सोमवारी मधु आठवडाभराच्या सुट्टीनंतर ऑफिसात रुजू झाली. एका आठवड्यामध्ये मधुचं आयुष्य खूप बदललं होतं. आधी वसुधा ताईचं आजारपण, मग आशिषच्या आठवणीत काढलेला अख्खा आठवडा, त्याच्यावरचा रुसवा, ती त्याच्याशी बोलत नसताना त्याची होणारी घालमेल आणि त्याने बोललेले ते तीन शब्द 'i missed you'.. या सगळ्या भावना तिच्यासाठी खूप नवीन होत्या. कॉलेज मध्ये असताना मधु खुपच साधी आणि समंजस मुलगी होती. आपला अभ्यास आणि परीक्षा या व्यतिरिक्त बाकी कशात वेळ घालवणं म्हणजे तिला वेस्ट ऑफ टाइम वाटायचं. तिच्या मैत्रिणी तिला त्यांना आवडणाऱ्या मुलाबद्दल सांगायच्या किंवा लपून छपून त्यांच्या बॉयफ्रेंड्स ना भेटायला जाताना कारण म्हणून मधुचं नाव पुढे करायच्या तेव्हा तिला त्या खुप उथळ वाटायच्या. "प्रेम वगैरे करायला आयुष्य पडलंय गं, आता जरा अभ्यासात लक्ष घाल. मागच्या महिन्यात तर तुला दुसराच कोणीतरी आवडत होता ना?", असं ती तिच्या मैत्रिणींना म्हणायची. आणि म्हणूनच आशिषच्या बाबतीत तिला वाटणाऱ्या या सगळ्या भावना म्हणजे नेमकं काय आहे ते तिला कळत नव्हतं कारण तिने त्या पहिले कधी अनुभवल्याच नव्हत्या. बरं मधुला कोणी नोटीस करत नव्हतं अशातली गोष्टं नव्हती. कॉलेजच्या पहिल्याच दिवसापासून कितीतरीजण तिच्यावर फिदा होते. तिचा नाजूक चेहरा, गव्हाळ वर्ण, बोलक्या टपोऱ्या घाऱ्या डोळ्यांमुळे ती जिथे जाईल तिथे लक्ष वेधून घ्यायची. कॉलेजमधली कितीतरी मुलं तिला पाहायला किंवा तिच्याशी बोलता यावं म्हणून लायब्ररी मध्ये येऊन बसायची. पण मधुला पुस्तकातून डोकं बाहेर काढून त्यांच्याकडे बघायला वेळच नव्हता. तिच्या एका सिनियरने तर चक्क ती कॉलेज मध्ये भाव देत नाही म्हणून त्याच्या वडिलांना अण्णांशी बोलायला घरी पाठवलं होतं. मधु घरी आल्यावर तिला हा सगळा प्रकार कळला तेव्हा लाजेनं कुठे तोंड लपवू असं झालं होतं तिला. तिला वाटलं होतं आता अण्णा आपल्यावर चिडतील. पण उलट तिची उडालेली धांदल बघून त्यांना हसायलाच येत होतं. "मधु, बाळा आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि प्रेमात वगैरे पडायचं हेच वय असतं गं. त्यामुळे तुला कोणता मुलगा आवडत असेल तर तू आम्हाला सांगू शकतेस. पण अभ्यासावर मात्र त्याचा परिणाम नाही झाला पाहिजे हं. तुझ्यासारख्या हुशार मुलीने या कारणासाठी तिकडे दुर्लक्ष केलेलं नाही आवडणार आम्हाला", अण्णांनी तिला समजावलं. त्यांच्या या स्वभावामुळेच मधुला कधीच त्यांच्यापासून काही लपवून ठेवावसं नाही वाटलं.
ऑफिसच्या लंच ब्रेक मध्ये मधु एकटीच जेवत असताना आशिषचं फेसबुक प्रोफाइल बघत होती. त्याने कुठले कुठले फिरायला गेलेले, ट्रेकिंगचे, वाढदिवसाच्या पार्टीज चे फोटोज टाकले होते. त्याचा कुठलातरी धबधब्यामध्ये भिजतानाचा शर्टलेस फोटो बघताना मधुचा चेहरा लालबुंद झाला. पटकन तिने फोन बाजूला ठेऊन दिला. 'काय होतंय मला नेमकं, मी सारखा त्याचाच विचार का करतेय. तो इथे नसतानाही त्याचे फोटो बघून लाजतेय. प्रेमात वगैरे पडलेय का मी त्याच्या? छे छे कसं शक्य आहे. इतक्या कमी भेटीत कोणी प्रेमात थोडी पडेल. मला तर त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही. त्याचं लग्न वगैरे झालं नसेल ना? आजकाल कोणाचा काय भरवसा', मधु स्वतःशीच विचार करत होती. पण मग तिला हॉस्पिटलमधली ती रात्र आठवली. किती आस्थेनं तो सगळं करत होता. गाडी मधले त्याचे तिच्याकडे बघणारे घारे डोळे आठवले, त्यात किती सच्चेपणा होता. त्याने म्हंटलेलं 'i missed you' तर तिने स्वतःच्या मनात कमीत कमी हजारवेळा अनुभवलं होतं. 'छे आशिष बाकीच्या मुलांसारखा नाहीये. तो असा नाही वागणार', मनात आलेले विचार झटकून मधु कामाला लागली.
संध्याकाळी मधु ऑफिसमधून निघत असताना आशिषचा फोन आला. "हाय, मी बोलतोय", पलीकडून आशिषचा खेळकर आवाज ऐकून मधु दिवसभराचा सगळा थकवा विसरली.
"मी कोण?", मधुने त्याला चिडवायला विचारलं.
"रानडे गं", समोरून हसत आशिष म्हणाला.
"अच्छा? मी तर हा नंबर आशिष म्हणून सेव्ह केलाय", मधुने प्रत्युत्तर केलं.
"अरे वाह, म्हणजे राग पूर्ण गेलेला दिसतोय. बरं, मी तुझ्या ऑफिसच्या आसपासच होतो कामासाठी म्हणून तुला कॉल केला. म्हंटलं तू अजून निघाली नसशील तर एकत्र जाऊ.", आशिषचं बोलणं ऐकून मधु एकदम खुश झाली. त्याचा फोन ठेऊन लगेचच ती खाली गेटपाशी आली तेव्हा त्याची गाडी समोरच उभी होती.
दार उघडून मधु पुढच्या सीटवर बसली, "काय रे, तू आसपास म्हणजे अगदी माझ्या ऑफिसच्या खालीच होतास वाटतं", पावसामुळे चेहऱ्यावर जमा झालेले थेंब पुसत मधु म्हणाली. तिचे अर्धवट भिजलेले केस, गाडीच्या अंधुक प्रकाशात चमकणारे डोळे आणि लहान मुलांसारखं निखळ हास्य बघून आशिष तिच्याकडे बघतच राहिला.
"आशिष.. कुठे हरवलास? सीटबेल्ट दुरुस्त करून घेतलास कि नाही अजुन", मधुने बॅग मागच्या सीटवर ठेवत विचारलं.
"कशाला दुरुस्त करायचा? वेळेला उपयोगी पडतो तो", आशिष तिच्याकडे एकटक बघत म्हणाला.
"हा हा.. रोज लॉटरी नाही लागत. आणि अजून कितीवेळा उपयोगी पडला आहे रे सीटबेल्ट?", मधु सीटबेल्ट लावत म्हणाली.
"अरे वाह, आज चक्क न लाजता उत्तर दिलंस. मला जाम मजा येते तुला लाजताना बघायला", आशिष हसत गाडी सुरु करताना म्हणाला. त्याच्या या बोलण्याने मात्र मधु लाजली.
बिल्डिंगच्या खाली आल्यावर कार पार्किंगमधून बाहेर येताना आशिषने मधुला विचारलं, "परवा मी म्हणालो त्याचं उत्तर नाही दिलंस. मी तुला एवढं आय मिस यु म्हणालो आणि तू निघून गेलीस. तू मिस नाही केलंस का मला?".
आशिषच्या त्या प्रश्नाने मधु कावरीबावरी झाली, "छे मी कशाला मिस करेन तुला. बाजूलाच तर राहतोस", ती कसंबसं म्हणाली.
"अच्छा म्हणजे तो राग दुसऱ्याच कुठल्यातरी गोष्टीसाठी होता का? ठीक आहे, नसशील मिस केलं तर जाऊ दे. मलाच आपलं वाटलं उगाच", घराचा दरवाजा उघडताना चिडायचं नाटक करत आशिष म्हणाला. मधु काही बोलायच्या आधीच तो दार लावून आत गेला.
आशिषच्या चिडण्यामुळे घरी गेल्यावर मधुचं कशातच मन लागत नव्हतं. जेवण झाल्यावर ती बाल्कनीत जायला निघाली तेव्हा वसुधा ताई तिला म्हणाल्या, "अगं आता पावसात कुठे बाहेर जातेस, परत भिजलिस तर शिंकत बसशील रात्रभर".
मधु काहीतरी कारण द्यायचं म्हणून म्हणाली, "अगं माझं गुलाबाचं रोप पावसात भिजतंय, ते जरा भिंतीपाशी आणून ठेवते".
"बरं, मध्येच म्हणते टाकून देऊ, मध्येच पावसात स्वतः भिजून त्याची काळजी घेते, काय या पोरीच्या मनात असतं तिलाच माहीत", वसुधा ताई स्वतःशीच बोलत आत गेल्या.
गुलाबाचं रोप बाजूला करून मधुने बाजूच्या बाल्कनीमध्ये डोकावलं तेवढ्यात आशिष बाहेर आला, तिला बघून तो परत आत जाणार इतक्यात मधु म्हणाली, "आशिष... तू चिडलायस का माझ्यावर?".
"छे मी कशाला चिडू, म्हणजे एक भाडेकरू त्याच्या घरमालकावर कोणत्या अधिकाराने चिडणार ना", आशिष मधुकडे न बघता बोलला. त्याच्या बोलण्याने मधु खूप दुखावली.
"असं का बोलतोयस, मी तुला किती मिस केलं हे काय मला वेगळं बोलून दाखवायची गरज आहे का? माझ्या वागण्या बोलण्यातून तुला ते कळलं नाही का? आणि नसेल कळलं तर आत्ता सांगते. मी तुला खूप मिस केलं आशिष, एवढं मी आजपर्यंत कोणालाच केलं नव्हतं, एवढं की मला भीती वाटायला लागली की तु पुन्हा माझ्याशी बोललाच नाहीस तर मी काय करणार. आणि त्या दिवशी तु जे i missed you म्हणालास ते जर खरंच असेल तर पुन्हा कधी असं करू नकोस", मधु रडकुंडीला येत म्हणाली.
तिचं ते मनमोकळं आणि अधिरकारवाणीचं बोलणं ऐकून, आशिषने पटकन पुढे येऊन तिचा हात आपल्या हातात घेतला, "वेडीच आहेस तू पण मधु, अगं मी मजा करत होतो तुला चिडवायला, पण आता वाटतंय बरं झालं बोललो, नाहीतर मला हे ऐकायला नसतं मिळालं", तिचे डोळे पुसत तो म्हणाला. "अँड आय प्रॉमिस, मी पुन्हा असं नाही करणार. मी खरंच मुद्दुमून नाही केलं गं. माझं मलाच कळत नव्हतं मला काय होतंय. एक सारखा मी तुझाच विचार करत होतो. आणि मग तू म्हणालीस तसं मलाही भीती वाटली की जे मला वाटतंय ते तुला वाटतंच नसेल तर? पण शेवटी मलाच राहवलं नाही, म्हणून मी डब्यांचं कारण काढून तुमच्याकडे आलो. तेव्हा तू घरी नव्हतीस. शनिवारी सकाळी बाल्कनी मध्ये तुझा आवाज ऐकला आणि धावत बाहेर आलो. हां म्हणजे तेव्हा मी अगदी कूल असल्यासारखं दाखवत होतो पण मनातून कधी एकदा तुला भेटतोय असं झालं होतं", तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला.
त्याचं बोलणं ऐकून मधु खुद्कन हसली, "आता असं बोलतोयस मगाशी किती खडूसपणे बोलत होतास. म्हणे भाडेकरू घरमालकावर कसा चिडणार. घरमालक मी नाही माझी आई आहे. चल आता जाते आत नाहीतर आई येईल बाहेर. तुझ्या नादात गेले काही दिवस त्या बिचाऱ्या गुलाबाच्या झाडाला जरा जास्तच पाणी घातलंय मी". तिचं बोलणं ऐकून दोघं खळखळून हसले.
क्रमशः..!
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
