आशिषच्या फोनने सुन्न झालेली मधु रिक्षावाल्याच्या आवाजाने भानावर आली. रिक्षा तिच्या बिल्डिंग बाहेर थांबली होती. तीच रिक्षा घेऊन मधु वात्सल्य हॉस्पिटलकडे निघाली. मनात विचारांचं काहूर माजलं होतं. नक्की काय झालं असेल? आशिषला फोन वर नीट सांगायला काय झालं होतं? 'तातडीने हॉस्पिटलला ये", हि काय निरोप द्यायची पद्धत आहे? आणि आता ह्याचा फोन पण लागत नाहीये. घरापासून हॉस्पिटलपर्यंतचा पंधरा मिनिटांचा प्रवास तिला तासभरासारखा वाटला. शेवटी एकदाची ती हॉस्पिटलला पोचली, आशिष बाहेरच तिची वाट बघत उभा होता. ती धावतच त्याच्याकडे गेली.
"रानडे ही काय निरोप द्यायची पद्धत आहे का? नक्की काय झालंय? आणि आई कुठे आहे? ती माझा फोन पण उचलत नाहीये", तिने प्रश्नांचा भडीमार केला.
"मधु तू आधी शांत हो, मी मुद्दामच तुला जास्त काही बोललो नाही, तू टेन्शन घेतलं असतंस म्हणून, जे की तू आत्ताही घेतलेलं दिसतंच आहे. काकू आत आय.सी.यू. मध्ये आहेत. सगळं एकदम अचानकच झालं. मी संध्याकाळी ऑफिस वरून आल्यावर त्यांना डबे परत द्यायला गेलो तर काही उत्तरच नाही आलं म्हणून मी माझ्याकडच्या चावीने दार उघडून आत गेलो तर काकू टेबलापाशी बेशुद्ध पडल्या होत्या. लगेच मित्राच्या गाडीने त्यांना हॉस्पिटलला घेऊन आलो आणि तुला कॉल केला. डॉक्टर त्यांना तपासतायत आत, चल आपण आधी आत जाऊन त्यांच्याशी बोलू. खूप सिरीयस वाटत नाहीये, तू काळजी करू नकोस", आशिष आश्वासक आवाजात म्हणाला. त्याने मधुला थोडा धीर आला.
दोघं आत गेले तेव्हा डॉक्टर आय.सी.यू मधून बाहेर येत होते. मधुला पाहून ते हसून म्हणाले, "मधु अगं केवढं टेन्शन दिसतंय चेहऱ्यावर. आई बरी आहे आता, त्यांना पडल्यामुळे हातापायाला मार लागलाय म्हणून थोड्या स्ट्रॉंग गोळ्या दिल्या आहेत. झोपल्या आहेत आता. पण आपल्याला थोड्या टेस्ट्स कराव्या लागतील याचं कारण कळण्यासाठी. आणि पडताना त्यांच्या डोक्यालाही थोडा मार लागला आहे. मला तरी जखम वरवरची वाटते आहे पण उगाच रिस्क नको म्हणून आपण स्कॅन करून घेऊ." त्यांच्या बोलण्याने मधुच्या जीवात जीव आला.
"डॉ. काका तुम्हाला तर माहितीच आहे अण्णांच्या प्रसंगानंतर आता असं काही झालं की पोटात गोळा येतो. तुम्ही नक्की खरं सांगताय ना? काळजीचं काहीच कारण नाहीये?", तिने काकुळतीला येऊन विचारलं.
"हो गं, आता काळजीचं काही कारण नाही, थँक्स टू धिस जेंटलमन हिअर! त्याने एकदम वेळेत त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलं.", डॉक्टर आशिषकडे बघत म्हणाले.
डॉक्टरांशी बोलून मधु आय.सी.यू. मध्ये आई ला बघायला गेली. आईला त्या अवस्थेत बघून तिने इतकावेळ अडवलेले अश्रू बांध फुटून वाहायला लागले. ती वसुधा ताईंच्या जवळ जाऊन बसली, त्यांचा हात हातात घेऊन.
"काय गं आई, जरा तुला एकटं सोडलं तर हे काय करून घेतलंस?", ती झोपलेल्या वसुधा ताईंकडे बघून म्हणाली. थोडावेळ तिकडे बसून ती बाहेर आली. रात्रीचे अकरा वाजून गेले होते. आशिष बाहेर बाकड्यावर बसला होता, मधुला बघून तो उठून तिच्याजवळ आला. "कशा आहेत काकू आता?", त्याने विचारलं.
"काय माहीत, अजून झोपली आहे, डॉ. काका म्हणाले तसं उद्या सकाळी उठल्यावर कळेल. रानडे आज तुम्ही नसतात तर काय झालं असतं त्याची कल्पनाही करवत नाहीये मला", मधु आशिषकडे बघून म्हणाली.
"हो ना? मग नकोच करूस कल्पना, कारण मी होतो ना. आणि आता आभार प्रदर्शन नको. आपल्या माणसांना कोणी थँक यु नाही म्हणत..आणि आडनावाने पण नाही हाक मारत", आशिष मिश्कीलपणे म्हणाला.
"म्हणजे?", मधुने विचारलं.
"अगं म्हणजे तू मला आशिष म्हटलंस तर जास्त आवडेल मला. तुझ्यापेक्षा एक-दोन वर्षांनीच मोठा आहे मी. रानडे म्हणजे एकदम मोठं असल्यासारखं वाटतं", आशिष मधुकडे बघत म्हणाला. थोडा विचार करून थोडंसं हसून ती म्हणाली, "चालेल, मला पण कोणी मधु ऐवजी गोखले बोलावलं तर विचित्रच वाटेल."
"बरं, तुला काही खायचं आहे का? बराच उशीर झालाय, हॉस्पिटच्या कॅन्टीनमध्ये पण आता काही मिळणार नाही. इथे बाहेरच काहीतरी खावं लागेल", वेळ बघत आशिष म्हणाला. मधुला पण आता खूप भूक लागलेली. मगाशी टेन्शन मध्ये तिला जाणवलं नाही, पण आता जरा शांत झाल्यावर तिला भुकेची जाणीव झाली.
"चालेल, आपण इकडेच काहीतरी खाऊ मग मी परत हॉस्पिटलला येईन आणि आज इकडेच झोपेन. आणि हो येताना आईची औषधं पण आणायची आहेत, तुला आसपास एखादं मेडिकल स्टोर माहित आहे का?", तिने आशिषला विचारलं.
"हो आहे ना, इथे पुढे एक छोटं हॉटेल आहे आणि त्याच्या बाजूला मेडिकल स्टोअर पण आहे. पण आता खूप उशीर झालाय, तू इथेच थांबतेस का? मी औषधं आणि जेवण दोन्ही घेऊन येतो. तु खूप दमलेली पण वाटतेयस. तु कॅन्टीन मध्ये जाऊन चहा-कॉफी घे तोपर्यंत मी जाऊन येतो पटकन बाईक वर, चालेल? ", आशिष ने सुचवलं. मधुला पण ते पटलं. तसही तिला आशिषच्या बाईक वरून जायला कसतरीच झालं असतं आणि एवढ्या रात्री रिक्षाशोधत बसण्यापेक्षा हे बरं होतं. तिने संमत्ती दर्शवली, तेवढयात आशिषचा फोन वाजला म्हणून तो बाजूला जाऊन बोलायला लागला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघताना मधुच्या मनात विचार आला, 'कधीकधी आपण माणसं ओळखायला किती चूक करतो. अण्णा नेहमी म्हणायचे रक्ताच्या नात्यांपेक्षा मनाची नाती फार घट्ट असतात. आता हा आशिष, कोण कुठला आमच्या आयुष्यात आला आणि आज तो नसता तर काय झालं असतं! आईनं त्याच्यावर एवढा जीव लावला आणि त्याला पण केवढं वाटतं आईबद्दल. मगाशी मला धीर देत होता पण फोनवर याचाच आवाज रडवेला झाला होता'.
"मधु.. कुठे हरवलीस?", आशिषच्या आवाजाने ती भानावर आली. "मी जाऊन येतो. अजून काही आणायचं असेल तर कॉल कर", म्हणून आशिष बाईक वळवून निघाला. त्याच्या दूर जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून मधु स्वतःशीच हसली. आशिषने बाईकच्या आरशात मध्ये मागे उभ्या असलेल्या मधुकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचं हसू बघून त्याला वेगळच समाधान मिळालं. लवकरात लवकर तिच्याकडे परत येण्यासाठी त्यानं बाईकला ऐक्सिलरेटर दिला..
क्रमशः..!
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
