सुदैवाने वसुधा ताईंचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. पडल्यामुळे हातापायाला आणि डोक्याला लागलेला मुका मार सोडला तर बाकी त्या बऱ्या होत्या. पण तरीही मधुने रिस्क नको म्हणून ऑफिसमध्ये आठवडाभर सुट्टी टाकली. अण्णा गेल्यापासून तिला आणि वसुधा ताईंना असा मोकळा वेळ मिळालाच नव्हता. अण्णांच्या आठवणीपासून दूर कशाततरी मन गुंतवायचं म्हणून मधु लगेच कामावर रुजू झाली होती. त्यामुळे या सुट्टीत रोज आरामात उठायचं, आईशी मनसोक्त गप्पा मारायच्या, पुस्तकं वाचायची आणि पावसाची मजा घेत हवं तेव्हा चहा प्यायचा असं तिचं ठरलं होतं. हॉस्पिटलचं बिल भरून दोघी बाहेर आल्या. रिक्षाची वाट बघत असताना, समोर एक गाडी येऊन थांबली. खिडकीची काच खाली करत आशिष म्हणाला, "बरं झालं इथेच भेटलात नाहीतर आपली चुकामूक झाली असती. आत्ता तुम्हालाच भेटायला येत होतो काकू." आशिषने उतरून गाडीचा मागचा दरवाजा उघडला आणि वसुधा ताईंना मागच्या सीटवर बसायला मदत केली. मधु दुसऱ्या बाजूने वसुधा ताईंच्या बाजूला बसायला जात असताना आशिष पुढचं दार उघडून आशेने तिच्याकडे बघत होता. त्याच्याकडे मिश्किल नजरेने पाहत मधु पुढच्या सीट वर जाऊन बसली, जणूकाही तिच्याही मनात हेच होतं.
मधुची चुळबुळ बघून आशिषने तिला विचारलं, "काही हवंय का तुला?".
"हो अरे, सीटबेल्ट कशात तरी अडकला आहे. निघतच नाहीये. म्हणजे घरापर्यंतच अंतर कमीच आहे पण उगाच तेवढ्यात पोलिसांनी पकडायला नको", मधु सीटबेल्ट खेचायचा प्रयत्न करत म्हणाली. आशिष तिला मदत करण्यासाठी ड्राइव्हर सीटवरून तिच्याकडे झुकला. तो सीटबेल्ट काढत असताना दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. ती पहिल्यांदाच त्याचा चेहरा एवढ्या जवळून बघत होती. त्याचे घारे डोळे तिच्या चेहऱ्यावर खिळलेले. तिच्या चेहऱ्यावर चाललेली चलबिचल वाचायचा ते प्रयत्न करत होते असं तिला वाटलं. त्याच्या परफ्युमचा मंद वास तिला एकदम ओळखीचा वाटला. आणि अचानक तिला आठवलं कालही त्याने हेच परफ्युम लावलेलं.
"घ्या मॅडम, लावला तुमचा सीटबेल्ट", म्हणून आशिष मागे झाला. पण मधु अजूनही त्याच्या घाऱ्या डोळ्यातच हरवली होती.
वसुधा ताईंना घरी येऊन एक-दोन दिवस होऊन गेले होते. त्याच्या तब्येतीत आता बरीच सुधारणा होती. पण मधुचं चित्त मात्र थाऱ्यावर नव्हतं. हॉस्पिटलमधून घरी आल्यापासून आशिषशी काही संपर्कच नव्हता. तसं काही कारणही नव्हतं म्हणा. तो भाडेकरू म्हणून शिफ्ट झाल्यापासून सहा महिन्यात मधु त्याला मोजून ४-५ वेळा भेटली होती. वसुधा ताईंना त्याने एक दोनदा फोन केला होता, तब्येतीची चौकशी करायला. ऑफिस मधून यायला उशिर होतोय म्हणून भेटायला जमत नाहीये म्हणाला.
"तुला फोन करायला बरा वेळ आहे त्याला एवढं काम असताना!", मधु एकदा वसुधा ताईंनी आशिषचा फोन ठेवल्यावर त्यांना म्हणाली.
"झाली का तुझी चिडचिड चालू परत. अगं नुसती चौकशी करायला फोन केलेला त्याने", वसुधा ताई मधुला समजावत म्हणाल्या.
"मी काही चिडचिड करत नाहीये. आता पेशंट ची चौकशी करायला पेशंटला कशाला फोन करायचा, तू झोपलेली असतीस तर? उगाच झोपमोड झाली असती ना. म्हणून म्हंटलं. मला फोन केला असता तरी मी सांगितलंच असतं त्याला तुझ्या तब्येतीबद्दल", मधु बाल्कनी मधल्या झाडांना पाणी घालत म्हणाली. घरात येताना तिने सहज शेजारी आशिषच्या बाल्कनीमध्ये डोकावून पाहिलं, पण बाल्कनीचं दार बंद होतं. 'अजून घरी आलेला दिसत नाही, खरंच खूप काम असेल कदाचित', स्वतःशीच विचार करत मधु आत आली.
"आई आपले डबे अजून परत नाही केले ना गं आशिष ने?", मधुने ने जेवणाचं ताट वसुधा ताईंना देत विचारलं.
"तुझं अजून तेच आहे का? अंग देईल नंतर. त्यादिवशी डब्बे द्यायला आला तेव्हा हे रामायण घडलं, नंतर वेळ नसेल मिळाला", वसुधा ताईंचं अर्ध लक्ष टीव्ही कडे होतं.
"ठीक आहे, मी उद्या सकाळी घेऊन येईन, नाहीतर त्याच्याकडेच राहतील", मधु म्हणाली. थोड्यावेळाने ती वसुधा ताईंची औषधं आणायला खाली गेली. गेल्या दोन दिवसात पाहिल्यांदाच ती घराबाहेर पडली होती. मोकळ्या हवेत फिरताना तिला बरं वाटत होतं. नुकताच पाऊस पडून गेलेला, त्यामुळे वातावरण गार झालेलं. पण मधुचं लक्ष या सगळ्यात नव्हतं. 'आशिषने काहीच कॉन्टॅक्ट कसा नाही केला. हॉस्पिटलमध्ये तर सारखा आसपास असायचा. एका मजल्यावर राहून भेटायला किती वेळ लागतोय. जाऊ दे मला काय करायचंय. उद्या जाऊन मी माझे डबे घेऊन येईन', तिने स्वतःशीच विचार केला. औषधं घेऊन मधु घरी आली, तेव्हा तिला टेबलावर आशिषने दिलेले डबे दिसले.
"हे काय? हे डबे इकडे कसे आले?", तिने विचारलं.
"अगं मगाशी तू गेलीस आणि आशिष आला. १५-२० मिनिटं बसला होता गप्पा मारत. डबे पण देऊन गेला जाताना. त्याला कुठेतरी पार्टीला जायचं होतं म्हणे. तुला का एवढा वेळ लागला? तुमची जस्ट चुकामूक झाली बघ", वसुधा ताई औषधं घेत म्हणाल्या. मधुच्या डोळ्यात टचकन पाणी आलं, ते लपवायला ती किचन मध्ये पळाली. 'ह्याला पार्टीला जायला वेळ आहे पण मला साधं 'कशी आहेस?' विचारायला वेळ नाहीये. जाऊदे मी तरी कशाला वाट बघतेय, भाडेकरूच आहे ना आमचा, नाही भेटला तर काय झालं', स्वतःशीच ठरवून मधु डोळे पुसून बाहेर आली.
मधुच्या सुट्टीचे शेवटचे दोन दिवस राहिलेले. आशिषचा अजूनही काही कॉन्टॅक्ट झाला नव्हता. मधुनेही ठरवून टाकलेलं की आपण आता त्याच्याशी बोलायला जायचं नाही. शनिवारी सकाळी बाल्कनीमध्ये झाडांना पाणी घालून झाल्यावर ती घरात यायला वळली तेव्हा समोर आशिष हातात चहाचा कप घेऊन उभा होता.
"गुड मॉर्निंग, काय ओळख आहे का?", त्याने मधुकडे पहात हसत विचारलं. त्याचे घारे डोळे आणि निखळ हास्य पाहुन काही क्षणांसाठी मधु तिचा सगळा राग विसरली.
"हो आहे ना, असं कसं विसरून चालेल. महिन्याला भाडं देता ना तुम्ही", मधु तिरसटपणे म्हणाली.
"म्हणजे? फक्त भाड्यासाठीच आठवण आहे का?", त्याने न समजून विचारलं. त्यावर मधुने काहीच उत्तर नाही दिलं. "मधु.. बोल ना", त्यानेच पुन्हा संवाद चालू करायला म्हंटलं.
"कामं आहेत मला. जाते मी", म्हणून ती घरात आली.
संध्याकाळी दारावरची बेल वाजली, मधुने दार उघडलं तर दारात आशिष उभा होता. चेहऱ्यावरचा आनंद लपवत तिने विचारलं, "आज इकडे कसं येणं केलंत रानडे?".
"रानडे? बापरे माझ्याकडून काही चूक झालीये का? आशिष वरून पुन्हा रानडे झालोय मी ते?", त्याने न कळून विचारलं.
"अरे ये आशिष, जेवण तयारच आहे. मधु तुला सांगायला विसरले. दुपारी तू झोपली होतीस ना. मी आज ह्याला आपल्याकडे जेवायला बोलावलंय. म्हंटलं तू ऑफिसला रुजू व्हायच्या आधी आपली एक छोटीशी पार्टी करू", वसुधा ताई एकदम उत्साहाने म्हणाल्या.
"अरे वा, आज चक्क आपल्याकडच्या पार्टीला वेळ मिळाला ह्यांना. बाकीच्या पार्ट्या झाल्या वाटतं", आशिषकडे न बघता मधु म्हणाली.
वसुधा काकू आत गेल्यावर आशिषने मधुच्या डोळ्यात बघत विचारलं, "मधु बास झालं हां आता, माझं काही चुकलंय का? सकाळपासून माझ्याशी बोलतही नाहीयेस. आणि हे काय परत रानडे रानडे चालू केलं आहेस"?.
"मी सकाळपासूनच बोलत नाहीये, तू तर गेला अख्खा आठवडा गायब आहेस. का आता तुला वेळ आहे म्हणून मी हसत हसत तुझ्याशी बोलायला यायचं?", मधुने डोळ्यातून येणारं पाणी अडवायचा प्रयत्न करत उत्तर दिलं. तेवढ्यात वसुधा काकूंनी तिला जेवणाची तयारी करायला बोलावलं.
"मधु.. अगं..", आशिषचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच मधु आत निघून गेली.
रात्री जेवण झाल्यावर मधू मोकळ्या हवेत बाल्कनीमध्ये उभी होती. वरवर कितीही दाखवत असली तरी आतून तिलाही वाईट वाटतच होतं.
"अरे वा, आजची आपली तिसरी भेट", शेजारच्या बाल्कनीमध्ये आशिष उभा होता. मधुने काहीच उत्तर दिलं नाही. ती घरात जायला वळली, आणि तिच्या कानांवर शब्द पडले, "i missed you". आशिषच्या आर्जवी आवाजातल्या त्या शब्दांनी गेले काही दिवस मधुच्या चेहऱ्यावरच हरवलेलं हास्य क्षणात परत आलं.
क्रमशः..!
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
