणाली.
"नाही तर काय? एवढे औषध गोळ्या चालू आहेत. त्याच्याने काही फरक पडला नाही. मग तो तुझा दगडाचा विठ्ठल काय बरे करणार तुला?" उपरोधक हसत उज्ज्वल म्हणाला.
"तो दगडाचा असला तरी त्याला पाझर फुटतो रे. असे बोलून त्याला कमी लेखू नकोस. माझी त्याच्यावर मनापासून श्रद्धा आहे. त्याच्या मनात आलं तर तो नक्कीच मला इथे येऊन दर्शन देईल." तिच्या रूममध्ये असलेल्या सावळ्या विठ्ठलाच्या मूर्तीला मनोभावे नमस्कार करत ती म्हणाली.
"कोणत्या युगात वावरतेस तू, आई? तुझी श्रद्धा मान्य करतो मी. तो घरबसल्या तुला दर्शन देईल हा निव्वळ तुझा भ्रम आणि अंधश्रद्धा आहे. असो.. उगीच आता वाद नको यावर. मी ऑफिसला जातोय. तर शांततेत जाऊ दे. औषध-गोळ्या घे." असे म्हणून तो ऑफिसला निघून गेला.
"बरोबरच बोलत होते हे. उगीच नसता विचार करून, स्वतःचे आणि आमचे डोके पिकवू नका. अर्जंट मिटिंग आहे मलाही जायचे. शांता येईल. तिला सगळं सांगून ठेवले आहे. प्लीज, तिला कोऑपरेट करा." दिक्षा मंगलचे औषध-गोळ्या तिला दाखवत म्हणाली.
मंगल तिच्या सून आणि मुलासोबत एका शहरात राहत होती. दोघेही नोकरी करणारे. त्यामुळे ते दिवसभर बाहेर असायचे. नातवंडे होती; पण तीही दुसरीकडे शिकायला होती. मंगलच्या पतीचे काही महिन्यांपूर्वी अकस्मात निधन झाले होते. त्याचा धक्का बसल्याने ती अंथरूणाला खिळून होती. मंगलचे पंढरपूरच्या विठ्ठलावर नितांत श्रद्धा होती. चांगली होती तेव्हा ती मनोभावे त्याची पूजा, प्रार्थना करायची. पती हयात असताना तिला वारी करायची होती. पण काही ना काही कारणाने ते राहून गेलं होतं.
आता तर ती आजारी पडल्यापासून एकच आस लावून बसलेली पंढरपूरची वारी आणि विठ्ठलाचे दर्शन.
दिक्षा घराबाहेर पडत नाही तोच ती आज येऊ शकत नाही असे सांगण्याचा शांताचा फोन आला. त्यामुळे ती संतापली. ती तडातडा बोलू लागली तेव्हा गेटजवळ गावठी वेषातील एक जोडपं येऊन उभं राहिलं.
बोलता बोलता तिचे लक्ष तिकडे गेले. तिने रागात फोन बंद केला आणि रागाने फणकारत त्यांच्यावर खेकसली,"हे बघा सकाळी सकाळी तुम्ही जर भिक मागायला आला असाल तर सरळ चालते व्हा."
"न्हाई ओ, तायसाब. आम्ही भिक मागायला न्हाई आलो. काही काम असलं तर द्या. तुम्ही सांगाल ते काम करू आम्ही." त्या जोडप्यातील तरूण स्त्री हात जोडत पुढे येत आबदीने आर्जव करत म्हणाली.
त्या दोघांच्या चेहऱ्यावर एक अनोखं तेज होते. ते पाहून दिक्षाने नकळत विश्वास ठेवला आणि मनात विचार केला,"यांच्याकडे पाहून का कुणास ठाऊक विश्वास ठेवावासा वाटतो. जर काही केले तरी सीसीटीव्ही आहे घरात. असं ही मला कामासाठी माणसांची गरज आहेच. यांना ठेवते आजच्या दिवस. उद्या शांता येईलच की."
"ठीक आहे, पगार मी संध्याकाळी काम पाहिल्यावरच देईन. काही चालाखी नको. नाही तर पोलिसांत देईन." असे बजावून सांगत तिने त्यांना सगळे काम समजून सांगितले.
मंगलशी त्यांची ओळख करून देऊन ती निघून गेली.
त्या जोडप्यांनी सगळं काम व्यवस्थित केले. मंगलच्या तर त्यांच्या चेहऱ्यावरील तेज पाहूनच निम्मा आजार कमी झाला होता. कालपर्यंत तिला नीट उठून बसता येत नव्हते. ती आता उठून बसली होती. ते दोघे मनापासून तिची सेवा करत होते.
दिक्षाला मात्र त्यांच्याबद्दल शंका होती. तिने मोबाईलमध्ये सीसीटीव्हीचे एक्सेस ठेवले होते. ती ऑफिसमध्ये असूनही त्यांची सगळी खबर ठेवत होती. त्यांच्याबद्दल संशयास्पद काहीच आढळून आले नाही. तेव्हा तिला हायसे वाटले.
तिने उज्ज्वला त्यांच्याबद्दल कानावर घातल्यावर आधी तो चिडला. नंतर तिने समजावल्यावर तो शांत झाला.
दोघे जेव्हा संध्याकाळी घरी आले तेव्हा त्यांचे काम पाहून खुश झाले. त्यांना योग्य मोबदला देऊन पाठवून द्यावे हा विचार करत होते. तेव्हा शांता आठ दिवस येणार नसल्याचे तिने सांगितले. त्यामुळे त्यांना आठ दिवस काम सांगितले.
पण जेव्हा त्यांनी आम्हाला घर नाही, इथेच एका कोपऱ्यात राहू द्या असे म्हणाले तेव्हा त्यांनी दबकत त्यांना घराच्या अडगळीच्या खोलीत राहायला सांगितले. त्यांनी आनंदाने मान्य केले.
आठ दिवस त्यांनी मंगलची मनापासून सेवा केली. त्याने तिच्या तब्येतीत कमालीची सुधारणा झाली.
दिक्षा आणि उज्ज्वल आश्चर्यचकित झाले.
बोलता बोलता मंगलने त्यांच्याबद्दल चौकशी केली असता त्यांनी सांगितले की ते पंढरपूरचे आहेत. तेव्हा तिच्या डोळ्यांत चमक आली. तिने तिची इच्छा बोलून दाखवली. तेव्हा ते तिला घेऊन जातील असे आश्वासन दिले.
विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जाणार ह्या सुखद विचाराने तिला आणखी बरे वाटू लागले.
आठ दिवस असेच निघून गेले. त्या जोडप्यांनी कामात कोणतीही कसूर ठेवली नाही. त्यामुळे उज्ज्वल आणि दिक्षा खुश होते.
मंगलने त्यांच्यासोबत पंढरपूरला जाण्याची इच्छा बोलून दाखवली तेव्हा का कुणास ठाऊक लगेच ते दोघेही तिच्यासोबत जाण्यासाठी तयार झाले. तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला.
आठव्या दिवशी ते जोडपे, मंगल, दिक्षा आणि उज्ज्वल पंढरपूरला निघाले.
पंढरपूर येताच मंदिराचा कळस पाहून मंगल खूप खुश झाली. चंद्रभागेच्या वाळवंटातील भक्तीचे वारे, विठू नामाचा जयघोष, टाळ, मृदंग आणि चिपळ्यांच्या आवाजाच्या भक्तीमय वातावरणात तिला भरून पावल्यासारखे झाले.
तेवढ्यात ते जोडपे म्हणाले,"आमचे ठिकाण आले. आम्ही निघतो आता. घरी सगळे वाट पाहत असतील."
थोड्या वेळात ते निघून गेले.
मंगलला आता विठू दर्शनाची आस लागलेली होती. भक्तीभावाने विठूचे नाव घेत ती त्या दोघांसोबत रांगेत उभी होती.
हळूहळू पुढे सरकत शेवटी विटेवर कमरेवर हात ठेवून उभा असलेला सावळा विठ्ठलाचे दर्शन घेतले. दोन मिनिटे तिने भक्तिभावाने डोळे मिटले तर नजरेसमोर त्या जोडप्याचे हसरे रूप समोर आले. धक्का लागल्यात तिने पटकन डोळे उघडून पाहिले तर त्या सावळ्या मूर्तीतही तीच छबी दिसली. आता मात्र तिला भरून आले.
तीच अवस्था दिक्षा आणि उज्ज्वल झाली.
प्रत्यक्ष विठ्ठल - रूक्मिणी आपल्या घरात राबले. आईची सेवा केली. आपण मात्र त्याला दगडाचा देव म्हणून हिणवले याने दोघांना पश्चात्ताप झाला आणि त्यांनी साश्रुनयनांनी त्या मूर्तीवर डोके टेकवून माफी मागितली.
नंतर मंगलचेही दोघांनी पाय धरले.
"आई, तुझ्या असीम भक्तीमुळे साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाले. धन्य झालो आम्ही."
मंगलच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित पसरले.
समाप्त -
मनापासून भक्ती आणि श्रद्धा असेल तर देव माणसाच्या रूपात येऊन स्वतः दर्शन देतो.
©️ जयश्री शिंदे
