पगाराचा काटा
भाग १
"अनिकेत, गेस व्हॉट! मला प्रमोशन मिळालंय... आणि फक्त पोस्ट नाही वाढली , तर माझा पगार आता अल्मोस्ट दुप्पट झालाय !" श्रेयाने घरात पाय ठेवल्या ठेवल्या आनंदाने ओरडत अनिकेतला मिठी मारली.
अनिकेतने तिला जवळ घेतलं, पण त्याच्या चेहऱ्यावर आनंदापेक्षा आश्चर्याचे भाव जास्त होते.
"अरे वा! अभिनंदन श्रेया. दुप्पट ? म्हणजे आता तुझा पगार माझ्यापेक्षाही...?" त्याचे वाक्य अर्धवटच राहिले.
" हो! म्हणजे तुझ्या पगाराच्या जवळजवळ दीड-दोन पट! आपण ठरवलं होतं ना, नवीन गाडी घ्यायची आणि आई-बाबांना चारधाम यात्रेला पाठवायचं, ते आता आपण लवकरच पूर्ण करू शकू!"
श्रेया उत्साहात बोलत होती. तिचे डोळे स्वप्नांनी चमकत होते. पण अनिकेतच्या मनात मात्र पगाराच्या गणिताचा एक वेगळाच काटा टोचायला लागला होता.
अनिकेत एका मध्यम दर्जाच्या कंपनीत मॅनेजर होता. त्याला स्वतःच्या कष्टाचा आणि पगाराचा नेहमीच अभिमान असायचा. घरातील मोठे खर्च तोच करायचा आणि श्रेयाचा पगार सेव्हिंग म्हणून बाजूला पडायचा. ही व्यवस्था अनिकेतच्या पुरुषी अहंकाराला सुखावणारी होती. पण आज अचानक श्रेयाचं पारडं जड झालं होतं.
सुरुवातीचे काही दिवस ठीक गेले. पण हळूहळू अनिकेतच्या वागण्यात एक सूक्ष्म कडवटपणा यायला लागला.
सुरुवातीचे काही दिवस ठीक गेले. पण हळूहळू अनिकेतच्या वागण्यात एक सूक्ष्म कडवटपणा यायला लागला.
एका रविवारी ते दोघे त्यांच्या मित्रांसोबत बाहेर डिनरला गेले होते. गप्पांच्या ओघात श्रेयाच्या प्रमोशनचा विषय निघाला. त्यांचा मित्र राहुल म्हणाला,
" मानलं बुवा श्रेया तुला! अनिकेत, तू खरंच नशीबवान आहेस दोस्ता. आता तुझ्यावरचं घराचं ओझं कमी झालं म्हणायचं. श्रेया कमावती आहेच. पण आता तर ती तुझ्याही पुढे गेलीये!"
राहुलने हे कौतुकाने म्हटलं होतं, पण अनिकेतला ते एखाद्या तीक्ष्ण बाणासारखं बोचलं. त्याला असं वाटलं की, जणू काही मित्र त्याची मस्करी करत आहेत. त्याचा पुरुषी अहंकार दुखावला गेला आहे. त्यावेळी तर तो फक्त फिकट हसून गप्प बसला. जेवण झाल्यावर बिल आलं. अनिकेतने पाकीट काढलं, पण श्रेयाने आधीच तिचं कार्ड वेटरकडे दिलं होतं.
"अरे असू दे अनिकेत, आज माझ्याकडून ट्रीट!" ती हसून म्हणाली.
घरी परतताना गाडीत अनिकेत पूर्णपणे शांत होता.
"काय झालं अनिकेत ? तू तिथे रेस्टॉरंटमध्ये अचानक गप्प का झालास ?" श्रेयाने काळजीने विचारलं.
" काही नाही, तुला बिल भरून सगळ्यांसमोर तुझं मोठेपण मिरवायचं होतं ना ? ते झालं, आता शांत बस," अनिकेतचे स्वर धारदार होते. आज त्याचा तोरा म्होरा बदलला होता.
" मोठेपण मिरवायचं ? अनिकेत, मी फक्त बिल भरलं. आपण कितीतरी वेळा असं करतो ना ? तुला का एवढं वाईट वाटतंय ?" श्रेयाला त्याचा राग अनाठायी वाटत होता.
" हो, पण तेव्हा पगार माझा जास्त होता ! आता तुला वाटतंय की तू जास्त कमवतेस म्हणजे तू काहीही करू शकतेस. मित्रांसमोर माझा अपमान झाला, हे तुला कळतंय का ?" अनिकेत जोरात ओरडला.
यानंतर घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींवरून खटके उडू लागले. पूर्वी ज्या गोष्टी अनिकेत हसण्यावारी न्यायचा, त्यावर आता तो तावातावाने भांडू लागला. ऑफिसमध्ये श्रेयाला एखादा दिवस उशीर झाला, तर अनिकेतचा पहिला प्रश्न असायचा ,
" पगार वाढला म्हणजे ऑफिसमध्येच राहायचं असं काही कॉन्ट्रॅक्ट केलंय का ?"
श्रेया सुरुवातीला दुर्लक्ष करायची. तिला वाटायचं की ऑफिसच्या कामाचा ताण असेल. पण परिस्थिती दिवसें दिवस बिघडत चालली होती.
एके दिवशी श्रेयाने घरासाठी एक लेटेस्ट व्हर्जनचा एअर प्युरिफायर ऑर्डर केला. अनिकेत घरी आल्यावर त्याने तो पाहिला. तो बॉक्स बघून त्याचा पारा चढला.
"हे काय आहे ? आणि मला न विचारता हे का आणलंयस ?"
"अनिकेत, तुला माहितीये ना मला डस्ट ॲलर्जी आहे, म्हणून मी मागवला. सध्या सेल सुरू होता म्हणून विचार केला घेऊन टाकू." श्रेयाने शांतपणे उत्तर दिलं.
" म्हणजे आता तू स्वतःचे निर्णय स्वतःच घेणार ? माझी गरज संपली का या घरात ? की तुला पैसे जास्त मिळतात म्हणून आता तू या घराची मालकीण झाली आहेस ? हे असं करून तुला के दाखवून द्यायचं आहे ? मी सक्षम नाही का ? " अनिकेतचा आवाज घरभर घुमला.
श्रेया सुन्न होऊन त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. ज्या पैशांमुळे तिला वाटलं होतं की त्यांच्या आयुष्यातील दुःख कमी होतील, तेच पैसे आज त्यांच्या नात्यात भिंत बनून उभे होते.
"अनिकेत, तुला खरंच असं वाटतंय का ? पैसा ही फक्त एक गरज आहे, ती आपल्या नात्यापेक्षा मोठी कधी झाली ?" तिने हुंदका आवरत विचारलं.
" मला काहीच बोलायचं नाहीये. ज्या दिवशी तुला कळेल की घराचा प्रमुख पुरुष असतो. त्याच्या ईगोला काहितरी किंमत असते, त्या दिवशी माझ्याशी बोल!" असं म्हणून अनिकेत जोरात दरवाजा आपटून बेडरूमबाहेर निघून गेला.
हॉलमध्ये पसरलेल्या त्या शांततेत श्रेयाला अनिकेतच्या शब्दांतील दाहकता जाणवत होती. पगाराचा तो काटा त्यांच्या नात्याला जखम करत होता, आणि ती जखम भरून काढण्यासाठी केवळ पैसा पुरेसा नव्हता.
