Login

पालवी - भाग ७

Simple and innocent girl from Mumbai, Madhu falls in love with charming young man Ashish from Pune! Though these two are sure about their future together, will their families accept their love?

"आशिष.. तू मजा करतोयस ना? मला माहिती आहे तुला मला त्रास द्यायला आवडतं", मधु आशिषच्या खांद्याला धरून त्याला स्वतःकडे वळवायचा प्रयत्न करत म्हणाली. पण आशिष दुसरीकडेच बघत राहिला. आता मात्र मधुचा धीर सुटला. 'आशिषचं खरंच लग्न झालंय? मग आमचं नातं काय आहे? ', मधुने स्वतःशीच विचार केला.

"हे तू मला आत्ता का सांगतोयस? इतके दिवस माझ्याशी फ्लर्ट करताना, माझा हात पकडताना तुला हे सांगावंसं नाही वाटलं का? का तुला वाटलं मला ह्याने काहीच फरक पडणार नाही? म्हणजे मी कोणाच्या तरी संसारात विष कालवतेय हे माहित असुन मी हे सगळं चालू देईन असं वाटलं का तुला? तुझ्या घरी तुझी बायको आहे तर आपलं नातं काय आहे? तू काही बोलणार आहेस का?", मधुचा संताप अनावर झाला होता. आशिष अजूनही तिच्याकडे बघणं टाळत होता, त्याने तिच्या जीवाची घालमेल वाढत होती. 

आशिषचे खांदे हलताना बघुन तिने त्याला दोन्ही हातांनी स्वतःकडे वळवलं, तर तो चक्क खदखदून हसत होता. मधुला काही कळलंच नाही.

"मधु अगं तू..", आशिष हसणं थांबवायचा प्रयत्न करत होता, "मधु अगं तू कशावरही काय विश्वास ठेवतेस. असं कसं लग्न झालं असेल माझं? इतके दिवस ओळखतेस तू मला, कधीतरी वाटलं का तुला की माझी दुसरीकडे कुठेतरी बायको असेल", आशिष अजूनही हसतंच होता.

"म्हणजे? तू गम्मत करत होतास?", मधुचा चेहरा आता रागाने लाल झाला होता.

"हो अफकोर्स.. अगं आणि तू बर्फाचा गोळा काय खाली टाकलास. तरी नशीब मला फेकून नाही मारलास नाहीतर माझा चांगला शर्ट खराब झाला असता", आशिषचं पोट आता हसून हसून दुखायला लागलेलं, "आणि मधु.. काय डायलॉग मारलास गं, संसारात विष कालवतेय वगैरे. खरं सांग काकूंबरोबर तू पण त्या सांस-बहू सिरिअल्स बघतेस ना".. हसून हसून आशिषच्या डोळ्यांतून पाणी यायला लागलेलं.

"आशिष धिस इज टू मच. कशातही काय मजा करतोस. इथं जीव जायची वेळ आली होती माझ्यावर आणि तुला तुझ्या शर्टाची पडली आहे? काही विचारल्यावर सरळ उत्तर देता येतंच नाही का? आणि आता माझ्यावरच हसतोयस. मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी, चालले मी", म्हणून मधु उठून जायला निघाली. पण आशिषने तिचा हात धरून तिला आपल्या जवळ बसवलं. त्या चिडलेल्या अवस्थेत सुद्धा त्याच्या एवढं जवळ बसल्यावर मधुच्या सर्वांगातून एक वेगळीच लहर गेली.

"अगं तू एकदम एवढं सिरिअस बोलायला लागलीस म्हणून म्हंटलं जरा गम्मत करू", आशिष मधुच्या चेहऱ्याकडे बघून पुन्हा येणारं हसू दाबायचा प्रयत्न करत म्हणाला.

"अशक्य आहेस हां तू, अजून तुला हसायला येतंय. मी चिडलेय ते कळत नाहीये का तुला. मी अशी मस्करी केली असती तर? पहिल्या डेटवर कोणी अशी मस्करी करतं का?", मधुने विचारलं.

"हो अगं जरा जास्तच झाली मजा मान्य आहे. आणि तुझा राग पण कळतोय मला. पण तुझ्या लाल नाकाकडे आणि लाल-हिरव्या ओठांकडे बघून मला तुला सिरिअस्लि घेणं कठीण जातंय जरा," आशिषचं हसणं परत सुरु झालं. मधुने पटकन तिच्या पाकिटाच्या आरशात बघितलं, तिचे बर्फाच्या गोळ्याने लाल हिरवे झालेले ओठ पाहून तिला पण हसायला आलं.

"तू काय हसतोयस, तुझे पण ओठ तसेच दिसतायत. आणि हे मला दे, तुझ्यामुळे माझा गोळा पडला खाली", त्याच्या हातातून त्याचा बर्फाचा गोळा काढून घेत मधु म्हणाली. वरवर चिडली असली तरी आशिष मजा करत होता कळल्यावर तिचा जीव भांड्यात पडला होता. 

"त्यापेक्षा दोघं शेअर करूया ना", तिच्या खांद्यावर हनुवटी टेकवत आशिष लाडाने म्हणाला. आता दुसरीकडे बघायची पाळी मधुची होती.

"माझ्या घरी आई, बाबा, दादा आणि वहिनी असतात. आमचा फॅमिली बिझनेस आहे. बाबा आणि दादा दोघं तोच सांभाळतात. कॉलेज पूर्ण झाल्यावर मी पण त्यांना जॉईन व्हावं अशी त्यांची इच्छा होती पण मला काहीतरी वेगळं करायचं होतं. स्वतःच्या बळावर. थोडे दिवस पुण्यात राहून जॉब केला मी. पण बाबांना माझं दुसरीकडे नोकरी करणं मान्य नव्हतं. त्यामुळे रोज घरात तेच वाद व्हायला लागले. स्वतःचा बिझनेस असताना दुसऱ्यांकडे चाकरी कशाला करायची असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून ते रोजचे वाद टाळायला मी मुंबई ला शिफ्ट झालो", आशिषने सांगितलं.

"अच्छा, पण मग तुमचा एवढा मोठा बिझनेस असताना तू इथे भाड्याने का राहतोस, तुला काय सहज एखादं घर घेता येईल", मधुने विचारलं.

"आता मी त्या बिझनेस मध्ये काम करत नाही म्हंटल्यावर त्या पैश्यांवर पण माझा काहीच अधिकार नाही ना. घर घ्यायचंच असेल तर ते पण मी माझ्या बळावर घेईन. आणि आता तू पण आहेस की माझ्याबरोबर", आशिषने मधुचा हात हातात घेत म्हंटलं. मधुला त्याचा खुप अभिमान वाटला, आजकाल कोण असं हातात आयता मिळालेला बिझनेस सोडून स्वतःच्या जीवावर काहीतरी करायला तयार होतं. तिने हसून आपला दुसरा हात त्याच्या हातावर ठेवला.

"अफकोर्स मी आहेच रे. पण वाद होतात म्हणून असं पळून येणं मला नाही पटत. आपल्या माणसांशीच तर वाद होतात, समजावलं की समजतील ते", मधु त्याला समजावत म्हणाली.

"तेवढं सोप्पं नाहीये ते मधु. तुला असं वाटतं का की मी प्रयत्न केले नसतील? जनरेशन गॅप चा प्रश्न आहे हा. जाऊदे तू टेन्शन नको घेऊस, ते सगळे मनाने खूप चांगले आहेत फक्त आमच्या विचारांमध्ये फरक आहे. या सगळ्यात आईचं वाईट वाटतं. ती बिचारी मला खूप मिस करते तिकडे", आशिष हळवा होत म्हणाला. मधुने त्याला दिलासा देण्यासाठी त्याच्या खांद्यावर डोकं टेकलं. दोघं बराच वेळ तसेच बसून सनसेट पहात होते. अंधार झाल्यावर आशिष म्हणाला "चला निघूया आता, उगाच काकू टेन्शन घेतील घरी."

घरी येताना मूड हलका करायला मधु म्हणाली "तू तर श्रीमंत निघालास की एकदम, कॉलेजमध्ये असताना बऱ्याच गर्लफ्रेंड्स असतील ना तुझ्या. एवढ्या चांगल्या घरचा, फ्लर्ट करण्यात एक्सपर्ट, दिसायलाही बरा आहेस. त्या लोणावळ्याच्या ट्रिप मध्ये निळ्या ड्रेस मधली मुलगी आहे ती तुझी गर्लफ्रेंड होती का? फेसबुकवर सगळ्या फोटोजमध्ये तुला अगदी चिकटून उभी आहे".

"अरे वा, कोणीतरी माझं पूर्ण प्रोफाइल बघितलेलं दिसतंय", आशिष म्हणाला अन मधुला आपली चूक कळाली.

"हो म्हणजे त्या अनुलाच नसत्या चौकश्या म्हणून ती बघत होती. तेव्हा मी एक दोन फोटोज बघितले. पण तू उत्तर नाही दिलंस", मधु विषय बदलत म्हणाली.

"हो. कॉलेजमध्ये असताना आम्ही डेट करत होतो. पण नंतर नाही टिकलं आमचं. जेवण खूप बाप बनवायची पण ती, शेफ बनायचं होतं तिला. मला आवडतात म्हणून कॉलेजमध्ये पुरणपोळ्या करून आणायची. त्या पुरणपोळ्या मात्र अजूनही मिस करतो मी", आशिष हेल्मेट काढत म्हणाला. दोघं बिल्डिंगच्या बाहेर उभे होते.

"हो का, बराच वेळ होता वाटतं तिच्याकडे पुरणपोळ्या बनवायला. अभ्यासवगैरे करायची की नाही", मधु तोंड वाकडं करून म्हणाली. ते बघून आशिषला हसायला आलं.

"काय आता प्रेमात लोकं काहीही करतात, बरोबर ना?", समोर उभ्या असलेल्या मधुला आपल्याकडे खेचत आशिष म्हणाला.

"आशिष, सोड मला, कोणीतरी बघेल अरे. हे काय नवीनच", मधु लाजत त्याच्या हातातून सुटायची धडपड करत म्हणाली.

"मधु, मगाशी मी माझ्या बायकोबद्दल म्हणालो ते खरं पण होऊ शकतं बरं का", आशिष तिला अजून घट्ट पकडत म्हणाला.

"म्हणजे? तू आता परत माझी मस्करी करतोयस ना?", त्याच्या डोळ्यांत बघत ती म्हणाली.

"नाही म्हणजे आत्ता जरी माझी मिता नावाची बायको नसली तरी पुढे मागे होऊ शकते ना....काय..मधुमिता गोखले?", आशिषने खट्याळ नजरेनं तिला विचारलं. त्याच्या प्रश्नाचा रोख समजल्यावर लाजलेल्या मधुने त्याच्या मिठीतच तोंड लपवलं.

क्रमशः..!

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →