Login

एकतर्फी प्रेम असेही

About Love
लघुकथा स्पर्धा एप्रिल



"काय झाले गं रसिका? सर काही बोलले का तुला?

बॉसच्या केबिनमधून रडवेल्या चेहऱ्याने बाहेर आलेल्या रसिकाला रीनाने विचारले.

रसिकाने मानेनेच होकार दिला आणि ती रडायला लागली.

रसिकाला रडताना पाहून रीना तिला म्हणाली.

"सर्व बॉस सारखेच असतात. यांना फक्त रागावता येते. मला तर या बॉस लोकांचा खूप राग येतो."

"अगं, मला बॉस बोलले याचा राग नाही आला. माझ्या कामात खरंच खूप चुका होत्या. त्याचेच मला वाईट वाटतेय आणि रडू येते आहे."

आपले रडणे थांबवत रसिका रीनाला म्हणाली.

"तुझ्याकडून कशा झाल्या चुका? तू तर कामात अगदी व्यवस्थित असतेस."

रीनाने रसिकाला विचारले.

"मला काम व्यवस्थित करायला आवडते; पण सध्या घरातील टेन्शनमुळे माझी मनस्थिती बरोबर नाही. त्यामुळे माझ्याकडून काम करण्यात चुका होत आहे. सर प्रत्येक वेळी का समजून घेतील? त्यांचे रागावणे योग्यच आहे ना!"

रसिका आपल्या चुकांचे कारण सांगत म्हणाली.

"काय झाले आता टेन्शन येण्यासारखे?"

रीनाने विचारले.

"अगोदरच घरात खूप टेन्शन्स आहेत. त्यात ताईचे कुठे लग्नही जुळत नाही आहे. आता जे स्थळ आले होते तिकडूनही नकार आला आहे. या सर्व गोष्टींचा माझ्या मनात विचार सुरू राहतो, त्यामुळे कामात चुका होऊ लागल्या आहेत."

रसिका म्हणाली.

"अगं, पण तू सारख्या चुका करत राहिली तर तुझी नोकरी जाणार ना? म्हणजे अजून टेन्शन वाढेल. तू जास्त विचार न करता कामात लक्ष दे. होईल सर्व चांगले."

रीना रसिकाला समजावत म्हणाली.

रसिकाने रीनाचे हात आपल्या हातात घेत, रीनाच्या बोलण्याला होकार दिला. रसिकाच्या डोळ्यांतील आत्मविश्वास पाहून रीनाला आनंद झाला.

बॉसच्या केबिनमधून रडवेल्या चेहऱ्याने बाहेर आलेल्या रसिकाचा चेहरा पाहून, उदास झालेला गिरीश, आता रसिकाचा आनंदी चेहरा पाहून आनंदी झाला होता. रसिकाचा रडवेला चेहरा पाहून तो तिच्याकडे विचारपूस करायला जाणारच होता, पण बॉसने त्याला काही महत्त्वाचे काम पूर्ण करायला दिलेले होते. त्यामुळे तो ते काम करत होता. काम पूर्ण होताच त्याला बरे वाटले आणि 'आता रसिका व रीना यांच्याशी बोलूया.' असे त्याने ठरवले, पण तेवढ्यात रसिकाचा आनंदी चेहरा त्याने पाहिला. आणि मग त्याला बरे वाटले. चेहऱ्यावर आनंद आला. 'रसिकाला नेहमी असेच आनंदी राहू दे.' अशी त्याने देवाला प्रार्थनाही केली.


'मी तिच्यावर इतकं रागवायला नको होतं. माझ्या बोलण्याने ती किती दुःखी झाली! अगोदरच तिच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होते आणि माझ्या बोलण्याने तिला अजून टेन्शन आले. तिला असे दुःखी, उदास पाहून मला वाईट वाटते आहे. तिच्याकडून कामात अशा चुका कधी होत नाही पण सध्या खूपच चुका होत आहे. नक्कीच तिला काही टेन्शन असावे. म्हणून कामात तिचे लक्ष लागत नाही. कितीदा मनात येते की तिला आपल्या मनातील सर्व सांगावे पण तिच्याबद्दल मला जे वाटते ते तिलाही जाणवते का? तिच्या वागण्या बोलण्यातून असे कधी दिसले नाही. जाणवले नाही. मी आपल्या मनातील भावना तिला सांगितल्या आणि तिच्याकडून वेगळीच प्रतिक्रिया आली तर म्हणून काही सांगत नाही. तिच्याबद्दल मला जे काही वाटते ते फक्त एक आकर्षण नाही आहे. हे नक्की. ती मला मनापासून आवडते. ती सुंदर तर आहेच पण तिचे वागणे, बोलणे व तिचे काम सर्व काही मला खूप आवडते. प्रेमाची भावना ही हृदयातून असावी लागते आणि तिच्याविषयी माझी हीच भावना आहे. माझे तिच्यावर कितीही खरे प्रेम असले तरी ते एकतर्फी प्रेमच म्हटले जाईल ना! तिच्याकडूनही काहीतरी भावना असायला हवी ना!'

रसिकाला कामातील चुकांबद्दल रागावलेला तिचा बॉस शैलेश असा विचार करत होता.

तेवढ्यात केबिनच्या दारावर टकटक आवाज आला. त्याने आत येण्याची परवानगी दिल्यावर रसिका आत आली व तिने हातातील कामाची फाईल शैलेशसमोर ठेवली. शैलेश ती फाईल हातात घेऊन चेक करू लागला. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर राग न येता आनंद दिसत होता. रसिकाने नेहमीप्रमाणे आपले काम चोखपणे केले होते.

"रसिका मॅडम, तुम्हांला काही टेन्शन आहे का? तसे काही असेल तर सांगा आणि मी थोड्या वेळापूर्वी जरा जास्तच रागावलो. त्याबद्दल सॉरी."

शैलेश फाईल बघत रसिकाला म्हणाला.

बॉसचा आनंदी चेहरा व ते आपली काळजीने विचारपूस करत असलेले पाहून रसिकाला बरे वाटले आणि ती म्हणाली,
"सर, तुमची यात काही चूक नाही आहे. मीच चुकले होते. यापुढे नाही होणार अशा चुका."

एवढे बोलून रसिका सरांची परमिशन घेऊन केबिन बाहेर आली व आपल्या जागेवर रिलॅक्स होऊन बसली.


रसिका ही दिनकरराव व सुनिताताईंची दुसऱ्या क्रमांकाची मुलगी. दिनकरराव व सुनिताताईंना पहिली मुलगी झाल्यानंतर दुसऱ्या वेळी मुलगा होईल अशी अपेक्षा होती, पण दुसऱ्यावेळी मुलगीच झाली; त्यामुळे घरात तिच्या जन्मामुळे कोणाला विशेष आनंद झाला नव्हता. तिसऱ्या वेळी तरी मुलगा होईल. असे सासूबाईंना वाटत होते पण तिसरी मुलगीच झाली. सुनिताईंनाही वाईट वाटले, पण आई म्हणून त्या आपल्या मुलींची व्यवस्थित काळजी घेत होत्या. तिन्ही मुली देखणं रूप घेऊन जन्माला आल्या होत्या.

दिनकरराव मुंबईत एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. सुनीताताई आपल्या हुशारीने सुखाचा संसार करत होत्या. सर्व काही छान सुरळीत सुरू असताना,
दिनकरराव जिथे नोकरीला होते, ती कंपनी बंद पडली. ते दुसरी नोकरी शोधत होते ; पण नेमके तेव्हाच घरात आजारपण आणि इतर मोठे खर्च येत गेले. त्यात होती तेवढी बचत संपली. मोठी मुलगी दर्शनाने नुकतेच बी.ए. पूर्ण केले होते. रसिका एफ. वाय. बी. कॉम. ला होती व लहानी नम्रता दहीवीला होती. सुनीताताई होईल तसा आपला संसाराचा गाडा ओढत होत्या. दिनकररावांना एका ठिकाणी नोकरी मिळाली पण पगार जास्त नव्हता. दर्शना नोकरी करू लागली. रसिकाही कॉलेज करता करता पार्ट टाइम जॉब करू लागली.
तिच्या इतर मैत्रिणी आपल्या कॉलेज जीवनाचा व मैत्रीचा आनंद घेत होत्या, तेव्हा रसिका आपल्या घरातल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होती. आता दर्शनाच्या लग्नाचा विषय घरात सुरू झाला होता. स्थळे येत होती पण योग कुठे जुळून येत नव्हता.


रसिका सुंदर होती. हुशार होती स्वभावाने खूप चांगली होती. आपल्या कामामुळे तिची एक वेगळीच छाप इतरांवर पडत होती. आपल्या कामातून, जबाबदाऱ्यातून रसिकाला स्वतःचा विचार करायला कधी वेळही मिळत नव्हता. प्रेम वगैरे या गोष्टी तर खूप दुरच!
त्यामुळे आपल्या बॉसच्या मनातील भावना तिच्या मनापर्यंत पोहोचत नव्हत्या आणि आपल्या सोबत काम करणारा गिरीश हा आपला चांगला मित्र आहे. एवढेच तिला वाटत होते.

काही महिन्यांनी,
खूप प्रयत्नानंतर दर्शनाचे लग्न जुळले. घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. रसिकाने आपल्या ऑफिसमधील सर्वांना आपल्या बहिणीच्या लग्नाचे आमंत्रण दिले.
रसिकाच्या बहिणीच्या लग्नात रसिकाच्या ऑफिसमधील सर्वजण आले होते. बॉस शैलेश पण आला होता. रसिका खूप सुंदर दिसत होती.

'आत्ताच तिला आपल्या मनातले सांगून लग्नाची मागणी करावी.'

असे गिरीश व शैलेशच्या मनाला वाटत होते. पण मनातले तिला कसे सांगायचे? असा विचार ते दोघेही करत होते.


शैलशच्या मनात अचानक काय आले आणि त्याने रसिकाच्या वडिलांजवळ रसिकाच्या लग्नाची मागणी घातली. त्यांच्यासाठी हा आश्चर्याचा धक्काच होता. त्यांनी लगेच काही उत्तर दिले नाही.

"विचार करून व रसिकाशी बोलून सांगतो." एवढेच ते म्हणाले.

'आपण काही चुकीचे केले का? की जे काही केले ते बरोबर केले? आता जे पण उत्तर येईल ते स्वीकारू या. होकार आला तर खूपच चांगले आणि नकार आला तर मनाला वाईट वाटणार. पण जे सत्य असेल ते स्वीकारावेच लागणार.'
असा विचार शैलेश करत होता.


लग्नाच्या दुसऱ्या दिवशी,
रसिकाच्या बाबांनी रसिकाला सांगितले की, शैलेशने तिला लग्नाची मागणी घातली आहे. हे ऐकून तिला मोठा शॉकच बसला.

"कसे शक्य आहे? ते एवढे सुंदर, श्रीमंत आणि कंपनीचे बॉस आहेत. आणि त्यांनी मला लग्नाची मागणी घातली आहे. हे सर्व मनाला नाही पटत आहे."

रसिका बाबांना म्हणाली.


"रसिका, तू खरंच खूप भाग्यवान आहेस. शैलेशसारखा जोडीदार तुला मिळणार आहे. सर्व गोष्टी चांगल्या असताना नकार देण्याचे काही कारण नाही. तू या गोष्टीवर विचार कर."


'बाबा म्हणताय तसे खरे आहे. नकार देण्याचे काही कारणच दिसत नाही आहे. सर्व तर चांगलेच आहे.'

असा विचार करून आपल्याकडून तिने होकार सांगितला.

मनात काही शंका नसावी, म्हणून रसिकाच्या बाबांनी शैलेशची व त्याच्या कुटुंबाची माहिती काढली. सर्व काही चांगले असल्याचे कळताच दोन्ही कुटुंबात लग्नाची बोलणी सुरू झाली. रसिकाच्या ऑफिसमध्ये जेव्हा सर्वांना ही बातमी समजली तेव्हा सर्वांना खूप आनंद झाला. सर्वांनी तिचे व शैलेश सरांचे अभिनंदन केले. गिरीश जरी आनंदी चेहऱ्याचे नाटक करत होता पण मनातून खूप दुःखी होता.

'आपण आपल्या भावना रसिकाला सांगायला हव्या होत्या. आपण उशीर केला.'
असे त्याला वाटत होते.

"रसिकावर तू प्रेम करत होतास ना मग तिला सांगितले का नाही?"

रीनाने गिरीशच्या हसऱ्या चेहऱ्यामागचे दुःख ओळखून त्याला विचारले.

तिने असे विचारताच,
"मी माझ्या भावना व्यक्त करायला खूप उशीर केला." असे म्हणत तो रडू लागला.

"तुझ्या नशिबात रसिका नव्हती असे समज आणि पुढे चल. तुझ्या नशिबात दुसरी कोणी असेल."

रीनाने त्याला समजावले.

आपले एकतर्फी प्रेम अपूर्ण राहिले. याचे गिरीशला वाईट वाटले पण रसिकाविषयी त्याने कोणतीही वाईट भावना मनात ठेवली नाही आणि तो मोठ्या आनंदाने तिच्या लग्नाला गेला.

जेव्हा शैलेशने रसिकाला आपल्या मनातील भावना, प्रेम हे सर्व सांगितले तेव्हा रसिकाला खूप आनंद झाला व एकतर्फी प्रेम असेही असू शकते. असा विचार तिच्या मनात आला. आणि तिने त्या प्रेमाचा आनंदाने स्विकार केला.


समाप्त
नलिनी बहाळकर
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →