निशिगंधा भाग 5
तुला समजून घेतांना...
तुला समजून घेतांना...
©️®️शिल्पा सुतार
निशिगंधाला होणारा त्रास शरदला बर्यापैकी समजला होता. तो तिच्या कलाने घेईल का? की परत पहिले पाढे पंचावन्न? पुढे बघू...
शरद स्वतः उठला. आईला पाणी देवून झोपायला सांगितलं. त्या त्याला काहीतरी सांगत होत्या, त्याने ऐकलं नाही. रेखाताईंना समजलं शरद नाराज आहे.
रात्री निशिगंधा रूम मधे आली. ती आवरत होती. शरद तिच्याकडे बघत होता. ही खरच शांत छान आहे. हिची काही तक्रार नाही. म्हणून तिला गृहीत धरलं जात वाटतं. पण आता पुरे झालं आमचं ही वय झालं. " निशिगंधा सॉरी."
" का?" तिने विचारलं.
"ते मी आईच्या खिचडीच बोललो."
"ते होय. ठीक आहे ना. एवढ टेंशन घेवू नका. तुम्ही आज मला काही पहिल्यांदा बोलले का? घरात काही झालं तरी मीच दोषी असते ना. आता मला असं ऐकायची सवय आहे. झोपा. उगीच काळजी करू नका. उद्या प्रोग्राम आहे." ती सहज म्हणाली.
"निशिगंधा ऐक ना. दोन मिनिट इथे बस. मला तुझ्याशी बोलायच आहे."
तिला समजल शरद सिरियस आहे. ती त्याच्या जवळ बसली.
" यापुढे अस होणार नाही. मी माफी मागतो. "
"अहो काय झालं? " ती त्याच्याकडे बघत होती.
" आता आपलं नव्याने आयुष्य सुरू होणार आहे. त्याची ही पायरी. एकमेकांना समजून घेवून सुखात राहू. " त्याने हात पुढे केला. निशिगंधाने तो मिळवला. तिला समजलं उद्या हे रिटायर होणार आहेत म्हणून हळवे होत आहेत. इतके वर्ष बिझी होते. अचानक खूप मोठी पोकळी निर्माण होते आहे.
" अहो काळजी करायची नाही. आपण खरच खूप छान वेळ घालवू. यापुढे काहीही झालं तरी लक्ष द्यायचं नाही. आपण नीट राहू." निशिगंधा म्हणाली. शरद झोपला.
ती विचार करत होती... काय करू नवी सुरुवात करू का? की जून झालेलं... हे वागलेलं आठवत राहून... यांच्यावर आगपाखड करू. मला अस वागता येणार नाही. हे तसे खूप चांगले आहेत. जावू दे. भांडण करायचं नाही. मला ही मानसिक शांततेची गरज आहे. जे झालं ते गेलं. माझ्या नशिबात असेल.
निशिगंधा सकाळी लवकर उठली. ती आवरून आली. आज घर पाहुण्यांनी भरलं होतं. सगळ्यांची गडबड सुरू होती. निशिगंधा कामात होती. तस आता हल्ली तिच्याकडून ही विशेष काम होत नव्हतं. साक्षी, सोहम, पूनम, सचिन सगळेच मदत करत होते.
रेखाताई नेहाची वाट बघत होत्या. त्यांची लेक, जावई येणार होते. तसे ते नेहमीच येत होते. जवळ रहायला होते.
थोड्या वेळाने नेहा आली. ती सगळ्यांना भेटत होती. छान बोलत होती. ती आल्यामुळे रेखाताई उत्साही होत्या.
"निशिगंधा अग यांच चहा पाण्याचं बघ. किती उशीर. हिला किती सांगा हीच आवरत नाही. जावई आलेले आहेत. त्यांची ठेप नको का ठेवायला? शरद जरा बाहेर येवून बस." चारचौघात रेखाताई निशिगंधाला ओरडल्या.
"आजी जावई काय. सचिनला काही हव तर तो सांगेल. आई तयार होते आहे. अशी मोठ्याने बोलू नकोस." साक्षी म्हणाली.
" साक्षी मी तुझ्या नवर्यासाठी म्हणत नाही . तुझी नेहा आत्या आली ना. मी त्या जावयां बद्दल म्हणते आहे. " रेखाताई म्हणाल्या.
साक्षीला राग आला होता. ही आजी कधीच आईला, मला आपलं मानत नाही. हिच्यासाठी माझा नवरा महत्वाचा नाही आणि लग्नाला इतके वर्ष झाले तरी नेहा आत्या आणि ते मामा महत्वाचे. हिचे लाडके.
सोहमने फोन लावला. "आजी बाहेरून नाश्ता येत आहे. दहा मिनिट थांब."
" बापरे, आजही बाहेरच का? यांना घरी काही करायला नको. चांगलं वाटत का? तो पर्यंत तुझ्या आत्या, मामाचा चहा ठेवा. " रेखाताई म्हणाल्या.
" आजी आज प्रोग्राम आहे. आजही आई काम करत बसेल का? आज दिवसभर बाहेरून जेवण येणार आहे. आणि तू थोड शांत हो." सोहम ओरडला.
साक्षी किचन मधे आली. ती चहा करत होती. "आजी जास्त करते. जस काही आत्याच नवीन लग्न झालं आहे. त्यांच्या लग्नाला पंचवीस वर्षापेक्षा जास्त वर्ष तरी झाले असतिल. तरी काय त्या जावयाने अजून यांना समजून घेतल नसेल का?"
निशिगंधा घाईने किचन मधे आली. "अग साक्षी असू दे मी करते. "
" वाह आई, किती गोड दिसते आहेस."
निशिगंधाने निळ्या रंगाची पैठणी नेसली होती. केसांची छान हेअर स्टाईल केली होती. थोडासा मेकअप होता. मॅचिंग टिकली. बांगड्या घातलेल्या. लांब मंगळसूत्र शोभत होतं.
" ही साडी हा रंग खूपच छान आहे साक्षी. मस्त नेसली गेली. थँक्यू बेटा. खूप छान गिफ्ट दिलं." निशिगंधा खुश होती.
पूनम ही मागून आली." आई आत्ताच चहा झाला ना. तुम्ही इथे काय करताय? जा बर आरामात बसा. किती सुंदर दिसताय. " ती निशिगंधाचे दागिने नीट करून देत होती.
"हो ना आता काय करणार पण. आजी सारखं कामाला लावते. आत्यासाठी चहा करायला सांगितला. " साक्षी म्हणाली.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
