निशिगंधा भाग 9
तुला समजून घेतांना...
तुला समजून घेतांना...
©️®️शिल्पा सुतार
शरद, निशिगंधा, रेखा ताईंचा दिनक्रम सुरू झाला...
" तुझं म्हणजे ऑफिस सारखं काम सुरू असतं निशिगंधा. टार्गेट वर टार्गेट. नुसती बिझी." शरद किचन मधे मदतीला आला.
"एवढ करूनही आमचा बॉस कधीच खुश नसतो अहो. ऑफिसला तरी रविवारी सुट्टी असते. आम्हाला तर उलट रविवारी जास्त काम असतं. परत आमच्या कामाचा मोबदला मिळत नाही. उलट दोन शब्द ऐकायला मिळतात की तू करतेस काय? पाहुणे आले तर विचारूच नका. आम्हाला सिक लीव ही नसते. आजारी असतांना थोड का होई ना उठून करावं लागत. गृहिणी असणं म्हणजे थँक्सलेस जॉब. " निशिगंधा भाजी चिरत म्हणाली.
आता शरद कांडवल्यासारखा झाला होता. तो सुद्धा इतके वर्ष असंच करत होता. निशिगंधा घरी काय करते असं त्याला वाटत होतं. उठ सूट हे झालं नाही, ते झालं नाही यावरून तो बोलला होता. मुलांना कमी मार्क मिळाले की तिला बोलणी बसत होती. तिने किती सहन केलं असेल. अजून ही करते आहे.
एकदा असच तिला ताप होता. तिने म्हटलं सकाळी मुलांच आवरून द्या. मी स्पष्ट नकार दिला होता. उलट त्या दिवशी थोड लवकरच ऑफिस मधे निघून गेलो होतो. आम्ही आजारी असतांना ती जागेवर सगळं देत होती.
कितीतरी वेळा निशिगंधाने रेखाताईं बद्दल सांगायचा प्रयत्न केला. पण मी ऐकलं नाही. तिला फक्त मन मोकळं करायचं होतं. जबाबदारी तर चुकणार नव्हती. तरी मी ऐकून घेतलं नाही.
आता फक्त दोनच दिवस घरी राहिल्यावर समजतं की आई खूप त्रास देते. मला तर अश्या वातावरणात वेड लागेल. नोकरी तरी बदलू शकतो. घरच्या लोकांच काय करणार ना.
संध्याकाळी नेहा आली. ते चौघे बोलत बसले. ते जेवण करून जाणार होते.
" वहिनी जास्त भूक नाहिये फक्त मसाले भात करा." नेहा मदतीला होती.
" अस कसं? निशिगंधा पोळी, भाजी, कोशिंबीर ही कर. जावई आहेत." रेखाताई म्हणाल्या.
जेवण झालं. ते घरी गेले. शरद, निशिगंधा छान शतपावली करून आले.
"अहो मला उद्या आमच्या महिला मंडळात जायचं आहे."
"हो जा."
निशिगंधाचा मैत्रिणींचा एक ग्रुप होता. पंधरा दिवसातून एखादा कार्यक्रम असायचा. ती छान तयार होवून गेली. चार तासाने परत आली.
" काय मग खुश आहेस निशिगंधा." शरद पुढे बसलेला होता.
" हो अहो, आम्ही मैत्रिणीं ट्रिपला जाणार आहोत तर तुम्ही दोन दिवस आईंकडे बघणार का?"
"हो जाऊन ये."
" मी आज पहिल्यांदा तिथल्या तिथे पिकनिक साठी होकार दिला. कारण तुम्ही घरी आहात ना." निशिगंधा म्हणाली.
" हो, मी आईकडे बघेल. चल आपण चहा घेवू."
" तुम्ही काय केल?"
" काही नाही अर्ध पुस्तक संपवलं. आता बागेत फिरून येवू." शरद म्हणाला.
" चालेल."
घरी आल्यावर निशिगंधाने स्वयंपाक केला. तिने उद्याची तयारी केली. सकाळी लवकर ती निघाली.
त्या दोन दिवसात रेखाताईंनी शरदला खूप त्रास दिला. त्यांचं करणं खूप अवघड आहे हे त्याला समजलं. जरा बसू दिलं नाही.
"आई तू कुठलीही गोष्ट अजिबात ऍडजेस्ट करत नाही. तूला सारखी स्पेशल ट्रीटमेंट का हवी असते? आवाज दिल्या बरोबर एका सेकंदात तुला कोणीतरी समोर हवं असतं. तुला माहिती ना आमच ही वय झालं. आता जरा स्वभाव बदल. " शरद ओरडत होता.
"मी तर म्हणतच होती की निशिगंधाला मैत्रिणींसोबत पाठवू नको." रेखाताई म्हणाल्या.
" पाठवू नको म्हणजे? ती काही लहान आहे का? ज्याने त्याने ज्याच त्याच काम करावं. तुला मी काय म्हणतो आहे ते समजत नाही का आई? निशिगंधा थकत नाही का? हे काय सुरू आहे? तिने कुठे जायचं नाही का? तिच्यावर कायम जबाबदारी हवी का? ती पण पन्नास प्लस आहे. तिला थोडं तिच्या मनासारखं जगू दे ना." शरद म्हणाला.
" मला माहिती आहे तिने तुझे कान भरले आहेत म्हणून तू माझ्याशी असं वागतो. " रेखाताई रागात होत्या.
"अजिबात नाही. मला दिसतं ना तू किती विचित्र वागते. कान भरायचे असते तर लग्नाच्या इतक्या वर्षातच भरले असते. आई जरा शांत रहात जा. नाहीतर तू एकटी पडशील. " शरद समजावत होता.
तो संध्याकाळी फिरायला निघून गेला. रात्री मित्रांसोबत जेवण करून आला. रेखाताई हॉल मधे बसून होत्या. त्याने आईसाठी जेवणाचं पार्सल आणलं. घरी आल्यावर त्याने ते रेखाताईंकडे दिल. त्या वाढून द्यायची वाट बघत बसल्या. शरद टीव्ही बघत बसला. त्यांनी स्वतः च्या हाताने वाढून घेतलं.
इथे माझा मुलगा माझं काही करत नाही. काय करणार? त्यांची बडबड सुरू होती.
घरातल्या जेष्ठ लोकांच कोणाकडून काम होत नाही. घरची सून ते नीट करते. तिला त्यांच्या सवयी माहिती असतात. ती त्यांची नीट काळजी घेते. अजिबात गैरसोय होवू देत नाही.
पण अशी चांगली सूनबाई जेष्ठ लोकांना नकोशी असते. तिला नेहमी बोलणे बसतात. जो करतो त्याला ऐकावं लागत हे खर.
त्या दोन दिवसातही त्या दोघांचं भांडण झालं. जे इतके वर्ष निशिगंधा सोबत झालं नव्हतं. रेखाताई समजल्या शरद ऐकणाऱ्या मधला नाही.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
