Login

पालवी - भाग १०

Simple and innocent girl from Mumbai, Madhu falls in love with charming young man Ashish from Pune! Though these two are sure about their future together, will their families accept their love?

वसुधाताई मधुची चिडचिड शांतपणे पाहत होत्या, "आई काय हे? मी कितीवेळा सांगितलं आहे माझे ऑफिसचे कपडे या कपाटात नको ठेवत जाऊस, सगळे चुरगळले आहेत परत.आता मी ऑफिसला काय घालू?". कालपासून तिचं काय बिनसलंय तेच त्यांना कळत नव्हतं. छोट्या छोट्या गोष्टींवरून तिची चिडचिड चालू होती. त्यांनी तिला एक दोनदा विचारून पण बघितलं पण मधुने त्यांना काहीच धड उत्तर दिलं नाही,"मला कुठे काय झालंय? तु मुद्दामून मला आवडत नसलेल्या गोष्टी करतेस आणि मग मी चिडले की म्हणतेस चिडचिड का करतेस."

"बरं बाई, माझंच चुकलं. मी तुझे कपडे परत इस्त्रीवाल्याकडे टाकते म्हणजे उद्या तुला घालायला होतील.", त्या लेकीसमोर पडतं घेत म्हणाल्या. मधु आवरत असताना कमीत कमी दहा वेळा आशिषचा फोन येऊन गेला पण तिने एकदाही उचलला नाही. त्याने बरेच मेसेजेस पण पाठवलेले जे मधुने उघडलेही नव्हते. शेवटी त्याने वसुधा ताईंना फोन केला.

"हॅलो काकू, मी आशिष बोलतोय. कशा आहेत तुम्ही?", त्याने पलीकडून विचारलं.

"काही विचारू नकोस. तुझ्या मधुचं फिरलंय डोकं, आणि सध्या तू ही नाहीस इथे त्यामुळे मला धारेवर धरलं आहे तिने.", त्यांनी आशिषकडे तक्रार केली.

"हो का, ती माझा फोनही उचलत नाहीये कालपासून. मेसेजचं ही काही उत्तर नाही. काही कळत नाहीये काय झालंय. म्हणजे परवा मला तिला फोन नाही करता आला म्हणून चिडली असेल असं वाटलं मला. पण दोन दिवस राग धरून ठेवणाऱ्यातली नाही आपली मधु", आशिष म्हणाला. वसुधा ताईंना फोनवर त्याचा आवाज पण एकदम थकल्यासारखा वाटत होता.

"तुमचं काही भांडण झालं आहे का? तुझाही आवाज नेहमीसारखा नाहीये.", त्यांनी आशिषला विचारलं.

"नाही तसं काही नाही, जरा दमायला झालंय एवढंच. तुम्ही मधुला फोन देता का?", त्याने विचारलं.

"मधु, आशिषचा फोन आहे गं. तु उचलला नाहीस म्हणून मला केला त्याने.", त्यांनी बाहेरून मधुला आवाज दिला.

"मला आत्ता वेळ नाहीये बोलायला, ऑफिसला उशीर होतोय.", मधु घाईघाईने घराबाहेर पडत म्हणाली. आशिषने तिचा आवाज फोनवरून ऐकला, तो ऐकून त्याला बरं वाटलं पण काळजीही वाटली. 'काय झालंय हिला?', स्वतःशीच विचार करत त्याने फोन ठेवला. 

ऑफिसला पोहोचल्यावर मधुने आशिषचे मेसेजेस वाचले. 'मधु फोन का उचलत नाहीयेस? सगळं ठीक आहे ना?', 'काहीतरी बोल? बिझी आहेस का?','आधीच एवढे लांब आहोत आपण, तूझ्याशी बोलल्याशिवाय माझं मन लागत नाहीये', असे अजून बरेच मेसेजेस त्याने पाठवलेले. ते वाचताना मधुचे डोळे भरून आले, लगेच त्याला कॉल करावा असं तिला वाटत होतं. पण तिने स्वतःला आवरलं. त्याचा विचार मनातून काढण्यासाठी तिने स्वतःला कामात बुडवून घेतलं. दुपारी अनुबरोबर जेवत असताना, आशिषचा पुन्हा फोन आला. मधु फोन उचलत नसल्याचं बघून अनुनेच उचलला.

"हाय आशिष, का आता मी तुला जीजू म्हणू, म्हणजे तुमचं सगळं ठरल्यातच जमा आहे ना म्हणून विचारलं.", मधुला डोळा मारत ती म्हणाली.

"म्हण की तुला हवं ते. पण मधु आहे का तिकडे मला तिच्याशी जरा बोलायचं होतं.", आशिषने कसंबसं हसून म्हंटलं. मधुने हातानेच 'मी नाहीये' अशी खूण केली आणि तिकडून निघून गेली. फोन ठेऊन अनु मधुपाशी आली तेव्हा ती कसल्यातरी विचारात हरवली होती.

"आत्ता एक्झॅक्टली काय झालं सांगशील का मला? तू त्याला अव्हॉइड करतेयस का?", अनुने काळजीने विचारलं.

"नाही तसं काही नाहीये, आणि तुला फोन उचलायची काय गरज होती? माझा फोन आहे, मी बघेन ना कधी कोणाशी बोलायचं ते.", म्हणून मधु तिकडून निघून गेली.

रात्री मधु बाल्कनीमध्ये येरझाऱ्या घालत असताना वसुधाताई आल्या.

"मधु, आशिषचा फोन आहे. आणि तू आता त्याच्याशी बोलायचं आहेस. केवढा काळजीत आहे अगं तो. त्याचा आवाज ऐकवत नाहीये मला. हे घे.", तिच्या हातात फोन देऊन त्या आत गेल्या. मधुकडे आता बोलण्याखेरीज काही पर्याय नव्हता, "हॅलो आशिष?".

"मधु..थँक गॉड. अगं काय झालंय तुला? तू माझे कॉल्स का घेत नाहीयेस? तू सोडून बाकी सगळे माझे फोन उचलतायत. काही चुकलंय का माझं. तर तसं सांग ना मला. तुझं न बोलणं सहन नाही होत आहे मला. तुला कल्पना नाहीये इकडे काय काय झालंय. कधी एकदा मी परत तुझ्याकडे येतोय असं झालंय मला. त्यात तू माझ्याशी बोलत नाहीयेस. मला इतकं एकटं वाटतंय.", त्याच्या आर्जवी शब्दांनी मधुला गहिवरून आलं. त्याला होणारा त्रास तिला कळत होता. आपण करतोय ते योग्य करतोय ना असंही तिला वाटून गेलं. पण मग तिने मन घट्ट केलं.

"आशिष अरे असं काहीच नाहीये, जरा बिझी होते म्हणून बोलता नाही आलं. तू आलास की बोलूच आपण. सॉरी खूप दमलेय आज, ठेवते फोन. बोलू नंतर", म्हणून मधुने तो काही बोलायच्या आधीच फोन ठेऊन दिला.

दुसऱ्या दिवशी सकाळी मधुने ऑफिसला जायला दरवाजा उघडला तर समोर आशिष उभा होता. मधुला बघून त्याने कसलाही विचार न करता दारातच तिला मिठी मारली. त्याच्या मिठीमध्ये तीही काही क्षण सुखावली. सगळं नॉर्मल असताना त्याला दोन दिवस लवकर परत आलेलं बघून तिला केवढा आनंद झाला असता. पण आता काहीच नॉर्मल नव्हतं. त्याच्या आईशी झालेलं बोलणं आठवून मधु पटकन बाजूला झाली.

"प्लिज आशिष, असं नको करत जाऊस. कोणी बघितलं तर तू नामनिराळा राहशील, बोल लोकं मुलीलाच लावतात.", मधु त्याच्याकडे पाठ वळवत म्हणाली.

"म्हणजे? तुला मी लवकर आलोय याचा आनंद नाही झालाय का? आणि काय बोलतेयस तू? तुझ्या आईकडे ऑफिशिअली तुझा हात मागितला आहे मी, विसरलीस का तू?", आशिष तिला स्वतःकडे वळवत म्हणाला. 

"पण लग्न झालं नाहीये ना अजून?', मधुला त्याच्याकडे बघून बोलणं कठीण जात होतं. "अगं होईलच ना. काकूंनी संमत्ती दिलीच आहे की. तू म्हणत असशील तर मी आज तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण तू अशी चिडू नकोस. काही प्रॉब्लेम असेल तर सांग ना मला.", आशिष तिचा चेहरा आपल्या हातात घेत म्हणाला.

"आणि तुझ्या घरच्यांनी? त्यांनी दिली आहे का संमत्ती?", मधुने त्याचे हात बाजूला करत विचारलं. तिच्या प्रश्नाने आशिष गप्प झाला.

"प्लिज तू आत्ता इकडून जा. लग्न म्हणजे काय मजा वाटते का तुला. म्हणे आज लग्न करायला तयार आहे. मी नाही आहे तयार. हे सगळं खूप फास्ट होतंय असं वाटतंय मला. मला विचार करायला वेळ हवाय. आणि प्लिज डोन्ट टच मी. मगाशीच बोलले ना मी.", मधु जमिनीकडे बघत म्हणाली. आशिषने आता काहीही न बोलता तिकडून निघून जावं असच तिला वाटत होतं. तिच्या बोलण्याने त्याला झालेलं दुःख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं आणि त्याने तिच्या काळजाला किती घरं पडत होती तिचं तिलाच माहिती होतं. त्याच्या डोळ्यातलं पाणी बघून तिचा जीव तुटत होता. अजून काही क्षण तो समोर थांबला असता तर मधुला स्वतःला आवरता नसतं आलं.

"मधु असं का बोलतेयस? अचानक एवढा परकेपणा का?", आशिषने भरलेल्या आवाजात विचारलं. पण मधुने त्या आधीच दरवाजा बंद केलेला.

आवाज ऐकून वसुधाताई बाहेर आल्या तेव्हा मधु दारातच बसलेली. तिचा चेहरा अश्रूंनी भिजलेला. तिला तसं बघून वसुधाताई धावत  तिच्याकडे गेल्या.

"मधु अगं इथे काय बसलीयेस. आणि आत्ता आशिष आलेला का? तू रडतेयस का? काही सांगशील की मला?", तिचे डोळे पुसत त्या म्हणाल्या. मधुने त्यांना घट्ट मिठी मारली.

"आई मला काही कळतच नाहीये गं मी काय करतेय. एकीकडे तो मुलगा आहे ज्याच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे आणि दुसरीकडे माझी तत्व. या दोघांमध्ये काहीही निवडलं तरी हरणार मीच आहे", वसुधा ताईंना ती काय म्हणतेय त्याचा अर्थच लागत नव्हता. त्या तिला उठवून आत घेऊन गेल्या. पाणी पिऊन थोडं शांत झाल्यावर मधुने त्यांना आशिषच्या आईच्या कॉल बद्दल सांगायला सुरवात केली..

क्रमशः..!

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →