Login

पालवी - भाग ११

imple and innocent girl from Mumbai, Madhu falls in love with charming young man Ashish from Pune! Though these two are sure about their future together, will their families accept their love?

(थोडं शांत झाल्यावर मधुने वसुधा ताईंना आशिषच्या आईंच्या कॉल बद्दल सांगायला सुरवात केली)..

"मधु कालच आम्हाला आशिषने तुम्हा दोघांबद्दल सांगितलं. म्हणजे तो इकडे आला तेव्हा मला त्याच्या वागण्या बोलण्यातून वाटतंच होतं की काहीतरी बदललं आहे. पण तेव्हा सगळे पार्टीच्या तयारीत होते त्यामुळे बोलायला वेळ नाही मिळाला. आशिषच्या बाबांचा वाढदिवस खूप छान साजरा झाला. त्यात त्यांच्या जवळच्या मित्रांना पण बोलावलं होतं. त्यांच्या सगळ्यात खास मित्राची मुलगी ऋता आणि आशिष सारख्याच वयाचे आहेत. एकत्रच ते लहानाचे मोठे झाले. आमचे संबंध एवढे घरच्या सारखे आहेत की ती कितीतरी वेळा आमच्याकडे येऊन गेली आहे. ते दोघं लहान असताना आम्ही कायम म्हणायचो की मोठे झाले की या दोघांचं लग्न लावून देऊ. नंतर पोरं मोठी झाली आणि आपल्या आपल्या आयुष्यात रमली. आशिष आणि ऋताचा सध्या एकमेकांशी फारसा कॉन्टॅक्टही नव्हता वाटतं, अशातच ते दोघं यांच्या पार्टीला भेटले तेव्हा स्वाभाविकपणे लहानपणीच्या आठवणीत रमले. पण त्यांना एकत्र बघून आशिषच्या बाबांनी वेगळाच अर्थ लावला. तेव्हा आम्हाला तुमच्या बद्दल काही माहित नव्हतं. आशिषला न विचारता परस्परच त्यांनी त्यांच्या मित्राला आणि ऋताला दुसऱ्यादिवशी आमच्याकडे बोलावलं आणि त्या दोघांच्या लग्नाचा विषय काढला. आशिषला याबद्दल काहीच माहिती नसल्याने त्याला काय बोलावं कळलं नाही. ऋतालाही ते लगेच जाणवलं. म्हणून तिने स्वतःच विचार करायला वेळ हवा म्हणून वेळ मारून नेली. पण आशिषसाठी तिला वाटणारं प्रेम आम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे." रानडे काकू समोरून बोलत होत्या. आशिषचं नाव दुसऱ्या कोणत्या मुलीबरोबर जोडलं गेलेलं ऐकून सुद्धा मधुला प्रचंड त्रास होत होता. ती काहीच न बोलता ऐकत राहिली.

रानडे काकू पुढे घडलेलं सांगत राहिल्या, ऋता आणि तिचे बाबा गेल्यावर, आशिष खूपच चिडला, "बाबा तुम्ही मला न विचारता असं परस्पर काहीतरी कसं ठरवू शकता? आत्ता जे घडलं ते आमच्या दोघांसाठी किती ऑकवर्ड होतं."

त्याचं बोलणं ऐकून त्याच्या बाबांचा पण पारा चढला, "आमचं काही ऐकायचंच नाही असं तू ठरवून टाकलं आहेस का? आणि ऑकवर्ड तुझ्यासाठी होतं का आमच्यासाठी. एवढ्या वर्षांच्या आमच्या मैत्रीत तुझ्या या वागण्यामुळे अंतर आलेलं मला आवडणार नाही. आणि त्या मुलीमध्ये वाईट काय आहे? तुम्ही दोघं एकमेकांना लहानपणापासून ओळखता, तिचं या घरातल्या माणसांशी एक नातं आहे. अजून काय हवंय?".

"अहो बाबा, प्रेम नावाची पण गोष्टं असते, मी ऋताबद्दल तसा विचार कधी केलाच नाहीये. आणि तसही माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे, मधुमिता गोखले नाव आहे तिचं." आशिष म्हणाला.

"अच्छा म्हणजे आता हे पण तुझं तूच ठरवलं आहेस का? आम्हाला काही सांगायची इच्छा झाली नाही वाटतं तुला? नशीब परस्पर लग्नकरून नाही आलास. कोण कोणती मुलगी या घरात आणणार तू, आम्हाला तिच्याबद्द्ल काहीही माहीती नसताना." त्याचे बाबा रागाने म्हणाले.

"आता सांगतोय ना मी बाबा, आमचं नातं खूप नवीन होतं म्हणून आधी सांगितलं नाही. आणि मधुबद्दल तुम्ही असं बोललेलं मला अजिबात आवडणार नाही. तुम्ही तिला एकदा भेटा, मला पूर्ण खात्री आहे तुम्हाला ती नक्की आवडेल." आशिषने त्यांना समजवायचा प्रयत्न केला.

"मला कोणालाही भेटायची गरज नाहीये. आजपर्यंत मी तुझ्याकडे कधी काही मागितलं नाहीये. तू कायम तुला हवं तेच करत आलायस. तुझ्या कॉलेज डिग्री पासून नोकरी पर्यंत तू सगळी स्वतःचीच मनमानी केली आहेस. घरचा बिझनेस सोडून दुसर्यांकडे नोकरी करायला लागलास, पुण्याचं आपलं राहतं घर सोडून मुंबईला भाडेकरू म्हणून राहतोयस, हे सगळं मला पटत नसताना पण मी मान्य केलंय. पण आता हे माझ्या मनासारखंच झालं पाहिजे. नसेल तर यापुढे आमचा तुझ्याशी काहीच संबंध नाही. तुझ्या आयुष्यात आम्हाला काही किंमतच नसेल तर उगाच नावापुरती नाती कशाला ठेवायची." आशिषच्या बाबांचा राग अनावर झाला होता.

"बाबा, एवढं टोकाला का जाताय. माझं आयुष्य कोणाबरोबर जगायचं हे मी नको का ठरवायला.आणि तुम्ही तिला न भेटताच का ठरवताय हे सगळं?" आशिषने पुन्हा त्यांना समजवायचा प्रयत्न केला.

"मी माझा निर्णय सांगितला आहे. यापुढे काय करायचं ते तू ठरव." त्याचे बाबा काहीही ऐकून घ्यायच्या मनस्थितीमध्ये नव्हते.

शब्दाने शब्द वाढला आणि आशिषने सांगून टाकलं, "मी मधुशीच लग्न करेन, मग ते तुमच्या संमतीने असो वा नसो." आणि तो तिकडून निघून गेला. त्या दिवशी तो त्याच्या मित्राकडेच राहिला. रागात निघून गेल्यामुळे त्याचा फोनपण तो घरीच विसरला. आत्ता तुझं नाव बघून फोन उचलला मी. रानडेकाकूंनी घडलेला सगळा प्रसंग मधुला सांगितला. तिच्याकडून काहीच रिस्पॉन्स नाही आला म्हणून त्यांनीच विचारलं , "मधु, ऐकतेयस ना? मला खरंच तुला या परिस्थितीत टाकायचं नव्हतं. आशिषला हे अजिबात आवडणार नाही मला माहिती आहे. पण एक आई म्हणून तुझी मदत मागतेय मी. आशिष घर सोडून मुंबईला शिफ्ट झाला तेव्हा मनात कुठेतरी आशा होती की पुढे सगळं नीट होईल, पण आता हे दोघं बाप लेक हट्टालाच पेटलेत. कोणीच ऐकून घ्यायला तयार नाही. आणि मधल्या मध्ये मी कात्रीत सापडले आहे. ह्या दोघांच्या या हट्टाने संपूर्ण कुटुंब तुटेल गं. आशिष आमचं कोणाचंच ऐकणार नाही. तूच माझी शेवटची आशा आहेस. तू त्याला समजावशील?" त्यांनी येणारा हुंदका अडवायचा प्रयत्न करत मधुला विचारलं.

"मी बघते." म्हणून मधुने फोन ठेवला.

मधुने सांगितलेला तिचा आशिषच्या आई बरोबरचा संवाद ऐकून काय बोलावं ते वसुधाताईंना ही कळत नव्हतं. "मग तू आता काय ठरवलं आहेस?" त्यांनी मधुला विचारलं.

"हे सगळं कळल्यावर मी त्याच्याशी लग्न कसं करू आई? आमच्या लग्नामुळे तो त्याच्या आई वडिलांना दुरावणार असेल तर मला हे करणं शक्य नाहीये. मी आशिषला खूप चांगलं ओळखते गं. तो त्याच्या आईशी खूप क्लोज आहे. त्याच्यात आणि त्याच्या वडिलांमध्ये कितीही मतभेद असले तरी शेवटी ते त्याचे वडील आहेत. आपल्या आयुष्यात वडिलांची जागा काय असते हे त्यांना गमावल्या शिवाय नाही कळत. हे माझ्यापेक्षा जास्त कोणाला समजेल? मी आशिषच्या आयुष्यात असेपर्यंत तो माझा हात कधीच सोडणार नाही, त्यासाठी तो बाकी काहीही सोडेल हे ही मला माहिती आहे. पण त्याला त्याच्या आई-वडिलांपासून तोडून आमचं नातं सुरु नाही करायचंय मला." मधु खिडकीतून बाहेर पहात म्हणाली.

"अगं पण ह्यात चूक त्याच्या वडिलांची पण आहे ना. सगळ्याच बाप लेकांचं नातं तुझ्या आणि अण्णांसारखं नसतं. जर तुमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे तर तुम्ही एकत्रच राहिलं पाहिजे." वसुधाताई स्वतःशीच विचार करत म्हणाल्या.

"त्याच्या आई च्या जागी तू असतीस तर आई? काही दिवसांपूर्वी भेटलेल्या मुलासाठी मी तुला सोडून गेलेलं चाललं असतं तुला?" मधुने त्यांच्याकडे बघत प्रश्न विचारला. वसुधाताईंना त्यांची चूक कळली. अशी वेळ आपल्याच मुलीच्या आयुष्यात का यावी याचं त्यांना वाईट वाटलं आणि आपल्या मुलीचा अभिमानही वाटला.

"मधु एवढी मोठी कधी झालीस गं, स्वतःला इतका त्रास होत असताना दुसऱ्या कोणासाठी काहीतरी करायला खूप हिम्मत लागते." तिच्या डोक्यावरून हात फिरवत त्या म्हणाल्या.

"दुसऱ्या कोणासाठी कुठे, माझ्या आशिषसाठी करतेय मी हे सगळं." म्हणून मधु तिकडून उठून गेली.

रात्री मधु बाल्कनीमध्ये उभी राहून स्वतःशीच विचार करत होती.

"मला वाटलंच तू इकडे असशील." बाजूच्या बाल्कनीतुन आशिष तिच्याकडे बघत म्हणाला. सकाळी झालेलं सगळं त्याला विसरून जायचं होतं, त्याला त्याचं अन मधुचं नातं परत पहिल्यासारखं हवं होतं.

"आशिष तू इथे नसताना मला आपल्या नात्याबद्दल विचार करायचा वेळ मिळाला, कदाचित कायम एकमेकांच्या आसपास असल्याने आपण साध्या आपुलकीला प्रेम समजायला लागलोय असं मला वाटतंय. त्यामुळे आपण लग्न न करणंच योग्य. तसही तुझ्या वागण्यावरून तुझ्या घरच्यांचाही या लग्नाला फारसा सपोर्ट आहे असं मला वाटत नाही. म्हणून अजून एकमेकांचा वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण हे इकडेच थांबवूया." मधुने दोघांना होणाऱ्या या त्रासातून एकदाचच काय तो मार्ग काढण्यासाठी म्हंटलं. त्यानंतर आशिषकडे बघायची हिम्मत तिच्यात नव्हती. तिच्या डोळ्यातलं पाणी त्याच्यापासून लपवण्यासाठी त्याच्या उत्तराची वाट न बघताच ती आत निघून गेली.

सकाळी मधु झाडांना पाणी घालायच्या निमित्तानं बाल्कनीत गेली, कालच्या प्रसंगानंतर आशिष बरा आहे ना एवढंच तिला जाणून घ्यायचं होतं. पण त्याच्या बाल्कनीचं दार बंद होतं. आत येऊन तिने वसुधा ताईंना विचारलं, "आई आशिष दिसला का गं सकाळपासून?"

पदराला बांधलेल्या चाव्या तिच्या हातात ठेऊन त्या म्हणाल्या,"हो! सकाळी चाव्या देऊन गेला, निघतांना फक्त 'येतो..' एवढंच म्हणाला!" मधु तिच्या हातातल्या चाव्यांकडे पहातच राहिली.

क्रमशः..!

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →