स्थळ - रानडे बंगला, पुणे
"हरी ओम नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसि.." रानडेकाका आपल्या सकाळच्या पूजेत बुडाले होते. नैवेद्याची वाटी रिकामी बघून त्यांनी काकूंना आवाज दिला, "अहो, आजही नैवेद्याला उशीर का? माझं नाही तर नाही पण कमीत कमी देवाचं तरी वेळेत करत जा". त्यांचा आवाज ऐकून काकू नैवेद्याची वाटी घेऊन आल्या.
"सॉरी मगाशीच बनवून ठेवला होता पण आतच राहिला सकाळच्या गडबडीत. आज रेवाला (आशिषची वाहिनी) लवकर निघायचं होतं त्यामुळे तिची पण घाई होती." त्यांनी वाटी काकांच्या हातात देत म्हंटलं.
"रेवाला म्हणावं लवकर जायचं होतं तर लवकर उठायचं जरा, सासूबाईंना या वयात धावपळ करायला लावताना काहीच कसं वाटत नाही तिला. तूच तिला डोक्यावर बसवून ठेवलं आहेस." पूजा थांबवून काका म्हणाले.
"असू द्या हो. पोर दमते दिवसभर कामं करून आणि मी घरीच असते. काय बिघडलं केलं म्हणून. सुट्टीच्या दिवशी करतेच की मदत ती. आणि तुम्ही देवासमोर बसून तक्रारी करू नका हो. कलह वाढतात त्याने घरात." काकू पदराने तोंड पुसत म्हणाल्या.
"कलहांसाठी देव नाही तुमचे धाकटे चिरंजीव जबाबदार आहेत. त्यांना समजवा काही जमलं तर." म्हणून काका पुन्हा आपल्या पूजेत बुडाले. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. काकूंनी दार उघडलं तर समोर आशिष उभा होता, पण तो वेगळाच दिसत होता. लाल डोळे, दाढीची खुंट, चेहऱ्यावर काळजी, विस्कटलेले केस.
"आशु अरे तू सकाळी सकाळी इकडे? आत्ताच परत गेलेलास ना?" त्याच्याकडे बघून त्यांनी काळजीने विचारलं. आशिषने एकदा त्यांच्याकडे पाहिलं आणि काही न बोलता तो आपल्या खोलीत निघून गेला.
आशिषला घरी येऊन आठवडा होऊन गेला होता. पण तो कोणाशीच फारसा बोलत नव्हता. मधुचं आणि त्याचं नातं मधुने संपवलं आहे पण म्हणून तो दुसऱ्या कोणाशीही लग्न करायला तयार नाही एवढंच त्याने रानडेकाकूंना सांगितलं होतं. त्यांना मधुचं फार कौतुक वाटलं, कोण कुठली ही पोर, तिची आपल्याशी फारशी ओळखही नाही तिने आपल्या सांगण्यावरून आपलं कुटुंब वाचवण्यासाठी एवढं मोठं सॅक्रिफाईज केलं. आणि वर कुठेही आपल्यावर दोष नाही टाकला. आशिष घरी आला याचा अर्थ मी मधुला फोन केलेला हे त्याला माहिती नसणार, असा विचार त्यांनी केला. एवढी समजूतदार मुलगी आपली सून न बनू शकल्याची त्यांना खंत वाटली. एकदा दुपारी असंच त्यांनी आशिषच्या रूममध्ये डोकावलं तेव्हा तो लॅपटॉप वर काम करत बसलेला.
"आशु, बिझी आहेस का?" त्यांनी विचारलं.
"हो म्हणजे ऑफिसचं काम करतोय." आशिषने स्क्रीनकडे बघत उत्तर दिलं.
"काही नाही, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. आल्यापासून फारसा बाहेर येत नाहीस, जेवणात पण लक्ष नसतं तुझं. मधुशी काही बोलणं झालं का?" त्यांनी जरा चाचरतंच विचारलं. तिचं नाव ऐकून आशिषची टाइप करत असलेली बोटं एकदम थांबली आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकंस स्माईल आलं. किती दिवसांनी त्याने तिचं नाव ऐकलं होतं. तो इकडे आल्यापासून त्यांचं काहीच बोलणं नव्हतं झालं. वसुधाताईंचा एक दोनदा मेसेज आलेला पण त्यांनीही मधुबद्दल काही बोलणं टाळलं होतं. कशी असेल ती? मला मिस करत असेल? असा विचार त्याच्या मनात डोकावून गेला.
"नाही गं आई, आणि मला या विषयावर काही बोलायचं नाहीये." त्याने तिचा विचार दूर ढकलायचा प्रयत्न करत उत्तर दिलं.
"तू फार मनाला नको लावून घेऊस बाळा. आयुष्यात ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांचं प्रेम आपल्याला मिळतंच असं नाही." त्यांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हंटलं.
"आई, जर मधुचं माझ्यावर प्रेमच नसतं ना तर मला एवढा त्रास झालाच नसता. पण मला दिसत होतं की ती मला मुद्दामून दूर लोटतेय. तिचा स्वतःच्याच मनात कसलातरी संघर्ष चालू होता. माझ्या मधुला मी ओळखतो गं, तिच्या डोळ्यात पाहिलेलं प्रेम खोटं असूच शकत नाही. मी खूप प्रयत्न केला तिला समजवायचा पण मला असं वाटतंय तिच्यावर कसलंतरी दडपण आलेलं, त्यामुळे माझं बोलणं तिच्यापर्यंत पोहोचतंच नव्हतं. माझ्या तिथे असण्याने तिलाही त्रासच झाला असता आणि ते मला बघवलं नसतं. म्हणून मी इकडे निघून आलो. पण तू काळजी नको करुस. मी ठीक आहे." बोलून आशिषने पुन्हा लॅपटॉपमध्ये डोकं घातलं.
रानडेकाकूंचे डोळे भरून आले, हे दोघं खरंच किती प्रेम करतात एकमेकांवर. मी माझ्या स्वार्थापायी माझ्या आशूच्या आयुष्याशी तर खेळत नाहीये ना? त्याने पुन्हा कोणावर प्रेमच नाही केलं तर? आत्ताच तो केवढा बदलला आहे. एरवी येतो तेव्हा माझी मस्करी करत माझ्या मागे मागे फिरत असतो, आणि यावेळी जेवायला पण रूमच्या बाहेर येत नाहीये. नवऱ्याचा हट्ट टिकवण्याच्या नादात मी या पोरांची केवढी परवड करते आहे. त्यांची या सगळ्यात काय चूक आहे? डोळे पुसत त्या आशिषच्या रूममधून बाहेर आल्या.
संध्याकाळी आशिष मित्राला भेटायला बाहेर जात असताना रानडे काकांचा आवाज त्याच्या कानावर पडला,"काय चिरंजीव, यावेळी किती दिवस मुक्काम? ती कोण मुलगी आहे तिचा नाद सोडलेला दिसतोय, मला आधीच माहिती होतं हे काही फार काळ टिकणार नाही." त्यांच्या शब्दांनी आशिषचा पारा चढत होता पण कोणाशीही वाद घालायचं त्राण त्याच्यात नव्हतं.
"त्या मुलीचं नाव मधु आहे बाबा. आणि तो नाद नाही ते प्रेम होतं. इन फॅक्ट आहे." एवढंच म्हणून तो बाहेर निघून गेला. काकू हे संभाषण किचनच्या दारात उभं राहून ऐकत होत्या.
आशिष गेल्यावर त्यांनी बाहेर येऊन काकांना विचारलं, "कशाला तुम्ही त्याला उगाच बोलताय. आधीच त्याची अवस्था दिसत नाहीये का तुम्हाला? झालंय ना तुमच्या मनासारखं आता?"
"कसली अवस्था? दोन दिवसाच्या प्रेमात एवढं आंधळं व्हायला काय झालंय ह्याला. आणि माझ्या मनासाखं कुठे काही झालंय? त्या ऋताशी लग्न करायला होकार दिलाय का ह्याने? कसं वाटलं असेल तिला?" काकांनी त्यांच्याकडे न बघता म्हंटलं.
आता मात्र काकूंचा संयम संपला, "काय हो, त्या ऋताची तुम्हाला एवढी काळजी आहे, नाही मान्य आहे चांगली मुलगी आहे ती, पण स्वतःच्या मुलाबद्दल काहीच वाटत नाही का तुम्हाला? एवढं त्याने चुकीचं काय केलंय? तुमचं ऐकून लॉला ऍडमिशन न घेता मार्केटिंगला घेतली. घरचा बिझनेस जॉईन न करता स्वतःच्या जीवावर नोकरी शोधली हेच ना? तुम्ही तरी तुमच्या वडिलांचं ऐकलं होतंत का? त्यांचं ऐकून घरची शेती सांभाळली असतीत तर आज ही 'रानडे लॉ फर्म' उभी राहिली असती का? तेव्हा त्यांनी जर तुम्हाला त्यांच्या आयुष्यातून बेदखल करण्याची धमकी दिली असती तर तुम्हाला तुमचं करिअर आणि आई-वडील यांत एकाची निवड करता आली असती? नाही ना, मग माझ्या मुलाला का हे करायला लावताय?" त्यांना एवढं संतापलेलं काका पहिल्यांदाच बघत होते.
"तू आता काहीही बोलत्येस..", काका आवाज चढवत म्हणाले पण त्यांचं वाक्य अर्ध्यातच थांबवून काकू म्हणाल्या,"हे मी खूप आधीच बोलायला हवं होतं, जेव्हा तुमच्या सततच्या कटकटीमुळे आशिष घर सोडून मुंबईला गेला. काय वाईट चाललंय हो त्याचं? चांगली नोकरी आहे, पुढेमागे करेल स्वतःच काहीतरी. आणि ती मुलगी, मधु, जिच्याबद्दल तुम्ही इकडे बसून आग ओकताय ना, त्या मधुमुळेच आपला आशिष आज घरी आहे. तुमचा इगो बाजूला ठेऊन जे तुम्हाला करायला जमलं नाही ते त्या मुलीने केलं. तिच्यामुळे आज आपलं कुटुंब एकत्र आहे." काकूंनी त्यांना मधुशी झालेलं सगळं संभाषण सांगितलं.
"ही माझी वॉर्निंग समजा किंवा अजून काही, पण हे आता थांबलं पाहिजे. तुमच्या हट्टापायी मी माझ्या मुलाच्या आयुष्याची परवड होऊ देणार नाही. मधु आणि आशिषच्या लग्नाला माझी पूर्ण संमती आहे आणि जर तुम्ही आशिषला, तुमच्यात आणि तिच्यात एकाला निवडायला भाग पाडणार असाल, तर मी तुम्हाला निक्षून सांगते की तो मधुलाच निवडेल आणि त्याच्या या निर्णयात मी त्याच्याबरोबर असेन, कारण त्यातच माझ्या आशुचा आनंद आहे." म्हणून काकू तिकडून निघून गेल्या आणि काका त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतंच राहिले.
क्रमशः..!
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
