Login

नवे पाऊल - नवी दिशा ( पन्नास रुपयाची नोट)

Short Film Review
*पन्नास रुपयांची नोट*

आत्ताच ११ एप्रिल रोजी इरा ब्लॉगिंग चा सातवा वर्धापन दिन झाला. तुमची आमची IRA आता सात वर्षांची झाली आणि आता अगदी धावायला लागली आहे. जेव्हा ईरा एक वर्षाची झाली आणि मग दोन वर्षांची झाली होती तेव्हा आम्ही गमतीत म्हणायचो की आता ही बालिका रांगायला लागली आहे, उभी राहते आहे, मग ती चालायला लागली आणि आता एक जागी बसत नाही. मागच्यावर्षी जेव्हा ती सहा वर्षाची झाली तेव्हा मी म्हणालो की आमची इरा आता पहिलीत आली आहे.
हे सांगणं म्हणजे गमतीचा भाग सोडला तर ते कौतुक होतं, इरा ब्लॉगिंगला आम्ही म्हणजे आपण सर्वांनी कसं वाढताना आणि प्रगत होताना पाहिलं आहे.

तो महत्वाचा मुद्दा हा आहे की एक एक पाऊल पुढे जाताना प्रत्येक वेळी काहीतरी नवीन प्रयोग करायचा हे इराला जमतं म्हणजेच हे शांत आणि संयमी विचारांच्या संजना मॅम ला बरोबर कळत. सतत काहीतरी नवीन करण्याचा ध्यास त्यांना असतो, काहीतरी वेगळं करण्याची धडपड असते.

आपण पाहिलं तर लक्षात येईल की लेखक -लेखिकांना पेमेंट सुरू करण्याची गोष्ट असो की IRA champions trophy असो नेहमी काहीतरी नवीन पाऊल उचललं गेलं आहे.
शिवाय चॅम्पियन्स ट्रॉफी देखील दर वर्षी एक सारखी असत नाही, एका वर्षाची ट्रॉफी दुसऱ्या वर्षी वेगळीच असते, प्रत्येक वेळी त्यातल्या फेऱ्या बदलतात, त्यातली आव्हानं बदलतात. म्हणजे लेखकांचा चौफेर खेळता यावं असं व्यासपीठ नेहमी उपलब्ध झालं आहे.
केवळ लेखन न करता, व्हिडिओ बनविणे, मुलाखती घेणे, स्टँड अप कॉमेडी, डिजिटल नाटक किंवा रील्स बनवणे असो किती ते वेगवेगळे चॅलेंजेस.
लेखकांचं स्नेहसंमेलन देखील यापैकी एक!

अशी नेहमीच अवघड वाटेवरून चालणारी , प्रगतीशील इरा आता एका नवीन क्षेत्रात प्रवेश करत आहे, या गोष्टीचा खूप आनंद झाला. "पन्नास रुपयांची गोष्ट!"
शॉर्ट फिल्म ही आजच्या काळाची गरज आहे, कमी वेळात जास्त सांगणं आणि प्रबोधन न करताही काहीतरी शिकवणं हे गरजेचे आहे.
संजना मॅम यांनी लिहिलेली ही कथा मनाचा ठाव घेणारी आहे आणि त्यावर ज्या प्रकारे अगदी तांत्रिक पद्धतीने प्रोफेशनली किंवा व्यावसायिक पद्धतीने शूटिंग करून चांगल्या कलाकारांसोबत बनवली आहे ते खरंच स्तुत्य आहे.
शॉर्ट फिल्म मध्ये सासू सुनेला पन्नास रुपये परत मागते ते पाहून कुणालाही विचित्र वाटेल की सासूने किमान पाचशे हजार जरी परत मागितले असते तर काहीतरी वाटलं असतं, पन्नास रुपये का मागते आहे?

प्रत्येकाच्या मनात आपला एक हळवा हक्काचा कोपरा असतो एखाद्या वस्तुशी किंवा एक गोष्टीशी ती एक आठवण निगडित असते आणि त्या संदर्भाने आपण तसे वागू लागतो.
आपल्याला कळते की तिच्या सासूला पन्नास रुपयाची नोट खूप प्रिय आहे कारण त्या पन्नास रुपयाच्या नोटेसाठी तिने तिच्या लहानपणी तिच्या वडिलांचा संघर्ष पाहिलेला आहे. कथानक सांगत नाही, तुम्ही पहा.
मला खास आवडली कारण असा संघर्ष आम्ही सुद्धा केलेला आहेत.
पन्नास रुपयाची नोट हे नाव पाहतात मला माझ्या कॉलेजचे दिवस आठवले. माझे बीएससी झाल्यानंतर निकाल येईपर्यंत एका छोट्या तिसरीच्या मुलाची मी आग्रहाखातर ट्युशन घेतली होती. त्यावेळी त्यासाठी कुणी वीस तीस रुपये दिले तरी देखील खूप झालं पण त्या मुलाचे वडील जेव्हा मेला भेटायला आले तेव्हा त्यांना माझी इंग्रजी बोलण्याची पद्धत इतकी आवडली की ते म्हणाले माझ्या मुलाला तू इंग्रजी शिकव मी तुला महिन्याला पन्नास रुपये देईन .
मला खरंच वाटलं नाही की रोज एक तास शिकवल्याने मला पन्नास रुपये मिळतील!

त्याकाळी ती रक्कम खूप मोठी होती आणि मला तिचा पुरेपूर उपयोग झाला. त्या पन्नास रुपयात मी माझा महिना काढायचे. 32 रुपयांना माझा बसचा जनरल पास मिळायचा आणि राहिलेले 18 रुपये मी घरात छोटे-मोठे भाजीपाला आणण्यासाठी वापरायचे. त्यामुळे ती पन्नास रुपयाची नोट हे नाव वाचताच माझ्या भावना माझ्या आठवणीशी रिलेट करू लागल्या.
त्या सासूची ती आठवण काय असते? आणि सुनेचे डोळे कसे उघडतात? हे पाहण्यासाठी प्रत्येकाने आवर्जून पहावी अशी शॉर्ट फिल्म म्हणजे पन्नास रुपयाची नोट ! मी कथा सांगणार नाही. पहा.

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आणि डिजिटल पेमेंटच्या जमान्यात पर्समध्ये अगदीच पैसे न घेता फिरणारे आपण आपल्याला वेळ पडली तर त्या 50 नाही 20 रुपयांचा देखील महत्त्व कळून येतं .

शॉर्ट फिल्म, कथा आणि सगळ्या कलाकारांचा अभिनय देखील खूप आवडला. उत्तरोत्तर अशाच सुंदर कथांवरती ईरा ब्लॉगिंग कडून फिल्म बनवल्या जाव्यात.
खूप शुभेच्छांसोबत, तुमची आमची ईरा आपल्या सोबत अशीच खेळत बागडत नवीन नवीन पावले उचलत प्रगती करू दे हीच सहृदय शुभेच्छा.

*©® स्वाती बालूरकर, सखी*
१६.०४.२०२६
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →