"आई डबा तयार आहे का? मला आधीच खूप उशीर झाला आहे . त्यात सकाळी रिक्षा मिळायला सुद्धा खूप वेळ लागतो!", आरशातील आपली प्रतिमा निरखत मधुने विचारलं.
"हो डबा तयार आहे आणि नाश्ता सुद्धा, आज न खाता निघालीस तर बघ. नोकरी वगैरे चालूच राहील, त्यासाठी उपासमार कशाला करायची? आणि हो स्वयंपाकघरात येताना बाल्कनी मधल्या गुलाबाच्या रोपट्याला पाणी घाल जरा. एवढ्या कौतुकाने लावलं होतस आणि आता काहीच काळजी घेत नाहीस त्याची!", वसुधा ताईंनी आपल्या एकुलत्या लेकीच्या प्रश्नाला स्वयंपाकघरातूनच ओरडून उत्तर दिलं.
"आई आता खाऊन जायला वेळ नाही मला, त्यापेक्षा तू नाश्ता पण डब्यातच का नाही देत? मी ऑफिस मध्ये जाऊन खाईन. आणि तूच घाल पाणी त्या रोपाला, मला तर वाटतंय आपण टाकूनच देऊ ते, फुलं तर येत नाहीत उगाच कामं वाढतात!", जेवणाचा डबा बॅग मध्ये भरत मधु म्हणाली.
"बरं मी घालते पाणी, लगेच टाकून द्यायची भाषा नकोय करायला. झाडांचं हे नात्यांसारख असतं. दोघांना बहरायला वेळ, कष्ट आणि प्रेम द्यावं लागतं. तुम्हा आजकालच्या मुलांना सगळं अगदी पटापट हवं असतं. हे घे तुझा नाश्त्याचा डबा, पण सगळा मैत्रिणींमध्ये वाटून टाकू नकोस. आणि हो जाताना त्या आशिषला पण हा छोटा डबा देऊन जा. आज कोथिंबीर वड्या केल्या आहेत, त्याला पण फार आवडतात", वसुधा ताई मधुच्या हातात दोन डबे देत म्हणाल्या.
"ए आई आता निघताना कामं नको सांगुस गं. आणि त्याला कशाला द्यायचाय डबा. मागच्या वेळेला दिलेला डबा अजून परत दिला नाहीये त्याने. आणि तू विसरतेस का तो आपला भाडेकरू आहे ते. उगाच कशाला लाड? जरा घरमालकासारखं वाग की. मागच्या आठवड्यात आपल्या कामवाल्याकाकूंकडून त्याची रूम साफ करून घेतली होतीस. असं चालू ठेवलंस तर थोडेदिवसांनीं तोच आपल्याकडून भाडं घेईल असं वाटतं मला!", मधु वैतागून म्हणाली.
"काहीही काय बोलतेस गं? चांगला मुलगा आहे बिचारा. तुझ्यासारखाच दिवसरात्र काम करत असतो खाणं पिणं विसरून. आपल्याकडे असलेलं थोडं दिलं त्याला तर काय बिघडलं. इतकं वैतागायला काय झालं तुला? चिडचिड फार वाढली आहे हां तुझी आजकाल, म्हणून म्हणते जरा मेडिटेशन करत जा. जोश्यांच्या सुनेने ऑनलाईन वर्ग चालू केले आहेत, तुझं पण नाव रजिस्टर करू का?", वसुधा ताईंनी फणकाऱ्याने लेकीला विचारलं .
"तुला काय कमिशन मिळतं का गं आई जोश्यांच्या सुनेकडून? जेव्हा बघावं तेव्हा तिच्या मेडिटेशनच्या क्लासचा प्रचार करत असतेस. दे तो डबा, देते मी रानडयांना जाताना", मधु हसत म्हणाली.
दोनदा बेल वाजवल्यावर शेवटी आशिषने दार उघडलं, "अरे आज सकाळी सकाळी तू कशी? काही काम आहे का?", त्याने मधुकडे प्रश्नार्थक नजरेने बघत विचारलं.
"काय हे रानडे, कधीपासून बेल वाजवतेय मी, आधीच ऑफिसला उशीर झालाय. हा डबा दिलाय आई ने, तुम्हाला आवडतं म्हणून. ह्या डब्याबरोबर मागच्या वेळेचा डबा पण परत केलात लवकर तर बरं होईल, नाहीतर थोडे दिवसांनी आमचे सगळे डबे तुमच्याकडे असतील आणि मला प्लॅस्टिकच्या पिशवीत जेवण न्यावं लागेल", मधु वैतागून घड्याळाकडे बघत म्हणाली.
"सॉरी हां, म्हणजे उशिरा दार उघडल्याबद्दल आणि डब्यांबद्दल सुद्धा. काहीतरी बनवून द्यायचा असा विचार करत होतो पण कामामुळे जमलं नाही. आपल्यात रिकामा डबा देत नाहीत ना!", आशिष थोड्या अपराधीपणे म्हणाला. मधुला पण आपण उगाच बोललो असं झालं. जास्त वेळ न घालवता ती लगेच निघाली, पण वाटेत पूर्णवेळ ती आईच्या वाक्याचाच विचार करत होती. खरंच विनाकारण चिडचिड करते मी आजकाल.
जेवण करून लोकांना खायला घालण्याची वसुधा ताईंना पहिल्यापासूनच आवड होती. अण्णा म्हणजे मधुचे वडील असताना, त्यांचे मित्र, नातेवाईक सारखे घरी यायचे. त्यांच्यासाठी नवीन नवीन पदार्थ वसुधा ताई अगदी आवडीने करायच्या. पण वर्षभरापूर्वी अचानक अण्णा ह्रदयविकारच्या झटक्याने गेले आणि मधु आणि वसुधा ताईंच जगच बदललं. घराची सगळी जबाबदारी आता आपल्यावर आहे या विचाराने मधु एका रात्रीतच एकदम प्रौढ झाली. अण्णांबरोबरच तिचा अल्लडपणा आणि विनोदी स्वभावही काळाच्या पडद्याआड गेला. वसुधा ताईंना पण लेकीची, तिच्या लग्नाची काळजी होतीच. तिचं लग्नं आता आपल्यालाच लावून द्यायचय, त्यासाठी थोडे पैसे आणि दागिन्यांची जमवाजमव करावी लागेल म्हणून बाजूच्या रिकाम्या फ्लॅट मध्ये भाडेकरू ठेवावा असा विचार त्या करत होत्या.
"आई तू कशाला उगाच अनोळखी माणसाला घरात आणते आहेस? आपण दोधीच असतो घरात, त्यात दिवसा तू एकटीच असतेस, कशाला उगाच रिस्क? आपल्याला काय पैशांची कमी आहे का? दोघींच भागेल एवढं कमावते आहे ना मी?", मधुने वसुधा ताईंची भाडेकरू ची कल्पना ऐकून लगेचच नकारघंटा वाजवली होती. तिचाही मुद्दा बरोबरच होता.
"सगळी लोक वाईट नसतात गं मधु. आणि हा आशिष का कोण आहे तो आपल्या जोशी काकांच्या मित्राचा मुलगा. मुंबई मध्ये कामासाठी शिफ्ट होतोय. बोलायला वगैरे चांगला वाटला गं मला. आणि तू कमावते आहेसच गं, पण मुलीचे पालक म्हणून आमची पण काही जबाबदारी आहे कि नाही? तसे अण्णांनी तुझ्यासाठी साठवून ठेवले आहेत थोडे पैसे, पण भाडेकरू ठेवला तर महिन्याला थोडा घरखर्च मला पण उचलता येईल. आता अण्णा नाहीत, त्यामुळे तुझं लग्नं, सणवार, बाळंतपण सगळं मलाच करावं लागेल ना. जगाची रीत असते ती, हे सगळं केलं नाही तर लोक तोंडात शेण घालतील आमच्या", वसुधा ताई पदराने डोळे पुसत म्हणाल्या.
"तुझं पण काहीही असतं हां आई. आता लोकांना काय करायचंय आपण आपलं घर कसं चालवतो त्याच्याशी? आणि दादरच्या रस्त्यांवर त्यांना शेण तरी कुठे मिळणार आहे?", मधुने मूड जरा हलका करण्यासाठी म्हंटलं.
"शहाणीच आहेस गं. रस्त्यावर शेण मिळणार नाही म्हणून, नाहीतर चाललं असता का तुला आमच्या तोंडात शेण घातलेलं?", वसुधा ताई लटक्या रागाने म्हणाल्या.
"मज्जा केली गं आई. तू पण ना, त्या मराठी सिरिअल्स बघून त्यांच्या सारखीच बोलायला लागली आहेस. चल आता पानं घे मी आलेच हातपाय तोंड धुवून, खूप भूक लागली आहे", मधु चहाचा कप ठेऊन आत जात म्हणाली.
त्यानंतर एका आठवड्याने नवा भाडेकरू शेजारच्या फ्लॅट मध्ये राहायला आला, आशिष रानडे! वसुधा ताईंना आशिष लगेचच आवडला, घरात काही केलं कि त्याला नेऊन द्यायच्या, सध्यांकाळी मधुसाठी चहा टाकताना त्याच्यासाठी पण टाकायच्या. त्याला त्या अगदी आपल्या घरातल्या माणसासारखं वागवायच्या. मधुला त्यांचं हे वागणं अजिबात पटत नव्हतं, अर्थात ते त्यांच्या काळजीपोटी होतं. त्यांनी कोणा परक्या मुलावर जीव लावून नंतर तो निघून गेल्यावर तिलाच त्रास होऊ नये हा तिचा उद्देश होता. आजकालच्या पिढीतील लोकांना म्हाताऱ्या माणसांची कटकट वाटते, उगाच हा नवा भाडेकरू आई ला काहीतरी बोलला तर तिचं मन दुखावू नये एवढंच तिला वाटत होतं. पण आशिष तसा नव्हता, वसुधा ताईंना त्याची जेवढी काळजी वाटायची तेवढीच त्यालाही त्यांच्याबद्दल वाटायची. कधीही बाहेर जाताना न विसरता त्यांना "येताना काही आणू का काकू?", असं विचारून जायचा. ऑफिसवरून यायला उशीर होणार असेल तर त्यांना फोन करून कळवायचा. खरं तर त्याला हे सगळं करायची काही गरज नव्हती, पण घरापासून एवढं लांब असताना या परक्या शहरात कोणीतरी आपल्यावर एवढा जीव लावतंय हे बघून त्याचाही एकटेपणा लगेच कमी व्हायचा.
अंधेरीच्या सिग्नल वर बाजूच्या रिक्षाच्या हॉर्न ने मधु भानावर आली. मनातले सगळे विचार झटकून ती ऑफिस मध्ये शिरली. खुर्चीत बसून जरा दम खाल्ल्यावर तिने आई ने दिलेला कोथिंबीर वड्यांचा डबा उघडला. त्या वासानेच तिची सकाळची सगळी चिडचिड दूर झाली. शेवटची वडी तोंडात टाकताना तिने आई ला मेसेज टाकला, "वड्या खूपच छान झाल्या आहेत, मला रात्रीला पण ठेव थोड्या." आणि फोन बाजूला ठेऊन ती कामाला लागली.
संध्याकाळी ऑफिसमधून निघायला मधुला जरा उशीरच झाला होता, रिक्षाची वाट बघताना तिने पटकन घड्याळ बघितलं, "बापरे साडेसात वाजले! अजून चक्क् आईचा फोन कसा नाही आला. कुठल्यातरी सिरिअल्स बघत बसली असेल म्हणून लक्षात नसेल राहिलं तिच्या", तिने स्वतःशीच विचार केला. एक रिक्षा समोर येऊन थांबली, त्या रिक्षावाल्याशी हुज्जत घालत असतानाच तिचा फोन वाजला, 'आशिष रानडे कॉलिंग' असं तिच्या फोनवर दिसलं, मधु आधीच उशीर झाल्यामुळे आणि रिक्षावाल्याशी झालेल्या भांडणाने वैतागलेली. जरा चरफडतचं तिने फोन उचलला, "बोला रानडे!". फोन वरती आशिषचं बोलणं ऐकून तिने फोन ठेवला आणि ती सुन्न होऊन बसून राहिली.
क्रमशः..!
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
