लघुकथा लेखन स्पर्धा- एप्रिल:-२०२६
विषय:- अंतिम इच्छा
शीर्षक:- नवऱ्याचे लग्न
"तुझं डोकं ठिकाणावर नाहीये सध्या! काहीही काय म्हणतेस तू?" शेखर रागाने म्हणाला.
त्याचे ती भेदक नजर बघून क्षणभर सौम्याला धडकीच भरली; पण ती तिच्या निर्धारावर ठाम होती.
आवंढा गिळत मनाचा हिय्या करून ती त्याला शांतपणे म्हणाली,"माझं डोकं ठिकाण्यावरच आहे. जरा डोकं शांत ठेवून विचार करा ना."
"विचार काय करायचा यात? तुला मी आधीच म्हणालो आहे, तू म्हणशील ते सगळं काही करेन मी, फक्त ती एक गोष्ट सोडून." तो पुन्हा डोळ्यांत रागीट भाव आणत म्हणाला.
"तुम्ही शब्द दिला आहे आणि ती माझी अंतिम इच्छा आहे. एव्हढंसुद्धा तुम्ही पूर्ण करणार नाही का?" तिने आता आपले अश्रूंचे शस्त्र वापरले.
तिच्या डोळ्यांतील पाणी बघून त्याचे हृदय विरघळू लागले. ती म्हणजे त्याची कमजोर कडी होती आणि त्यात तिच्या डोळ्यांतले पाणी त्याला बघवत नव्हते. ते पाहून तो नरमला.
"दुसरी कोणतीही इच्छा सांग गं, राणी. मी पूर्ण करेन; पण हे माझ्याच्याने नाही होणार. तुझ्याशिवाय या हृदयात कोणालाही जागा नाही. प्लीज, तू समजून घे ना, गं." तो तिला हृदयाशी लावत कातर आवाजात म्हणाला.
"माहिती आहे मला की माझी जागा तुम्ही कोणालाही देणार नाही. देऊच नका; पण नवीन जागा निर्माण करू तर शकता ना!" ती त्याच्या पाठीवर हात घट्ट रोवत म्हणाली.
"कसं सांगू तुला समजतं नाहीये मला. आता तू आराम कर. एक महत्त्वाची मिटिंग आहे मला, मी ऑफिसला जाऊन येतो. टेक केअर, डियर. बाय." असे म्हणत तो तिच्यापासून बाजूला होत प्रेमाने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि निघून गेला.
त्याचे पाणावलेले डोळे तिच्या मनाला छळत होते.
सौम्या आणि शेखर यांचं पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोघांमध्ये खूप प्रेम होते. दृष्ट लागण्याजोगा त्यांचा सुखाचा संसार होता. पण या सुखाला सौम्याच्या आजारपणाची नजर लागली. ती सतत आजारी पडू लागली. डोके तिचे प्रचंड प्रमाणात दुखायचे आणि त्यात तापही येई. इलाज चालू झाला. सुरुवातीला गोळ्या औषध घेऊन बघितले. तात्पुरते कमी होई. पुन्हा महिन्याभराने तेच दुखणं डोकं वर घेई. वारंवार होणाऱ्या या आजारामुळे तिची तब्येत खालावली. म्हणून डाॅक्टरांनी तिच्या पूर्ण शरीराची तपासणी करून घ्यायला सांगितले. सगळ्या तपासण्या केल्यावर जे निनाद झाले. त्यामुळे त्यांचे पूर्ण घरच हदरले.
तिला कॅन्सर आहे, तेही तिसऱ्या स्टेजचे, ज्यातून तिचे वाचण्याचे चान्सेस फारच कमी म्हणण्यापेक्षा नाहीच असे डाॅक्टरांनी सांगितले.
फार फार तर तिच्याकडे सहा महिने आहेत. शक्य तितकं तिला खुश ठेवा, तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, तिची काळजी घ्या असे डॉक्टरांचे म्हणणे होते.
तिच्या आजारपणाबद्दल कळताच शेखरच्या पायाखालची जमीन सरकली. मेंदू सुन्न झाला होता. त्याचे तिच्यावर जीवापाड प्रेम होते. ती आता काही दिवसांची सोबती आहे म्हटल्यावर तो आतून पूर्णपणे तुटला होता; पण तरीही तिच्यासाठी त्याने खंबीर उभे राहण्याचे ठरवले. तिची तो खूप पुरेपूर काळजी घेत होता. तिच्या तोंडातून शब्द निघत नाही तोच तिची प्रत्येक इच्छेचा मान राखत ते पूर्ण करायचा. तिला या आजाराबद्दल कळणार नाही याची त्याने पुरेपूर काळजी घेतली होती ; पण म्हणतात ना सत्य लपून राहत नाही.
एके दिवशी कपाट आवरताना त्याने लपवून ठेवलेली फाईल तिला सापडली. त्या दिवशी ती आतून पूर्णपणे हादरून गेली. खूप रडली होती ती. त्याला जाबही विचारला होता तिने. तिच्या काळजीने सांगितले नाही याने तिला अजून भरून आले.
एके दिवशी हाॅस्पिटलमध्ये तिची भेट तिची जीवलग मैत्रीण संध्याशी झाली. संध्याचे लग्न तिच्या आधी झाले होते. लग्नानंतर तिच्याबद्दल काहीच कळले नव्हते. तिने जाणून घेण्याचा प्रयत्न केला; पण तिला काहीच कळले नव्हते. त्यानंतर त्यांच्यात दुरावा आला होता.
दोघींंची अचानक भेट झाल्याने एकमेकांना खूप आनंद झाला होता; पण नंतर तिला कळलं की संध्याचा नवरा मिलिटरीत होता. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्याला सीमेवर तैनात व्हावे लागले. तो तेव्हा गेला ; पण परत मात्र त्याचे पार्थिवच आले. त्याच्या मृत्यूला संध्याच्या सासरच्या मंडळींनी तिला आणि तिच्या पायगुणाला दोषी ठरवून तिला घराबाहेर काढले. नंतर तिने नर्सिंगचे कोर्स केला आणि हाॅस्पिटलमध्ये काम करत होती. आताही तिची बदली झाल्याने ती या हाॅस्पिटलमध्ये आली होती.
संध्याबद्दल कळल्यावर सौम्याला खूप वाईट वाटले होते आणि जेव्हा सौम्याच्या आजारपणाबद्दल संध्याला कळले तेव्हा तिचे काळीज हेलावून गेले. ती तिची आस्थेने विचारपूस करून काळजी घेत होती.
आजार जास्त वाढल्यावर सौम्याला हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिचे डोक्यावरील केस गळून गेले होते. शरीर आधीपेक्षा जास्त कमजोर झाले होते. डोळे खोल जाऊन त्याखाली काळी वर्तुळे झाली होती. तिला रात्रंदिवस शेखरची काळजी वाटू लागली. तिच्या नंतर त्याचे काय होईल ही काळजी तिच्या मनात घर करून गेली.
अशातच तिचे लक्ष तिची काळजी घेणाऱ्या संध्याकडे गेले. ती आणि शेखर हसून बोलतं होते. एव्हाना दोघांमध्ये छान मैत्री झाली होती. शेखरला संध्याबद्दल सहानुभूती होती. त्यामुळे तो तिच्याशी चांगलेच बोलायचा आणि वागायचा. त्या दोघांना बघून तिच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. तिने खूप विचारपूर्वक एक निर्णय घेतला.
तिने संध्याला जवळ बोलावले आणि तिचा हात हातात घेऊन म्हणाली,"मी काही मागितले तर तू मला देशील का?"
"हो देईन ना, तुझ्यासाठी जीव द्यायला तयार आहे मी. बोल काय हवंय तुला?" संध्याने तिचा हात दाबत हसत म्हणाली.
"जीव नको, फक्त शब्द दे." सौम्या म्हणाली.
"दिला शब्द. बोल काय हवे?" संध्याने शब्द दिला.
"तू हवीस मला." ती तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाली.
"म्हणजे मला समजले नाही." ती प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाली.
"माझ्या शेखरच्या आयुष्यात येशील, त्यांची बायको म्हणून. लग्न कर त्यांच्याशी, नाही म्हणू नकोस, प्लीज." संध्या तिनताड उडालीच. ती अशी मागेल तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. तिने आश्चर्याने पाहत तिचे हात सोडवून घेतले.
ती सरळ स्पष्टपणे नकार देत जाऊ लागली तेव्हा ती डोळ्यांत पाणी आणत तिला थांबवत म्हणाली,"संध्या, तू मला शब्द दिला आहेस. हवं तर ही माझी अंतिम इच्छा आहे असे समज. माझ्या शेखरला तुझ्याइतका योग्य जोडीदार मिळणार नाही. तू त्यांना सुखात ठेवशील याची खात्री आहे मला."
"अगं, मी तसा कधी विचार केला नाही. हे कसे शक्य आहे? तू वेडी आहेस, नवऱ्याच लग्न कोण लावत..ते पण.." संध्याचे बोलणे मध्येच तोडत सौम्या म्हणाली,"मग आता विचार कर. मी करणार नवऱ्याच लग्न, त्याच्या सुखासाठी..माझ्यानंतर शेखर खूप एकटे पडतील गं. त्यांचे कसे होईल या काळजीने माझे काळीज तीळ तीळ तुटतो गं. तूच त्यांना सांभाळून घेऊ शकतेस."
ती काहीच न बोलता तेथून निघून गेली. पण सौम्याचे शब्द तिच्या मनात सतत घोळत होते. तिच्या मनात वादळ उठले होते.
हीच गोष्ट जेव्हा सौम्याने शेखरजवळ मागितली तेव्हा तोही चिडला होता.
दिवसामागून दिवस जात होते. तशी सौम्याची तब्येत खालावत चालली होती. त्यात आता कोणतेही औषध घ्यायला आणि ट्रीटमेंट घ्यायला नकार देऊ लागली.
जो पर्यंत ते दोघे लग्नाला होकार देत नाहीत तोपर्यंत ती ना काही खाणार ना औषध घेणार असे स्पष्टपणे सुनावत उपोषण सुरू केले. किती समजावले तरी ती ऐकायला तयार नव्हती. शेवटी ते दोघे हतबल झाले आणि तिची इच्छा मान्य केली.
सौम्याच्या कोमेजलेल्या चेहरा आनंदाने उजळून निघाला. तिने संध्याला वधू आणि शेखरला वर पोशाखात तयार होऊन यायला सांगितलं. ते दोघे आल्यावर तिने स्वतःच्या गळ्यातले मंगळसूत्र थरथरत्या हाताने काढून शेखरच्या हातात दिले. नजरेने तिच्या गळ्याकडे खूण केली.
तिच्या डोळ्यांसमोर तिच्या गळ्यात मंगळसूत्र आणि भांगेत कुंकू भरायला लावले. त्याने जड अंतःकरणाने तिच्या इच्छेचा मान राखत तिने सांगितले तसे केले.
वधूवर वेशातील ते दोघे आणि तिच्या गळ्यातील मंगळसूत्र, भांगेतील कुंकू पाहून ती गालात हसली. तिच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटली आणि म्हणाली,"माझी अंतिम इच्छा पूर्ण झाली. तुम्ही दोघे सुखी राहा. आता मी आरामात देवाकडे जायला मोकळी झाले."
"ए असे नको बोलूस गं..मी कसा.." शेखरच्या तोंडून शब्दच फुटेना. तो तिच्या कुशीत शिरून रडू लागला. संध्यालाही भरून आले.
त्याला बाजूला करून सौम्याने त्या दोघांचे हात एकमेकांच्या हातात दिला आणि तिने समाधानाने डोळे मिटून घेतले कायमचे..
समाप्त -
