Login

पालवी - भाग ९

Simple and innocent girl from Mumbai, Madhu falls in love with charming young man Ashish from Pune! Though these two are sure about their future together, will their families accept their love?

"मधु, मी विचार करतोय पुढच्या आठवड्यात पुण्याला घरी जाऊन येईन. आईचा फोन आला होता सकाळी. बाबांचा ६० वा वाढदिवस आहे म्हणून छोटंसं सेलिब्रेशन करू असं म्हणाली. मला पण त्यांना आपल्याबद्दल सांगायचं आहेच. फोनवर सांगण्यापेक्षा प्रत्यक्षात भेटून सांगितलेलं चांगलं, नाही का?", आशिष आणि मधु ऑफिसनंतर संध्याकाळी शिवाजी पार्क मध्ये भेटले होते. वसुधाताईंना त्यांच्या नात्याबद्दल सांगून जवळ जवळ दोन महिने होऊन गेले होते. त्याही आशिषच्या घरच्यांना भेटण्यासाठी मागे लागल्या होत्या, पण आशिषला घरी सांगायला योग्य संधी मिळत नव्हती. एवढी नाजूक गोष्टं फोनवर सांगणं त्याला योग्य वाटत नव्हतं. बाबांच्या वाढदिवसाला सगळे आनंदात असतील तेव्हा योग्य वेळ बघून मधुबद्दल घरी सांगायचं असं ठरवून तो पुढच्याच आठवड्यात पुण्याला निघणार होता. मधुच्या प्रेमात पडल्यापासून पहिल्यांदाच तो तिच्यापासून इतके दिवस लांब जाणार होता. ती आपल्याला आता आठवडाभर दिसणार नाहीये या कल्पेनेने त्याच्या मनाची आत्तापासूनच घालमेल होत होती. मधुची अवस्थाही वेगळी नव्हती. आशिषचं आसपास असणं, त्याची थट्टा मस्करी, त्याचं वसुधाताईंबरोबर मिळून तिला चिडवणं आणि त्याच्या खट्याळ हरकती.. सगळंच ती खूप मिस करणार होती.

"आशिष एवढं अख्खा आठवडा जायलाच हवं का रे? मला मान्य आहे तू खूप दिवसांनी घरी चालला आहेस. पण पुणं काय जवळच आहे ना. आत्ता एक-दोन दिवस जाऊन ये आणि नंतर पुन्हा जा", मधु त्याला बिलगत म्हणाली.

"माझ्या हातात असतं तर मी एकही दिवस तुला सोडून गेलो नसतो. तुझा गोड चेहरा बघितल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरवात करायची कल्पनाही मला आवडत नाहीये. पण आईने एवढं बोलावलंय, मला तिचं मनही नाही दुखवायचंय. आधीच माझ्या आणि बाबांच्या वादात तिची फार ओढाताण होते. आणि मी रोज कॉल करेनच की तुला. एकदा का घरी सांगितलं की मग काय लवकरच आपण कायमचे एकत्र राहू", आशिष तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. त्यांच्या सहजीवनाच्या कल्पनेनेच मधुचं मन आनंदानं भरून आलं.

पुढच्या आठवड्यात आशिष पुण्याला गेला. मधु ऑफिसनंतर मन रामावण्यासाठी पुस्तक वाचत बसली होती.

"मधु, आशिष पोहोचला का गं पुण्याला? काही फोनवगैरे आला होता का त्याचा?", वसुधाताई खिडकीत वाचत बसलेल्या मधुला म्हणाल्या.

"हो आई, दुपारीच पोहोचला तो. सगळे खुश झाले त्याला बघून असं म्हणत होता. आय होप त्याच्या घरीपण सगळे आमचं नातं मान्य करतील. म्हणजे तसं प्रॉब्लेम व्हायचं काही कारण नाहीये. पण एकदा सगळ्यांनी संमत्ती दिली की आपल्याला पण त्यांच्याशी बोलता येईल ना", मधु पुस्तकातून डोकं वर न काढता म्हणाली.

"हो ना, खरं तर आत्ता चांगला प्रसंग होता. आपणही आशिष बरोबरच गेलो असतो, सगळ्यांची भेटही झाली असती आणि आपण एकत्र मिळून त्याच्या बाबांचा वाढदिवस साजरा केला असता", वसुधाताई मधुच्या बाजूला बसत म्हणाल्या.

"हो आई पण त्यांना अजून आमच्याबद्दल माहित नसताना आपण असं अचानक जाणं बरोबर नसतं वाटलं ना. भेटी काय होत राहतील पुढे. तू झोप आता, खूप उशीर झालाय. मी पण एवढं पान संपवून झोपतेच", मधु म्हणाली.

तो आठवडा खूपच हळू हळू पुढे सरकत होता असं मधूला वाटत होतं. आशिष जाऊन २-३ दिवस होऊन गेले होते. आदल्या दिवशीच त्याचा फोन आला होता. वाढदिवसाची पार्टी खूप छान झाली, सगळे नातेवाईक भेटले, खूप मजा आली म्हणाला. त्याला एवढं खुश पाहून मधुला पण छान वाटलं. पुण्याला जाताना तो थोडा टेन्शनमध्ये वाटत होता पण काल फोनवर तसं जाणवलं नाही. आज तो घरी त्यांच्याबद्दल सांगणार होता. म्हणुन मधु आतुरतेने त्याच्या फोनची वाट बघत होती. तिचं ऑफिसच्या कामातही लक्ष लागत नव्हतं.

"काय मॅडम, एवढं कसलं टेन्शन घेतलंय", अनु शेजारच्या डेस्कवरून डोकावत म्हणाली.

"काही नाही गं, आशिषचे घरचे काय म्हणाले असतील याचा विचार करतेय. त्यांनी आमच्या लग्नाला नकार दिला तर?", मधुच्या चेहऱ्यावर काळजीचं जाळं पसरलं होतं.

"असे कसे नकार देतील ते, एकदा तुझा फोटो पहिला की फुल फिदा होतील ते तुझ्यावर. कॉलेजमध्ये नाही का तू जाशील तिकडे मुलं घायाळ व्हायची", अनु तिला चिडवत म्हणाली.

"त्यांची गोष्टं वेगळी होती गं. आशिषचे आई वडील काय माझे डोळे आणि चेहरा बघून प्रेमात पडणार आहेत का. होणाऱ्या सुनेकडून त्यांच्यापण काहीतरी अपेक्षा असतीलच की. त्या मी पूर्ण नाही केल्या तर?",मधु पुन्हा पुन्हा फोन अनलॉक करून बघत होती.

"अगं वेडी आहेस का? ती काय परीक्षा आहे का? त्यांच्या काही अपेक्षा असतीलच तर तू शिकशील की नंतर. आणि तसाही आशिष तर तुझ्यावर पूर्ण लट्टू आहे. मग काय टेन्शन. तो सांभाळून घेईल तुला. आता सारखं तो फोन बघणं थांबव आणि जेवायला चल", अनु मधुला खुर्चीतून उठवत म्हणाली.

दिवसाची रात्र झाली, अजून आशिषचा काहीच फोन किंवा मेसेज आला नव्हता. मधुनेही एक दोनदा फोन करायचा प्रयत्न केला पण त्याने उचलला नाही. तिला काय करावं कळतंच नव्हतं. 'असा काय हा, याला माहित नाही का मी किती टेन्शन मध्ये आहे ते? एक फोन करून सांगायला काय होतंय. बरं मी करतेय तो ही उचलत नाहीये. काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना. जाऊदे बिझी असेल म्हणून वेळ नसेल मिळाला कॉल करायला. उद्या करेल. निघाला तेव्हा तर अगदी मधु मी तुझ्यापासून लांब कसा राहणार, मी आत्ताच तुला मिस करतोय वगैरे म्हणत होता. आणि आता बघा, ना फोन ना मेसेज. येऊ दे त्याला परत मग बघते मी', मधु कुशीवर वळत विचार करत होती. रात्रीचे बारा वाजून गेलेले पण ती टक्कं जागी होती. आत्ता कितीही नाराज असली तरी तो परत आल्यावर त्याच्या घाऱ्या डोळ्यांमधलं तिच्यावरचं प्रेम आणि त्याचं निरागस हसणं बघून ती सगळं विसरून त्याच्या मिठीत विरघळणार होती हे तिलाही माहीती होतं.

सकाळी उठल्या उठल्या मधुने फोन चेक केला, आशिषचा अजूनही काही मेसेज नव्हता. शेवटी न राहवून तिनेच पुन्हा फोन लावला. यावेळी कोणीतरी फोन उचलला पण आवाज मात्र त्याचा नव्हता.

"हॅलो, कोण मधु का?", पलीकडून वयस्कर आवाज आला. मधुला दोन मिनिटं काय बोलावं ते सुचेना.

"हॅलो? बाळा मी आशूची आई बोलतेय", समोरून रानडे काकूंचा आवाज आला.

"अं हो मी मधु बोलतेय. आशिष आहे का तिकडे?", मधुने धीर गोळाकरून विचारलं.

"नाही अगं, तो जरा बाहेर गेलाय आणि फोन घरीच विसरलाय", पलीकडून उत्तर आलं. आशिषने ह्यांना सांगितलं असेल का माझ्याबद्दल? पुढे काय बोलावं ते मधुला कळेना.

"आता तू कॉल केलाच आहेस तर मी तुझ्याशी जरा बोललेलं चालेल का तुला?", शेवटी त्याच जरा अडखळत म्हणाल्या. त्यांच्या आवाजात मधुला काळजी, प्रेम, भीती, उत्कंठा अशा अनेक भावना एकत्र जाणवल्या.

"हो बोला ना", ती म्हणाली. पुढची १५ -२० मिनिटं मधु काहीच न बोलता ऐकत होती.

"हॅलो? मधु? ऐकतेयस ना?", मधुकडून काहीच उत्तर न आल्याने पलीकडून रानडे काकूंनी विचारलं.

"हं", मधु एवढंच म्हणाली.

"हे असं सगळं आहे मधु. तूच माझी शेवटची आशा आहेस. मला तुला खरंच या परिस्थितीमध्ये टाकायचं नव्हतं. मला माहिती आहे, आशिषला हे अजिबात आवडणार नाही. पण एक आई म्हणून मी तुझ्याकडे मदत मागते आहे, आता सगळं तुझ्याच हातात आहे", रानडे काकूंच्या आवाजतले हुंदके मधुला फोनवर ऐकू येत होते.

"मी बघते", एवढं म्हणून मधुने फोन ठेवला. फोन तसाच हातात घेऊन ती कितीतरी वेळ तशीच बसून होती. फोनच्या रिंगने ती पुन्हा भानावर आली. स्क्रीनवर आशिषच्या आणि तिच्या फोटोखाली 'आशिष कॉलिंग' असं लिहून आलं. आशिष निघायच्या एक दिवस आधी तिने तो फोटो काढला होता. ज्या कॉलची ती कालपासून एवढ्या आतुरतेने वाट पाहत होती तो कॉल तिने आज कट केला.

क्रमशः…!

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →