शॉर्ट फिल्म लेखन स्पर्धा जुलै २०२६
पॅकेज
सुधाताई त्यांच्या एकुलत्या एका लेकीचे, मनालीचं लग्न जमत नव्हतं म्हणून हताश झाल्या होत्या. मनालीच प्रत्येक मुलात काही ना काहीतरी खोट काढत होती. आताच एका मुलाचं प्रोफाईल त्यांनी तिला दाखवलं होते.
"मनु अगं आता हा मुलगा सगळ्या बाजूनी तुला योग्य असा आहे. मग आता तू ह्याला नाही का म्हणतेस?"
"अगं आई तुझं बरोबर आहे. हा सर्वतोपरी मला योग्य आहे पण उंचीत मार खाल्ला ना. आता देवाने मला इतकी चांगली उंची दिली यात माझा काय दोष! अगं तो चक्क माझ्यापेक्षा दोन इंच कमी आहे."
"अगं पुरुषाचे कर्तृत्व बघायचे असते."
"आई तू घिसे-पिटे डायलॉग्ज मारू नकोस. आम्हाला एकमेकांबरोबर चालताना कंफर्टेबल वाटायला नको का!"
"हे बघ मनु एकतर तुम्हा हल्लीच्या मुलींना कांदेपोह्याचा कार्यक्रम करून लग्न ठरवायचे नसतं. दोघांनाच आधी बाहेर कुठेतरी भेटायचं असतं. दोन्ही बाजूंनी दोन दोन माणसं असली की जरा बरं पडतं."
"तुला माझ्या लग्नाची इतकी घाई का झाली आहे."
"घोडे, पुढच्या वर्षी तीस वर्षांची होशील. आता तुला वाटतं की तू सुंदर आहेस, तुला खूप मोठ्या पॅकेजचा जॉब आहे. अगं तिशीनंतर खूप बदल होतात. मग तुला स्थळ येणं पण बंद होईल."
"माझं लग्न नाही झालं तरी चालेल. मी तुमची एकुलती एक मुलगी आहे ना तुमच्या बरोबरच राहीन."
"असं नसतं गं. लोकं आई बापाला नावं ठेवायला टपलेलेच असतात. मुलीचा पगार मिळतोय ना, मग कशाला लग्न करतील. त्यांना आम्ही सांगायला जाऊ का की आम्ही तिच्या पैशाला हात पण लावत नाही."
"तुम्ही लक्ष नका देऊ. इग्नोर मारायचं गं."
"तुला अगदी हवा तसा मुलगा मिळणार आहे का? कुठेतरी तडजोड करावीच लागेल ना! कोणाची उंची कमी, कोण जास्त काळा आहे, कोणाचं पॅकेज कमी आहे, कोण सेंट्रल साइडला राहतो म्हणून नको. किती ती कारणं तुझी. मलाच आता कंटाळा आला आहे सगळ्याचा."
"ए आई थांब थांब. हे बघ एक प्रोफाइल अगदी मला हवं तसं आहे. निखिल राणे. उंची सहा फूट, दिसायला देखणा, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयर. पठ्ठ्याने पॅकेज लिहिलं नाही. आई हा मला अपील झाला आहे. बोल याला भेटू का? भेटतेच. मला "हाय" पाठवलं आहे."
दोन तीन दिवसांनीच मनाली त्या निखिल नामक मुलाला भेटायला गेली.
"हाय, मी निखिल राणे"
"हाय मी मनाली."
दोघांनी अवांतर गप्पा मारल्यावर निघताना मनालीने त्याला विचारलं,
"निखिल तू तुझे सगळे प्लस पॉइंट्स लिहिलेस. तुझं पॅकेज नाही लिहिलंस."
"हो ते तुझ्यापेक्षा थोडं कमी आहे. तुला चालेल ना. पॅकेज बद्दल बोलता येईल. म्हटलं आधी एकदा भेटायला हवं."
"विचार करून सांगते तुला. बाय."
मनाली घरी आली तर तिच्या लाडक्या शैला मावशीने दार उघडलं. तिने तिला मिठी मारली,
"ए आज अचानक कशी आलीस?"
"आधी तू सांग तू एव्हढी खुश का आहेस.?"
"आज ती एका मुलाला भेटून आली आहे. काय गं नाव त्याचं."
"निखिल. सगळं छान आहे गं पण त्याचं पॅकेज माझ्यापेक्षा कमी आहे."
"आहे का म्हणजे ह्याच्यात पण काहीतरी कमीच आहे." आई वैतागून बोलली. शैला मावशी तिला शांत करत म्हणाली,
"मनु अगं आज त्याचं पॅकेज कमी आहे. उद्या त्याला नवीन जॉब मिळाला तर तुझ्यापेक्षा त्याचं पॅकेज जास्त पण असू शकतं. तुमच्या या आयटी क्षेत्राचं काही खरं नसतं बघ. कधी पटकन मोठ्या पगाराच्या नोकरीवरून काढून टाकतील ते कळत पण नाही. कसं असतं ना एखादा तुझ्यापेक्षा जास्त पॅकेजवाला मुलगा तुला आवडला पण तुमचे विचार जुळले नाहीत तर काय करशील?"
"हो मावशी ते बरोबरच आहे आणि हा मुलगा समजूतदार वाटतोय आणि दुसऱ्याचा आदर करणारा पण वाटतो."
"अगं तुला नुसता वाटतोय पण तो तसाच आहे ह्याची मी तुला खात्री देते."
ओठांचा चंबू करत मावशीकडे बघत मनाली म्हणाली,
"ते कसं काय. तू ओळखते का त्याला."
"अगदी तो लहान असल्यापासून. माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे. खरं तर तुला स्थळ म्हणून आधीच आणणार होते पण मी आणि तुझ्या आईने, तुमच्या स्टाईलने तुम्हाला भेटू द्यायच ठरवलं होतं. त्याला मीच सांगितलं होतं पॅकेज बद्दल लिहू नकोस. मनु मी तुला खात्रीने सांगते की निखिलशी लग्न केल्यावर तुला पश्चताप करायची वेळ कधीच येणार नाही."
"ए मावशी, सगळं मान्य आहे गं. पण नवऱ्याचं पॅकेज कमी असलं की त्याला इन्फेरीओरिटी कॉम्प्लेक्स येऊ शकतो आणि बायको रागाच्या भरात बोलू शकते, तुझे पॅकेज माझ्यापेक्षा कमी आहे जास्त आवाज करायचा नाही आणि तिथेच नात्याला सुरुंग लागायला सुरुवात होऊ शकते."
"मनु ह्या फक्त शक्यता आहेत. पण दोघेही समंजस असतील तर ह्या गोष्टीचा उल्लेख सुद्धा होणार नाही."
शैलाला दुजोरा देत आई पण म्हणाली,
"मनु आता जास्त विचार करू नकोस. आम्हाला दोघींनाही वाटतंय तू ह्या निखिलला हो म्हण. त्याचे कुटुंबीय पण चांगले आहेत. मुख्य म्हणजे तुझी लाडकी मावशी त्याला त्याच्या लहानपणापासून ओळखते."
"मला सुद्धा वाटतंय ह्या मुलात मला हव्या त्या क्वालिटीज आहेत. ए आई माझं एक बोट पकड."
"अजून लहानच आहेस. समजा मी तुला हवं ते बोट नाही पकडलं तर!"
"असं कसं मी मला हवं ते बोट पुढे करेन नेहमीसारखं."
मनालीने असं म्हणताच तिघीही हसल्या.
"चल आई मी तुमच्या डोक्यावरचं ओझं उतरवते आणि ह्या निखिलला हो म्हणते. आता तू आणि बाबा निश्चिंतपणे झोपू शकाल. मावशी इस बातपे तुझ्या हातचा गोडाचा शीरा होऊन जाऊ दे."
"चला पॅकेजपेक्षा निखिल जास्त महत्वाचा वाटला आमच्या मनुला."
©️®️सीमा गंगाधरे
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
