Login

निशिगंधा भाग8

एकाच ह्या जन्मी जणू फिरून नवी जन्मेन मी
निशिगंधा भाग 8
तुला समजून घेतांना...

©️®️शिल्पा सुतार

मूल परत गेले. निशिगंधा, शरदचं रूटीन लाइफ सुरू झालं.

सकाळचा वेळ तर असाच गेला. शरदला घरात कंटाळा आला होता. जरा वेळ पेपर वाचला. नेहमीप्रमाणे कामासाठी मावशी आल्या. निशिगंधा तिच्या रोजच्या कामात बिझी होती. आज शरदच्या आवडीचा नाश्ता होता. भरपूर खाणं झालं. निशिगंधा आणि शरदने मिळून बागेत रोपं लावले. थोड्या वेळाने निशिगंधाने स्वयंपाक करून घेतला.

"जेवायला बसायचं का?" तिने विचारलं.

" आत्ताच तर खाणं झालं ना. नाश्ता केला. मला भूक नाहिये. " शरद म्हणाला.

"आपलं ठीक आहे पण आईंना चालणार नाही. त्या चिडतील." निशिगंधाला अनुभव होता.

"या वयात तिला इतक पचत?" शरद सहज म्हणाला.

" अहो..." निशिगंधा ओरडत होती.

शरदला आठवलं एकदा असच आई बारा वाजता जेवायला मागत होती. निशिगंधा म्हणाली की अर्धा तासात पोळ्या करते, आत्ताच तर खाणं झालं. तर मी किती जोरात ओरडलो होतो. आईला वेळेवर जेवायला देत जा. तिच्या बाबतीत हयगय चालणार नाही. तिला गोळ्या असतात.

घरात हे असं चालत होतं की काय? निशिगंधा कायम किचन मधे बिझी होती. ते ही इतके वर्ष.

"निशिगंधा सॉरी. " शरद म्हणाला.

" काय झालं? "

" काही नाही अश्या जुन्या गोष्टी आठवल्या. माझ्या जवळ बस थोडी."

"काम पडले आहेत. आई चिडतील." निशिगंधा म्हणाली.

"आई कशाला चिडेल?"

" बघा आता तुम्हीच. इथे ऑफिस पेक्षा कडक वातावरण असतं. " निशिगंधा हसत म्हणाली.

साडेबारा झाले. रेखाताईंनी आवाज दिला. "आज जेवायला आहे की नाही?"

शरदला आश्चर्य वाटलं. "आईचा हा कसा आवाज आहे. तू कशी ऐकून घेतेस निशिगंधा?"

"त्या काही आज अस बोलत आहेत का? नेहमीच अस करतात. मी दिसली की चिडून बोलतात. त्यांना खरच कोणी काही म्हणत नाही म्हणून अस वागायची सवय झाली आहे. " निशिगंधा म्हणाली. एकदम गप्प बसली.

" मला समजत आहे ते निशिगंधा. तू मोकळ बोलू शकतेस. हा त्रास आहे. मग तू का नाही काही म्हणालीस? "

" हे घर आहे. याचं रणांगण झालं असतं. मी थोडा प्रयत्न केला होता पण त्या ऐकतच नाही. उगीच मी काही म्हणते त्या उत्तर देतात. वाद वाढतो. परत मी अस का करते याच कारण तुम्हाला समजल नसतं. तुम्हाला वाटलं असतं मी तुमच्या आईला त्रास देते. त्यापेक्षा गप्प बसलेलं बरं. जावू द्या बोलून उपयोग नाही. उगीच आपल्याला त्रास होतो. बाकीचे तर स्वभाव बदलणार नाहीत. " निशिगंधा म्हणाली.

शरद विचार करत होता मला इतके दिवस हे लक्ष्यात का आलं नाही.
" आईला बोलायची आणि तुला सहन करायची सवय लागली आहे निशिगंधा. "

" काय करू मग? जे आहे ते ठीक आहे. "

निशिगंधाने रेखाताईंना जेवायला दिलं. थोड्यावेळाने ते दोघे जेवायला बसले.

"आपण आपलं एक काहीतरी टाईम टेबल करून घेऊ. " शरद म्हणाला.

"हो चालेल. पण रोज त्याच वेळी मला फिरायला येता येणार नाही. कारण मंगळवार आणि गुरुवार आईंची मोठी पूजा असते. त्यांना देवघरात मदत करायची असते."

" सगळं सामान देऊन दिलं तर काय बघायचं. ती तिची पूजा करेल ना. " शरद म्हणाला.

" उद्या त्यांची पूजा आहे. तुम्हीच बघा. " निशिगंधा म्हणाली.

" हे अस टेंशन मधे तू इतके वर्ष जगते आहेस." शरदला कसतरी वाटलं.

"सून असणं इतकं सोप आहे का? मिनिटा मिनीटाला परीक्षा असते. सगळ्यांना जोर करायचा असतो. मग लग्नाला किती का वर्ष झाले असेना. काही फरक पडत नाही. ठीक आहे, आता मला काही वाटत नाही. तुम्हाला ही सवय होईल. " निशिगंधा म्हणाली.

शरदने छान पुस्तक मागवले होते. तो रात्री वाचत बसला. सकाळी उशिरा उठला. निशिगंधा बागेत फुल काढत होती. एकीकडे झाडू फारशी झालेली होती. तिची धावपळ सुरू होती.

रेखाताई नुसत्याच देवासमोर बसलेल्या होत्या. हे दे, ते दे नुसतं सुरू होतं. दोन मिनिट ही त्यांनी निशिगंधाला आरामात बसू दिलं नाही. शेवटी त्यांनी पोथी वाचायला घेतली तेव्हा शांतता झाली.

निशिगंधा लगेच किचनमध्ये पळाली. स्वयंपाक सुरू झाला. कारण पूजा झाल्यानंतर लगेचच रेखाताई जेवायला बसतील. तिथे उशीर झाला तर परत गोंधळ होईल. तेवढ्यात तिने शरदला चहा दिला.

बायकांमध्ये खूपच समजदारपणा आणि संयम असतो. एवढा माझ्यात नाही. माझीच आई आहे तरी मला सहन होत नाही. या बायका लग्न करून दुसऱ्या घरी जातात. त्यांच सगळं आवरतात. परत तोंडातुन एक शब्द काढत नाही.

त्याला निशिगंधाचा कौतुक वाटत होतं. त्याबरोबर अस ही वाटत होतं की आईने आता जरा थोडं समजून घ्यायला हवं.

शरद काय करेल? रेखाताईंना समजावेल की जे आहे ते असचं सुरू राहील... बघू पुढच्या भागात.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →