खास महिला दिना निमित्त
दोन अंकी नाटक : औट घटकेची राणी
दोन अंकी नाटक : औट घटकेची राणी
(हे नाटक आपल्या ईराच्या नियमित वाचक भाग्यश्री ऋषिकेश देशमुख, अमरावती यांच्या विनंतीवरून लिहिलं आहे)
लेखक : सीमा गंगाधरे
दिग्दर्शन : अशोक लुकतुके
निर्माता : समीर
वेशभूषा : आविष्कार
नेपथ्य : अविनाश
दिग्दर्शन : अशोक लुकतुके
निर्माता : समीर
वेशभूषा : आविष्कार
नेपथ्य : अविनाश
तिसरी घंटा वाजते आणि एका भारदस्त आवाजात घोषणा होते. "नाट्यलंकार" प्रस्तुत दोन अंकी नाटक "औट घटकेची राणी"
पडदा वर जातो आणि पहिला अंक सुरू होतो.
अंक पहिला :
स्थळ : नीरज आणि नंदिनीच्या नवीन थ्री बीएचके फ्लॅटचा हॉल. अद्ययावत सजावट खूप उठून दिसते. आकर्षक सोफा आणि बाजूला मोठ्या सोफ्याला मॅचिंग मोठ्या खुर्च्या. काचेचे डायनिंग टेबल. एका भिंतीला वॉल पेपर लावला आहे तर बाकीच्या भिंतीना आकर्षक रंग लावला आहे. खूप मोठ्या आकाराचा टीव्ही हॉल ची शोभा वाढवतोय. फॉल्स सीलिंग ची शोभा आकर्षक लाईट वाढवतात. मध्ये आधुनिक पद्धतीचे झुंबर आहे. नीरज ऑफिसला जायला तयार होतोय.
नंदिनी (विनोदाने) : हल्ली एका माणसाचा डबा अगदी धुतल्यासारखा स्वच्छ असतो. ए नक्की तूच खातोस ना!
नीरज(चिडवत) : हल्ली तू एव्हढे चविष्ट जेवण बनवतेस ना की डबा चाटायचा मोह आवरत नाही.
नंदिनी : तू वेळ काढून जरा सर्वांबरोबर जेवत जा. तुला रोज केबिनमध्ये जेवायचा कंटाळा येत नाही का?
नीरज : अगं कामच इतकं असतं ना आणि ते लवकर झालं की आम्ही आमच्या राणी सरकारांकडे लवकर येऊ शकतो. कधी जातो बाहेर सर्वांबरोबर जेवायला.
नंदिनी (लाडात येऊन) : नीरज ऐक ना
नीरज (लाडात प्रतिसाद देत): बोल न नंदू. आज काय विशेष सांगायचं आहे का!
नंदिनी (उत्साहाने) : अरे तुला माहिती आहे ना आमचे "सखी" महिला मंडळ आहे. आम्ही आठवड्यातून एकदा भेटतो. गेल्याच बुधवारी येत्या आठ मार्च या महिला दिनाची चर्चा चालली होती. काय कार्यक्रम ठेवायचा. प्रमुख पाहुणे वगेरे. तेव्हा मंजिरी म्हणाली की तिचे मिस्टर तिच्या साठी हिऱ्यांचा हार घेणार आहेत. शेफालीला तिचे मिस्टर नवीन डिझाइनचा सोन्याचा नेकलेस घेणार आहेत. रिनाला तिचे मिस्टर पैठणी घेणार आहेत. असं प्रत्येक जण काय काय महागाच्या गिफ्ट घेणार आहेत. मी एकदम गप्प होते कारण तू मला काय घेणार ते सांगितलच नाहीस. सगळ्यांनी माझ्यावर प्रश्नांचा भडीमार केला. मी त्यांना खोटेच सांगितलं की तू मला सरप्राइज देणार आहेस. हो ना नीरज तू मला काही सरप्राइज देणार आहेस का!
नीरज (थोडा दुःखी होत): हे बघ नंदू मी ह्या मोठ्या फ्लॅटसाठी आताच लोन घेतलं आहे. आपण महागाचे ह्या वर्षी काही घेऊ शकणार नाही. आपल्याला लाँग ड्राईव्हला जाण्यासाठी एक आलिशान कार घ्यायची आहे. मग हे लोन आपण लवकर फेडून टाकायला हवे ना.
नंदिनी (नाराज होत): नीरज आता तुझे माझ्यावर पहिल्यासारखे प्रेमच राहिले नाही. प्रत्येक वेळी लोनचे कारण देत असतोस. जाऊ दे मी महिला दिनाच्या दिवशी घरीच राहीन. बाहेर पडणारच नाही.
नीरज : नंदू मला सांग पूर्वी होते का गं हे डेज. तरी आपल्या आई बाबांचं एकमेकांवर किती प्रेम आहे. लहान सहान गोष्टीमध्ये ते आपलं सुख शोधत असतात. बरं मी आता ऑफिसला चाललोय मला स्माईल देऊन बाय तरी म्हण.
हिरमुसली नंदिनी इच्छा नसताना बळेच त्याला खोटं हसू चेहऱ्यावर आणत बाय म्हणते. तिला फ्लॅशबॅक मध्ये त्यांचे पूर्वीचे प्रेमात असतानाचे दिवस आठवतात.
रंगमंचावर थोडासा अंधार होऊन दृश्य बदलतं. एक निसर्गसुंदर बाग आहे. विविध रंगांची गुलाबाची फुलं फुलली आहेत. एका दिशेने नीरज येतो दुसऱ्या दिशेने नंदिनी येते. जवळ आल्यावर दोघे हलकेच धावत येतात. नीरज नंदिनीला मिठीत घेतो.
नीरज (प्रेमाने ओथंबलेल्या हळुवार स्वरात) :
राणी तुला भेटण्यासाठी जीव खूप आतुर असतो. तुझा विरह अजिबात सहन होत नाही.
राणी तुला भेटण्यासाठी जीव खूप आतुर असतो. तुझा विरह अजिबात सहन होत नाही.
नंदिनी (त्याच्या मिठीत सामावून जात): नीरज माझी अवस्था काही वेगळी नाही.
संवाद चालू असताना नीरज खिशातून एक नाजूक डबी काढून तिला उघडून दाखवतो.
नंदिनी (खूपच उतावीळपणे): अय्या ही अंगठी माझ्यासाठी आहे ना?
नीरज (तिच्या हातात अंगठी घालत): आवडली ना नंदू.
असेच सगळे प्रसंग नंदिनी आठवत बसते. तिला जेवायचं भानही उरत नाही. इतक्यात दारावरची बेल वाजते. आता ह्या वेळी कोण आलं म्हणत ती अनुत्साहाने दार उघडायला जाते.
नंदिनी (दरवाजात आईला पाहून उत्साहित स्वरात खूप प्रेमभराने) : आई ये ना आत. अशी अचानक कशी आलीस. साधा फोन पण नाही.
आई (नंदिनीला हलकेच जवळ घेत): अगं हे बघ तुझ्या आवडीचे मेथी घालून थालीपीठ केलं आहे. गरमागरम खाऊन घे. तुझ्याकडे लोणी असेल नसेल म्हणून एका डब्यात ते पण आणले आहे. फोन करण्यात उगाच वेळ दवडला नाही. बरं आज काय जेवलीस.
नंदिनी (अपराधीपणे): अगं आज अजून मी जेवले नाही. असेच कसले कसले विचार येत होते डोक्यात.
आई (किचन मध्ये जात) : तू हे गरम आहेत तोवर खाऊन घे आणि माझ्या लाडक्या जावयाला दोन तरी ठेव बरं. मी तोपर्यंत आपल्यासाठी फक्कडसा चहा करून आणते.
नंदिनी : हो बाई त्याच्यासाठी ठेवायलाच पाहिजेत.
आई (दोन कप चहा घेऊन येते आणि नंदिनीच्या बाजूला बसत) : काय गं नंदू मी आले तेव्हा दार उघडताना तुझा चेहरा का पडला होता. नीरजशी भांडण झालं का!
नंदिनी (बाजू सावरत) : अगं भांडण असं काही नाही. मी त्याला म्हटलं की ह्या महिला दिनाला आमच्या सखी महिला मंडळात सर्व जणींना त्यांचे नवरे महागाचे गिफ्ट देणार आहे. ह्याचं आपलं नेहमीचेच. लोनचे हफ्ते फेडायचे आहेत.
आई (तिला समजावत): अगं त्याचं बरोबरच आहे. एव्हढा मोठा फ्लॅट त्याने आपल्या सगळ्यांसाठी घेतला आहे. कधी त्याच्या आई बाबांना, कधी आम्हाला तर कधी तुझी नणंद सुमनला येऊन राहण्यासाठी.
नंदिनी (नाराज होत): आई तू नीरजची वकिली करायला आली आहेस का! त्यानेच तुला पाठवलं का?
आई : हे बरं आहे तुझं मी तुझ्यासाठी वेळ काढून आले तर तुझं आपलं काहीतरीच. नीरजचे तुझ्यावर खूप प्रेम आहे. इतकेच काय त्याचे अण्णा गावातील सधन शेतकरी आहेत तरी तो ते नको म्हणत असताना त्यांना दर महिन्याला पैसे पाठवतो. दर दोन दिवसांनी तुम्ही दोघं त्यांच्याशी व्हिडिओ कॉल वर बोलता. दोन तीन महिन्यांनी सुट्टी घेऊन भेटायला जाता. आम्हाला पण तो आठवड्यातून एकदा तरी फोन करतो.
नंदिनी: तू बोलतेस ते सगळं खरं असलं तरी मी काही नेहमी त्याला महागाचे गिफ्ट मागत नाही. ह्या विशेष दिवशी द्यायला काय हरकत आहे.
आई: अगं तुमच्या सगळ्या विशेष दिवशी तो आठवणीने तुला काहीतरी गिफ्ट आणतो. तुझा आवडीचा मोगऱ्याचा गजरा तर तो नेहमीच आणतो.
नंदिनी (स्वतःचा हेका न सोडता): हो पण त्या दिवशी ह्या सगळ्या आपल्या गिफ्ट सगळ्यांना दाखवणार, त्या किती महाग आहेत अशा फुशारक्या मारणार. मी आपली बावळट सारखी गप्पच बसणार. म्हणून मला असं वाटतं की महिला दिनाच्या दिवशी घराबाहेर पडूच नये.
इतक्यात पडदा पडतो आणि पहिला अंक संपतो.
